कामाठीपुरा : याची देही याची डोळा

कामाठीपुर्‍यात जन्मलेल्या, वाढलेल्या, त्या मातीत खेळलेल्या, त्या वस्तीचा चेहरा मोहरा न्याहाळलेल्या, ‘याची देही याची डोळा’ जीवन अनुभवलेल्या संयमी स्वभावाचा एक तरुण तडफदार, व्यवस्थेविरुद्ध प्रचंड चीड, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि न्याय मिळवून देण्यासाठी सतत धडपडणारा कार्यकर्ता, लेखक सुधीर जाधव यांनी स्वानुभवातून लिहिलेल्या ‘कामाठीपुरा’ या कादंबरीतील वर्णन हे वास्तव अत्यंत वेगळं आणि मर्मभेदी आहे. इतकं भीषण वास्तव यापूर्वी कुणीही लिहिण्याची हिंमत केली नाही.

मुंबई भौगोलिकदृष्ठ्या एखाद्या राज्याएवढा भूप्रदेश आहे. एकंदर जग एका बाजूला आणि मुंबई एका बाजूला. मुंबई दर्शन घेण्यासाठी जगभरातून लोक येतात, अभ्यास करतात. मुंबई केवळ आर्थिक राजधानी नसून सर्वार्थाने म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक, वैचारिक, सांस्कृतिक केंद्र. जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे. ‘कामाठीपुरा’ हा मुंबईचा अत्यंत संवेदनशील असा भाग आणि म्हणून तो सर्वांच्या आकर्षणाचा विषय. जिवाची मुंबई करणार्‍यांसाठी हा महत्त्वाचा इलाका. कामाठीपुरा हे नाव उच्चारताच काहींच्या कपाळाला आठ्या पडतात तर काहीजण उच्चारण्याची हिंमतही करत नाहीत. कामाठीपुरा म्हणजे ‘डेंजर एरिया’ असंही वर्णन करता येईल. कामाठीपुराविषयी यापूर्वी अनेकांनी लिहिलं आहे.

काही चित्रपटात, कथा, कवितेत आलं आहे. परंतु कामाठीपुर्‍यात जन्मलेल्या, वाढलेल्या, त्या मातीत खेळलेल्या, त्या वस्तीचा चेहरा मोहरा न्याहाळलेल्या, ‘याची देही याची डोळा’ जीवन अनुभवलेल्या संयमी स्वभावाचा एक तरुण तडफदार, व्यवस्थेविरुद्ध प्रचंड चीड, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि न्याय मिळवून देण्यासाठी सतत धडपडणारा कार्यकर्ता, लेखक सुधीर जाधव यांनी स्वानुभवातून लिहिलेल्या ‘कामाठीपुरा’ या कादंबरीतील वर्णन हे वास्तव अत्यंत वेगळं आणि मर्मभेदी आहे. इतकं भीषण वास्तव यापूर्वी कुणीही लिहिण्याची हिंमत केली नाही. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याच्या भविष्याची चिंता न करता कोणतीही भीती न बाळगता अनेक आव्हानं पचवून ‘मी पाहिलेला कामाठीपुरा’ जसाच्या तसा मांडणं ही कलात्मकता सुधीर जाधव साधली आहे.

कामाठीपुरा म्हणजे देहविक्री करणार्‍यांची दुकानं आणि आपली लैंगिक भूक भागवणार्‍या आंबट शौकिनांचा अड्डा. फसलेल्या, फसवलेल्या गरिबीच्या नावाखाली पोटाची खळगी भरण्यासाठी आई-बापांनी विकलेल्या आणि विकत घेतलेल्या लाचार अबला, त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचार बलात्कार केलेल्या बाया पोरींची आणि धंदेवाल्यांची चंदेरी दुनिया. तर दुसर्‍या बाजूला भूककंगाल, दारिद्य्रामुळे एक वेळचं जेवण न मिळणार्‍या परंतु स्वाभिमानाने जगणार्‍या समूहाची लोकवस्ती. दारू, चरस, गांजा, मटका अड्डे हे या विभागातील शतकानुशतके राजरोसपणे चालत आलेले व्यवसाय आपणास माहीत आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन कामाठीपुरा काय केमिस्ट्री आहे याचं दर्शन सुधीर जाधव यांच्या कामाठीपुरा या कादंबरीतून घडतं. आपण आपल्या सार्वजनिक जीवनात जे उच्चारू शकत नाहीत, तेच शब्द जसेच्या तसे लिहून कादंबरी वाचताना उत्सुकता वाढवण्याचं काम जाधव यांनी केलं आहे.

सुधीर जाधव लिहितात…कामाठीपुरा अगदी रात्री उजाडायचा. अगदी रात्री जेव्हा अख्खी मुंबई झोपलेली असायची ना तेव्हा. तेव्हा पेव फुटायचं ह्या इलाक्याला. कोंबडा तेव्हा आरवायचा अगदी रात्री बारा वाजता. इथे दिवस सकाळी सातला मावळायचा. पावडर-लाली लावलेल्या, गजरा माळलेल्या, साडी किंवा परकर, वरचं बेंबाट दाखवणार्‍या, कमीत कमी गळ्याचा ब्लाउज घालून गिर्‍हाईकाला आकर्षित करण्यासाठी स्तनांची अधिकाधिक घळ दाखवणार्‍या बाया, त्यांच्याशी लगट करणारे, त्यांच्या अंगाला झोंबणारे दारू पिऊन तर्र झालेले, देहाचा सौदा करून निजायला जाणारे बाप्ये. ‘बढ़ीया, कवला माल देता हु साब’ म्हणत गिर्‍हाईकाला पटवणारे दल्ले. पावभाजी, बिर्याणी, अंडाबुर्जी, चिकन तंदुरी, सीक कबाब, तव्यावरचे खिरी, कलेजी, गोश्त, पाया, वजडी, मुंडी अशा अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल. प्रत्येक कुंटणखान्याला केलेली रोषणाई. रस्त्याच्या कडेकडेला उभ्या ललना. मटका, पताडा, बेटिंग, जुगाराचे, चरसचे अड्डे. सगळा उघड उघड कारभार. संध्याकाळी सात वाजल्यानंतर धूप अंगार्‍याच्या वासात कामाठीपुरा सुरू व्हायचा.

येथे एक प्रकारची फिल्मी दुनिया असते. ‘जवानी है तब तक भाव है’ दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळे चेहरे मोहरे इथे बघायला मिळतात. इथे दिवसा गच्च झोपलेली खिडकीची तावदाने संध्याकाळी सातच्या सुमारास लख्ख डोळे उघडतात, ‘सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो’ किंवा ‘इन्ही लोगो ने ले लिया दुपट्टा मेरा’सारख्या सूरांसोबत घुंगरांचा आवाज आणि तबल्याचा ठेका बाहेरच्या रहदारीला ऐकायला येतो. इथे येणारी दर्दी पण फालतू नसायची स्मगलर, काळाबाजार करणारे, शेठ, बिल्डर, कर्मचारी अशा मोठमोठ्या माणसांची वर्दळ आणि मुजरा गल्लीत चालतो. इथे येणार्‍या मुली या नाईलाज अथवा जबरदस्तीने आणल्या जातात, त्यामुळे राग, सूड-भावना वेदना सारं काही विसरून दफन करून पायातल्या पैंजणाला आणि देहाला जामीन ठेवून फिटवत असत आपल्या प्राक्तनाचे कर्ज.

कामाठीपुरा विभाग इतका गुन्हेगारीचा असला तरी माणुसकी नावाची दुनिया इथे ओतप्रोत भरलेली आहे. दुर्गा नावाची एक मुलगी केरळच्या गरीब कुटुंबातली. घरात पाच मुली. बाप एकटा कमावणारा. मुलींचे शिक्षण, घरचा खर्च या आर्थिक कुचंबनेतून वाट काढण्यासाठी तिची मैत्रीण परमेश्वरी तिला मुंबईला आणते आणि हा व्यवसाय करायला भाग पाडते तेव्हा ती चक्क नकार देते. अशा वेळेस तिची मैत्रीणसुध्दा जबरदस्ती न करता, ती आणि तिची मालकीण अक्का,अम्मा तिच्या नकळत तिच्या घरी पैसे पाठवतात, ती कामाला लागली असं सांगून. वास्तविक दुर्गा काहीच काम करत नाही, परंतु त्याच पैशावर दुर्गाचं घर चालतं, लहान भावंडे शिक्षण घेत असतात. दुसरा प्रसंग एक असहाय मुलगी लाचार बापाची लेक आणि कुणाची तरी बहीण, तिला या घाणीत न राहता तिच्या मूळ घरी हैदराबादला जायचं होतं, परंतु ही व्यवस्था आणि मालकीण यातून बाहेर पडू देत नव्हती. अशा वेळेस ही मुलगी या लोकवस्तीत येते आणि वस्तीतले लोकं तिला सुखरूप घरी पोचवतात. त्यासाठी शांत्यादादा लक्ष्मीअक्काबरोबर वैर स्वीकारतो.

लक्ष्मीअक्काची एवढी दहशत असते की, इलाक्यात कुणाची हिंमत होत नाही तिच्याशी पंगा घेण्याची. एखाद्या निराश्रिताला आश्रय, भुकेलेल्याला अन्न-पाणी देणे ही इथली संस्कृती. अक्काची दहशत असताना अशाही अवस्थेत त्या मुलीला नसीमा बानू बुरखा घालते, टॅक्सीत बसवते सगळे आपल्या कडेकोट बंदोबस्तात व्ही.टी.स्टेशनला साडेनऊच्या सुमारास हैदराबादला जाणार्‍या गाडीत मुलीला बुरख्यासकट बसवतात, तिकीट आणि पैसे तिच्या पर्समध्ये कोंबतात. गाडी सुटेपर्यंत सगळेजण थांबतात. गाडी गेल्यावर सगळे आपापल्या घरी येतात. माणूस आणि माणुसकीचं दर्शन याच ठिकाणी होतं, इथला शांत्यादादा म्हणजे धर्मेंद्र. त्या शांत्यादादाची कहाणी काय वेगळीच आहे. शिकून मोठा होऊन डॉक्टर व्हावं अशी स्वप्न बाळगणारा शांत्यादादा पुढे ‘दादा’ होतो याची रंजक कहाणी वाचताना डोळ्यातील अश्रू आपोआप बाहेर येतात. डॉक्टर होणार्‍या शांत्यादादाला ही व्यवस्था गुंड बनवते याचं वास्तव चित्रण या कादंबरीत मांडलं आहे. हे चित्रण वाचताना हाताच्या मुठी आवळल्या जातात. सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.

या कादंबरीचा खरा नायक चिनू अत्यंत हुशार आणि सगळ्यात जास्त शिकलेला मुलगा आहे.आर्थिक संकटाशी सामना करीत गरिबीत जीवन जगतो. बाप एक नंबरचा बेवडा. दारूच्या नशेत तो आईला सतत मारहाण करत असतो, परंतु कुणाची पर्वा न करता स्वतःची ऐश मात्र भागवत असतो. घरात खायला नसेल तरी चालेल, परंतु त्याचे आयुष्य तो पूर्ण जगतो. एके दिवशी हाच चिनूचा बाप आपली चैन भागवण्याकरता भाड्याच्या घोड्यावरून घरी येतो. घोड्यावर बसलेला फुल टाइट एकदम हाले डुले डावीकडे -उजवीकडे तोल जातोय, गल्लीतली पोरं म्हणतात काका उतरा. पण काका घोड्यावरुन उतरत नाही. हा सगळा प्रसंग अनुभवला, की असं लक्षात येतं या लोकांना उद्याच्या भविष्याची अजिबात चिंता नाही. या चिनुच्या आयुष्यात राधा नावाची मुलगी येते. तिची त्याला भुरळ पडते. परंतु तीही आयुष्यातून निघून जाते, पुन्हा न भेटण्यासाठी. तो प्रसंग मात्र आपल्या स्मृतीपटलावरून कधीच पुसला जात नाही.

कामाठीपुर्‍यात विविध जात, धर्म, प्रांत, भाषा, पंथाचे लोक राहत असले तरी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि प्रेम या पंचशीलाचं आचरण करणारी सुसंस्कृत माणसं येथे राहतात. एखाद्याच्या सुख-दुःखात, प्रसंगात धावून जाणारी, जीवाला जीव देणारी, प्रसंगी जीवाची पर्वा न करणारी माणसं इथे आहेत. इथे जातीयवाद, प्रांतवाद, जात-धर्म नसला तरी कुणीही कुणाचा बाप नाही. हे सगळं वर्णन आणि ख्याती कळल्यानंतर कामाठीपुरा समजून घेण्यासाठी संपूर्ण कामाठीपुरा फिरून यावा असं वाटणं सहाजिकच आहे, परंतु त्याहीपेक्षा जास्त पटीने ही कादंबरी आपणास उपयोगी ठरते. कारण या कादंबरीतील प्रसंग आपल्याला अनुभवता येणार आहेत, जे लेखकाने स्वतः भोगलं आहे. या साहित्यकृतीला कादंबरी म्हणावं की एखाद्या नायकाचं जीवन चरित्र, हा खरा प्रश्न आहे. कामाठीपुरा ही कादंबरी मराठी साहित्यात शब्दांची पेरणी करणारी वेगळ्या भाषेत वर्णन करणारी वेगळी कादंबरी असं म्हणावी लागेल.

इतर पात्रांची नावंही पहा चौपाटी, फिफ्टी, चंद्या, अरुण, लाल्या, काल्या, सुक्या, येडा, परश्या, बचत, सूर्या, कंपनी, रामदास, मिल्या, पासकिंगमामा, पापलेट. ही सगळी माणसं इथे आनंदाने प्रत्यक्ष जीवन जगलेली आहेत. कामाठीपुरा या कादंबरीतील भाषा क्लिष्ट आहे. काही ठिकाणी आवश्यक असल्याने हिंदीचा उपयोग केला आहे, ती समजण्यास थोडी कठीण असली तरी ती त्या काळात घडलेल्या घटनांचा दस्तऐवज आहे. या कादंबरीचं वैशिष्ठ्य असं आहे की वाचताना उत्सुकता शिगेला पोहचते, पुढे काय असेल या कुतूहलाने कादंबरी केव्हा वाचून पूर्ण होते, हे आपल्याला कळतही नाही. भविष्यात कुणाला डॉक्युमेंट्री अथवा कलाकृती करावयाची असल्यास संदर्भासाठी ही कादंबरी महत्त्वाची ठरेल. काही दशकानंतर नवीन वाचायला मिळणार असल्याने कादंबरीचं स्वागतच होईल.

कामाठीपुरा -लेखक सुधीर जाधव
प्रकाशक -सृजन प्रकाशन
पाने- २५२, किंमत ३००/-

–प्रदीप जाधव