मूठभर विद्वानांची मक्तेदारी मोडली

ब्रह्मविद्या आणि त्यावर असणारी मक्तेदारी ही समाजातील वरिष्ठ वर्गाच्या हातात होती. मूठभर विद्वानांच्या हातात होती. तीच आम्ही काढून घेतली आहे आणि ती केवळ काढून घेतली नाही तर तिचा सुकाळ करून टाकला आहे. ज्ञानदेवांच्या या प्रतिपादनाच्या पाठीमागे केवळ उत्तुंग प्रतिभाच नाही, तर जे बळ त्यांना प्राप्त झाले आहे ते निवृत्तीनाथ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत गुरु म्हणून. ही जाणीव अगोदर ज्ञानदेवांनी करून दिली आहे.

–प्रा. अमर ठोंबरे

मागील दोन लेखांत आपण वारकरी संप्रदायाची तथा भागवत धर्माची पार्श्वभूमी आणि त्यातील निवृत्तीनाथांची भूमिका इथपर्यंतचा प्रवास बघितलेला होता. सनातन भागवत धर्माला वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान देताना संतांनी तो विठ्ठलमय तर केलाच, पण त्याचबरोबर या संप्रदायात सामान्यांच्या व्यथा वेदनांचा जागरही संतांनी सुरू ठेवला. निवृत्तीनाथ त्याचे अध्वर्यू होते. निवृत्तीनाथांना गुरुस्थानी ठेवून ज्ञानदेवांनी वारकरी पंथाची समर्थ अशी पायाभरणी करून या संप्रदायाची मूळ उद्दिष्टे बाराव्या शतकात मांडली.

जे जे भेटे भूत तया मानिंजे भगवंत हा भक्तियोग जाणिजे निश्चित माझा

ज्ञानेश्वरांनी प्रतिपादिलेला हा भक्तियोग पुढे संत एकनाथ, संत तुकाराम यांनी जनसामान्यांमध्ये प्रसृत केला. मानवी सुखदुःख, भावभावना, वासना, विकार, प्रपंचातील कलह यज्ञयागादी कर्मकांडांनी जाणार नसून परमेश्वराच्या नामस्मरणानेही आपण जीवनातील मुक्तीचा अनुभव घेऊ शकतो, ही केवळ जाणीवच संतांनी निर्माण केली नाही तर ती अनुभूती लोकांना त्यांच्या आचरणाने त्यांनी करून दिली. संतांचा कर्मयोग आणि भक्तियोग हा केवळ दिखाऊ आणि वरवरचा नव्हता किंवा पढिक पांडित्याचा नव्हता.

बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे

ही सामान्यांप्रति असणारी कणव संतांच्या लेखणीतून पाझरत होती. संतांच्या अभंगनिर्मितीचा हेतूच मुळात माणसांच्या जगण्याशी संबंधित होता. एकीकडे वैदिक मार्गाने जाणारा वर्ग केवळ कठोर नीती नियम सांगत होता. चतुवर्ग चिंतामणी या ग्रंथातून असंख्य व्रतवैकल्य सामान्यांसमोर येत होती. अशा परिस्थितीमध्ये सामान्यांची वेदना समकालीन कोणत्याही पंथातून पुढे येत नव्हती. केवळ वारकरी पंथानेच या सार्‍या तथाकथित पाखंडी विचारांना पायदळी तुडवून आपला मार्ग सुकर केला.

इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी
अशी ग्वाही ज्ञानदेवांनी दिली.

कारण ब्रह्मविद्या आणि त्यावर असणारी मक्तेदारी ही समाजातील वरिष्ठ वर्गाच्या हातात होती. मूठभर विद्वानांच्या हातात होती. तीच आम्ही काढून घेतली आहे आणि ती केवळ काढून घेतली नाही तर तिचा सुकाळ करून टाकला आहे. ज्ञानदेवांच्या या प्रतिपादनाच्या पाठीमागे केवळ उत्तुंग प्रतिभाच नाही तर जे बळ त्यांना प्राप्त झाले आहे ते निवृत्तीनाथ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत गुरू म्हणून. ही जाणीव अगोदर ज्ञानदेवांनी करून दिलेली आहे. म्हणून ते म्हणतात,

का चिंतामणी जालिया हाती
सदा विजयवृत्ती मनोरथी
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती, ज्ञानदेवो म्हणे

थोडक्यात निवृत्ती ते निळोबा हीच वारकरी फळी आहे आणि त्यांचे लोकसंघटन या माध्यमातून भक्तीचं एक मुक्त आवार खुलं झालं.

परमेश्वर प्राप्तीसाठी कुठे रानावनात जावे लागत नाही. कोणते मंत्रजाप करावे लागत नाहीत. रामनाम हा सोपा मंत्र या चळवळीने लोकांना दिला. निवृत्तीनाथही या नामसंकीर्तनात अग्रभागी होते. ते म्हणतात,

नलगे मंत्रसार न लगती तपे
रामनाम सोहपे मूळ मंत्र

ज्यावेळी वैदिकांचा जनसामान्यांवर संस्कृतचा भडिमार सुरू होता, त्याचवेळी संतांनी स्वतःचा भक्तिमार्ग पुरस्कृत केला आणि ठामपणे, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, अशी तुकोबांनी गर्जना केली. याचा अर्थ ते वेदांमध्ये काय आहे याची जाणीव तर त्यांना होतीच, पण ते त्यात अर्थाचा धांडोळा घेत बसले नाहीत. तर वेदाचा जो जनिता आहे अर्थात परमेश्वर तोच आमच्या हृदयात विराजमान झाला आहे. आम्ही रोज त्याच्याशी बोलतो, खेळतो तो आमचा सखा आहे, म्हणून आम्ही वेदच कोरडे केलेले आहेत. शब्दाची आणि अर्थाची वांझोटी बडबड तुकोबांना नको होती. अर्थात कोणत्याच संतांना ती नको होती. संतांच्या भक्तीला आत्म्याची हाक होती. सामान्यांचा आनंद हे संतांच्या भक्तीला आलेले फळ होतं. नलगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण

यातून खर्‍या अर्थाने संतांच्या भक्तीमार्गाचा मळा फुलत गेला. वारकरी पंथांचं उद्दिष्टच मुळात समता हे होतं. निवृत्तीनाथ तर या समतेचे पहिले पाईक होते. समता धरा आधी टाका द्वैत बुध्दी असे ते म्हणतात. निवृत्ती, ज्ञानदेव यांचा नामसंकीर्तनाचा वारसा पुढे अनेक वर्षे नामदेवांनी सुरू ठेवला.

आम्हा सापडले वर्म
करू भागवत धर्म

यातून संत नामदेवही याच भागवत धर्माचे वेगळेपण सांगताना दिसतात. कारण भागवत धर्माची पूर्वपिठीका यापूर्वीच्या लेखांत आपण बघितली आहे. आता नामदेव या ठिकाणी म्हणतात की, आम्हा सापडले वर्म, पण ते कोणते, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. यातून दोन प्रश्न निर्माण होतात, जर भागवत धर्म सनातन होता तर संतांनी अधिष्ठित केलेला धर्म कोणता? पूर्वीही तो अनेक नावांनी ओळखला जात होता. नारायणी धर्म, वैष्णव धर्म वगैरे, पण संतांच्या वेगळ्या दृष्टिकोनातून तो तयार झाला असल्याने नामभक्ती आणि देवाचे सख्यत्व हे या धर्माचे विशेष होते. म्हणून नामदेव म्हणतात की, आम्हा सापडले वर्म.

पुढे एकनाथांनी एका अनाथ आणि अस्पृश्य बालकाला उचलून तत्कालीन समाजात क्रांती केली. अनेक नाठाळ आणि मुस्लीम लोकांनाही त्यांनी भक्तिपंथाला लावले. महत्त्वाचे हे की यासाठी कोणतेही दरबार भरवले नाहीत. मठ मंदिरांमधून शिष्यांच्या संख्या वाढवल्या नाहीत. पोटासाठी कवित्व केले नाही आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे तत्त्वज्ञानाची विक्री केली नाही. संत म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते.

आता निवृत्ती ते निळोबा या संत चळवळीची फलश्रुती पुढील लेखात पाहूया.