वाढणारी उष्णता आणि तापणारी शहरे!

यंदाचा हा उन्हाळा ग्लोबल वॉर्मिंगमुळेच वाढला आहे, असं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे, पण असं मत व्यक्त करताना आपण आपल्या शहरांच्या बदलत्या स्थितीचा, हवेच्या दिशेचा विचार करीत नाही. विकासाच्या वाटेवर धावताना भारतातल्या शहरांमध्ये विविध बांधकामांमुळे गेल्या काही दशकांमध्ये मोठे बदल झाले आहेत. शहरांभोवतीची आणि शहरांमधली मोठी झाडं या बांधकामांमुळे नष्ट झाली. त्यापाठोपाठ डांबरी, सिमेंटचे रस्ते आणि काँक्रीटच्या इमारती असं शहरांचं नवं रूपडं तयार होत गेलं. काँक्रीटच्या अतिरिक्त इमारती तसेच रस्ते यामुळे शहरांमध्ये तापमान वाढत गेलं. हे तापमान आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा जास्त असल्यामुळे या ठिकाणी उष्ण भाग तयार झाल्याचं जाणवतं. जसजशी लोकसंख्या वाढत जाते तसतशी या उष्ण भागांची म्हणजेच हीट आयलंडची व्याप्ती वाढत जाते.

–दिलीप कोठावदे

उन्हाचा चटका वाढू लागला की जागतिक तापमान वाढीबद्दल चर्चांना उधाण येतं आणि उन्हाची तीव्रता कमी झाली की या चर्चा हवेत विरून जातात. त्यातही नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या समस्यांचे खापर आपण निसर्गावर फोडून मोकळे होतो, मात्र अनेक वेळा यातील काही समस्या या मानवनिर्मित असतात याचा आपल्याला सोयीस्कररित्या विसर पडतो आणि याच समस्यांचे परिणाम निसर्ग काही वर्षांनी आपल्याला भोगायला लावत असतो. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक असणे ही काळाची नव्हे तर आजची, आताच्या या क्षणाची गरज झाली आहे.

खरंतर आपण रोजच वृत्तपत्रात किंवा बातम्यांमध्ये जागतिक तापमान वाढ अर्थात ‘ग्लोबल वॉर्मिंग’ याविषयी काहीतरी वाचत, ऐकत असतो, मात्र या सगळ्या माहितीकडे आपण दुर्लक्ष करतो, परंतु यामुळे मानवी जीवन एक दिवस पूर्णपणे नष्ट होणार आहे या वास्तवतेची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र तेव्हा खूप उशीर झालेला असेल यात शंका नाही. कारण मानवाला प्रगतीच्या पायर्‍या चढवणारी वाढती औद्योगिक क्रांती एक दिवस मानव जातीलाच संपविणार हे भयावह वास्तव आहे.

काय आहे ग्लोबल वॉर्मिंग?

पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाचे तापमान वाढणे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमान वाढ असे म्हणता येईल, मात्र याचेदेखील अनेक पैलू आहेत. आजच्या वातावरण बदलांचा विचार करता भर उन्हाळ्यात धो धो बरसणारा पाऊस, गारपीट आणि पावसाळ्यात चटके लागणारे ऊन तर हिवाळ्यातदेखील उन्हाळ्यासारखे ऊन लागणे हे जागतिक तापमान वाढीचे परिणाम आहेत. या बदलांकडे गांभीर्याने बघण्याऐवजी आपण सोशल मीडियावर या बदलांची खिल्ली उडवून मोकळे होतो. उन्हाळ्यात पावसाची मजा घेता येते म्हणून या सगळ्या समस्येकडे आपण कळत नकळतपणे दुर्लक्ष करतो, मात्र आता आपल्याला या अनियमित बदलांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. अन्यथा ही समस्या मानवी जीवनाचा नाश करणारी समस्या ठरेल हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही.

जागतिक स्तरावरील हवामानतज्ज्ञ सातत्याने गेली अनेक वर्षे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, कचरा प्रदूषण या सगळ्या समस्या आणि त्यांच्या भविष्यकालीन परिणामांबाबत वेळोवेळी सूचित करीत आले आहेत. एवढेच नाही तर काल परवाच जागतिक हवामान अभ्यासकांनी पुढची पाच वर्षे अधिक उष्णतेची राहणार असल्याचा इशारा दिला आहे. दिवसेंदिवस पृथ्वीचा ओझोन थर विरळ होत चालला आहे. परिणामी जागतिक तापमानात वाढ आणि अंटार्क्टिका प्रदेशावरील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे जगाची वाढती मोठी लोकसंख्या सर्व नैसर्गिक संसाधनांना संपवत आहे. त्याचवेळी माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गाची कत्तल करीत आहे.

यंदाचा हा उन्हाळा ग्लोबल वॉर्मिंगमुळेच वाढला आहे, असं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे, पण असं मत व्यक्त करताना आपण आपल्या शहरांच्या बदलत्या स्थितीचा, हवेच्या दिशेचा विचार करीत नाही. विकासाच्या वाटेवर धावताना भारतातल्या शहरांमध्ये विविध बांधकामांमुळे गेल्या काही दशकांमध्ये मोठे बदल झाले आहेत. शहरांभोवतीची आणि शहरांमधली मोठी झाडं या बांधकामांमुळे नष्ट झाली. त्यापाठोपाठ डांबरी, सिमेंटचे रस्ते आणि काँक्रीटच्या इमारती असं शहरांचं नवं रूपडं तयार होत गेलं. काँक्रीटच्या अतिरिक्त इमारती तसेच रस्ते यामुळे शहरांमध्ये तापमान वाढत गेलं. हे तापमान आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा जास्त असल्यामुळे या ठिकाणी उष्ण भाग तयार झाल्याचं जाणवतं. जसजशी लोकसंख्या वाढत जाते तसतशी या उष्ण भागांची म्हणजेच हीट आयलंडची व्याप्ती वाढत जाते.

शहराच्या हद्दीबाहेर जाताच तापमान कमी झालेलं जाणवतं. शहरांमधील बदलांमुळे, वाढत्या बांधकामांमुळे वार्‍याचा वेग कमी झाला हेदेखील उष्णता वाढीचे एक कारण आहे. याशिवाय शेती आणि हिरवळीचं क्षेत्र कमी कमी होत गेलं तसेच डांबरी-काँक्रीट रस्त्यांची व्याप्ती वाढल्याने शहरांमधील तापमानात वाढ झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याचबरोबर जमिनीच्या वापरात झालेला बदल तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डांबरी व सिमेंटचे रस्ते तसेच बांधकामात वापरल्या जाणार्‍या काँक्रीटचा उष्णता वाढीमध्ये मोठा वाटा आहे. कारण काँक्रीट उष्णता शोषून घेत असल्याने लवकर तापते आणि उशिरा थंड होते. ही उष्णता दीर्घकाळ उत्सर्जित होत असते. त्यामुळेही उष्णता वाढीचे प्रमाण वाढते.

गेल्या दोन दशकांमध्ये नव्यानं वाढणार्‍या शहरांचं तापमान आधीपासून वसलेल्या शहरांच्या तापमानापेक्षा अधिक गतीनं वाढत असल्याचं अभ्यासात लक्षात आलं आहे. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे याला अजून एक बाब जबाबदार आहे ती म्हणजे ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’ अर्थात हरितगृह परिणाम. हे जागतिक तापमान वाढीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता ‘हरितगृह परिणाम’ म्हणजे नेमकं काय? तर समजा सर्व काचा बंद करून एक गाडी भरउन्हात उभी केली तर गाडीच्या आतील तापमान हळूहळू वाढू लागेल आणि शेवटी तापलेल्या गाडीत माणसाला बसणे अशक्य होईल. अशाच प्रकारची स्थिती माणसाकडून पृथ्वीसोबत केली जात आहे. मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे दूषित वायूंचे वातावरणातील प्रमाण पृथ्वीच्या नैसर्गिक पातळीपेक्षा अत्यंत जलद गतीने वाढत आहे.

याचाच अर्थ पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांसारख्या वायूंचे पृथ्वीवरील उत्सर्जन वाढत चालले आहे. निसर्गतःच हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण हे जवळजवळ स्थिर असते. त्यामुळे निर्माण होणार्‍या हरितगृह परिणामांची तीव्रतादेखील स्थिर असते. नैसर्गिक हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे वातावरण उष्ण बनून सरासरी तापमान १५ सेल्सिअस एवढे राखले जाते, मात्र वाढते प्रदूषण, मिथेनचे उत्सर्जन, ऑक्सिजनचा अभाव, कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. नैसर्गिक हरितगृह परिणाम नसता तर वातावरणाचे सरासरी तापमान -२० सेल्सिअस इतके खाली गेले असते आणि आपली पृथ्वी बर्फाचा थंड गोळा झाली असती, मात्र सध्या याच्या उलट परिस्थिती निर्माण होत आहे.

औद्योगिकीकरणामुळे कारखाने वाढले आणि यामुळे मानवाच्या गरजादेखील वाढल्या, मात्र या सगळ्यांमधून आपण पृथ्वीला हानी पोहचवत आहोत हे सोयीस्करपणे विसरलो. कारखान्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन, कार्बन आणि हानिकारक वायू यांचे उत्सर्जन होते. त्याच्या परिणामस्वरूप ओझोनचा थर नष्ट होताना दिसत आहे. सूर्यापासून निघणार्‍या हानिकारक किरणांना थोपवून ठेवण्याचे काम ओझोन करीत असतो, मात्र वाढत्या औद्योगिकरणाने आणि वाहनांच्या वापराने दिवसेंदिवस दूषित वायूंचे उत्सर्जन वाढत असल्याने हा ओझोन थर कमी होत चालला आहे आणि यामुळे पृथ्वीचे तापमान अधिकाधिक उष्ण होत आहे.

जागतिक तापमान वाढीमुळे अनेक पर्यावरणविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे पृथ्वीवरील दुर्मीळ जीवांचा नाश होण्याबरोबरच भूतलावरील महासागरांच्या आम्लीकरणासारख्या समस्यादेखील गंभीर रूप धारण करीत आहेत. आताच्या परिस्थितीचा अभ्यास केला तर लक्षात येते की, या शतकात सरासरी जागतिक तापमान दर दशकात ०.३ ते ०.१ सेल्सिअस इतका वाढत असतो. हेच तापमान २०२५ पर्यंत १ सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ दिवसेंदिवस आपली पृथ्वी अधिक गरम आणि निस्तेज होत जाईल, मात्र मानवाने दूषित वायूंचे उत्सर्जन नियंत्रणात आणले तर ही तापमान वाढ नक्कीच कमी होऊ शकते.

ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम

अनेकदा एप्रिल महिन्याच्या अखेरीस वाढलेल्या तापमानाचा संबंध थेट ग्लोबल वॉर्मिंगशी जोडला जातो, मात्र हवामानतज्ज्ञ या मताशी सहमत नाहीत. कारण १८९३ सालीही तापमानाने विक्रमी उच्चांकी पातळी गाठली होती. याचा अर्थ शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीही तापमान वाढलेलं होतं हे निश्चित. त्याचीच पुनरावृत्ती आता होतेय. याचा अर्थ त्यावेळीही तापमान वाढ होतच होती. त्यामुळे याचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी जोडणं अयोग्य असल्याचं हवामान तज्ज्ञांना वाटतं.

वाढत्या तापमानाचा विचार करताना हवेच्या दिशेचाही विचार होणे आवश्यक आहे. राजस्थानसारख्या वाळवंटी उष्ण प्रदेशाकडून येणारी हवा गरम असते. त्यामुळे उष्णतेची लाट जशी येते तशी वार्‍याची दिशा बदलल्यावर निघूनही जाते किंवा बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे उत्तर व मध्य भारतासह आजूबाजूच्या प्रदेशातील वातावरणात बदल होऊन पाऊस पडल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई-पुण्यासारखी मोठी शहरे विकसित होताना या शहरांमध्ये भल्यामोठ्या काँक्रीटच्या इमारती बहुसंख्येने उभ्या राहिल्या. त्याचा परिणाम वार्‍याचा वेग आणि दिशा बदलण्यात झाला. परिणामी शहरं गरम झाली. आता महाबळेश्वर, पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही तापमान वाढल्याचं दिसून येतं. कारण आर्थिक उन्नतीच्या मागे धावताना इथेही काँक्रीटची जंगले उभी राहिली. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने शहरांचे आकार वाढले, रचना बदलल्या. बसकी घरे, एक-दोन मजली इमारती गडप होऊन टोलेजंग बिल्डिंग उभ्या राहिल्या. त्यामुळे वार्‍याची दिशा बदलली आणि आता कृत्रिम मार्गांनी उन्हाळ्यावर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तापमान वाढीची प्रमुख कारणे ः

१. वारेमाप वृक्षतोड झाल्याने झाडांची, जंगलांची संख्या कमी झाली.
२. दिवसेंदिवस सिमेंटच्या जंगलांमध्ये होणारी वाढ
३. भूगर्भातील पाण्याचा प्रमाणापेक्षा जास्त उपसा
४. वाढत्या औद्योगिकरणातून कारखान्यांचे विषारी वायू व केमिकलयुक्त सांडपाण्याचे नैसर्गिक स्रोतांमध्ये उत्सर्जन झाल्यामुळे कार्बन, सल्फरसारख्या विषारी वायूंचे प्रमाण वाढले.
५. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वाढता वापर.
६. अल-निनो आणि ला-निनोचा वातावरणात वाढता प्रभाव