Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश हमारे मुह में तुम्हारी जुबान थोड़ी है...।

हमारे मुह में तुम्हारी जुबान थोड़ी है…।

आता ही रिहाना नेमकी कोण..? जिच्या फक्त सहा शब्दाच्या ट्विटने एवढा गदारोळ व्हावा.. तर ती आहे एक जगप्रसिद्ध पॉप सिंगर, जिचे जगभरात आज कोट्यवधी चाहते आहेत. तेवढेच सोशल मीडियावर फॉलोवर्सदेखील. नेमकी मेख इथेच आहे. तिने भारतातील समस्येबद्दल ट्विट केले. आणि जगभरातील तिच्या चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. तिचे ट्विट लाखो वेळा रिट्विट केले. तेेव्हा भारतातील कधीही न बोलणार्‍या सेलिब्रिटींचे राष्ट्रप्रेम जागे झाले.

Related Story

- Advertisement -

रिहाना नामक पॉप सिंगरने एक ट्विट केले. ते ट्विट म्हणजे काय तर भारतातील सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलना संदर्भात, इंटरनेट सेवा बंद आहे त्याबद्दल… आता भारतात एवढे तज्ञ आणि बुद्धिजीवी लोक असताना आमच्याबद्दल बोलणारी ही कोण बाई..? तिला काय अधिकार यावर बोलण्याचा..? आणि ती थोडीच भारतीय आहे..? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. एवढेच नाही तर इतर बाबतीत न बोलणारे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी तर तिला विरोध म्हणून उत्तर दिले, ट्विट केले. आणि कधी नव्हे ते भारताच्या सार्वभौमत्वाबद्दल उद्गार काढले..(!) (राज्यसभा सदस्य असतानाचे काम काय..? हा वेगळा विषय आहे) अहो एवढेच नाही तर त्याच्या मदतीला अखी चित्रपटसृष्टी धावली, क्रिकेट खेळाडूंनी मैदान तयार केले.

काही लोकांनी तर तो किती खरे बोलला याचा उदो उदो केला. सर्व बाजूंनी पुन्हा एकदा ट्विटरवर वाकयुद्ध रंगले. इथल्या युद्धाला दिवस नसतो न रात्र. शब्द मर्यादेवर आपले बुद्धिचातुर्य दाखवले जाते.आणि ती किंवा तो कसा चुकला किंवा कसा बरोबर याचा बोलबाला होतो. अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढले आहे. अशा गोष्टींना तेवढाच प्रतिसाद देखील मिळतो. इथे मूळ मुद्दा बाजूला राहतो. दुसर्‍याच वादाला तोंड फुटते. अगदी ज्याने सुरुवात केली त्याचा इतिहास तपासला जातो. पुरावे दिले जातात. एका अर्थाने हे चांगलेच म्हणावे लागेल. पण मर्यादा ओलांडल्या जातात याचे वाईट वाटते.

- Advertisement -

आता ही रिहाना नेमकी कोण..? जिच्या फक्त सहा शब्दाच्या ट्विटने एवढा गदारोळ व्हावा.. तर ती आहे एक जगप्रसिद्ध पॉप सिंगर, जिचे जगभरात आज कोट्यवधी चाहते आहेत. तेवढेच सोशल मीडियावर फॉलोवर्सदेखील. नेमकी मेख इथेच आहे. तिने भारतातील समस्येबद्दल ट्विट केले. आणि जगभरातील तिच्या चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. तिचे ट्विट लाखो वेळा रिट्विट केले. आता हे सर्व होत असताना भारतीय म्हणून आपण गप्प बसून चालणार नाही. याची जाणीव इथल्या सारस्वतांना झाली. मग काय ’हम भी किसीसे कम नही ’ या आमच्या बॉलीवुडच्या सुप्रसिद्ध डायलॉगप्रमाणे,आमच्या देशाप्रती इतरांनी बोलू नये, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमचे सार्वभौमत्व आजही टिकून आहे. इतरांनी काही सांगता कामा नये. असे काहीसे बोलले गेले.आता म्यान झालेल्या तलवारी सत्तेच्या बाजूने बोलायला लागल्यावर काय होणार हे आपल्याला माहितच असते. या सर्व गोष्टींचा समाचार घेण्यासाठी आमचा राष्ट्रवाद जागा झाला. हे तेवढे बरे झाले. पण दुःख या गोष्टीचे की,भारतात रोज नव्या एका समस्येचा जन्म होत असताना आपण मात्र कधीच बोलत नाही….त्याचे कारण हेच की आपल्याला सत्ताधार्‍यांच्या विरोधात जायचे नसते. सत्तेचे गोडवे गाण्यात आपण धन्यता मानतो.

बुद्धीजीवी म्हणून घेणारा वर्ग ज्यावेळी महत्त्वाच्या समस्येविषयी गप्प बसतो, त्यावेळी समजून घ्यायचे की स्वतःचा स्वार्थ दडलेला आहे. त्याशिवाय हे होणे शक्यच नाही. तसा इतिहास सुद्धा आहे.एका अर्थाने आपण हे मान्य करूयात की आपल्या अंतर्गत प्रश्नांबद्दल इतर देशातील लोकांनी बोलू नये. त्यांनी त्यांचा देश सांभाळावा किंवा तुमच्या क्षेत्राशी निगडित बोलावे. मग पर्यावरणाबद्दल बोलायला सुद्धा आपण मज्जाव करू. भारतातल्या पर्यावरणीय समस्या बद्दल आपणच तोडगा काढायला हवा असे सांगू. पण तसे होताना दिसत नाही. खरे सांगायचे झाले तर रिहाना आणि ग्रेटा या स्त्रिया आहेत. आणि भारतात आजही पुरुषी मानसिकता जिवंत आहे. म्हणून हा विरोध होतोय ही त्याची दुसरी बाजू. कारण आमच्या बद्दल एखाद्या स्त्रीने बोलावे हे आम्हाला पटत नाही. मग ते कितीही खरे असू देत. हे अलीकडेच जगाने सुद्धा पाहिले.

- Advertisement -

या सर्व वादाला तोंड फुटल्यावर देशातील युवक गप्प तरी कसे राहणार. कोण सत्य आणि कोण खोटे हे सर्वांनाच दिसतं. म्हणून एकेकाळी ज्या भारतरत्नांना इथल्या युवकांनी डोक्यावर घेतले, त्याच युवकांनी आज मोठ्या प्रमाणात त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करून सत्यता डोळ्यासमोर आणून दिली. सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नव्या जोमाने सर्व युवक पुन्हा शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभे राहिले. हजारो-लाखो ट्विटर खात्यावरून समर्थनार्थ ट्विट आपण पाहिले. प्रत्येक घटनेवर बारीक लक्ष ठेवणारा युवक तेवढाच सक्रिय झाला. हे मान्य केले पाहिजे. पेटून उठणारा हा आवाज बदलाची अपेक्षा करतोय. पण यांच्या सोशल मीडियावरील क्टिव्हिटीवर सरकारचे बारीक लक्ष आहे. अर्थात काही खोटी खाती आहेत. जी विनाकारण वाद पसरवत असतात. जी दोन्ही बाजूने आहेत. याचाच फायदा घेत सरकारने ट्विटरवरील काही खाती बंद करण्याचा निर्णय ट्विटर संस्थापकांना पाठवला. पण जो युवक बदलाची अपेक्षा करतोय त्यांना गप्प करून चालणार नाही.

आपण ज्या देशात राहतो त्याच देशात आज गरीबी, भूकबळी, आरोग्य, बेरोजगारी, अनेक भागात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. याकडे आमचे लक्ष नाही. यावर सेलिब्रिटीज व मुख्य मीडिया कधीच बोलत नाही. मग सोशल मिडीयाद्वारे जर युवक या गोष्टीला समोर आणत असतील तर त्यांना अपराधी ठरवलं जातं ही शोकांतिकाच…

या सर्व गोष्टी देशात होत आहेत याची जाणीव युवकांना होतेय. त्यांना सुद्धा मन आहे. म्हणून सध्या व्हॅलेंटाईन डे सुद्धा हा युवक साजरा करतोय. या सातही दिवसात त्यांचा वेगळा आनंद एकीकडे पाहायला मिळतोय. आपल्या भोवतालच्या जगाचा विसर पडू न देता हे होत आहे.(अपवाद वगळता) पण आता या प्रेमी युगुलांवरसुद्धा एक गट लक्ष ठेवून आहे. ही आपली संस्कृती नाही.. हे चुकीचं आहे असं हातात दंडुका घेऊन बोलल्या जातं. प्रेम करणं हा ज्याच्या त्याच्या खासगी आयुष्याचा विषय…इतरांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणार्‍या लोकांना सेलिब्रिटीज किंवा क्रिकेटर बोलतील का..? हे सुद्धा सोशल मीडियावर युवक विचारत आहेत.

एकीकडे सार्वभौमत्वाचा गप्पा मारणारे आपण सार्वभौमत्व टिकून ठेवण्यासाठी काय करतो..? याचेसुद्धा उत्तर आपल्याकडे नाही. देशात अनेक अंतर्गत प्रश्न आहेत, त्यावर विचारमंथन करून, चर्चा करून तोडगा काढता येईल का.. यावर बोलले तर आणखी बरे होईल. अन्यथा आम्ही म्हणतो तेच खरे हीच प्रवृत्ती देशात राहील.. अगदी राहत इंदोरी यांनी म्हटल्याप्रमाणे..

हमारे मुह से जो निकले वही सदाकत है ।
हमारे मुह में तुम्हारी जुबान थोड़ी है…।
या सद्य:परिस्थितीत बदल व्हावा हाच आशावाद…!

-धम्मपाल जाधव
-(लेखक युवा विषयाचे भाष्यकार आहेत)

- Advertisement -