Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai

बाळा

बाळा 11 महिन्यांचा असताना त्याचे वडील गेले. तो लहान असल्याने त्या वर्षी गणपतीला गावी न जाण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी भगवान यांनी घेतला. अंबरनाथला राहणारे भगवान पाचव्या दिवशी गणपती विसर्जनाला त्यांच्या परिसरातील खाडीत उतरले होते. सोबत चार वर्षांची मोठी मुलगी होती. तिच्या हाती कपडे होते. बाबा बरेच वेळ पाण्यातून वर न आल्याने मुलगी कपडे घेऊन तशीच घरी आली. खूप शोधाशोध झाली. पण, भगवान मिळाले नाहीत. दुसर्‍या दिवशी त्यांचे प्रेत सापडले. हा बाळाच्या कुटुंबावर मोठा आघात होता. चार वर्षांची एक मुलगी, दोन वर्षांची दुसरी मुलगी आणि बाळा. जगण्याचा काहीच आधार नसल्याने बाळाच्या आईने तीन मुलांना घेऊन वेंगुर्ले गाठले.

Related Story

- Advertisement -

कोकणात घरातल्या थोरल्या मुलाला बाळा, बाबी किंवा मोठ्या लेकीला बायो, बेबी म्हणण्याची प्रथा आहे आणि ती आजतागायत टिकून राहिलीय. याचे एक कारण दिसते ते म्हणजे या बाळा, बायोला दिवंगत पणजोबा, आजोबा, आजी, काका यांची नावे ठेवलेली असतात. मग त्यांना आपल्या जाणत्यांचे नाव घेऊन कशी हाक मारणार. शिवाय प्रसंगी दोन शिव्या किंवा चार फटके कसे देणार? म्हणून बाळा, बायो म्हटले की काम सोपे होते. तसे बघितले तर कोणाच्या चांगल्या नावांचे असे तीन तेरा वाजवायचे यासाठी कोकणातल्या लोकांचा कोणी हात धरू शकणार नाही. उदारणार्थ संजय असे तीन अक्षरी, जोडाक्षरे नसलेले, अनुस्वार सोडला तर घ्यायला सोपे नाव असले तरी त्याची ‘संज्या’ अशी वाट लावणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे आसपासचे हाक मारणार… खरेतर कोकणातील माणूस जगात सर्वच बाबतीत सर्वश्रेष्ठ असतो. तो छोट्या मोठ्या गोष्टी करतच नाही. पिंपळाच्या पारावर बसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना आता चीनला टक्कर देण्यासाठी काय करावे लागेल, हे तो अगदी सविस्तर सांगू शकेल. पण, आपल्या घराची पडवी यंदाच्या पावसाळ्यात कोसळून पडेल, याची त्याला काही पडलेली नसते. जगाला शहाणपण शिकवताना स्वतःची अर्धी चड्डी पारावर बसून बसून फाटत आल्याची त्याला काळजी नसते.

असे बाळा, बाबी कोकणातील वाडी वाडीवर दिसतील. पण, माझ्या या सत्यकथेतील एक बाळा मी बघितलाय जो या सगळ्या चित्राला छेद देऊन जीवनात सकारात्मक रंग भरणारा आहे. बाळाचे मूळ नाव सहदेव. आजोबांचे नाव त्याला ठेवले होते. गावात घरटी बाळा असल्याने या बाळाला सहदेव बाळा म्हणतात. या बाळाच्या तोंडी कधीच ‘नाय जमाचा’ हा शब्द दिसला नाही. तो जसा दिसायला देखणा तसाच त्याचा स्वभावसुद्धा गोड. जणू देवदूत म्हणून त्याचा जन्म झाला असावा… वेंगुर्ल्यात माझ्या गावी गेल्यावर गोरापान, हसतमुख बाळाला बघितल्यावरच आपल्यातला काही अंशी असलेला नकारात्मक सूर कुठल्या कुठे निघून जातो. ‘कधी ईलास. बरे आसास मा. घरची कशी असत. ईलास तर आता जावची घाई करू नका’, हे बाळाचे आपलेपण थोरामोठ्यांपुरते मर्यादित नाही तर ज्या आपुलकीने तो मोठ्या माणसांना जोडतो, त्यापेक्षा खूप सहजतेने तो छोट्या मुलांबरोबर रमतो. त्यांना तो आपला बाळा दादा वाटतो. हे वाटणे सगळ्यांच्या नशिबी नसते. कदाचित नाशिबाच्या खेळानेच त्याला हे देवदूतपण दिले असावे.

- Advertisement -

बाळा 11 महिन्यांचा असताना त्याचे वडील गेले. तो लहान असल्याने त्या वर्षी गणपतीला गावी न जाण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी भगवान यांनी घेतला. अंबरनाथला राहणारे भगवान पाचव्या दिवशी गणपती विसर्जनाला त्यांच्या परिसरातील खाडीत उतरले होते. सोबत चार वर्षांची मोठी मुलगी होती. तिच्या हाती कपडे होते. बाबा बरेच वेळ पाण्यातून वर न आल्याने मुलगी कपडे घेऊन तशीच घरी आली. खूप शोधाशोध झाली. पण, भगवान मिळाले नाहीत. दुसर्‍या दिवशी त्यांचे प्रेत सापडले. हा बाळाच्या कुटुंबावर मोठा आघात होता. चार वर्षांची एक मुलगी, दोन वर्षांची दुसरी मुलगी आणि बाळा. जगण्याचा काहीच आधार नसल्याने बाळाच्या आईने तीन मुलांना घेऊन वेंगुर्ले गाठले. गावीसुद्धा फारशी चांगली परिस्थिती नव्हती. दिवसाची मजुरी करून जेमतेम दोन वेळचे पोट भरेल, असे जगणे. गावी आजी, मोठी काकी, तिच्या तीन मुली. मोठे काका मुंबईत गिरणी कामगार. हेच काका बाळाच्या कुटुंबाचा एकमेव आधार. पण, बाळाच्या आईने धीर खचू दिला नाही. पदर खोचून ती घराबाहेर पडली.

दुसर्‍याच्या मदतीने वर्षभर पुरेल इतके भात करायचे आणि मोलमजुरी करून घरात लागणार्‍या वस्तू आणायच्या. सोबत काजू कारखान्यातून काजू सोलायला आणायचे. तीस एक वर्षांपूर्वी एक दिवस मान खाली घालून एक डबा काजू सोलले तर साडे तीन रुपये. बाळाच्या घरात तो सोडला तर आठ बायका पोरी. त्या सर्व पाठपोट एक करत काजू सोलत सोलत, घराला आधार देत. याचवेळी बाळा शेजारच्या दळवी मामांबरोबर घर शाकारणी, इतर छोट्या मोठ्या कामांना जात आपल्या घरातील स्त्री शक्तीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करी. घरी आणि दारीही कोणी काही कामे असतील तर बाळाला सांगायची. त्याने कधी त्यांना नाही म्हटले नाही. मग ते केरकर कुटुंब असो किंवा लक्ष्मीकांतदादा, वासंती, आयनाड बाबा. कोणी हाक मारली तर बाळा मदत करायला एका पायावर तयार. आपल्याला दिलेले काम चोख आणि प्रामाणिकपणे करायचे हा बाळाचा पाया त्याच्या लहानपणच्या संस्कारात दडला होता.

- Advertisement -

कोकणी माणूस आणि शिव्या या एकमेकांच्या सोबतीने चालतात. त्यात काही विशेष नाही. रांडेच्याही तो सहज बोलून जातो. बाळाही आजूबाजूच्या वातावरणात शिव्या शिकला होता. पण, शाळेत असताना कलावती आईंच्या बालोपासना वर्गात गेल्याने त्याला जे काही संस्कारित वागण्याचे धडे मिळाले ते आयुष्यभर पुरून उरले.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा बाळा शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. अगदी शाळा उघडण्यापासून ते साफसफाई, सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी ते मुलांना शिकव अशी बाळाने शाळेतील प्रत्येक कामे केली. भविष्यात शिक्षक होण्याची तो शाळकरी वयात मुळाक्षरे गिरवत होता. शिकवण्याबरोबर बाळाला लाभलेला अंगभूत गुण म्हणजे संगीत. पेटी वाजवणे आणि सुरात गाणे हे तो कोणी न शिकवता आपले आपणच शिकत गेला. वसंत परब हे शिक्षक अभ्यासाबरोबर शाळेत संगीत शिकवत. एकदा सातेरी प्रासादिक संघाची गायन स्पर्धा होती आणि परब यांनी बाळाला ‘बलसागर भारत होवो’ हे गाण पाठ करायला सांगितलं. मात्र या गाण्यातील तिसरा चरण काही त्याला पाठ होईना. शेवटी वसंत गुरुजींनी हातावर चांगल्या छड्या मारल्यानंतर दुसर्‍या क्षणाला बाळाचा तिसरा चरण पाठ झाला.

तसेच एकदा कोकण भजन सम्राट कृष्णा पवार यांचे गाणे पेटीवर बसून गात होता. मात्र त्याला नीट वाजवता येत नव्हते. याच वेळी त्याचा उत्साह वाढवण्याऐवजी आपल्याला जमत नाही ते करू नये, हा नेहमीचा आगाऊ कोकणी सल्ला त्याच्या बरोबरच्या सहकार्‍याने दिला. हा बाळाच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. मनाशी ठरवले आपण शास्त्रीय संगीत शिकलो नसलो तरी संगीताची ऐकून, बघून जेवढी आराधना करता येईल तितकी करायची आणि आज या मेहनतीचे फळ त्याला मिळालय. वेंगुर्ले परिसरात गायक, संगीतकार म्हणून त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे भजनी मंडळ, संगीत बारीपुरते आपल्याला मर्यादित न ठेवता त्याने परबवाडा गाव आणि आसपासच्या तरुणांना एकत्र करून सातेरी तरुण दशावतार नाट्यमंडळ स्थापन केलय. भविष्यात सामाजिक, संगीत नाटके करण्याचा बाळा विचार करतोय.

एमकॉम, बीएड शिक्षण घेऊनही मनासारखी शिक्षकाची नोकरी बाळाला मिळाली नाही. पण, ज्या शाळांमध्ये तो जाईल ती शाळा आपल्या अभिजात शिकवण्याने तो कायम आपलीशी करत आलाय. शिक्षणाबरोबर वाचन, संगीत, स्पर्धांमधील सहभाग, वक्तृत्व, विविध कार्यक्रमांचे आयोजन अशा सर्व बाबतीत तो पाहिली ते पदवीपर्यंतच्या मुलामुलींना घडवत असतो. सध्या बाळा कुडाळच्या तुळसुली शाळेत शिकवत असून मालवण, वेंगुर्ले आणि आता कुडाळ असा त्याचा शिक्षकी प्रवास सुरू आहे. बाळा अभिजात शिक्षक म्हणूनच जन्माला आलाय. या त्याच्या गुणांचा शिक्षण संस्थेने छान उपयोग करून घ्यायला हवा, असे मला मनापासून वाटते. जन्मजात देखणेपण लाभलेला बाळा एखादी गोष्ट शिकवायला लागला की ती प्रासादिक करून टाकतो.

साने गुरुजींना जरी आपल्याला बघता आले नसले तरी त्यांच्याबद्दल वाचून, ऐकून त्याची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आईच्या मायेने शिकवणार्‍या साने गुरुजींसारखा बाळा मुलांना शिकवतो. लहान, मोठी सर्व मुले तनमन हरपून बाळाला ऐकत असतात तेव्हा शिक्षक या शब्दाचा खरा अर्थ उमगलेला असतो. बाळाच्या एक आवाजावर आज शेकडो मुले तो सांगतील ते करायला एका पायावर तयार आहेत. ही पुण्याई आपल्या प्रेमळ गुणांनी बाळाने कमावली आहे. आपल्या वागण्याने, कामाने कोकणातील नकारात्मकता घालवण्यात त्याने मोठा हातभार लावलाय. विशेष म्हणजे त्याने मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीला काम व्हायच्या आधीच ‘नाही रे’ म्हणायचे नाही, असा मूलभूत संस्कार घडवलाय. भविष्यात सकारात्मक वाटेवरून जाणारा कोकण अशा बाळा आणि तो घडवत असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातून उभा राहणार आहे.

- Advertisement -