घरफिचर्ससारांशभूमिका विद्रोही संमेलनाची !

भूमिका विद्रोही संमेलनाची !

Subscribe

१८८५ मध्ये महात्मा फुले यांनी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्रातील भूमिकेशी बांधिलकी मानत आजवर विद्रोहीची १४ संमेलने झाली. दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी नाशिकमध्ये १५ वे विद्रोही साहित्य संमेलन संविधान सन्मानार्थ होत आहे. महात्मा फुले यांच्या पत्राची प्रस्तुतता आजही संपलेली नाही. एकसंध भारतीय समाज म्हणून आपल्याला आलेले हे फार मोठे अपयश आहे. आमची मागणी विशेष हक्कांची नसून समान हक्कांसाठी आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. याच समान हक्कांची गळचेपी करणार्‍या असामाजिक, असंवैधानिक, असमानतेचा पुरस्कार करणार्‍या, अवैज्ञानिक घटकांच्या विरोधातला हा विद्रोह आहे.

शोषणाच्या समर्थनासाठी सांस्कृतिक कपट करणार्‍या लोकांना जागे करणारा हा विद्रोही साहित्य संमेलनाचा एल्गार असतो. आमचे जगणे हेच आमचे साहित्य असते. श्रमव्यवस्थेच्या घटकांनी येथील पिढीजात आयतखाऊ लोकांना केलेला विवेकी सवाल म्हणजे हा विद्रोह आहे. भले ते आयतखाऊ लोक कितीही विद्रोहीला प्रतिक्रियावादी म्हणून हिणवत असले तरी वारंवार आपला आवाज विद्रोही साहित्य संमेलनाने बुलंद केला पाहिजे. याचे कारण भारतीय समाजमनामध्ये या विद्रोहाची खास अशी जागा आहे. वामनदादा गीतामध्ये म्हणायचे ‘येथे मिठात शिजती तुरी तिकडे काटा चमचा सुरी ’ अशी दोन स्पष्ट सीमारेषा, भेद असलेल्या सांस्कृतिक घटकांचे हे संमेलन आहे. आज अभिव्यक्तीची गळचेपी होत असताना, संविधानाचे मूल्य पायदळी तुडविला जात आहेत. सारे संसदीय आयुध गळून पडली आहेत. अघोषित डिक्टेटरशीप लादली जात आहे. पाशवी बहुमताच्या आधारे अन्यायकारक कायदे केले जात आहेत. अशावेळी साहित्यिकांनी मनोरंजनासाठी (शासकीय खर्चाने) मांडव घालणे हे अत्यंत निलाजरेपणाचे लक्षण आहे. या सार्‍या हुकूमशाहीच्या विरोधात आपली अभिव्यक्ती बुलंद करण्यासाठी एकत्र येणार्‍या लोकांना प्रतिक्रियावादी म्हणणे हे त्याहून मोठा बेशरमपणा आहे.

महात्मा जोतिबा फुले यांना आत्मविश्वास होता की, मी आता ज्या काही शाळा काढतो आहे, या शाळेतून शिकून बहुजन वर्गातून नवे सक्षम असे ग्रंथकार तयार होतील. ते स्वतःची संमेलने स्वतःच घेतील. चोखोबाच्या पायरीला ते स्वाभिमानी साहित्यिक कधीही आपसूक जाऊन बसणार नाहीत. अभिजनांच्या पंचपक्वानांच्या पंगतीला भुलणार नाहीत. परंतु महात्मा फुले यांच्या शिक्षणक्रांतीचा पराभव करायला निघालेल्या बहुजनांना मधल्या ‘नवसारस्वतांना’ तुमचा घालमोडे दादा होवू देऊ नका, तसे होणे अरिष्टकारी असते. बहुजनांनो आपापल्या सांस्कृतिक भूमीत पाय रोवून समतेची मागणी लावून धरा, याचा पुनरुच्चार करण्यासाठी विद्रोहीचे हे संमेलन आहे. बहुजनांना स्वातंत्र्याच्या सत्तर-ऐंशी वर्षानंतरही संस्कृतीक भूमिका व ठेवता आलेली नाही. यास्तव कला- साहित्य -संस्कृती-भाषा- लिपी यांमध्ये हस्तक्षेप करण्याची ताकत बहुजनांना शिक्षणातून कमवता आलेली नाही. याचे कारण समाजात साहित्य संमेलनांसारखी विचारपीठं ही पारंपरिक शोषण व्यवस्थेला शरण गेली आहेत. म्हणून हे सांस्कृतिक भान देण्यासाठी प्रयत्नपूर्वक काही करावे हे सांस्कृतिक घटकांना आज विद्रोहीच्या रूपाने वाटते आहे हे फार महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

भौतिक वास्तवाचा विपर्यास करून लिहिलेल्या साहित्याचे दिवस आता मागे पडले आहेत हे सांगण्याची वेळ आता आलेली आहे. तसेच कल्पनेच्या जगात रमणार्‍या आणि बहुजनांच्या लिंगसमानतेच्या, समताग्रही मूल्यांचा हेतूत: बुद्धिभेद करणार्‍या साहित्यास ठामपणे नकार देण्याचा, स्वाभिमान दाखविण्याची ही वेळ आहे. आपल्या भौतिक समस्यांची उकल दैवी म्हणून आजवर थापा मारणार्‍या ऐतखाऊ प्रवृत्तीच्या लोकांना थोडे तरी आता भान यावे यासाठी हा विद्रोह असतो. हा विद्रोह नुसतेच नाकारणारा, प्रतिक्रियावादी नाही. तर नवनिर्माणाची शक्यता आणि दिशा सांगणारा असा जागर असतो. नवनिर्माणाचं दायित्व स्वीकारणारा विद्रोह भारतामध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. गौतम बुद्धांपासून अनेकांची नावे आपल्याला सांगता येतील. परंतु ही नवसमाज निर्मितीची प्रक्रिया गोठवून, जैसे थे वादी होत शोषणाचे समर्थन करणारे साहित्य शेकडो वर्षे आमच्या माथी मारण्यात आले. त्याचमुळे आम्हाला बौद्धिक गुलाम केले गेले.

आता मात्र आम्ही स्वतःचे डोके वापरणार आहोत, हे सांगणारा सांगावा म्हणजेच हे संमेलन आहे. ज्यांनी आपल्या साहित्यातून सती प्रथेचे गोडवे गायले. अयोनी जन्म आम्हाला सांगितले. राष्ट्रमातेच्या चारित्र्याचे हनन केले, पुराणांचे मिथकं आळविली. आमच्या इतिहासातले खलपुरुष असणार्‍या पेशव्यांना हिरो केले. उद्ध्वस्त शेतीला जबाबदार शेतमजूर असे अज्ञान मांडले. हे साहित्य, साहित्य नसून बुद्धिभेद आहे. निकोप साहित्य हे समाज आणि राष्ट्र घडवीत असते. परंतु अशा शोषणाच्या समर्थनार्थ लिहिलेल्या साहित्याने येथील करोडो लोकांच्या पिढ्यानपिढ्या अज्ञानात ढकलल्या आहेत. आमच्या समतेच्या मागणीला मूठमाती देणारा हा साहित्यव्यवहार आमचा नाही. म्हणून आम्ही आमचा साहित्यव्यवहार स्वतंत्रपणे उभा करतो आहोत. आमचा साहित्य व्यवहार हा संविधान मूल्याग्रही आहे. म्हणूनच तो या देशातल्या करोडो गोर, गरीब वंचित उपेक्षितांसाठी नवसमाज निर्मितीची आशा पेरणारा आहे. निव्वळ पंगतावळी, भोजनावळींनी गेल्या जवळपास दीडशे वर्षात मराठीचे काहीही भले झालेले नाही.

- Advertisement -

स्व जातीच्या हिताखातर चाललेल्या या भोजनावळींचा साहित्याशी काहीही संबंध नाही. संबंध असता तर मराठीची आजची अशी लाजीरवाणी दुरवस्था झाली नसती. आजवरची अभिजनांचीही सारी साहित्य संमेलने पाकिटं लुबाडणे, खानावळी चालविणे, शासकीय संपत्तीची नासाडी करणे, त्याचबरोबर विषमतेची भाषा करणार्‍या पोपटांना मिरविणे, एवढीच राहिली आहे. आपले पारंपरिक श्रेष्ठत्व, आधिसत्ता, प्रभुत्व तसेच मक्तेदारी कायमची टिकवण्यासाठी आटापिटा करणार्‍या लोकांच्या अखंड, असेतू मनोरथाचे सगळे घोडे मारणारा हा विद्रोह आहे. अभिजनांच्या शोषण समर्थनार्थ होणार्‍या संमेलनात जाऊन त्यांना चोख सेवा पुरविणार्‍या बहुजनांना सतरंज्या उचलणार्‍या, खुर्च्या लावणार्‍या, निर्णय प्रक्रियेत सहभाग नसणार्‍या, आत्मसन्मान हरवलेल्या, सांस्कृतिक मूर्खता करणार्‍या, अडाणी बहुजन सारस्वतांना कडक जयभीम घालणारा आणि लाल सलाम करणारा हा सोहळा आहे. सत्यशोधकांचा जय हो असे वाटणार्‍या प्रत्येकाने या विद्रोही साहित्य संमेलन सोहळ्यात सामील व्हावे.

नाशिक ही कधीही निर्धोकपणे मंत्र्यांची भूमी नव्हती. ती चळवळींची भूमी होती आणि आहे. कोट्यवधी लोकांना धर्म जाचातून सोडवणूक करणार्‍या धर्मांतराची घोषणा देणारी ही भूमी आहे. या आमच्या समता संघराचा एल्गार पुकारणार्‍या चळवळीच्या भूमीतून जर मनुस्मृतीची दिंडी जाणार असेल तर विद्रोह आवश्यकच असतो. कारण मनुस्मृतीची होळी करणारा विद्रोह आम्ही विसरलेलो नाही किंवा त्यामागची कारणमीमांसा देखील आम्ही विसरलेलो नाही. हे सांगण्यासाठीच हे संमेलन आहे. आमच्या धर्मांतर मुक्तीच्या भूमीत कोण्या माथेफिरूस, भारतातल्या पहिल्या सनातनी दहशतवादी नथुरामला जर कोडगे अभिजन महात्मा म्हणत असतील तर आमुचा हा विद्रोही साहित्य संमेलनाचा घाट अनेकार्थाने महत्त्वपूर्ण ठरतो. निकडीचा ठरतो. जातीअंत-वर्गअंत-स्त्रीदास्याला जर ते मनोरंजनाचा मुलामा देत असतील तर हा विद्रोह आवश्यकच आहे. ब्राह्मण महासभेच्या अधिवेशनाला जाऊन आलेल्या आणि तेथे ब्राह्मण हे सुपीरियर जीन्सचे नाव आहे असे अवैज्ञानिक विधान करून अंधश्रद्धा पसरवणार्‍या माणसाला जर ते अध्यक्ष करत असतील तर हा विद्रोह खूप

मोलाचा आहे. ज्यांचा साहित्याशी काहीही संबंध नाही त्यांना आम्ही महाराष्ट्राचे वैचारिक पालकत्व देऊ इच्छित नाही. निव्वळ थोड्याबहुत विज्ञानकथा लिहून, (वामण आला परतून) त्यातही पुन्हा वामनाची परंपरा अबाधित ठेवणारे शीर्षक वापरून लिखाण करणारा लेखक आमचे भौतिक प्रश्न धजास लावू शकत नाहीत. कारण ते वामनाची परंपरा चालवू इच्छितात आणि आम्ही मात्र बळीराजाची. पोटार्थी खगोलशास्त्राची मास्तरकी करणार्‍या माणसाला शास्त्रज्ञ म्हणणे हा खूप मोठा विनोद आहे. अशी अनेक साहित्यबाह्य स्वजातीय माणसं त्यांनी पिढ्यानपिढ्या आमच्या बोकांडी बसवली. तिकडे मेंढरांसारखी गर्दी असेल तरी इकडे मात्र मोजकीच विवेकी माणसं असतील. तिकडे लोंढा माध्यमं, भरमसाठ प्रसिद्धी, झगमगाट, सेलिब्रिटी, तामझाम, लक्झरियस ट्रीटमेंट, गलेलठ्ठ मानधन, दिमतीला शासन संस्था असे सगळे असेल मात्र यापैकी इकडे काहीही नसले तरी विचार आहे. जो फुले, शाहू , आंबेडकर यांच्या मार्गे होत संविधानाकडे जातो. अशा या संविधान सन्मानार्थ जागराला संपूर्ण मराठी भाषिकांनी यावे असे आवाहन.

—राकेश वानखेडे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -