घरफिचर्ससारांशराजामौली पॅटर्न...

राजामौली पॅटर्न…

Subscribe

साध्या भातालाही व्हेज पुलाव बनविण्याची कला साऊथच्या डायरेक्टर्सना अवगत झालीये आणि या दिग्दर्शकांचा सध्याचा मास्टरशेफ आहे एस. एस. राजामौली. मक्खी, मगधीरा, बाहुबली, बाहुबली 2 या सर्वच सुपरहिट सिनेमानंतर त्याचा ‘आरआरआर’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. साउथचे 2 सुपरस्टार आणि फोडणी म्हणून वापरलेले बॉलिवूडचे दोन सुपरस्टार सोबत घेऊन, तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा बनविण्यात आला ज्याला रिलीजनंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय, सिनेमाचं फॅड इतकं चढलं की, केवळ 3 दिवसातच याने 500 कोटींच्या वर पैसा कमावलाय. सिनेमा बनविण्याचा असा कोणता फॉर्म्युला राजामौलीला गवसलाय की, त्याचे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरताय? इतर दिग्दर्शकांच्या तुलनेत राजामौली नेहमीच उजवा का ठरतोय ? अशाच काही प्रश्नांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.

दाक्षिणात्य सिनेमात काय दाखवतील याचा भरवसा नाही, एक सिनेमा मी असाही पाहिलाय ज्यात नायक केळं चक्क तलवार म्हणून वापरतो, आता तो सिन किती खरा किती खोटा हा नंतरचा विषय, पण जिथं सामान्य व्यक्तीची विचार करण्याची शक्ती संपते, तिथं या साउथवाल्यांची सुरू होते असा इतिहास आहे. सिनेमे रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवीचे असो किंवा अल्लू अर्जुन, धनुष, प्रभासचे. तंत्रज्ञानात बदल झाला असला तरी सिनेमांना लार्जर दॅन लाईफ बनविण्यात कुठलाही बदल दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी आजवर केला नाही. याला कारणदेखील तसंच आहे, एरव्ही साऊथच्या सिनेमांना ओव्हररेटेड म्हणणार्‍या आपल्या सारख्यांनासुद्धा त्या सिनेमांना टाळणं कधीच शक्य होत नाही. बालपणात मास दादाच पाय फिरवून तुफान तयार करणं असू देत किंवा शिवाजी द बॉसच एकाच वेळी 20 लोकांना हवेत उडवणं, आपणही आनंदी होऊन एन्जॉय केलंय. एकंदरीत काय तर ज्या गोष्टी सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात कधीच घडत नाही, पण सामान्य व्यक्तीला त्या नेहमीच कराव्या वाटतात, त्याच गोष्टी पडद्यावर दाखविण्यात दाक्षिणात्य सिनेदिग्दर्शकांना महारथ प्राप्त झालंय.

बॉलिवूडमध्ये देखील असे प्रयत्न आधीपासूनच होत होते आणि आजही होतात पण दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी याला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलंय, ज्यामुळे बॉलिवूडच्या अनेक दिग्दर्शकांना यात तितकं यश मिळवता आलं नाही. साध्या भातालाही व्हेज पुलाव बनविण्याची कला साऊथच्या डायरेक्टर्सना अवगत झालीये आणि या दिग्दर्शकांचा सध्याचा मास्टरशेफ आहे एस. एस. राजामौली. मक्खी, मगधीरा, बाहुबली, बाहुबली 2 या सर्वच सुपरहिट सिनेमानंतर त्याचा आरआरआर हा सिनेमा प्रदर्शित झालाय. साउथचे 2 सुपरस्टार आणि फोडणी म्हणून वापरलेले बॉलिवूडचे दोन सुपरस्टार सोबत घेऊन, तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा बनविण्यात आला ज्याला रिलीजनंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय, सिनेमाचं फॅड इतकं चढलं की, केवळ 3 दिवसातच याने 500 कोटींच्या वर पैसा कमावलाय. सिनेमा बनविण्याचा असा कोणता फॉर्म्युला राजामौलीला गवसलाय की, त्याचे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरताय? इतर दिग्दर्शकांच्या तुलनेत राजामौली नेहमीच उजवा का ठरतोय ? अशाच काही प्रश्नांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.

- Advertisement -

राजामौलीच्या करियरची सुरुवात एक जाहिरात दिग्दर्शक म्हणून तेलगू इंडस्ट्रीत झाली, 20 वर्षात फक्त 12 सिनेमे बनविलेल्या राजामौलीचे सर्वच सिनेमे सुपरहिट ठरलेत. प्रत्येक सिनेमा बनविताना किमान 1 वर्षांचा गॅप ते ठेवतात, राजामौलीच्या सिनेमांबाबत एक अजून गोष्ट म्हणजे त्याच्या सिनेमात स्टार्सपेक्षा पात्र अधिक लक्षात राहतात, मग तो मगधीरा असो किंवा बाहुबली, यातले अभिनेते आपण भलेही आधी पडद्यावर पाहिलेले असूदेत, पण सिनेमात ते केवळ एक पात्र म्हणूनच लक्षात राहतात, याला कारण आहे राजामौलीचे कथानक आणि त्यातील पात्राला दिलेलं महत्व. एका मुलाखतीत त्यांनी स्टार्सच्या लोकप्रियतेबाबत सांगितलं होतं की, माझ्यासाठी स्टार्सची लोकप्रियता ही शून्यासारखी आहे, जसं शून्याच्या आधी एखादा अंक आल्याशिवाय त्याला महत्व नसते, अगदी तसेच त्या लोकप्रियतेच्या आधी कथा नसेल तर त्या लोकप्रियतेला महत्व नाही. हेच कारण आहे ज्यामुळे त्यांच्या सिनेमात कथा केंद्रस्थानी असते.

राजामौलीचा सिनेमा फक्त कथेवर चालतो असं म्हणणं गैर ठरेल, कारण कदाचित त्यांच्यापेक्षाही चांगली कथा लिहिणारे दिग्दर्शक, कथाकार असतील पण राजामौली वेगळे ठरतात ते त्यांच्या कथानकाचे चित्रीकरण करण्यात…कथा प्रेक्षकांसमोर आणताना त्यातील प्रत्येक सीन लोकांना कसा आवडू शकतो? आणि त्या सीनमध्ये काय नवीन करता येईल? याकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. त्यांचे सर्व मोठे सिनेमे पाहिले तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की, त्यांच्या सिनेमात ते नवीन जग निर्माण करतात, कथा बाहुबलीसारखी असेल तर एकवेळ आपण समजूदेखील शकतो, पण आरआरआरसारख्या सिनेमात, जिथे कथा स्वातंत्र्यपूर्व भारतातील होती, तिथेही त्यांनी एका वेगळ्याच विश्वाची निर्मिती केल्याचा अनुभव प्रेक्षकांना सिनेमात येतो. भव्यदिव्य सेट्स कुठेच कृत्रिम वाटत नाही, त्यांचा कॅमेरा जिथे जिथे पडतो ती प्रत्येक फ्रेम आपल्याला खरी वाटायला लागते, ही त्यांच्या चित्रीकरणाची ताकद आहे आणि म्हणूनच दमदार कथानकाला दर्जेदार चित्रीकरणाची जोड दिल्याने राजामौली हे इतरांपेक्षा वेगळे दिग्दर्शक ठरतात.

- Advertisement -

सध्या आरआरआर सिनेमा रोज कमाईचे नवीन रेकॉर्ड्स तोडतोय, बिगबजेट सिनेमाला तेलगू भाषेत चढ्या दराने तिकीट विक्री करायला तिथल्या सरकारनेदेखील परवानगी दिली आहे. हा सिनेमा राजामौलीचा आजवर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनू शकतो, हा सिनेमा इतर सिनेमांपेक्षा का वेगळा ठरला यालाही काही कारणे आहेत. ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसारख्या सुपरस्टार्सना घेऊन राजामौलीने तब्बल 2 वर्षाहून अधिक काळ या सिनेमाचं शूटिंग केलंय, दक्षिण भारतातील 2 खर्‍या स्वातंत्र्यसैनिकांची काल्पनिक कथा म्हणजे हा सिनेमा आहे, प्रत्यक्षात जे दोन स्वातंत्र्यसैनिक कधीच एकमेकांना भेटले नव्हते ते जर त्याकाळी एकत्र आले असते तर काय घडलं असतं? याचं चित्रण या 3 तासाच्या सिनेमात केलंय. आता या सिनेमाची कथा वारंवार पाहता फार वेगळी वाटत नाही, एखाद्या व्यावसायिक सिनेमाला हवी तशीच ही कथा आहे, पण मग हीच कथा इतकी प्रभावी का बनते? याला कारण आहे त्याचं सादरीकरण… ज्या उत्कृष्ट पद्धतीने ती संपूर्ण कथा पडद्यावर आणली जाते, जी भव्यदिव्यता समोर दिसते, त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक त्याच्याशी कनेक्ट होतो, मग अशात तो ज्युनियर एनटीआरचा वाघासोबतचा सीन असो किंवा एका हाताने बुलेट उडविण्याचा सीन असो, सगळं काही खरं वाटतं. सिनेमात लार्जर दॅन लाईफ बरीच दृश्ये आहेत.

बहुतांश आहेत, असं म्हटलं तरी हरकत नाही, पण तरीही ते दृश्य समोर आणताना त्याच्याशी प्रेक्षक कसा कनेक्टेड करेल याची काळजी घेण्यात आलीये. रामचरणचा पोलीस स्टेशनसमोर हजारोंच्या जमावासोबतचा अ‍ॅक्शन सीन हा त्यापैकीच एक, मुख्य असलेल्या दोन्ही पात्राला त्याने एक कथा दिलीये, जी त्या पात्रांना मोठं बनवते, आगीचा आणि पाण्याचा संबंधदेखील चपखल बसतो. सिनेमात सांडणारा रक्ताचा प्रत्येक थेंब, धनुष्यातून निघणारा बाण आणि बंदुकीतून निघणारी गोळी याकडे विशेष लक्ष देण्यात आलंय. राजामौलीला मार्केट कळतं आणि त्या मार्केटला काय हवंय हेदेखील कळतं, म्हणून बाहुबलीला हिंदी पट्ट्यातून मिळालेल्या प्रतिसादाला लक्षात घेऊन त्याने यात अजय देवगण आणि आलीया भट यांना कास्ट केलं. अजयचे पात्रदेखील उत्तम आणि आलियालादेखील छोटंसं का होईना, पण काम दिलंय, यात विशेष हे की, बॉलिवूडचे लोक आहेत म्हणून आपल्या मुख्य पात्रांना कुठेही साईडला त्याने केलं नाही, इथे केंद्रस्थानी नेहमीच रामचरण आणि ज्युनियर एनटीआरच दिसतात. सिनेमा कसा बनवता हे अनेकांना माहितीये, पण तोच सिनेमा प्रेक्षकांना कसा दाखवायचा? त्यांना दुसर्‍या जगात घेऊन जाऊन कथेत रमवणं आणि सिनेमा चालवणं हे कसब फार कमी लोकांना अवगत आहे आणि राजामौली त्या लोकामध्ये येतो. म्हणूनच सिनेमा यशस्वी करण्याचा हा राजामौली पॅटर्न आज सगळ्यांना हवा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -