घरफिचर्ससारांशक्रांतिकारक नररत्न राजगुरू

क्रांतिकारक नररत्न राजगुरू

Subscribe

७ ऑक्टोबर १९३० रोजी लाहोर कट अभियोगाचा निर्णय जाहीर झाला आणि त्यानुसार न्यायमूर्तींनी आरोपींना विविध शिक्षा ठोठावल्या. यापैकी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली गेली. शिक्षेचा आदेश कारावासात येऊन धडकताच सर्वांनी ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा जोरजोरात दिल्या. शिक्षा आजच सुनावली जाणार हे माहीत नसल्यामुळे राजगुरूंच्या मातोश्री पार्वतीबाई या मुलासाठी श्रीखंड, मटार उसळ आणि पेढे असा खाऊ घेऊन आल्या होत्या. तुरुंगात येताच तुरुंगाधिकार्‍याने त्यांना फाशीचा निर्णय सांगितला. हे ऐकताच पार्वतीबाई सुन्नपणे बसून राहिल्या. हा खाऊ घेऊन मुलासमोर कसे जायचे या विचारांनीच त्यांना रडू फुटले.

-पुष्पा गोटखिंडीकर

राजगुरूंच्या माताजींनी काय आणले आहे हे पाहण्यासाठी सर्वांनी त्यांच्याभोवती गराडा घातला आणि चेष्टा मस्करी करीत आणलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. सर्वांचे खाणे संपले आणि राजगुरूंचा निरोप घेऊन पार्वतीबाई निघाल्या. इतक्या वेळ आपल्या डोळ्यांतील अश्रू मुलाला दिसू नयेत म्हणून प्रयत्न करणार्‍या पार्वतीबाईंना तुरुंगाबाहेर आल्यावर मात्र आपले अश्रू आवरेनात. देशासाठी बलिदान करणार्‍या मुलाच्या त्या धीरोदत्त मातोश्री होत्या. आई बाहेर जाताच राजगुरू आपल्या कोठडीकडे परतले आणि नकळत आपल्या गत आयुष्यामधील आठवणींमध्ये दंग झाले.

- Advertisement -

शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी पुण्याजवळील खेड (राजगुरूनगर) या गावी झाला. राजगुरू हा लहानपणापासूनच अतिशय खोडकर व व्रात्य आणि तितकाच रागीट होता. बालपणीच वयाच्या सहाव्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले. मोठा भाऊ दिनकर चाकणला नोकरीला होता. त्याच्याकडून येणार्‍या पैशांवरच राजगुरूचे शिक्षण व घर चालत होते. राजगुरूंना इंग्रजीबद्दल अतिशय तिरस्कार होता.

तो दिनकरला म्हणत असे, इंग्रजांना त्यांची भाषा येणारे नोकर निर्माण करायचे आहेत. इंग्रजी भाषेबद्दल तिरस्कार असणार्‍या राजगुरूंच्या मनात जालियनवाला भाग हत्याकांडामुळे इंग्रजांबद्दलचा द्वेष वाढू लागला. इंग्रजांना येथून हाकलून द्यायचे असेल तर प्रथम आपण शारीरिकदृष्ठ्या बलवान हवे हे लक्षात घेऊन त्यांनी व्यायामास सुरुवात केली. रोज भीमेमध्ये तासन्तास पोहत असे आणि जोर, बैठका, सूर्यनमस्कारही त्याने सुरू केले.

- Advertisement -

पुढे काशीला जाऊन राजगुरूंचे वेदाध्यायन सुरू झाले. काशीला ‘भारत सेवा मंडळ’ ही संस्था होती. तेथे राजगुरूंनी लाठी-काठी व कुस्तीचे शिक्षण घेतले. तसेच तो धनुर्विद्याही शिकला. ४० फुटांवरून तो नेमका लक्ष्य साधू लागला. याच लक्ष्यवेधीचा उपयोग पुढे पिस्तूल चालवताना त्याला करता आला. काशीमध्ये असतानाच राजगुरूंची बाबाराव सावरकर आणि चंद्रशेखर आझाद यांच्याशी भेट झाली.

पुढे बाबारावांच्या सूचनेनुसार शारीरिक शिक्षणाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी राजगुरूंनी अमरावतीच्या हनुमान व्यायामशाळेमध्ये प्रवेश घेतला आणि तो पुढे ‘व्यायाम विशारद’ झाला. ३० ऑक्टोबर १९२८ या दिवशी सायमन कमिशन लाहोरला येणार होते. सुधारणांचे तुकडे फेकू पाहणार्‍या या कमिशनला हिंदुस्थानातून तीव्र विरोध होणार होता. तेथे होणार्‍या निदर्शनात भाग घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, भगवतीचरण आदी सहकारी आले होते.

कमिशन लाहोर स्टेशनवर उतरण्यापूर्वी मोची गेटजवळ प्रचंड सभा झाली. या प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या अग्रभागी लाला लजपतराय होते. सायमन गो बॅक आणि भारतमाता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. हा जमाव उधळण्यासाठी इंग्रज पोलिसांनी घोडदळ घुसवले. घोड्यांच्या टापाखाली काही जण सापडले. चेंगराचेंगरी होऊ लागली. त्यात लाठीमाराची भर पडली. नेत्याला बेजार केले की अनुयायी विखरून जातात हे पोलीस अधीक्षक स्टॉकला माहीत असल्याने स्कॉटने लाला लजपतराय यांच्यावर लाठीचे दोन प्रहार केले.

त्याच्या हाताखालील सँडर्सनेसुद्धा एक तडाखा लालाजींना हाणला. लालाजी खाली कोसळले आणि पुढे १७ नोव्हेंबर १९२८ या दिवशी लालाजी मृत्यू पावले. सर्वत्र क्षोभ उसळला. लालाजींच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी स्कॉटला उडवायचे ठरले. ही चर्चा चालू असताना राजगुरू म्हणाले, स्कॉटला मीच उडवणार. स्कॉटला कंठस्नान घालण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद या तीन वीरांची निवड करण्यात आली. जय गोपाळ हा १४ डिसेंबरपासून पाळत ठेवू लागला. १७ डिसेंबरला त्याने धावत येऊन सांगितले की स्कॉट कार्यालयात आला आहे.

दुपारी दोन वाजता सर्वजण शस्त्रसज्ज झाले. जय गोपाळने मान हलवून स्कॉट आतच असल्याचा इशारा केला, परंतु तो स्कॉट नव्हता. तो सँडर्स होता. सँडर्सने बाहेर येऊन मोटरसायकल सुरू केली आणि जय गोपाळने पुन्हा इशारा करताच राजगुरूंनी पुढे झेप घेतली. राजगुरूंनी स्कॉटला पाहिले नव्हतेच. सँडर्सला पाहताच भगतसिंग जोरात ओरडले अरे हा स्कॉट नव्हे, परंतु अधिरतेमुळे राजगुरूंना भगतसिंगांचे बोलणे नीट ऐकू आले नाही आणि त्यांनी रिव्हाल्व्हर रोखले.

मन एकाग्र केले. धाड ड ड एकच आवाज निनादला आणि सँडर्सला कपाळाला बरोबर मध्यभागी गोळी बसली आणि तो मोटरसायकलसह खाली कोसळला. फितुरी ही हिंदुस्थानाला लागलेली कीड आहे. सर्वच योद्धांच्या नशिबी एखादा फितूर असतोच. केसकर नामक व्यक्तीने आपले फितुरीचे काम चोख बजावले आणि इंग्रज पोलिसांनी राजगुरूंना पकडून हातात हातकड्या घालून लाहोरला आणले. नंतर पुण्यात आणून येरवडा तुरुंगात डांबण्यात आले.

तेथे त्यांचा अतिशय वाईट रीतीने छळ केला. १७ ऑक्टोबरला त्याला न्यायालयात आणले गेले. भगतसिंग आणि अन्य साक्षीदार भेटणार या कल्पनेने राजगुरू रोमांचित झाले. १८ ऑक्टोबरला राजगुरूंना सर्व आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले. मंगळवार ७ ऑक्टोबर या दिवशी सर्वांना शिक्षा सुनावण्यात आली. यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२३ मार्च १९३१ हा दिवस फाशीचा ठरला. भगतसिंगाच्या उजव्या बाजूला राजगुरू तर डाव्या बाजूला सुखदेव होता. तिघांची फाशीच्या स्तंभाकडे वाटचाल सुरू झाली. तिघांच्या चेहर्‍यावर शांत आणि प्रसन्न भाव होते. फाशीच्या तक्तावर चढून तिघांनी भारतमाता की जय, वंदे मातरम्च्या घोषणा दिल्या आणि ७ वाजून ३३ मिनिटांनी त्यांच्या गळ्याभोवती असलेला फाशीचा खटका ओढण्यात आला आणि थोड्याच वेळात राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव पंचत्वात विलीन झाले. ते हुतात्मा आणि राष्ट्राच्या इतिहासात अमर झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -