सालेरी किल्ल्याची उंची पाहू गेले असता पागोटे गळून पडते

‘साल्हेर’ गडमाथा हे कळसुबाई नंतरचे उत्तुंग शिखर. जणू सह्याद्रीचे मस्तक. भगवान परशुरामांची तपोभूमी. बहामनी, निजाम, मुघलांच्या आक्रमणास जवळपास एक तपभर दाद मिळवू न देणारा हा बुलंद बळकट साल्हेर. इ.स.1639 मध्ये मात्र बागलाण राजा बहिर्जीने मुघलांपुढे कच खाऊन साल्हेरच नव्हे तर 33 किल्ल्यांचे स्वामित्व मुघलांच्या हवाली करून स्वतःही इस्लाम स्वीकारता झाला. साल्हेरचा सुलतान गड झाला. इ.स.1670 मध्ये महाराजांनी मुल्हेरची पेठ काबीज करून साल्हेर मिळवला होता. त्यावर त्वरित औरंगजेबाकडून बहादूर खान, दिलेरखानाने इ.स.1671 मध्ये साल्हेर भोवती वेढा घातला. मुघल सैन्याचा हा अफाट वेढा प्रतापराव गुजर, मोरोपंत यांनी शर्थीने मोडून उधळला होता.

ऐंशी-नव्वदीच्या दशकात गदिमा-बाबूजींच्या गीत रामायणाने अख्खी मराठी भावसृष्टी जणू राममय झाली होती. आणि अल्पावधीतच लताबाई-बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शिवकल्याण राजा’ शिवस्तुतीने मराठी मन शिवमय होऊन गेले होते. प्रत्येक घरा-मनाचा कानाकोपरा शिव-चैतन्यमय केला होता.

तेजस्वी मुखातून शिववाणी ऐकेस्तोवर ‘सह्याद्री- शिवपर्व’ हृदयापर्यंत भिडलेच नव्हते..‘शिवकल्याण राजा’ वारंवार ऐकताना हे सारं पाहण्यासाठी जीव उतावीळ होऊ जायचा. कुठे अन कसे असतील हे किल्ले? मला पाहता येतील का? मन अस्वस्थ व्हायचं. तेव्हा आपकमाई नव्हती. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये डिप्लोमा होत असताना अवघा तीनशे रुपये स्टाईपंड मिळत होता. तोही प्रवास खर्चात जायचा. भटकायचे, तर काही मार्ग हवा, म्हणून ट्युशन्स मिळवून सहाशेची सोय केली होती. पोटाची नाही पण भटकण्याची आसक्त काळजी होती. मनात आले, सर्वात उंच किल्ल्यापासून सुरुवात करू. ‘ट्रेक द सह्याद्री’ने साल्हेर अन निकटचे किल्ले दाखवले. मित्र मिलन म्हात्रेला सोबत घेऊन दोघं निघालो. कसार्‍यापर्यंत विदाऊट तिकीट. पुढे नाशिक हायवेवर येऊन ट्रक मिळवला. ट्रक ड्रायव्हरला इगतपुरीत पाजलेला टपरीवरचा चहा, दोन केळी आणि बेमुदत गप्पा यापलीकडे घरातून कळवणपर्यंत प्रवास चक्क चकटफु केला. पैसे वाचल्याचा कोण परमानंद काय सांगू? कळवणमध्ये मटकीउसळ पाव नाश्ता करून पार्लेचे आठ पुडे घेतलेत(त्यावरही पुढची सोय फुकट करता येते, गृहीत धरून). मुल्हेर-ताहराबादकडे जाणार्‍या वडापातून साल्हेर गाव गाठलं.

सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिकच्या बागलाणातून होते. मोक्षगंगा-अक्षगंगा या नद्यांमुळं समृद्ध पावलेला प्रदेश. उत्तरेकडून सुरू होणार्‍या सेलबारी रांगेवर मांगीतुंगी, न्हावी(रतन)गड तर डोलबारी रांगेवर मुल्हेर-मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा या उत्तुंग किल्ल्यांचा पहारा वसलाय. गुजरातमधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण यांच्या सीमेवरील हे धिप्पाड किल्ले..

‘साल्हेर’ गडमाथा हे कळसुबाई नंतरचे उत्तुंग शिखर. जणू सह्याद्रीचे मस्तक. भगवान परशुरामांची तपोभूमी. बहामनी, निजाम, मुघलांच्या आक्रमणास जवळपास एक तपभर दाद मिळवू न देणारा हा बुलंद बळकट साल्हेर. इ.स.1639 मध्ये मात्र बागलाण राजा बहिर्जीने मुघलांपुढे कच खाऊन साल्हेरच नव्हे तर 33 किल्ल्यांचे स्वामित्व मुघलांच्या हवाली करून स्वतःही इस्लाम स्वीकारता झाला. साल्हेरचा सुलतान गड झाला. इ.स.1670 मध्ये महाराजांनी मुल्हेरची पेठ काबीज करून साल्हेर मिळवला होता. त्यावर त्वरित औरंगजेबाकडून बहादूर खान, दिलेरखानाने इ.स.1671 मध्ये साल्हेर भोवती वेढा घातला. मुघल सैन्याचा हा अफाट वेढा प्रतापराव गुजर, मोरोपंत यांनी शर्थीने मोडून उधळला होता. या युद्धात महाराजांचा बालपणापासूनचा जिवलग सूर्यराव काकडेसारखा असामान्य योद्धा अद्वितीय पराक्रमाने सूर्यमंडळ भेदून अक्षयपदी गेला होता. मातीत मरणारे कैक असतात हो, पण मातीसाठी मरणारे ?? या बलिदानातूनच तर स्वराज्य घडले. साल्हेरच्या युद्धामुळे खुल्या मैदानातही मराठे मोगलांचे बळ मारून काढू शकतात, हा विश्वास मराठे सैन्यात कायमचा दृढ झालाच; शिवाय, मराठेशाहीची प्रतिष्ठा आणि दरारा वाढला. औरंगजेबाने तर इतका धसका घेतला, तो दिलेरखानाची निर्भत्सना करताना म्हणतोय, आपल्या महाबलवान योद्ध्यांना सीवाने कैद केले, तुम्हीं मेला का नाहीत ?

साल्हेरचा इतिहास अवगत ठेवून गड चढला तर इतिहास बोलू-वदू लागतो. गावात गडवाटेची माहिती घेऊन निघालो. बोलीभाषा मस्त सुखावते. खोदीव कातळ पायर्‍यावरून चढताना सुरुवातीसच कातळातच साकारलेल्या श्रीगणेशाचे दर्शन घडले. पहिल्या बुरुजापाशी दरवाजाचे नक्षीकाम आणि त्यावरचा शीलालेख लक्ष वेधतो. गडाच्या माचीवर घरावाड्यांचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्या शेजारी दोन पादुका आहेत. साल्हेरच्या बालेकिल्ल्यावर पोहोचावयास तब्बल सात दरवाजांचा पहारा पार करावा लागला. एका बाजूनं दूरवर पसरलेलं पठार आणि खेटून उभ्या असलेल्या छोट्या टेकडीवर परशुरामाचं मंदिर. पठारावरही घरा-वाड्यांचे चौथरे, पाण्याच्या टाक्या आहेतच. त्यातील दोन कुंडात तर बारमाही पाणी असतं. इतक्या उंचीवर असलेल्या तलावात मधोमध खांब आहे.

काठावर रेणुका देवीचं मंदिर आहे. दर12 वर्षांनी या तलावाचं पाणी दुधाळ होते, त्यावेळी गडावर मोठा उत्सव भरतो. टेकडीच्या एका बाजूनं खाली राजवाड्याचे अवशेष दृष्टीस पडतात. वाड्याकडूनच पुढे मावळतीच्या बाजूने कातळ गुंफा-लेणी, पाण्याच्या टाक्या आहेत. इथून समोरील सालोट्याचं रूप पाहाताना वार्‍यावरचा स्पर्श संवादू लागतो अन शब्द मुके होतात. शब्दांपलीकडचे भाव मनांत दाटतात. आभाळाला खांद्यावर तोलणारे क्षितिज असेच निःशब्द असते ना गुंफांच्या पुढेच गडाच्या या बाजूनं दुसर्‍या दरवाजातून खिंडीकडे उतार धरल्यावर कातळात खोदलेल्या सुबक पायर्‍यावरून वाट पुढे होते. तिसर्‍या दरवाजा बाहेरील एक सुस्पष्ट फार्सी शिलालेख मुघल-राजवटीची खून दर्शवतो.

खिंडीतूनच सालोटा गडाची वाट वर चढते. गडाच्या पसार्‍यात महादेव मंदिर, हनुमान मंदिर, पाण्याच्या असंख्य टाक्या, जागोजागी उध्वस्त वाड्या-घरांचे अवशेष, खोदीव गुंफा हा उध्वस्त सारीपाट भूतकाळात घेऊन जातो. गड उतरतांना साल्हेर वाट न घेता खिंडीतूनच वाघांबे गावाची दिशा पकडून वाटेवरील भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाचे ठसे पाहिलेत. साल्हेर-सालोटा करून सूर्यास्तास मुल्हेर-मोरा गडा पायथ्याचे मुल्हेर गाव गाठलेच. धर्मशाळेत सोय झाली. पायां पोटरीत गोळे येत होते. झोपही अपुरी होती. उद्याच्या मुल्हेरसाठी ऊर्जा-उत्साह राखून ठेवायचा होता.

‘मुल्हेर’गडाचे प्राचीनत्व तर महाभारतापासून सुरू होत असल्याचे दंतकथा सांगते. त्याकाळी रत्नपुर ही मयुरध्वज या राजाची राजधानी होती. हे रत्नपुर म्हणजेच हा मुल्हेरगड. खरीखुरी ‘रत्न’ देव जाणो, पण आम्हांसाठी हे गडाचे शेष दगडधोंडे हीच आता रत्न होत. देवगिरीच्या पाडावानंतर चहुबाजूने मुसलमानी अंमल वाढत असतानाही नानदेवशहा बागुलने आपल्या हिंदू-राज्याची स्वतंत्र स्थापना करून हा मुल्हेरगड राजधानी स्वरूप बांधला. गुजरातचे सुलतान, खानदेशातील फारूक, बहामनी, निजाम, मोगल या धर्मांधांशी केव्हा लढून तर प्रसंगी करार संगनमत करीत तब्बल 332 वर्षे हे बागलाण राज्य टिकलेत्याची स्मृती म्हणजे हा मुल्हेर किल्ला. त्या हिंदू राजवटी वरूनच या प्रदेशाला आजही बागलाण म्हणून ओळखले जाते. आजही या भागात तेव्हाच्या अहिराणी भाषेचा प्रभाव जाणवतो.

मुल्हेर-मोरा हे दोन बालेकिल्ले एकाच माचीवर आहेत. गावातून तासाभरात तीन दरवाजे ओलांडून मुल्हेर माचीवर प्रवेशलो. माचीवरील गणेश तलाव आणि गणेश मंदिर, सभामंडप, कोरीव नक्षीकाम, स्तंभावरील शिलालेख सारे चित्त खिळवून ठेवणारे. गणेश मंदिराच्या उजवीकडे मुल्हेर तर डावीकडे मोरागडाचा बालेकिल्ला उंचावलाय. बालेकिल्ल्याचे चार बुलंद दरवाजे आणि संरक्षक तटबंदी ‘राजधानी’ मुल्हेरची साक्ष पटवतायत. माची ते बालेकिल्ला परिसरात पाण्याच्या अगणित टाक्या, राजवाडा, घरेवाडे, बुरुज-तटबंदी, मधोमध दगडी स्तंभ असलेली पाण्याची विशाल कुंडे, पाषाणकोरीव कमानियुक्त दरवाजे आणि विशेष म्हणजे महिषासुरमर्दिनी-मारुती-गणेशाची मूर्ती, सारे काही राजधानी मुल्हेरची साक्ष पटवतात.

या ‘मूर्ती’ त्या इतिहासाच्या साक्षीदार, संस्कृतीच्या भागीदार. कधी अलौकिकांच्या व्यथा तर कधी आदर्शाच्या गाथा गातायत. समूर्त मूर्तीतून असं काही अमूर्त साकारत असतं, ते अंतःकरणात आरपार भीडतंहीच तर त्यांची थोरवी. बालेकिल्ला माथ्यावरून हरगड, साल्हेर, मांगी तुंगी, रतनगड किल्ले, सभोवरचा खडा पहाडी मुलुख विलोभनीय भासतो. मुल्हेर-मोरामधल्या खिंडीतून मोरा बालेकिल्ल्यावरचा प्रवेशही थक्क करणारा. कातळातच खोदलेली दरवाजाची कमान, कातळाच्या अंतरगृहातील खोदलेल्या पायर्‍याहे कवतिक पहात, मनांत प्रश्न उमळावेत?? पहिल्याच दरवाजाच्या दुतर्फा भिंतीवरील गणेशाची प्रतिमा पाहून मार्गावरील गुंफा,पाण्याची कुंडं बघून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर आलो. बालेकिल्ल्यावरही पाण्याची दोन कुंड आणि वाड्याचे अवशेष दिसतात. मोरा पाहून पुन्हा मुल्हेरकडे न वळता माचीकडे उतरलो. एकसंध पाषाण दरवाजे-पायर्‍या उतरल्यावर दूरवर भगवा दिसला. हे सोमेश्वर मंदिर. मंदिराचा सभामंडप, पुढील तिन्हीं दगडी कमानी-दालनं आजही सुस्थितीत आहेत. गर्भगृहात जाण्यासाठी पायर्‍या उतरून जावे लागते. गाभार्‍याच्या प्रवेशद्वारातूनही पिंड दिसत नाही. सर्वात आश्चर्य म्हणजे हे मंदिर कुठेही हलवता येत होते, ही वैशिष्ठ्यपूर्ण दुर्लभ वास्तूरचना इथेच पहावयास मिळते.

मंदिर प्रदक्षिणा मार्गावर गणेश मूर्ती आहे. पुन्हा माचीच्या रोखाने जात असताना झाडावळीत हरवलेली तीन मजली चंदनबाव विहीर पाहून पुरता अवाक झालो. त्यापुढील रामकृष्ण मंदिराच्या भिंतीवरील गजशिल्प अजूनही शाबूत आहे. इथेच प्रशस्त राजवाड्याच्या खाणाखुणा दिसतात. राजवाड्याकडून पुढे तीन दरवाजा कमानी पार करून हरगडकडे जाणार्‍या खिंडीत पोहोचलो. हरगड हा तसा मुल्हेरपेक्षा उंच. मुल्हेरच्या अगदी निकट त्यामुळे हरगडच्या डोंगरावरून मुल्हेरचा पाडाव सहज होऊ शकतो. त्यामुळे हरगडच्या शिखरालाही बुरुज तटबंदी बांधून यास गडा-शिबंदीचे स्वरूप दिले असावे.

गडावर पाण्याच्या टाक्या, घरावाड्यांचे अवशेष तर आहेतच पण हजार बागदी (की बांगडी) नावाची 19फुटी तोफ आहे. पुन्हा खिंडीतून मुल्हेर गाव गाठला. मुल्हेर गावात,पु.लं च्या ‘व्यक्ती अन वल्ली’प्रमाणे एक इरसाल नमुना मेतकर मामाला मी विसरू शकत नाही.

नाशिकच्या वायव्येकडील किल्ल्यांचे नेतृत्व साल्हेर-मुल्हेरकडे होते. सभोवार सह्याद्रीची उत्तुंग बेलाग शिखरे,आणि प्राचीन-मध्ययुगीन त्यातही शिवकालातील साल्हेरी युद्ध-इतिहास या किल्ल्यांनी उराशी कवटाळलाय. अजून एक महत्वाचे म्हणजे, इंग्रजांसमोर ‘मुल्हेर’ पडला तेव्हांच तिसरे आणि अखेरचे मराठा युद्ध संपले होते. माझं दोन वेळा जाणं झालंय.पण,पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं,असा हा सर्वांगसुंदर ऐतिहासिक मुलुख गडकोट ही तर साधनेची स्थळं. इथे गतकाल पुन्हां स्मरताना समाधी लागते. साल्हेर मुल्हेर धारेच्या वार्‍यावर भटकल्याशिवाय ‘भ्रमंती’ पूर्ण होऊच शकत नाही.

–रामेश्वर सावंत