घरफिचर्ससारांशउजवे वाम अंग एकची

उजवे वाम अंग एकची

Subscribe

फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेले हे दोन शब्द- डावे आणि उजवे. जगातील कष्टकरी, कामगार आणि बहुजनवर्ग हा डाव्याबाजूला आणि सत्ताधीशांच्या बाजूचा किंवा तत्सम पुरोगामी विचाराला विरोध करणारा वर्ग म्हणजे उजवा वर्ग. यात धर्म, लिंग, पंथ ह्या कल्पना होत्याच. पण लोकशाही समाजव्यवस्थेत अशा डाव्या वर्गाचे महत्व किती आहे हे आपण बघतच आहोत, पण तरीही उजव्यांचे राजकारण किंवा सत्तापिपासू वृत्ती डाव्यांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. कोकणातील शंकासुराच्या मनात जे द्वंद्व चालू आहे ते याच प्रकारचे असावे.

तळकोकणातील कुठल्यातरी गावाची जत्रा. जत्रेची रात्र म्हणजे दशावताराचा खेळ हे गेल्या कित्येक पिढ्यांचे समीकरण. मध्यरात्र उलटून गेली आणि शंकासुराचे आगमन झाले. खरं सांगू ह्या दशावताराच्या खेळात मला काय आवडत असेल तर तो शंकासूर. एकतर तो आला की रंगमंच हलवून सोडतो आणि आपल्या फर्ड्या मालवणीत प्रेक्षकांत हास्याची खसखस पिकवतो. चालू घडामोडीवर त्याच्या इतके भाष्य क्वचित कोणी करू शकेल. असो, तर अशाच एका रात्रीचा प्रसंग. हल्ली रात्रभर जागून दशावतार बघणारे प्रेक्षक तसे कमीच झाले, पण तरीही गावोगावी दशावतार चालू असतात. त्यातील नाईक आणि शंकासूर यातील संवाद असा. भयात भय पाच भय आसत.

नाईक- कोणते भय? शंकासूर- घरात भय घरकरणीचो. नाईक- तो घरापुरतो. शंकासूर- गावात भय गावकर्‍याचो. नाईक- तो गावापुरतो. शंकासूर- देवळात भय देवाचो. नाईक- देवळापुरतो. शंकासूर- रानात भय वाघाचो. नाईक- ता पण रानापुरता. शंकासूर- नी, जगात भय डाव्यांचो. नाईक – ता मातुर जगाक.

- Advertisement -

नाईक आणि शंकासुराचे असे संवाद हे खूप द्विअर्थी असतात, त्यांची खोली अशी पटकन घ्यानात येत नाही, पण त्या त्या प्रदेशातल्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणार्‍या या संवादांचा अर्थ ज्याने त्याने आपल्या पद्धतीने घ्यायचा. तेथील राजकीय परिस्थितीचा असल्या संवादावर नेहमीच प्रभाव पडलेला दिसतो. मला हा संवाद मात्र खूपच वेगळा वाटला. एखाद्या लोककलाकाराने त्याच्या लोककलेत एवढा मोठा विचार मांडावा आणि आपण फक्त त्याचा हसून आनंद घ्यावा याच्यापलीकडे आपण काही करू नये?. शंकसुराचा हा संवाद कुठेतरी विचार करायला लावून गेला. ह्या संवादाने केवळ त्या प्रदेशातील नाही, देशातील नाही तर संपूर्ण जगातील भयाची कारणमीमांसा केली.

फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेले हे दोन शब्द-डावे आणि उजवे. जगातील कष्टकरी, कामगार आणि बहुजनवर्ग हा डाव्याबाजूला आणि सत्ताधीशांच्या बाजूचा किंवा तत्सम पुरोगामी विचाराला विरोध करणारा वर्ग म्हणजे उजवा वर्ग. यात धर्म, लिंग, पंथ ह्या कल्पना होत्याच. पण लोकशाही समाजव्यवस्थेत अशा डाव्या वर्गाचे महत्व किती आहे हे आपण बघतच आहोत, पण तरीही उजव्यांचे राजकारण किंवा सत्तापिपासू वृत्ती डाव्यांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. कारण कुठेतरी ह्या सत्ताधीशांना ह्या डाव्यांची ताकद माहीत आहे. ह्या शंकासुराच्या मनात जे द्वंद्व चालू आहे ते याच प्रकारचे असावे. राजा, संस्थान ह्या गोष्टी कालबाह्य झाल्या तरी त्यांचे पडसाद आजही तिथल्या व्यवस्थेत इतके खोलं आहेत की ते जा म्हटले तरी जात नाहीत.

- Advertisement -

डावा उजवा संघर्ष कित्येक पिढ्या आपल्या मानगुटीवर बसून आहे, हे कौटुंबिक दाखले देतदेखील मांडता येईल. मी लहानपणी डावरा होतो. घरातल्या लोकांना काय वाटलं काय माहीत?, पण त्यांना बहुतेक माझं डावरं असणं आवडलं नाही किंवा पटलं नाही. आजूबाजूची पोरं उजव्या हाताने जेवतात आणि आपला पोरगा डावरा जेवतो हे खूप जड जात होतं. मारून मुटकून एकदाची माझी डाव्या हाताने जेवायची सवय मोडण्याचा प्रयत्न केला. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून मनात निर्माण होणार्‍या गोष्टीचा संदेश मेंदूकडे जातो आणि तिथून मिळालेल्या संवेदना सक्रिय होऊन कृती केली जाते. संवेदना मेंदूच्या कुठल्या बाजूने जास्त चलनशील होतात यावर डावे किंवा उजवे अवलंबून असते.

वडीलधार्‍यांच्या प्रयत्नाने माझं डाव्या हाताने जेवणे, डाव्या हाताने लिहिणं ह्या गोष्ठी प्रयत्नाने मी उजव्या हाताने लिहू लागलो, पण ह्या सगळ्या गोष्टी कृत्रिम होत्या. त्यात नैसर्गिकता अशी कधीच नव्हती. कोणी प्रसाद द्यायला हात पुढे कर म्हणून सांगितलं की सहज माझा डावा हात पुढे यायचा. ज्या गोष्टी वडीलधार्‍यांच्या अनुपस्थितीत केल्या त्या मात्र डाव्या हातानेच केल्या. मी क्रिकेट खेळताना बॅट घेऊन उभा राहिलो तो डावखुरा खेळू लागलो. ह्या गोष्टी अगदी नैसर्गिक असतात. हा डावा उजवा भेद का आणि कसा तयार होतो आणि लोक त्याचा का एवढा बाऊ करतात हेच कळत नाही. माझ्याप्रमाणे माझी मोठी मुलगी श्रेया मुळात डावरी. तिलादेखील डाव्या हाताने जेवताना बघून प्वॉर बापसाच्या गुणावर गेला (वास्तविक त्यांना अवगुण म्हणायचे होते), पण डावा उजवा भेद विसरून ती मात्र नैसर्गिक संदेशाने तिच्या मेंदूची डावी बाजू जास्त विकसित असल्याने ती डावरी असणं पालक म्हणून मी आणि माझ्या पत्नीने सहज स्वीकारलं. खरंच डाव्या आणि उजव्या बाजूंची एवढ्या मोठ्या प्रमाणात उठाठेव करायची गरज आहे का ?

हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर मला मात्र एका गोष्टीची खात्री पटली, जी गोष्ट पूर्वपार चालत आली आहे, तिच्याविरुद्ध जाऊन आम्ही उभे राहिलो की सहज आम्ही डावे होतो आणि परंपरेला मानणारे, रूढी जपणारे ते मग उजवे म्हणावे का?. समाज किंवा व्यवस्थेच्या विरोधात किंवा त्या दृष्टीने आम्ही एकेक पाऊले टाकताना ह्या भासमान जगात अजून एक गट निर्माण होतं आहे जो ह्या व्यवस्थेशी आपला काहीच संबंध नाही. ह्या व्यवस्थेने असे वागून आमच्यावर उपकार केले आहेत आणि स्वतःची आर्थिकस्थिती, सामाजिक स्तर वाढवून बेमालूमपणे व्यवस्थेत राहून उजव्यांचे गोडवे गातो आहे.

प्रतिकांच्या मागे वर्षानुवर्षे चालणार्‍या आमच्यासारख्या लोकांना कुठली समाजविघातक शक्ती उकलू पहाते आहे हे सहज आमच्या लक्षात येत नाही. सत्यनारायणाची पूजा मांडली की आजही स्त्रीने पुरुषाच्या डाव्याबाजूला बसायला हवे हा सांगणारा आपला समाज असेल तर लोकांचे डावेपण आपण सहज स्वीकारायला कसे तयार होऊ?. गावी गेलो की सगळे माझ्या मुलीकडे बोट दाखवून मला सांगतात पोरग्यान डाव्या हातान लीवल्यान तर चलात पण तिका जेवक मातुर उजव्या हातान सांग. खरं तर अशा वेळी तळपायाची आग मस्तकात जाते. एखादी गोष्ट सहजतेने करता येऊ नये हा कसला अट्टाहास?

ख्यातनाम कन्नड साहित्यिक भैरप्पा यांचे कन्नड साहित्य मराठीत अनुवादित करणार्‍या उमा कुलकर्णी यांनी नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिम्मित एस.एल. भैरप्पा यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा डावे आणि उजवी यांची व्याख्या केली, अर्थात ती व्याख्या पारंपरिकतेला जोडणारी होतीच. डावे हे उदारतावादी असल्याचा बहाणा करत आहेत, मुळात ते तसे नाहीत, आपण (म्हणजे स्वतः भैरप्पा ) डावा उजवा असा कोणताही भेद न करणारे असून अखिल मानवतावादी असल्याचे मुलाखती दरम्यान सांगितले. परंतु मी जे भैरप्पा यांचे अनुवादित लेखन वाचले त्यातून त्यांचे वर्गीकरण करणे सहज शक्य आहे. याबाबत त्यांनी गिरीश कर्नाड यांचा उल्लेख केला, पण कर्नाड यांचे साहित्य किंवा अभिनित केलेल्या भूमिका मात्र ठोस डाव्यांची बाजू घेताना दिसतात.

‘मालगुडी डेज’मधली त्यांची स्वामीच्या वडिलांची भूमिकादेखील सामान्य वडिलांची भूमिका म्हणूनच वाटते. तुमचे लेखन हा तुमच्या आयुष्याचा आरसा असतो. जगणे वेगळे, लेखन वेगळे असे म्हणून नाही जगता येत. बहुजनाच्या जगण्याचे संदर्भ हा तुमच्या लेखणीचा जर पिंड असेल तर आपण असे मानतो किंवा असे मानत नाही असे बोलण्याची गरज तुम्हाला का पडते. तुमच्या लिखाणाची प्रतिबिंबे ह्यावरून तुमची भूमिका कोणती हे सहज लक्षात येते. डावा उजवा ही एक मानसिकता तयार होते आहे किंवा यापूर्वी ती तशी तयार झाली आहे. डावी बाजू ही मानवतेच्या जवळपास जाताना आढळते.

पिढ्यानपिढ्याचे संस्कार घेऊन वागणारे आम्ही किती डोळसपणे वागतो. आपले कल्याण व्हावे म्हणून मात्र डाव्या सोंडेच्या गणपतीला पुजतो की नाही?. आपल्या ह्या वागण्यात किती विसंगती असते की नाही. नवरात्रीच्या दिवसात कॉलेजला निघालो की आजूबाजूला किती क्लेशकारक दृश्य बघायला मिळते. देवीचा उपवास आहे म्हणून कितीतरी स्त्रियाच नव्हे तर तरुण मुली पायात चप्पल न घालता शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये जाताना दिसतात, याला काय म्हणावे?. डाव्या उजव्याच्या गडबडीत हा जो अंध समाज तयार होतोय त्याला कसे अडवावे?, त्यांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले तरी त्यांना ह्यातील काय पटणार आहे?. पाणी उतरतीच्या दिशेने वाहू लागले आहे हे मात्र निश्चित!.

समोरच्या दशावतारी नाटकातील नाईक आणि शंकासूर यांच्यातील संवाद अजून चालू आहे. शंकासूर उठला आणि नाईकांना म्हणाला, अरे मानकर्‍यांक देवळात्सुन हाकलून दिल्यानी. नाईक- अरे पण कशाला हाकलून दिल्यानी? मानकरी मर्यादा सोडून वागले काय? शंकासूर- नाय नाय नाईक, मानकर्‍यांन डाव्या हातान देव पुजल्यान. शंकासुराने नाईकांना उत्तर दिले. नाटक संपत आलं. तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात आली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत डाव्या उजव्याचा खेळ सुरू आहे, आम्ही हा खेळ कदाचित हा दशावतार जगाच्या अंतापर्यंत बघणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -