घरफिचर्ससारांशवाढते तापमान...पृथ्वीच्या मुळावर!

वाढते तापमान…पृथ्वीच्या मुळावर!

Subscribe

मानवाने विकासाच्या नावावर नैसर्गिक संसाधने संपविली आणि निसर्गाला जिंकण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकते याची प्रचिती सध्या आपल्याला येत आहे. प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, विरळ ओझोन थर, समुद्र सपाटीत वाढ, नैसर्गिक आपत्ती आणि यातून होणारे प्रचंड आर्थिक नुकसान अशी कडू फळे आपण चाखत आहोत. ज्या जंगलांनी आपल्याला जन्म दिला ज्या हवा, पाणी आणि वृक्षांनी आपल्याला जगविले तेच आता आपण नष्ट करायला निघालो असून आपल्याच हाताने आपल्याच अंगावर कुर्‍हाड चालवित आहोत. स्वतःला बुद्धिमान आणि विज्ञान युगात वावरतो अशी घमेंड मारणार्‍या मानवाला साधे निसर्गाचे गणित समजू शकले नाही याचे आश्चर्य वाटते.

जगभर वातावरणात होत असलेले बदल मानवासाठी चिंतेचा विषय बनले आहेत. थंडी, ऊन आणि पाऊस याच्या उलटसुलट चक्राने पृथ्वी गरगरू लागली असून त्याची एक झलक, नव्हे चटके गेल्या आठवड्यात भारतीयांना बसले. मुंबईत दशकातल्या विक्रमी उच्चतम तापमानाची नोंद झाली. या आठवड्यात दिल्लीतही हा नकोसा विक्रम नोंदवला गेला. कोरोनापेक्षाही हवामान किंवा वातावरणातील बदल हे दीर्घकालीन विध्वंस घडवणारे आहेत, त्यामुळे त्यांचा विचार देशोदेशीच्या सरकारांना सातत्याने करावा लागतो आहे. एक संशोधन अलीकडेच प्रसिद्ध झाले, जे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानतर्फे हाती घेण्यात आले होते आणि प्राधान्याने महाराष्ट्रकेंद्री आहे.

पुढील काही वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईसह पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सन 2033 नंतर सरासरी 1 ते 2.5 अंशांची वार्षिक तापमानवाढ अपेक्षित आहे. 2050 पर्यंत हीच परिस्थिती राहिल्यास ज्वारी, ऊस आणि भाताच्या उत्पादनात लक्षणीय घट गृहीत धरण्यात आली आहे. म्हणजे केवळ औद्योगिक उत्पादकता नव्हे, तर पीक-उत्पादनातही घट होऊ लागेल. इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे की, हरितगृह वायू उत्सर्जनात अपेक्षित घट घडवून न आणल्यास 2030 पर्यंत भारतासह 60 देशांच्या पतमानांकनात सातत्याने अवमूल्यन संभवते. तथापि राज्यातील अनेक भागांत उन्हाची काहिली वाढत असताना त्यांचे गांभीर्य अधिकच अस्वस्थ करणारे ठरते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोनापाठोपाठ हवामानबदलाच्या मुद्याला प्राधान्य दिले आहे आणि लवकरच जगातील प्रमुख राष्ट्रप्रमुखांशी ते यासंदर्भात शिखर परिषदेत बोलणार आहेत.

- Advertisement -

अरबी समुद्रात पाठोपाठ उठणारी चक्रीवादळे, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील अनियंत्रित वणवे, ऑस्ट्रेलियातील पूर, मुंबईसारख्या शहरांचे तापमान 40 अंश किंवा त्याच्या आसपास सातत्याने जाणे असे अनेक अनाकलनीय बदल गेल्या काही वर्षांत दिसू लागले आहेत. केवळ चर्चा करून ते विस्मृतीत जावेत अशी परिस्थिती नाही. इतका प्रखर उष्मा हा अनेकदा अतिमुसळधार पावसाळ्याची नांदी ठरतो. त्यामुळे होणारे नुकसान, दुष्काळी म्हटल्या जाणार्‍या भागांमध्ये अचानक पूर उद्भवल्यानंतर सरकारी यंत्रणांची होणारी तारांबळ आणि तिजोरीवर पडणारा ताण याबाबत निव्वळ परिषदा, अहवाल आणि लेखांपलीकडे नियोजन आणि व्यवस्थापनाची गरज आहे. या संकटाच्या पुनरावलोकनाची संधीही मिळणार नाही. यासाठी स्थानिक, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक मोहिमेची गरज आहे. पर्यायी आणि स्वच्छ ऊर्जास्रोतांमध्ये भरीव गुंतवणूक करणे, जीवाश्म इंधनांचा वापर टप्प्याटप्प्याने घटवणे, प्रदूषकांना प्रतिबंध घालणे, जंगलतोड व जंगलातील जिवांचा संहार करणार्‍यांना वेळीच शासन करणे असे अनेक उपाय सातत्याने राबवावे लागतील. वातावरण- बदलाच्या झळांपासून हा बोध घेणे अत्यावश्यक ठरते

भूशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीच्या तापमानात सातत्याने बदल होत आहेत. भूशास्त्रीय पुरावे असे सांगतात की भूतकाळातले तापमानाचे स्वरूप सध्याच्या तापमानाच्या स्वरूपापेक्षा निराळे होते. काही ठिकाणी जास्त तापमान तर काही ठिकाणी अगदी कमी असे ते होते. पण सध्या जी तापमानवाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचे दिसत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणार्‍या तापमानवाढीचे प्रमाण हे मानवनिर्मित घटनातून होणार्‍या तापमान वाढीपेक्षा जास्त झाले आहे. म्हणजेच निसर्ग बेभरवशाचा झाला आहे. ही बाब वैज्ञानिकांना चिंताजनक वाटते. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील असे एकूण चित्र आहे.

- Advertisement -

हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते त्याला हरितगृह परिणाम म्हणतात, तर या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. वातावरणाच्या थरांवर सूर्यकिरणे पडतात. वातावरणाचे थर सूर्यकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परावर्तीत होणारी सूर्यकिरणं हरितगृह वायू शोषून घेतात किंवा पुन्हा उत्सर्जित करतात. याच सौरऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापते. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान 30 अंशांनी कमी आणि जीवसृष्टीसाठी ते घातक ठरणारे असते. या नैसर्गिक ग्रीनहाऊस परिणामाबरोबरच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातून उत्पन्न होणार्‍या वायूंचे उत्सर्जन होत असते. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. यालाच जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल म्हणतात.

मानवाने विकासाच्या नावावर नैसर्गिक संसाधने संपविली आणि निसर्गाला जिंकण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकते याची प्रचिती सध्या आपल्याला येत आहे. प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, विरळ ओझोन थर, समुद्र सपाटीत वाढ, नैसर्गिक आपत्ती आणि यातून होणारे प्रचंड आर्थिक नुकसान अशी कडू फळे आपण चाखत आहोत. ज्या जंगलांनी आपल्याला जन्म दिला ज्या हवा, पाणी आणि वृक्षांनी आपल्याला जगविले तेच आता आपण नष्ट करायला निघालो असून आपल्याच हाताने आपल्याच अंगावर कुर्‍हाड चालवित आहोत. स्वतःला बुद्धिमान आणि विज्ञान युगात वावरतो अशी घमेंड मारणार्‍या मानवाला साधे निसर्गाचे गणित समजू शकले नाही याचे आश्चर्य वाटते.

जागतिक सरासरी तापमान वाढ होते त्याचा परिणाम पृथ्वीवर सर्वत्र जाणवतो. परंतु प्रादेशिक भौगोलिक कारणांमुळेसुद्धा तेथील तापमानात वाढ होते. खडकाळ आणि वाळूच्या भागात दिवसाचे तापमान जास्त असते. वायू प्रदूषण ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत आणि प्रदूषण आहे तिथे तापमान जास्त असते जसे विदर्भात नागपूर आणि चंद्रपूरसहित अनेक शहरांचे तापमान जास्त असते. मोठ्या प्रमाणात शहरीकरण हेसुद्धा तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील ऋतुचक्र व हवामानात मोठे बदल झाले आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या ऋतुचक्रात बदल झाला आहे. अल-निनो, ला-निनोच्या सतत प्रभावामुळे जगभरातील दैनंदिन हवामानावर प्रभाव पडला आहे. तापमान वाढ ही ऋतुचक्र व हवामानावर परिणाम करते. त्यामुळे अति पाऊस, ढगफुटी, वादळे, महापूर, थंडी आणि उष्णतेची लाट व रोगराई अशा अनेक नैसर्गिक संकटांना आज सर्वच देशांना सामना करावा लागतो.

जागतिक तापमान आणि प्रदूषण कमी करायचे असेल तर त्यांचे स्रोत बंद करावयास पाहिजे. उद्योगातून जलवायू, कचरा प्रदूषण होणारच नाही याची काळजी घेतली पाहिजे. वाहने सौरउर्जेवर, बॅटरीवर किंवा सीएनजीवर चालवावी. कोळसा आधारित वीजनिर्मिती कमी करून सौर, जल, वायू ऊर्जा, नैसर्गिक व बॉयोगॅस ऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जास्रोतांकडे आपण वळलो पाहिजे. एलईडी दिव्यांचा सर्वत्र वापर व्हावा आणि वीज बचत करावी. जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर, शहरातील सर्व खुल्या जागांवर वृक्षारोपण झालेच पाहिजे. जंगले वाचवावी आणि लावावी. काँक्रिटची घरे व रस्ते तापू नये म्हणून त्यांना पांढरा रंग द्यावा. गाव तिथे तलाव आणि लहान धरणे सर्वत्र बांधावी, पावसाचे पाणी अडवावे व जिरवावे. जगाची 7.19 बिलीयन एवढी मोठी लोकसंख्या सर्व नैसर्गिक संसाधनांना संपवित आहे. त्यामुळे तिला कमी करणे गरजेचे आहे. अशा अनेक उपाययोजना आज राबविल्यास हळूहळू अनेक वर्षापर्यंत पर्यावरणाचे झालेले नुकसान भरून निघेल.

निसर्गाचे एक चक्र आणि साखळी आहे. त्यातील एक साखळी तुटली तर दुसरी आणि पुढे ती तुटत जाते. आपण जंगले तोडली. त्यामुळे जैवविविधता कमी झाली. प्राणवायू कमी होऊन कर्ब वायू वाढला. कारखानदारी वाढविली. प्रदूषण वाढले. तापमान वाढले. नैसर्गिक संकटे वाढली इत्यादी आज पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वायू, जल, भूमी अशा जीवनावश्यक नैसर्गिक घटकांचे आपण प्रदूषण करून आपले मरण ओढविले आहे. थर्मल पॉवरच्या प्रत्येक मेगावॅटसाठी दरवर्षी एका माणसाचा जीव जातो असा अहवाल ग्रीन पीस या संस्थेने दिला आहे. शहरातील पाण्यात घाण, कचर्‍याचे ढिगारे, हाच कचरा पुढे नाल्यातून नदीत जातो आणि समुद्रात साचतो. यामुळे जल जैव विवधिता ढासळते.

सागरी क्षारता व आम्लता वाढते आणि याचा दूरगामी परिणाम सागरी प्रवाहावर होतो आणि या प्रवाहाचा परिणाम तापमान वाढीवर होतो असे हे दुष्टचक्र सुरू होते आणि पर्यावरणाला दूषित करते. प्रदूषणाला जितके उद्योग तितकेच लोकसुद्धा जबाबदार आहेत. आपण आपले घर कसे स्वच्छ राहिल एवढाच विचार करतो, पण आजूबाजूचा परिसर साफ ठेवला पाहिजे याचा कोण विचार करणार? वर्षाला प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, जगवले पाहिजे यासाठी पुढाकार आपणच घ्यायला हवा. सरकार सर्व काही करेल, आपण मात्र हातावर हात ठेवून राहणार असू तर एक दिवस वाढते तापमान माणसाला जगवणार्‍या पृथ्वीच्या मुळावर येणार आहे. लोकांची मानसिकता बदलली तरच सरकारही बदलेल. आता आपण कोणत्याही स्थितीत पर्यावरणाचा र्‍हास थांबवलाच पाहिजे नाहीतर पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -