घरफिचर्ससारांशह्युमन : अमानवीय वास्तव !

ह्युमन : अमानवीय वास्तव !

Subscribe

विपुल अमृतलाल शाह निर्मित डिस्नी हॉटस्टारवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘ह्युमन’ ही वेबसिरीज वैद्यकीय क्षेत्रातील काळे वास्तव अधिकचा मसाला टाकून दाखविण्याचा प्रयत्न करते. विषयाची गंभीरता लोकांना कळावी आणि पूर्ण वेळ ते स्क्रीनवर खिळून राहावे म्हणून यात अनेक इंटिमेट सीन्स आणि सबप्लॉट्स आणले जातात, पण एपिसोड्सची वाढलेली लांबी आणि कथेत अडथळा ठरणारे काही सबप्लॉट्स यामुळे ही वेबसिरीज उत्कृष्ट होण्यापासून काहीशी दूर राहते. पण कोविडकाळात मेडिकलसारख्या विषयांना केंद्रस्थानी ठेऊन, लसीकरणाची मोहीम जगभर सुरू असताना ड्रग्सट्रायलचे भयाण वास्तव समोर आणणारी सिरीज म्हणून याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

भारतात अनेक अशी प्रोफेशन्स आहेत ज्यांना नोबल प्रोफेशन्स म्हटलं जातं, त्यांचं काम समाजाला त्यांच्या कामाची होणारी मदत, यामुळे त्या प्रोफेशनबद्दल आणि त्यात काम करणार्‍या व्यक्तींबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराची भावना आहे. पण हाच आदर आपल्या डोळ्यावर पट्टी बांधतो आणि त्या प्रोफेशनमध्ये काम करणारीदेखील हाडामांसाची माणसं आहेत, हे आपण विसरून जाऊन त्यांच्या कामावर आणि काम करण्याच्या पद्धतीवर कधीच प्रश्न विचारत नाही, ना कोणीही त्यांच्याविरुद्ध प्रश्न विचारलेलं आपल्याला आवडतं. नेमका याच गोष्टीचा फायदा या क्षेत्रात काम करणार्‍या काही लोकांना होतो आणि ते या प्रोफेशनच्या नावाखाली स्वतःचे उद्देश्य साध्य करतात. देशासह जगभरात अनेकवेळा विविध नोबल प्रोफेशन्सचे वास्तव दाखविणार्‍या सिनेमांची निर्मिती झाली आणि अजूनही होते आहे, पण विशेषतः भारतात ज्या नोबल प्रोफेशनवर कधी जास्तीचे प्रश्न विचारले जात नाहीत, अशा मेडिकल क्षेत्रातील काळ्या धंद्यावर भाष्य करणारे सिनेमे आपल्याला पाहायला मिळाले नाही.

ओटीटीच्या जमान्यात भारतात हिंदी वेबसिरीजची संख्या वाढते आहे. गुन्हेगारी आवडता विषय असलेल्या भारतीय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मसाला त्यात भरावाच लागतो. त्यातल्या त्यात विषय नवीन असेल तर यात मसाल्याची मात्रा अधिकची असावी लागते. विपुल अमृतलाल शाह निर्मित डिस्नी हॉटस्टारवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘ह्युमन’ ही वेबसिरीज वैद्यकीय क्षेत्रातील हेच वास्तव अधिकचा मसाला टाकून दाखविण्याचा प्रयत्न करते. विषयाची गंभीरता लोकांना कळावी आणि पूर्ण वेळ ते स्क्रीनवर खिळून राहावे म्हणून यात अनेक इंटिमेट सीन्स आणि सबप्लॉट्स आणले जातात, पण एपिसोड्सची वाढलेली लांबी आणि कथेत अडथळा ठरणारे काही सबप्लॉट्स यामुळे ही वेबसिरीज उत्कृष्ट होण्यापासून काहीशी दूर राहते. पण कोविडकाळात मेडिकलसारख्या विषयांना केंद्रस्थानी ठेऊन, लसीकरणाची मोहीम जगभर सुरू असताना ड्रग्सट्रायलचे भयाण वास्तव समोर आणणारी सिरीज म्हणून याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

- Advertisement -

ड्रग्स ट्रायल ही गोष्ट भारतातील सर्वच लोकांना माहिती असेल असं नाही, मग असा विषय ज्याची पार्श्वभूमीदेखील खूप कमी लोकांना माहिती आहे, त्याला केंद्रस्थानी ठेऊन वेबसिरीज बनविणे खरंच अवघड काम होतं. सर्वात आधी मला लेखकाचं कौतुक यासाठी करावं वाटतं की, त्याने या कथेसाठी भोपाळसारख्या शहराची निवड केली. गॅस गळती दुर्घटना आणि त्या काळात नरकयातना भोगलेल्या नागरिकांची आजची अवस्था अजूनही फार बदललेली नाही. गरिबी ही अशी गोष्ट आहे जी आपल्याकडून काहीही करवून घेऊ शकते, पोटाच्या भुकेसाठी स्वतःला लॅबोरेटरीमधले गिनीपिग बनवून बसलेल्या बर्‍याच लोकांची कथा म्हणजे ‘ह्युमन’ आहे. वायू फार्मा देशातील एक नामांकित औषधनिर्माती कंपनी ज्यांना कोव्हीड लस बनविण्यात अपयश आलंय, लसीच्या निर्मीतीत झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी युरोपात प्रतिबंधित असलेल्या हृद्यरोगावरील सार्स 93 या लसीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

हृदयरोगावर प्रभावी असलेली ही लस बाजारात आली तर कंपनीला मोठा फायदा होऊ शकतो म्हणून इतर ट्रायलवर वेळ न घालवता त्यांनी अवैधरित्या ह्युमन ट्रायल सुरू केलंय, ज्यासाठी त्यांनी गरीब आणि गॅस दुर्घटनाग्रस्त लोकांची निवड केलीये. प्रायोगिक तत्वावर देशातील नामांकित हॉस्पिटल असणार्‍या ‘मंथन’मध्ये पेशंट्सना ही लस देण्यात येणार आहे, ज्या हॉस्पिटलच्या प्रमुख आहेत, डॉक्टर गौरी नाथ (शेफाली शाह). आता या लसीच्या ट्रायलमध्येच याचे साईड इफेक्ट्स समोर येतात आणि लोक मरायला लागतात, पण मरणार्‍या लोकांच्या जगण्यालाच किंमत नसल्याने हा खेळ असाच सुरू राहतो. मग या गेममध्ये एंट्री होते डॉक्टर सायरा सबरवाल (कीर्ती कुल्हारी) यांची. त्या मंथनमध्ये कार्डियोलॉजिस्ट म्हणून जॉईन झाल्या आहेत.

- Advertisement -

आता या ड्रग ट्रायलमध्ये विजय कोणाचा होतो ? जगापुढे देव बनलेल्या गौरी नाथ यांचं खरं रूप नेमकं आहे तरी काय? तडफडून मरणार्‍या अनेक गरिबांना न्याय मिळतो का ? यासाठी संपूर्ण सिरीज पाहावी लागेल. सिरीजची कथा 3 व्यक्तींभोवती फिरते. त्यातील पहिल्या दोन म्हणजे गौरी नाथ आणि कीर्ती कुल्हारी तर तिसरी महत्वाची भूमिका आहे मंगूची(विशाल जेठवा) जो एक गरीब तरुण आहे, त्याने पैशाच्या मोहापोटी आपल्या आईवरच ड्रग ट्रायल केलंय आणि इतर अनेकांना ड्रग ट्रायल करायला लावलं आहे. मुख्य कथानकासोबत या तीन पात्रांची आपली एक समांतर कहाणी आहे, जी तीन वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न करते. एकीकडे गौरी तिचे ओपन मॅरेज आणि तरुण मुलाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्याचा विचार करतेय, तर दुसरीकडे सायरा आपल्या सेक्शुअल आयडेंटिटी आणि कुटुंबाच्या प्रेमासाठी लढते आहे, तर तिसरीकडे मंगु झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कुटुंबावर आलेलं संकट दूर लोटण्याचा प्रयत्न करतोय, अशा विविध उपकथांचा आधार घेत ‘ह्युमन’ आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करते.

शेफाली शाह एक अभिनेत्री म्हणून यशस्वी आहे, दिल्ली क्राईमनंतर तिचं हे रूप पाहणं थोडं अवघड होतं, पण आपल्या अभिनयातून आधी पात्राबद्दल आदर, प्रेम आणि नंतर चीड कशी निर्माण होईल याची पुरेपूर काळजी तिने घेतली आहे. गौरी नाथ हे ग्रे शेडमधील पात्र तिच्यासाठीच बनले आहे, असं वाटतं. पात्राच्या एन्ट्री सीनपासून ते क्लायमॅक्सपर्यंत तीच कथेच्या केंद्रस्थानी दाखवली आहे आणि इतर सर्व कलाकार तिच्या अवतीभोवती दिसतात. पण तिचं हे केंद्रस्थानी राहणंदेखील काही वेळा खटकतं, अभिनय उत्तम आहे, पण पात्राच्या स्वभावात होणारे तात्काळ बदल आणि त्याची प्रतिक्रिया तितकी अपील होत नाही. गौरी नाथनंतर दुसरी महत्वाची भूमिका अर्थात सीरिजमध्ये विसल ब्लोअर असणारी सायरा सबरवालची भूमिका कीर्ती कुल्हारी हिने चांगली साकारली आहे. क्रिमिनल जस्टिसमध्ये विक्टिमची भूमिका निभावणारी कीर्ती यात मात्र अन्यायाविरुद्ध लढताना दाखवली आहे.

पती, आई वडील आणि बालपणातील मैत्रिणीसोबतचे तिचे संबंध, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये एकाचवेळी येणारे असंख्य प्रॉब्लेम्स यामुळे बदलणारा स्वभाव सर्वकाही तिने उत्तमरीत्या साकारलं आहे. विशाल जेठवाची भूमिकासुद्धा सुरुवातीला काहीशी नकारात्मक वाटतं असली तरी शेवटपर्यंत येताना त्या पात्राबद्दल सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरते, त्याची लँग्वेज आणि एक्स्प्रेशन नेहमीच उत्तम असतात. यावेळी त्याच्या तोंडातून भोपालीमध्ये निघणारा प्रत्येक शब्द रीलेट होतो, अगदी पैसा शब्दाला पेसा म्हणणंदेखील तितकंच अपील होणारं आहे. या तीन कलाकारांसमवेत राम कपूर, सीमा बिस्वास, आदित्य श्रीवास्तव, मोहन आगाशे, संदीप कुलकर्णी यांनीही आपल्या वाट्याला आलेल्या छोट्या मोठ्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय.

सिनेमॅटोग्राफी जमून आली आहे, भोपाळ गॅस दुर्घटना आणि त्यातील पीडितांचे चित्रण, जुनं आणि नवीन भोपाळ शहर यातील दृश्येदेखील उत्तम आहेत. ‘ह्युमन’ बाबतीत मुख्य घोळ होतो तो एडिटिंग आणि काही ठिकाणी लिखाणात झालेल्या गुंत्यात, एडिटिंग थोडी अजून चांगली झाली असती तर एपिसोडची लांबी घटली असती, तासभर अवधीचे 10 एपिसोड पाहणे तितके व्यर्थ नाही. दुसरा मुद्दा म्हणजे यात मुख्य कथेत मसाला घालण्याच्या प्रयत्नात मूळ उद्देश अनेकदा भरकटून जातो, या दोन गोष्टी टाळल्या असत्या तर नक्कीच ही एक परिपूर्ण वेबसिरिज बनली असती असं म्हणायला हरकत नाही, तरीही वेगळं काही पाहण्याची इच्छा असेल आणि मुख्य म्हणजे वेळ असेल तर आपण ‘ह्युमन’ पाहू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -