– आशिष निनगुरकर
एखाद्या चांगल्या प्रसंगाची सुरुवात राम-रामने होते तर एखाद्याच्या अंतिम प्रवासातही रामनामाचा घोष केला जातो. त्यामुळे तुम्ही रामनामाचा वापर कुठे करता त्यावर सगळे अवलंबून असते. जगातील चित्रपटसृष्टी ही फक्त पाच कथानकांवर चित्रपट तयार करते.
यात सूड किंवा बदला घेण्याची कथा क्रमांक एकवर आहे. रामायण आणि महाभारतातल्या प्रसंगांवरून अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. त्यापैकी काही यशस्वी ठरले, तर काही सुपर फ्लॉप, मात्र या कथानकांवरून चित्रपट तयार करण्याची प्रथा काही थांबलेली नाही. आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे रोहित शेट्टीचा नवा चित्रपट सिंघम अगेन.
देशभरात रामनामाचा जप सुरू असल्याने दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही चित्रपटात रामनामाचा जप करीत कोट्यवधींची कमाई करण्याचा घाट घातला आणि त्यासाठी सिंघम अगेनची निर्मिती केली. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हटल्यावर गाड्या तर उडणारच, पण या चित्रपटात जेव्हा तुम्हाला विमानाच्या वरून गाडी उडताना दिसेल तेव्हा तुम्हाला वाटेल की भौतिकशास्त्र आणि गुरुत्वाकर्षणाच्या आत्म्याला किती दु:ख झालं असेल आणि न्यूटनच्या वंशजांना किती वाईट वाटलं असेल.
बाजीराव सिंघमची पत्नी अवनी म्हणजेच करीना कपूरचं अपहरण होते, जसं रामायणामध्ये रावण सीतामातेला पळवून नेतो, इथेही तसंच आहे. चित्रपटात रामायणाचा संदर्भ घेण्यात आला आहे आणि सर्वांनाच माहीत आहे की श्रीरामने पुढे काय केलं, तेच सिंघम करतो. सिंघम अर्जुन कपूरच्या लंकेमधून आपल्या पत्नीला वाचवतो आणि यामध्ये त्याला रोहित शेट्टीच्या चित्रपटातील कॉप युनिव्हर्समधील सर्व स्टारचा पाठिंबा मिळतो.
चित्रपटाची कथा ट्रेलरमध्ये आधीच दाखवण्यात आली होती. त्यामुळे त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रोहित शेट्टीचा पूर्वीचा सिंघम देसी होता, म्हणून तो हृदयाला भिडला. या चित्रपटात उगाच मालमसाला जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्टार्स जबरदस्तीने घुसवण्यात आले आहेत. चित्रपटाची कथा रामायणाशी जोडली गेली आहे, जी आवश्यक वाटत नाही. प्रत्येक गोष्टीत श्रीराम नावाचा आधार का घेतला जातो? या बहाण्याने रामायणातील काही गोष्टी कळल्या तर हा मार्ग योग्य ठरणार नाही.
जर कोणाला रामायण समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी इतर मार्ग आहेत, ते रोहित शेट्टीचा चित्रपट का पाहतील? चित्रपटातील अॅक्शन सीन्सही ठीक आहेत. काही दृश्ये दिसायला खूपच मजेदार दिसतात, तर काही डायलॉग्ज एकदम खणखणीत वाटतात. एकंदरीत जर तुम्हाला स्टार्सची स्टाईल आणि स्वॅग पाहायचा असेल तर तुम्ही चित्रपट पाहू शकता. रणवीर सिंह तुम्हाला हसवतो, त्याची कॉमिक टायमिंग चांगली आहे.
अगदी शेवटी सलमान खानचा कॅमिओदेखील करतो, पण तो परिणामकारक वाटत नाही आणि हा चित्रपट तुम्हाला का आवडणार नाही हे तुम्हाला बघूनच कळेल आणि यासाठी क्रेडिट रोलच्या वेळी थिएटर सोडू नका, पण क्रेडिट रोलपर्यंत तुम्ही चित्रपटगृहात राहणार की नाही ही एक वेगळी बाब आहे.
अजय देवगणचा अभिनय ठीक आहे. दीपिका पदुकोण ही ट्रेलरमध्ये आहे तशीच दिसते. तिची भूमिकाही ट्रेलरपेक्षा थोडीशी जास्त आहे. या चित्रपटात बरेच स्टार्स आहेत. या कारणामुळे टायगर श्रॉफने कदाचित हा चित्रपट केला असेल, अन्यथा यात त्याच्यासाठी काहीच नाही. रणवीर सिंह नक्कीच तुम्हाला हसवतो आणि तोच हा चित्रपट सहन करण्याची ताकद देतो. अर्जुन कपूर गब्बरसारखा दिसतो.
रणवीर सिंहनेही हे स्वतः सांगितलं आहे, पण तो फक्त गब्बरसारखा दिसतो, गब्बरसारखा अभिनय आणि तशी भीती निर्माण करण्याचा त्याचा चांगला प्रयत्न आहे, पण तो पुरता फेल गेल्याचं तुम्ही पाहू शकता. अक्षय कुमारची सूर्यवंशीची भूमिका सूर्यवंशी चित्रपटाप्रमाणेच आहे. करीना कपूरसुद्धा विशेष इम्प्रेस करू शकलेली नाही.
सिंघम अगेनमध्ये रोहित शेट्टीचं दिग्दर्शन सरासरी आहे. त्याच्या आधीच्या चित्रपटात अनेक शिट्ट्या वाजवणारे सीन्स असतात, जिथे लोक कडकडून टाळ्या वाजवतात, पण इथं असं झालेलं नाही. खलनायक अगदी सहज मारल्यासारखा वाटला, मोठा ट्विस्ट नाही. इतके स्टार्स घेण्याऐवजी स्क्रिप्ट आणि पटकथेवर काम करण्याची गरज होती.
रोहितला वाटले चला रामायणावर आधारित सिंघम करू. म्हणजे नायकाच्या पत्नीला खलनायक पळवतो आणि मग नायक आणि त्याचे मित्र खलनायकाचा खात्मा करून नायिकेला कसे परत आणतात ते भव्यतेने दाखवू. प्रेक्षक मंदबुद्धी असल्याने मधे-मधे रामायणाचे प्रसंग दाखवू म्हणजे त्याला कळेल की हा चित्रपट रामायणावर आधारित आहे आणि इथेच रोहित शेट्टी फसलाय. कथेत काहीही दम नाही. केवळ रामायण आहे म्हणून खलनायक श्रीलंकेला पाठवला.
अगोदरच्या चित्रपटात जे जे दाखवले तेच त्याने या चित्रपटात दाखवले आहे. अजय देवगणने बाजीराव सिंघमची भूमिका पुढे यशस्वीपणे चालवली आहे. करीना कपूर त्याच्या पत्नीच्या अवनीच्या भूमिकेत आहे, जिला खलनायक अर्जुन कपूर (जुबेर हफीज) आपल्या कुटुंबीयांचा बदला घेण्यासाठी पळवतो. मग सिंघम सिंबा (रणवीर सिंह), शक्ती शेट्टी (दीपिका पदुकोण), सूर्यवंशी (अक्षय कुमार), सत्या (टायगर श्रॉफ) यांच्या मदतीने जुबेरला मारतो आणि अवनीला परत आणतो. रणवीर सिंह चित्रपटात थोडी रंगत आणतो, पण ती काही वेळासाठीच आहे.
टायगर श्रॉफला म्हणावी तशी भूमिका मिळालेली नाही. कदाचित दोन-चार वर्षांनंतर रोहित शेट्टी त्याच्या युनिव्हर्सल कॉप सीरिजच्या एखाद्या चित्रपटात टायगर श्रॉफला मुख्य भूमिका देईल. तसेही चित्रपटाच्या शेवटी रोहितने सलमान खानच्या चुलबुल पांडेला दाखवत सिंघमच्या चौथ्या भागाची तयारी केलेलीच आहे. चित्रपटाच्या संगीतात काहीही उल्लेख करावे असे नाही. चित्रपटाला दक्षिणेतील संगीतकार रवी बसरूरने संगीत दिलंय. तरी एकदा अनुभव घ्यायचा असेल तर बघायला जाऊ शकता.
-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)