घरफिचर्ससारांशग्रामीण उद्योजकता : संधी आणि आव्हाने

ग्रामीण उद्योजकता : संधी आणि आव्हाने

Subscribe

ग्रामीण भागात उद्योजकता वाढीस लागलेली आहे, परंतु तिचा योग्य तो विकास होताना दिसत नाही. याचे मुख्य कारण आहे योग्य मार्गदर्शनाचा अभाव. उद्योगांच्या बाबतीत शहरी किंवा ग्रामीण यात जास्त भेद राहिलेला नाही. समस्या व गरजा दोघांच्याही समान आहेत. फक्त ग्रामीण भागात त्याची तीव्रता थोडी जास्त आहे. शहरात व्यावसायिक वातावरण रुळलेले असल्यामुळे काही ना काही कारणाने तुम्ही व्यवसायाशी जोडलेले असता, परंतु ग्रामीण भागातील तरुणांना अशा प्रकारची कुठलीच सोय नाही.

–राम डावरे

मागील काही वर्षांपासून उद्योजकतेचे वारे महाराष्ट्रात वाहायला लागले आहे. त्यात कोरोनाची दोन वर्षे अनेकांचे रोजगार गेले, नोकर्‍या गेल्या. नोकरीच्या मागे पळणारा तरुण व्यवसायाचा विचार करायला लागला आहे, पण याच वेळी या तरुणांना व्यवसायाची माहिती देणारा कुणीच भेटत नाही. व्यवसायाची सुरुवात करण्यापासून तो यशस्वीपणे चालवण्यापर्यंत सर्व क्षेत्रांत अंधारातच हातपाय हलवावे लागत आहेत. शहरात किमान काही स्रोत तरी आहेत, पण ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी अवघड आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागात उद्योजकता वाढीस लागलेली आहे, परंतु तिचा योग्य तो विकास होताना दिसत नाही. याचे मुख्य कारण आहे योग्य मार्गदर्शनाचा अभाव. उद्योगांच्या बाबतीत शहरी किंवा ग्रामीण यात जास्त भेद राहिलेला नाही. समस्या व गरजा दोघांच्याही समान आहेत. फक्त ग्रामीण भागात त्याची तीव्रता थोडी जास्त आहे. शहरात व्यावसायिक वातावरण रुळलेले असल्यामुळे काही ना काही कारणाने तुम्ही व्यवसायाशी जोडलेले असता, परंतु ग्रामीण भागातील तरुणांना अशा प्रकारची कुठलीच सोय नाही. यामुळेच ग्रामीण भागातील उद्योजकता वाढण्यात अडथळे येत आहेत किंवा सुरू झालेले व्यवसाय यशस्वीपणे चालण्याचे प्रमाण कमी आहे.

बरेचदा व्यवसायात अपयश येण्याचे किंवा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे न चालण्याचे मुख्य कारण असते व्यवसाय सुरू करताना चुकलेल्या पायर्‍या आणि व्यवसाय कसा करावा याचे अज्ञान. ही सुरुवात व्यवसाय निवडीपासूनच होत असते. काय चुकतंय, काय करायला हवं, काय मार्ग आहेत, कशा प्रकारे पुढे जायला हवं याचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. ही माहिती वाचण्याआधी एक लक्षात ठेवा, व्यवसाय म्हणजे विक्री. तुमचे उत्पादन स्वत: विकण्याची तयारी असेल तरच व्यवसायात पाऊल ठेवा. व्यवसाय सुरू झाल्या झाल्या लगेच तयार ग्राहक अपेक्षित असतील किंवा कुणीतरी येऊन सगळा माल विकत घ्यावा, मार्केटिंग त्रास नको, असा विचार करीत असाल तर नोकरीच योग्य. कारण या मानसिकतेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वर्षभर तग धरू शकता, त्यापेक्षा जास्त नाही.

- Advertisement -

व्यवसाय निवड : व्यवसाय निवड ही बहुतेकदा चुकणारी पायरी आहे. पायाच चुकला असेल तर इमारत कोसळणारच असते. असंच काही व्यवसायांच्या बाबतीतही घडतं. शेजारच्या कुणाचा तरी व्यवसाय यशस्वी झालाय म्हणून आपणही तो व्यवसाय करावा किंवा एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्याच्या यशाची कहाणी छापून आली म्हणून आपणही तोच व्यवसाय करावा किंवा सगळे करतात म्हणून आपणही तेच करावे किंवा कुणीतरी अमुकतमुक व्यवसाय कर, त्यात खूप पैसा आहे, असे सांगतोय म्हणून तोच व्यवसाय करावा अशा प्रकारे व्यवसाय निवड करण्याची सर्वसामान्य पण तितकीच चुकीची पद्धत ग्रामीण भागात दिसून येते. यातच ग्रामीण भागातील व्यवसाय म्हटले की डाळ मिल, मसाले, पापड, लोणचे, दूध उद्योग, पोल्ट्री उत्पादन इतकेच व्यवसाय सुचतात. त्यापलीकडेही शेकडो व्यवसाय आहेत हे आपल्या गावीही नाही. जो तो उठतो तेच तेच व्यवसाय सुरू करतोय. यामुळे ग्रामीण भागात एक प्रकारचे व्यवसायाचे डबके तयार झाले आहे. या डबक्यातून बाहेर येणे आवश्यक आहे. योग्य व्यवसाय निवडणे आवश्यक झाले आहे.

व्यवसाय निवडताना तुमच्यासाठी काय योग्य आहे हे पाहायचे असते, ना की इतरांनी काय केलंय किंवा किती पैसे कमावलेत. व्यवसाय हा पैसे कमावण्यासाठी असतो आणि प्रत्येक व्यवसायात भरपूर पैसा मिळत असतो. त्यामुळे व्यवसाय निवडताना विचारपूर्वक निवडणे महत्त्वाचे असते. व्यवसाय निवड करताना बर्‍याच गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. तुम्हाला कोणत्या क्षेत्राचे ज्ञान आहे, तुमच्या परिसरातील मार्केट कसे आहे, तुमचे वैयक्तिक संपर्क कसे आहेत, परिसरातील ग्राहकांची मानसिकता कशी आहे, तुमची गुंतवणूक क्षमता किती आहे, तुम्ही व्यवसायासाठी कोणत्या स्तरापर्यंत वेळ आणि कष्ट घेऊ शकता, तुमचा अनुभव व शिक्षण काय आहे, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात आवड आहे, अशा वेगवेगळ्या बाबी ध्यानात घेऊन व्यवसाय निवडायचा असतो.

सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न, ग्रामीण भागात कोणता व्यवसाय करावा? : व्यवसायात मुख्यत्वे तीन प्रकार आपण पकडू शकतो. उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग), सेवा (सर्व्हिस) आणि व्यापार (ट्रेडिंग) किंवा रिटेल व्यवसाय. रिटेल म्हणजे दुकानाच्या माध्यमातून विक्री. तुम्हाला आधी क्षेत्र निवडायचे असते, त्यानंतर प्रॉडक्ट. जर तुम्हाला उत्पादन करायचे असेल तर भाग ग्रामीण असो किंवा शहरी, तुम्हाला तुमचे उत्पादन विकण्यासाठी शहरात वा परिसरात जावेच लागेल. त्यामुळे ग्रामीण भागासाठी कोणताही विशेष असा उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय नसतो. तुमच्या ५०-१०० किमी परिसरात जे जे विकलं जाऊ शकतं ते ते तुम्ही बनवू शकता. यातही फूड प्रोसेसिंगशी निगडित असेल तर स्थानिक पातळीवर कोणत्या पिकांचं जास्त उत्पादन होतं एवढं फक्त तुम्ही बघू शकता.

व्यवसाय करायचा म्हटलं की काहीतरी गुंतवणुकीची गरज पडतेच, पण तुमच्या गुंतवणूक क्षमतेनुसारच व्यवसाय तुम्हाला निवडणे आवश्यक आहे. व्यवसाय नवीन असेल तर बँकेकडून कर्ज मिळण्याची आशा जवळजवळ नगण्यच असते. त्यासाठी बँकेत किती चकरा माराव्या लागतील हे सांगता येत नाही, पण जर बँक कर्ज देणार असेल तर तुमच्याकडे असलेल्या रोख गुंतवणुकीच्या जास्तीत जास्त चौपट गुंतवणुकीच्या प्रोजेक्टचा विचार करावा. बँक कर्ज देत नसेल तर सरळ सरळ आपल्याकडे असलेल्या गुंतवणुकीत काय करू शकता याचा विचार करा. याचबरोबर तुम्हाला मार्केटिंग व सेल्सचे गुण अवगत करावेच लागतात. सर्व व्यवसायांसाठी हे गुण आवश्यक असले तरी उत्पादनासाठी या मार्केटिंग व सेल्स स्किलची गरज सर्वात जास्त आहे. यामध्ये तुम्ही कुठे कमी पडत असाल तर अशा वेळी व्यापार, रिटेल वा सेवा क्षेत्रातील व्यवसाय निवडू शकता. तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरातील एखाद्या मोठ्या गावात सुरू करता येतील असे भरपूर ट्रेडिंग किंवा सर्व्हिस व्यवसाय आहेत.

व्यवसाय करायचा म्हणजे उत्पादनच केलं पाहिजे असा काही नियम नाही. एखादे चांगले दुकान तुम्ही सुरू करू शकता किंवा सीझनल व्यवसाय करू शकता. प्रत्येक बाजार जोडता येतील असे फिरते व्यवसाय सुरू करू शकता किंवा हॉटेल सुरू करू शकता. कितीतरी मार्ग आहेत. तुमचं गाव बाजारपेठेचं ठिकाण असेल किंवा परिसरातील एक महत्त्वाचं ठिकाण असेल किंवा तुमच्या परिसरात असं एखादं मोठं गाव असेल तर अशा ठिकाणी तुम्ही बरेच स्थानिक स्तरावर चालणारे व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाचा एक प्राथमिक नियम लक्षात ठेवा. व्यवसाय म्हणजे विक्री. काय विकू शकता याचा अभ्यास करा. कोणता व्यवसाय करावा याचं उत्तर मिळेल.

सुरुवात करायची म्हणजे नक्की काय करायचे? : व्यवसाय निवडला, पण पुढे काय? सुरुवात कशी करावी? कशा प्रकारे व्यवसाय उभारावा, हा नवउद्योजकांना सतावणारा दुसरा मुख्य प्रश्न. सुरुवात कुठून करावी या विवंचनेतच नवउद्योजकांचे कित्येक महिने निघून जातात. बरेचदा इतका वेळ जातो की व्यवसाय सुरू करण्याची ऊर्मीच कमी होते. व्यवसायाची सुरुवात करण्याचे काही ठरावीक टप्पे आहेत. यानुसार वाटचाल केली तर व्यवसाय सुरू करण्यात अडचण येणार नाही.

ही झाली व्यवसायाची सुरुवात. आता तो कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे सुरू राहण्यासाठी तुम्ही स्वत:ला त्याप्रमाणे तयार करणे आवश्यक आहे, ज्यासाठी मार्गदर्शनापेक्षा तुमच्या स्वयंशिक्षणाची आवश्यकता आहे. व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्ही आपोआपच व्यवसायाचे गुण शिकत असता. त्यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते. फक्त एक नियम ध्यानात ठेवा. व्यवसाय सुरू केल्यानंतर उगाच नफ्या-तोट्याचे हिशोब मांडत बसू नका. कोणत्याही व्यवसायासाठी पहिली तीन वर्षे खूप महत्त्वाची असतात. या काळात पहिल्या दोन वर्षांत नफ्या-तोट्याचा हिशोब मांडत बसण्यापेक्षा ग्राहक वाढवण्याकडे लक्ष द्यायचे असते. तुम्ही ग्राहकांवर लक्ष केंद्रित करा, नफा आपोआपच होणार असतो.

व्यवसायासाठी पैसेच नसतील तर? : व्यवसायासाठी पैसा आवश्यक असतो, पण जर तुमच्याकडे पैसे नसतील तर काय, हा प्रश्न उरतोच. अशा वेळी तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. तुम्ही व्यवसायासाठी गुंतवणूकदार शोधू शकता. याला आपण स्टार्टअप फंडिंग म्हणू शकतो, पण अशा प्रकारच्या फंडिंगसाठी तुमचा प्रोजेक्टसुद्धा सर्वोत्तम असणे आवश्यक असते. एखादी चांगली व्यवसाय कल्पना, ऑफर, पेटंटेड प्रोजेक्ट असेल तर गुंतवणूकदार तुमच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवू शकतात किंवा एखादा असा व्यवसाय असेल ज्यातील लहानातील लहान माहिती फक्त तुम्हालाच आहे आणि तुम्हीच फक्त तो सुरळीतपणे चालवू शकता, अशा वेळीसुद्धा तुम्हाला फंडिंग मिळू शकते. यासाठी तुमच्याकडे स्किल असणे आवश्यक आहे. कारण गुंतवणूकदाराला त्याच्या पैशांशी मतलब असते, तुमच्याशी नाही. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य रिटर्न मिळण्याची खात्री वाटली तरच ते गुंतवणूक करतात. यात फक्त तुमची भागीदारी सुरुवातीच्या काळात ५१ टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही याची काळजी घ्या.

दुसरा मार्ग म्हणजे विविध कंपन्यांसाठी, व्यावसायिकांसाठी कमिशन बेसिसवर काम करणे. याला फ्रिलान्सर्स म्हटले जाते किंवा ओळखीच्या भाषेत एजंट्स म्हटले जाते, पण प्रोफेशनल शब्द फ्रिलान्सर्स आहे. पगाराचा त्रास नको म्हणून कित्येक कंपन्यांना, व्यावसायिकांना त्याच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कमिशन बेसिसवर फ्रिलान्सर्स हवे असतात. तुम्ही अशा व्यावसायिकांना जॉईन होऊ शकता. कोणतीही गुंतवणूक न करता तुम्ही या लोकांना त्यांचे क्लायंट मिळवून देऊ शकता किंवा त्यांचे प्रॉडक्ट विक्री करून देऊ शकता. या बदल्यात तुम्हाला ठरलेले उत्पन्न मिळेल.

यात तुम्ही स्वत:चा व्यवसाय म्हणून सुरुवात करा. या सर्व कंपनी, व्यावसायिकांना तुमच्या ब्रँडसोबत जोडा. विनागुंतवणूक स्वत:चा व्यवसाय सुरू करा. व्यवसायात इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. असेच आणखी काही मार्ग तुम्ही स्वत:ही शोधू शकता. खूप मार्ग आहेत. आडवळणात असल्यामुळे झाकोळले आहेत. त्यांचा शोध घ्या. व्यवसायासाठी कितीतरी पर्याय समोर उभे राहतील. हे झाले व्यवसाय सुरू करण्यासंबंधी, त्यातील टेक्निकल माहितीसंबंधी, मार्केटसंबंधी, प्रोसेससंबंधी. आता व्यवसाय करताना आवश्यक असलेले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात.

व्यवसाय करताना पाळावयाचे नियम : उद्योजक हा उद्योजक असतो, शहरी असो व ग्रामीण, परंतु ग्रामीण उद्योजकांना शहरी उद्योजकांपेक्षा जास्त अडचणींना सामोरे जावे लागते. परिसरात उद्योजकतेचे वातावरण नसते. चांगले ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक आर्थिक क्षमता नसते. सल्लागार भेटत नाहीत. ग्रामीण भागातील व्यवसायाविषयी अजूनही कायम असलेली नकारात्मक वृत्ती यांसारख्या समस्यांमुळे ग्रामीण तरुणाई अजूनही उद्योगांपासून लांब आहे. या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास नक्कीच ग्रामीण भागात उद्योजकतेचे वारे वाहायला लागेल.

यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे आवश्यक आहे. शासकीय स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे. एखादे प्रॉडक्ट बनवण्याचे प्रशिक्षण देणे म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन होत नाही. व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे व्यवसाय कसा करावा याचे मार्गदर्शन. प्रॉडक्शन हे कामगारांचे काम आहे. मार्केटिंग आणि सेल्स हे उद्योजकांचे मुख्य काम आहे. नवउद्योजकांना मार्केटिंग आणि सेल्समध्ये तयार करणे ही मुख्य गरज आहे. ग्रामीण तरुणाईमध्ये वाढत चाललेली व्यवसायाची इच्छा ही येत्या काळात होणार्‍या मोठ्या परिवर्तनाची पायाभरणी आहे. हा पाया पक्का करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व स्तरातून प्रामाणिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. व्यवसाय अवघड नाही, फक्त नियोजन योग्य हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -