Homeफिचर्ससारांशRSS : ऐन शंभरीत संघ परिवारात फूट?

RSS : ऐन शंभरीत संघ परिवारात फूट?

Subscribe

संघ शंभर वर्षे कसा टिकून राहिला याच्या अनेक कहाण्या आहेत. पण भारतीय संदर्भात त्यातली एक गोष्ट नक्कीच अनोखी आहे. ती ही की, संघामध्ये आजवर कधीही बंडखोरी झालेली नाही. बाकी भारतातील सर्व विचारांच्या संघटना, पक्ष इत्यादींमध्ये फूट पडली आहे, पण संघ निदान आजवर तरी अभंग राहिलेला आहे. इथे आजवर तरी असे म्हटले याला कारण आहे. नेमक्या शताब्दी वर्षातच या परिवारात कुरबुरी सुरू झाल्या आहेत. यामुळे संघटना लगेच फुटणार नसली तरी दोन भिन्न दिशांनी विचार करणारे गट तिथे निर्माण झाले आहेत हे स्पष्ट झाले आहे.

-राजेंद्र साठे

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जे कोणी कम्युनिस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले असतील त्यांना थोड्या जास्त शुभेच्छा. कारण, या दोन्ही संघटनांची यंदा शताब्दी आहे. दोघांचीही स्थापना 1925 मध्ये झाली होती. दोन टोकाच्या विरोधी विचारांचा पाया ब्रिटिशकालीन भारतात एकाच वर्षात घातला जावा हा रोचक योगायोग आहे.

या दोघांपैकी संघवाल्यांचा रुबाब यंदा पाहण्यासारखा असेल. त्यांचा एकेकाळचा स्वयंसेवक सध्या पंतप्रधान आहे. अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री संघाच्या शाळेतूनच शिकून बाहेर पडलेले आहेत. देशभरातील स्वयंसेवकांनी कधी स्वप्नातही कल्पिली नव्हती अशी ही रम्यकथा आहे.

संघ शंभर वर्षे कसा टिकून राहिला याच्या अनेक कहाण्या आहेत. पण भारतीय संदर्भात त्यातली एक गोष्ट नक्कीच अनोखी आहे. ती ही की, संघामध्ये आजवर कधीही बंडखोरी झालेली नाही. बाकी भारतातील सर्व विचारांच्या संघटना, पक्ष इत्यादींमध्ये फूट पडली आहे, पण संघ निदान आजवर तरी अभंग राहिलेला आहे.

इथे आजवर तरी असे म्हटले याला कारण आहे. नेमक्या शताब्दी वर्षातच या परिवारात कुरबुरी सुरू झाल्या आहेत. यामुळे संघटना लगेच फुटणार नसली तरी दोन भिन्न दिशांनी विचार करणारे गट तिथे निर्माण झाले आहेत हे स्पष्ट झाले आहे.

संघ ही एकचालकानुवर्ती संघटना आहे. सरसंघचालकांचा शब्द अंतिम असा त्याचा अर्थ आहे, पण गेल्या काही दिवसांपासून मोहन भागवत यांनाच दुरुत्तरे केली जाऊ लागली आहेत. हे म्हणजे हिटलरला त्याच्या नाझींकडूनच आव्हान मिळण्यासारखे आहे. अयोध्येत राममंदिर हा हिंदूंच्या अस्मितेचा विषय होता, आता प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याचा उपद्व्याप करू नका, असे भागवत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर डिसेंबरात पुण्यात संजीवन व्याख्यानमालेत भारत-विश्वगुरू या विषयावर बोलताना त्यांनी पुन्हा तसेच मत मांडले.

संतांनीच लावला सुरुंग
अखिल भारतीय संत समितीचे स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी पहिली तोफ डागली. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, तिने धार्मिक बाबतीत बोलू नये, असे म्हणून त्यांनी संघाचे दात त्याच्याच घशात घातले. मंदिर वगैरेसारखे मुद्दे हे श्रद्धेचा व धर्माचा विषय आहेत. त्याबाबत आमच्यासारखे धार्मिक गुरु जो निर्णय घेतील तो संघाने आणि विश्व हिंदू परिषदेने मान्य केला पाहिजे असेही त्यांनी बजावले.

गंमत अशी आहे की, हे जितेंद्रानंद वगैरे संत कोण आहेत, त्यांचे ज्ञान आणि कार्य काय, त्यांच्या मागे शंभर तरी लोक आहेत का, याचा या देशातील कोट्यवधी हिंदू लोकांना काहीही पत्ता नाही. देणेघेणेही नाही. तरीही राममंदिराच्या आंदोलनापासून असल्या अनेक तथाकथित साधू, संत, महंतांनी काहीतरी विधान करावे आणि त्यांना एकदम राष्ट्रीय प्रसिद्धी मिळावी असे सतत घडत आले आहे. पूर्वी हे संघाला सोईचे होते. आता ते अडचणीचे ठरू लागले आहे.

भागवत अशाच प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍यांवर घसरले, पण मुळात संघ परिवारानेच त्यांना आणि मीडियाला ही सवय लावली हे लक्षात घ्यायला हवे. यानंतर, ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही भागवतांवर हल्ला केला. सत्ता हवी होती तोपर्यंत भागवत देवळांवर बोलत होते. आता तेच आम्हाला हे सोडून द्यायला सांगत आहेत, पण हा हिंदू अस्मितेचा मुद्दा आहे असे ते म्हणाले.

सर्वात आश्चर्यकारक म्हणजे, संघाच्याच ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रानेही हाच मुद्दा उचलून धरला. हिंदूंच्या बाबत न्याय होण्याचा हा प्रश्न आहे, असे मत त्यात मांडण्यात आले. त्यामुळे आता खुद्द नागपूर व दिल्लीतही फूट पडली की काय अशी शंका निर्माण झाली. पण नंतर ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी सारवासारव करून माघार घेतली.

संभळ- दुसरी अयोध्या
अयोध्येतील राममंदिर उद्घाटनासाठी सिद्ध होत असतानाच उत्तर प्रदेशात काशी आणि मथुरेतील मशिदींमध्ये भांडणे सुरू करण्यात आली. काशीमधील ग्यानवापी मशिदीत सर्वेक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आला. त्यातून मग उत्तर प्रदेशात अशा वादांचे व सर्वेक्षणांचे एकदम पेवच फुटले.

याच पार्श्वभूमीवर भागवतांनी पहिले विधान केले होते. तरीही हे प्रकार थांबले नाहीत. उलट, ते अधिकच वाढले. त्याचा कडेलोट संभळमध्ये झाला. भागवतांचे पुण्यातील वक्तव्य त्या पार्श्वभूमीवर आले.

संभळला अयोध्येच्या दिशेने नेण्याची पुरेपूर तयारी सुरू आहे. अयोध्येप्रमाणेच बाबराने तेथेही मंदिर पाडून त्याजागी शाही जामा मशीद उभारली असा संत मंडळींचा दावा आहे. विष्णूचा दहावा अवतार कल्की हा संभळमध्ये जन्माला येणार असल्याचा समज आहे. त्याचे पुराणातले दाखले देऊन एकदम हिंदूंच्या भावनांना हात घालण्यात आला आहे.

याबाबत 19 नोव्हेंबरला स्थानिक न्यायालयात एक दावा दाखल करण्यात आला. न्यायालयानेही तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले. लगोलग प्रशासनाने पहिले सर्वेक्षण केले. त्यात मंदिराचे अवशेष सापडले असे जाहीर केले. नंतर चार दिवसांनी दुसरे सर्वेक्षण झाले. त्यावेळी तेथे दंगल झाली. त्यात चार लोकांचा मृत्यू झाला. या दंगलीला मुस्लिमांना जबाबदार धरण्यात आले. आता दर दिवशी तेथे नवीन काहीतरी घडत आहे.

संभळमधील मशिदी चोरून वीज घेत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला आहे. त्यामुळे ते आता येथे बुलडोझर लावणार काय अशी भीती निर्माण झाली आहे. नुकतेच, मशिदीच्या समोरच एका पोलीस चौकीचे हिंदू धर्मशास्त्रानुसार भूमिपूजन करण्यात आले. तिला सत्यव्रत पोलीस चौकी असे नाव देण्यात आले आहे. सत्यव्रत हे संभळचे पुराणातले नाव आहे. याखेरीज मशिदीला लागूनच इतर जागांमध्ये उत्खनन सुरू करण्यात आले आहे. तेथे पुरातन अवशेष सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अयोध्येत हेच घडले होते.

संभळचे हे लोण आता सर्व उत्तर प्रदेशात पसरत आहे. अमुक ठिकाणी मंदिर सापडले अशा बातम्या रोज येत आहेत. मुर्शिदाबाद, मोरादाबाद, अमेठी, जौनपूर, गाझियाबाद, मुजफ्फरनगर इत्यादी असंख्य ठिकाणी मशिदींच्या आसपास किंवा अन्यत्र कथितरित्या ‘मुस्लिमांमुळे बंद झालेली’ मंदिरे सापडत आहेत. बुलंदशहरमध्ये तर शंकराचे मंदिर शोधून तिची पूजा तेथे बहुसंख्येने असलेल्या जाटव या दलित समाजाकडे सोपवण्यात आली आहे. म्हणजे यात भाजपचे सर्व राजकीय हिशेब पुरेपूर सांभाळले जातील याची काळजी घेतली जात आहे.

आदित्यनाथ संघाचे नाहीत
भागवतांच्या नाकावर टिच्चून हे सर्व प्रकार चालू आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथांनी या मोहिमेला सर्व ताकद पुरवली आहे. सर्व साधू-संत मंडळींनाही त्यांनी आपल्या बाजूने उभे केले आहे. सनातन धर्माची प्रतिष्ठा पुन्हा स्थापित करण्याची ही मोहीम आहे, असे आदित्यनाथ म्हणतात. एका अर्थी, याच्या आड येऊ नका असा जवळपास दमच ते भागवतांना भरत आहेत.

आदित्यनाथ हे मूळचे संघाचे नाहीत. ते ज्या गोरखपूर मठाचे नाव सांगतात, त्या मठाच्या महंतांच्या तीन पिढ्या हिंदू महासभेत होत्या. त्यांचे आणि संघाचे कधीही जमले नाही. ज्या चौरीचौर्‍याच्या घटनेवरून गांधीजींनी आपले असहकार आंदोलन मागे घेतले, त्या पोलीस चौकी जाळण्याच्या प्रकारात मठाशी संबंधित लोक होते. तेव्हाचे महंत दिग्विजयनाथांना अटक झाली होती. गांधी खून प्रकरणातही त्यांना पकडले होते. अयोध्येचे प्रकरण त्यांनीच पहिल्यांदा लावून धरले, मात्र 1969 मध्ये निधन होईपर्यंत ते कधीही संघात गेले नाहीत. त्यांचे उत्तराधिकारी अवैद्यनाथ हेही गोरखपूरमधून हिंदू महासभेचे खासदार म्हणूनच निवडून येत राहिले.

त्यांचे वारस म्हणजे आदित्यनाथ. ते भाजपमधून निवडून आले. तरीही त्यांनी आपल्या मित्रांना हिंदू महासभेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आणले होते. शिवाय हिंदू युवा वाहिनी नावाची स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. ही दंगेखोरांची संघटना म्हणून कुप्रसिद्ध होती. मुख्यमंत्री झाल्यावर ती त्यांनी बंद केली, पण अजूनही तिचे काम करणारे कार्यकर्ते आहेतच.

सध्याच्या मंदिरे शोधण्याच्या मोहिमेत हेच कार्यकर्ते आघाडीवर आहेत. संघाची स्थापना नागपुरात झाली. प्रदीर्घ काळ हेडगेवार, गोळवलकर, देवरस हे सरसंघचालक होते. त्यामुळे संघाच्या एकूण कारभारावर मराठी नेत्यांचा पगडा होता. विविध प्रांतांमध्ये प्रचारासाठी गेलेल्या लोकांमध्येही बहुतांश नावे मराठीच होती. हे लोक मुख्यत: मध्यमवर्गीयांमध्ये वावरत. थेट गुंडगिरी वा दंग्यांमध्ये दिसत नसत. त्यांची भाषाही सावध असे.

मोदींच्या भाजपच्या काळात हे चित्र बदलले आहे. आता शिवीगाळ, भांडणे, दंगे करणार्‍या लोकांनी हिंदुत्वाच्या परिवारात जोर केला आहे. गाय, अमुक जिहाद, तमुक जिहाद हे भयंकर भडकवणारे विषय झाले आहेत. हे हिंदुत्व भागवत वगैरे मराठी लोकांच्या हाताबाहेर जाऊ लागले आहे. 2025 मध्ये त्याची नुसती सुरुवात आहे. भविष्यात त्याचा स्फोट होणार आहे.

जाता जाता
शिवाजी महाराजांनी मुघलांना थेट प्रत्युत्तर दिले. त्यामुळे महाराष्ट्रात तेव्हाच्या अपमानाच्या नव्हे तर पराक्रमाच्या कहाण्या आहेत. याउलट स्थिती उत्तर प्रदेशात आहे. तेथील कोणीही हिंदू सरदार मुगलांविरुद्ध पाय रोवून लढल्याचा इतिहास नाही. त्या तेव्हाच्या अपमानाचा सूड आता उगवण्याच्या मोहिमांना म्हणूनच तेथे सध्या लोकप्रियता आहे. संघाची स्थापना महाराष्ट्रात होऊनही येथे मात्र तशा सुडाला इतकी सार्वत्रिक लोकप्रियता नाही, याचे कारण म्हणजे महाराज व नंतरची मराठेशाही.