घरफिचर्ससारांशपृथ्वीची रक्तवाहिनी...

पृथ्वीची रक्तवाहिनी…

Subscribe

सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘जागतिक नदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘मार्क अंजेलो’ या जागतिक जलतज्ज्ञाच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक नदी दिवस साजरा करण्याचे निश्चित केले. मानवी जीवन प्रवाहित करणार्‍या नद्यांचा उपयोग केवळ माणसाच्या गरजांसाठीच नव्हे तर संपूर्ण सजीवसृष्टीला जिवंत राखण्यासाठी होतो. म्हणूनच आजच्या दिवसाला महत्व प्राप्त होते.

हिमजल, भूजल-स्रोत एवं वर्षा के जल को उद्गम से संगम तक, स्वयं को प्रवाहित रखती हुवी, जो अविरलता, निर्मलता और स्वतंत्रता के साथ बेहती है और सदियोंसे सुरज, वायू और धरती से आजादी से स्पर्श करती हुवी जीवसृष्टी से परस्परपूरक और पोषक नाता जोडकर जो प्रवाहित है वो नदी है.
-प्रा. जी. दी. अग्रवाल, राजेंद्र सिंग

नदी केवळ आपल्याला दिसणारं वाहतं पाणी नसून एक फार मोठी संकल्पना आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्त वाहिन्या आहेत, ज्यांच्यामधून रक्त वाहते त्याचप्रमाणे नद्या पृथ्वीच्या रक्तवाहिन्या आहेत. आपल्या शरीरात वाहणारे रक्त हे जर शुद्ध, सातत्याने वाहणारे आणि विनाअडथळा असेल तर आपली तब्येत चांगली राहते तसेच पृथ्वीतलावरून वाहणार्‍या नद्या जर अविरल, निर्मल आणि स्वतंत्र राहिल्या तर पृथ्वीची तब्येत चांगली राहील.

- Advertisement -

मानवाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, किंबहुना पाण्यामुळेच मनुष्यप्राणी जिवंत राहू शकतो आणि म्हणूनच कुठलीही वसाहत नदीच्या किनारी वसली. आपण जर प्राचीन काळापासून भौगोलिक इतिहास बघितला तर असे लक्षात येते की गोदावरीतीरी नाशिक शहर वसले तसेच जगातले जवळपास सर्वच मोठी शहरे ही कुठल्या ना कुठल्या नदीच्या किनारी वसलेली आहेत. गोदातीरी वसलेले नाशिक, यमुनातीरी वसलेले दिल्ली, मिठी तीरी वसलेले मुंबई, मुळा-मुठातीरी वसलेले पुणे ही सर्वच शहर नदी किनारी वसली. नद्यांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी नद्या अविरल, निर्मल, स्वतंत्र होण्यासाठी राहण्यासाठी नेमके प्रश्न काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. गोदावरी, मुळा-मुठा, मिठी, यमुना, गंगा किंबहुना भारतामधल्या सर्वच नद्या या शोषण, प्रदूषण व अतिक्रमण यांच्यामुळे अडचणीत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची अविरलता आपणच खंडित केलेली आहे.

अविरत नदी -जर अविरतपणे वाहणारी नसेल तर ती नदी होऊ शकत नाही. जुन्या गाण्याचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ओह रे ताल मिले नदी के जल से, नदी मिले सागर से परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. आता नदी सागराला मिळत नाही तर सागर नदीला भेटायला येतो आणि त्याची मुख्यतः कारणे दोन. एक म्हणजे आपण मोठ्या प्रमाणावर बांधलेली धरणे आणि दुसरे म्हणजे भूजलातील पाण्याचा केलेला बेसुमार उपसा. त्यामुळेच जवळपास सर्वच नद्यांची अविरलता आता अडचणीत आली आहे.

- Advertisement -

प्रदूषण -प्राचीन काळी नदीचे पाणी हे अमृत समजले जात असे. नदीत अंघोळीला जाण्याआधी डोक्यावर एक तांब्या घेतला जायचा. जेणेकरून नदीत अंघोळ करताना लघवी होऊ नये याची देखील दक्षता घेतली जायची. आता सर्व शहराचे सांडपाणी हे तथाकथित प्रक्रिया करून नदीत सोडले जाते. आता ही प्रक्रिया नेमकी काय असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरे म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. सर्वात घातक म्हणाल तर नद्यांमध्ये सर्रासपणे सोडले जाणारे रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी.

अतिक्रमण – नदीची आपली एक स्वतःची हद्द असते त्याला आपण पूररेषा म्हणतो, परंतु आता शहरात जागांच्या वाढत्या किमतीमुळे, मानवी लोभामुळे आपणच त्यांच्या हद्दीत घुसायला लागलेलो आहोत. तसेच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली जवळपास सर्वच शहरांमध्ये नद्यांचे कॅनॉल बनवायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. लहान -लहान ओढ्यांमुळे नद्या बनतात. शहरांमध्ये तर ते ओढे शोधावे लागतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे थोडासा पाऊस जरी पडला तर सर्वच मोठ्या शहरांच्या रस्त्यांवर नद्या वाहायला लागतात.

शोषण

शोषण ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आधी आपण विकास या शब्दाची राज्यकर्त्यांची व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून विकास म्हणजे फक्त सिमेंट/स्टील याचा जास्तीत जास्त वापर. नदीपात्रामध्ये सिमेंटचे काँक्रिटीकरण, बेसुमार वाळू उपसा या माध्यमांनी नदीच्या शोषणाची प्रक्रिया सातत्याने चालू आहे.

नद्यांवरील हे सर्व अत्याचार हे गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहेत. आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर दुर्घटना वारंवार घडत आहेत. उत्तराखंडमध्ये वारंवार होणार्‍या दुर्घटना, माळीनची दुर्घटना त्रंबकेश्वरमध्ये थोड्याशा पावसात रस्त्यावर वाहणारी गोदावरी हे सर्व याचेच परिणाम आहेत.

मनुष्यप्राणी हा स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजायला लागलेला आहे आणि त्यामुळेच निसर्गाने मानवाशी युद्ध पुकारले आहे. निसर्ग खूप मोठा आहे त्याच्याबरोबर युद्धात मानवाला जिंकणे अशक्य आहे आणि ते मान्य करावेच लागेल. यावर उत्तर म्हणजे पुनश्च एकदा, प्राचीन काळाप्रमाणे निसर्गाचा, नद्यांचा, पंचमहाभूतांचा सन्मान करणे हे क्रमप्राप्त आहे. त्यांच्यामुळे आपण आहोत आपण त्यांच्यापेक्षा खूपच छोटे आहोत हे मान्य करावेच लागेल. प्राचीन काळी नद्यांना आई समजत असत आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी आचरण होत असे. आजही माता म्हणतात, परंतु आता ते फक्त म्हणण्यापुरते.

आपण नद्यांना माता म्हणतो, परंतु त्यांच्याशी मातेप्रमाणे आचरण करतो का? आता आपण त्यांच्याकडे सन्मानाने बघण्याऐवजी, उपभोगाच्या वस्तू म्हणून बघायला लागलो आहोत आणि त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. जर ही परिस्थिती बदलायची असेल आणि ती बदलणे आवश्यक आहे तर आपल्याला परत एकदा त्यांच्याशी प्राचीन काळाप्रमाणे नातं जोडावं लागेल. नद्यांचा सन्मान करावा लागेल. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. तसे केले नाही तर निसर्गाला, नद्यांना फरक पडणार नाहीये, परंतु आपला विनाश मात्र निश्चित आहे. आज विश्व नदी दिन या निमित्ताने सर्वांनी मिळून संकल्प करूया आपल्या आपल्या भागातील नदीचा सन्मान करूया …

तिचा सन्मान केवळ पूजा करून होणार नाहीये. तिचा खर्‍या अर्थाने सन्मान करायचा असेल तर तिला अविरल, निर्मल, स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा. प्रत्येकाने किमान एक झाड लावायला हवे आणि ते जागवायला हवे. आपल्या छतावर पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरायला हवा. आपण स्वतः प्रदूषण करू नये आणि करू देऊ नये. प्लास्टिकचा वापर बंद करावा. या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाने केल्या तर खर्‍या अर्थाने नद्यांचा सन्मान होईल.

नाशिकची गोदावरी, महाराष्ट्रातल्या सर्व नद्या किंबहुना भारतातल्या सर्वच नद्या कोर्टकचेरीत अडकल्या आहेत. पर्यावरण प्रेमींना पर्यावरणवादी म्हटलं जातं. विकास विरुद्ध पर्यावरण हा संघर्ष काही नवीन नाही. नाशिकच्या गोदावरीचे उदाहरण घ्यायचं ठरलं तर उच्च न्यायालय मुंबई व राष्ट्रीय हरित लवाद यांनी अनेक निर्देश दिलेले आहेत. शोषण, अतिक्रमण, प्रदूषण, प्रवाह व त्याचबरोबर समाजाची मानसिकता यावरही अनेक आदेश झालेले आहेत. उच्च न्यायालय मुंबई यांनी दोघांवर दोष ठेवलेला आहे. उच्च न्यायालय मुंबई हे आपल्या आदेशात म्हणते की, “On one hand the state has failed in protecting the river and on the other hand the citizens have failed in performing their fundamental duties..”

राज्यकर्ते आणि समाज हे दोघेही दोषी आहे असं एकंदरीत उच्च न्यायालय म्हणते आहे. राज्यकर्त्यांनी काय करावे यासाठी नीरी नावाच्या संस्थेची नेमणूक केली तर समाजाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करावयास सांगितले आहे अशाच आशयाचे आदेश जवळपास भारतातल्या सर्व नद्यांबाबत उच्च न्यायालये आणि राष्ट्रीय हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयानेदेखील सांगितले आहे. परंतु हा प्रश्नच मुळात का निर्माण होतो आहे? याचे कारण म्हणजे समाजाची निष्क्रियता ज्या वेळेस समाज म्हणेल की आम्हाला आमची नदी अविरत, निर्मल स्वतंत्र पाहिजे आहे त्याच वेळेला खरे तर नद्यांचा सन्मान होईल. यासाठी खरोखर गरज आहे ती म्हणजे संत म्हणजे विद्वान, शासन आणि समाज यांनी सर्वांनी एकत्र येण्याची. गरज आहे ती विकासाची परिभाषा बदलण्याची. पर्यावरण पूरक विकास शक्य आहे हे समजण्याची. नद्या आणि निसर्ग यामुळे आपण आहोत, आपल्यामुळे नद्या आणि निसर्ग नाही हे समजण्याची.

गरज आहे, नद्यांना जोडण्यापेक्षा आपण नद्यांशी जोडले जाण्याची. निसर्गाला बदलण्याऐवजी आपण आपल्यात बदल घडवण्याची. चला तर मग नद्यांचा, निसर्गाचा या पंचमहाभूतांचा सन्मान करण्याचा संकल्प करूया !

–राजेश पंडित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -