Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश वृक्षांमधील सुरक्षित अंतर !

वृक्षांमधील सुरक्षित अंतर !

Subscribe

कोरोनाच्या काळामध्ये आपण सामाजिक अंतर हा शब्द अनेकदा ऐकला. यात सामाजिक या शब्दावर अनेक उहापोह झाला. काही जणांनी शारीरिक अंतर किंवा भौतिक अंतर हे शब्द मान्य केले. अंतर हा शब्द सामाजिक विश्वामध्ये अनेक अर्थांनी प्रचलित आहे आणि तसा वापरलाही जातो. अगदी सोपे म्हणजे दोन मुलांमध्ये किती अंतर असावे हे प्रत्येक कुटुंब त्याच्या परिस्थितीप्रमाणे ठरवते. यात मुलांच्या वाढी निकोप व्हाव्यात हीच भावना सामान्यपणे असते, पण झाडे असे करतात का? विशेषतः जंगल पाहताना त्यांची नैसर्गिक सुंदर रचना मनाला मोहून टाकते. त्यांच्या रचनेतील लय, आपसातील अंतर लक्षात घेता नवलही वाटते. याविषयी विशेष संशोधन चालू असते.

–सुजाता बाबर

उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये बर्‍याचदा एक चौरस मैलामध्ये शेकडो प्रजातींची झाडे असतात, परंतु अशा प्रजातींची विविधता एकत्र कशी राहू शकते हे समजण्यासाठी शास्त्रज्ञांना अनेकदा संघर्ष करावा लागतो. ‘सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी परिपक्व वृक्षांच्या स्थानिक वितरणाचे मुख्य वैशिष्ठ्य शोधल्याने नवीन दृष्टी मिळाली आहे. ३० वर्षांच्या कालावधीचा डेटा गोळा करून संगणकीय मॉडेलिंगच्या मदतीने संशोधकांनी शोधले की पनामाच्या जंगलातील परिपक्व वृक्ष त्याच प्रजातीच्या इतर परिपक्व वृक्षांपेक्षा तिप्पट अंतरावर असतात.

- Advertisement -

युनिव्हर्सिटीच्या ओडेन इन्स्टिट्यूट फॉर कॉम्प्युटेशनल इंजिनीअरिंग अँड सायन्सेस आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक अ‍ॅनेट ऑस्टलिंग आणि पोस्टडॉक्टरल संशोधक मायकेल कल्युझनी यांनी पनामामधील बॅरो कोलोरॅडो बेटावर असलेल्या १०० फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या वन संशोधन प्लॉटमधून गोळा केलेला डेटा वापरला. कालव्याचा गेल्या १०० वर्षांपासून अभ्यास केला जात आहे. संशोधकांनी शोधून काढले की झाडांमधील एकमेकांपासूनचे अंतर हे बियाणे सामान्यत: प्रवास करत असलेल्या अंतरापेक्षा खूप जास्त आहे.

ऑस्टलिंग यांच्या मते कार्बन साठ्यासारख्या गोष्टींची गतीशीलता समजून घेण्यासाठी ही एक पायरी आहे जी हवामान बदलाशी संबंधित आहे. हा एक मूलभूत प्रश्न आहे. याची अंमलबजावणी कशी करायची याविषयी फारसे ज्ञान नाही म्हणूनच हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लहान झाडाला त्याच्या मूळ झाडापासून इतके अपकर्षण का असेल, ते विशिष्ट अंतरावर कसे का उगवते याचे शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटते. यासाठी एकमात्र सैद्धांतिक स्पष्टीकरण या संशोधनातून समोर आले आहे.

- Advertisement -

त्यांना आढळले की प्रत्येक झाडाची प्रजाती इतर प्रजातींपेक्षा स्वतःच्या प्रकारातील झाडांनी जास्त नकारात्मकरित्या प्रभावित होते. कदाचित याचे कारण म्हणजे प्रत्येक प्रजातीला विशिष्ट शत्रू असतात. उदा. रोगजनकांचा शत्रू म्हणजे बुरशी किंवा कीटकांचा शत्रू म्हणजे शाकाहारी प्राणी. हे शत्रू इतर प्रजातींना प्रत्येक झाडाभोवती स्थापित करण्यासाठी जागा तयार करतात ज्यामुळे अधिक वैविध्यपूर्ण जंगल निर्माण होते आणि कोणत्याही एका प्रजातीला वर्चस्व ठेवण्यापासून रोखले जाते. यामुळे जंगलांचा समतोल राखला जातो.

या विशिष्ट जंगलावरील डेटा भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने प्रत्येक झाडाचे अचूक स्थान आणि बिया किती दूर जातात हे समजता आले. जिथे बिया पडल्या तिथेच झाडे लावली तर जंगल कसे दिसेल याची कल्पना आणि खरे जंगल वेगळे आहे. खरी झाडे एकमेकांपासून खूप दूर आहेत.

काही प्रजाती सतत मोठ्या प्रमाणात नामशेष होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रजातींची विविधता कशी ठरवली जाते हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ काम करत आहेत. हा अभ्यास जंगलांचा आकार कसा बनतो यावरील विरोधाभासी सिद्धांतांमधील फरक कमी करण्यास मदत करतो आणि विशेषतः उष्णकटिबंधीय जंगले आणि त्यांचे रहिवासी वेळेनुसार कसे बदलतात हे जाणून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण साधने प्रदान करते.

वृक्ष हे अभियंते आहेत जे संपूर्ण परिसंस्थेसाठी संसाधने प्रदान करतात आणि जगातील बहुतेक प्रजाती उष्णकटिबंधात राहत असल्याने पृथ्वीची जैवविविधता कशी राखते हे आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे. अनेक औषधे उष्णकटिबंधातून मिळतात. यात कर्करोगविरोधी हजारो पदार्थांचा समावेश आहे. संशोधन नैसर्गिक जगाविषयीच्या या मूलभूत प्रश्नाचा शोध घेत असते.

जैवविविधता हा पर्यावरणाच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी आवश्यक घटक आहे. परिसंस्थेमधील प्रजातींची संख्या यापूर्वी वन उत्पादकतेशी (जंगलात वाढू शकणार्‍या वृक्ष आणि वनस्पतींच्या प्रजातींचे प्रमाण) सहसंबंधित असल्याचे आढळून आले आहे. याविषयी पूर्वी एक संशोधन झाले आहे.

जर्नल ऑफ इकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन शोधनिबंधाने जागतिक स्तरावर पुरावे दिले आहेत की, जंगलात असलेल्या प्रजातींची संख्या (प्रजाती समृद्धता), वन उत्पादकतेवर जैवविविधतेचा प्रभाव मोजण्यासाठी पुरेशी नाही. जैवविविधता हे प्रजातींच्या समृद्धीचे फलित आहेच शिवाय जमिनीच्या भूखंडातील प्रजातींच्या सापेक्ष विपुलतेचेदेखील फलित आहे. याला समानता असे म्हणतात.

समानता विशेषत: प्रजातींच्या विपुलतेच्या वितरणास संदर्भित करते. येथे एक उदाहरण आहे: जमिनीच्या प्लॉटमध्ये ५० झाडे आहेत. जर प्लॉटमध्ये १० झाडांचे ५ गट असतील, प्रत्येक गट वेगळ्या प्रकारच्या प्रजाती असतील, तर हे समान वितरण मानले जाईल. जर प्लॉटमध्ये ४६ झाडे आहेत जी सर्व एक प्रजाती आहेत आणि फक्त ४ झाडे इतर प्रजातींचे प्रतिनिधित्व करतात, तर हे असमान वितरण असेल. जगभरातील एक दशलक्षाहून अधिक वन भूखंडांच्या डेटावरून शास्त्रज्ञांनी जंगलांची समृद्धता आणि समानता यांच्यातील नकारात्मक संबंध शोधला.

विविध प्रजातींसह जंगले अत्यंत असमान असतात, फक्त काही प्रजाती जमिनीवर वर्चस्व गाजवतात. अशा वेळेस वन उत्पादकतेला चालना देण्यासाठी प्रजातींची समृद्धता वाढवण्याऐवजी समानता अधिक महत्त्वाची ठरेल. जंगलाच्या उत्पादकतेमध्ये योगदान देण्यासाठी प्रजातींनी समृद्ध जंगलातील झाडांच्या प्रत्येक प्रजाती मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.

हा अभ्यास वन उत्पादकतेवर प्रभाव टाकण्यासाठी प्रजातींच्या समानतेचे महत्त्व दर्शवितो. अशा वेळी जेव्हा हवामान बदल आणि जैवविविधतेच्या हानीशी लढण्यासाठी वैविध्यपूर्ण आणि उत्पादक जंगलांची आवश्यकता असते तेव्हा प्रजातींच्या विपुलतेची भूमिका समजून घेणे हे परिसंस्था संवर्धन आणि व्यवस्थापन प्रयत्नांना मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जंगलाची विविधता वाढवणे म्हणजे केवळ प्रजातींची संख्या वाढवणे असा होत नाही. याचा अर्थ त्या प्रजातींच्या नैसर्गिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करणेदेखील असू शकते. जंगले हा माणसाच्या दैनंदिन जीवनात न डोकावणारा विषय असला तरी आपले जीवन जगातील जंगल संपत्तीवर अवलंबून आहे हे सत्य कोणीही नाकारणार नाही. त्यामुळे जंगलांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
सुजाता बाबर

- Advertisment -