घरफिचर्ससारांशसमकाळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

समकाळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण वर्तमान पार्श्वभूमीवर करण्याचे औचित्य काय, असा प्रश्न कदाचित आपल्याला पडला असेल. तर त्याचे उत्तर हे आहे की, मागच्या आठवड्यात म्हणजे 26 नोव्हेंबरला आपण ‘संविधान दिवस’ साजरा केला. तर पुढच्या काही दिवसांमध्ये सहा डिसेंबर रोजी त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ.आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना हा एक स्वतंत्र दिवस म्हणून लोक स्मरणात ठेवतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना मनोभावे अभिवादन करतात. त्यांच्या जयंतीचा उत्साह जसा देशभरात संचारतो. तसेच महापरिनिर्वाणदिनी एक कमालीची खिन्नता, व्याकुळता घेऊन प्रचंड मोठा जनसागर त्यांना आदरांजली अर्पण करतो.

आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर महापुरुषांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी योगदान दिले आहे त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. केवळ संविधानाचे शिल्पकार किंवा दलितांचे मुक्तिदाते इतक्या मर्यादित परिप्रेक्ष्यात त्यांचे मूल्यमापन करता येणार नाही. तर काळाला वळण देणारा महानायक म्हणून त्यांच्या समग्र सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीचे विश्लेषण करायला हवे. एक महान तत्त्ववेत्ता म्हणूनही त्यांच्या विचारांचा परामर्श घ्यायला हवा. ‘बुद्ध अँड हिज धम्म’ या ग्रंथातून त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाची केलेली मांडणी असो किंवा त्यांनी दाखवून दिलेली बुद्ध धर्माची ऐतिहासिकता असो – या सगळ्याच लेखनातून, संशोधनातून दिसणारा त्यांचा व्यासंग थक्क करणारा आहे. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र, कायदा, तत्त्वज्ञान, धर्मचिकित्सा, अर्थशास्त्र अशा सर्वच ज्ञानशाखांचा अभ्यास असलेल्या आणि तमाम भारतीयांचे सामाजिक जगणे प्रगल्भ आणि न्याय बनावे यासाठी अहोरात्र झटणार्‍या आंबेडकरांइतका प्रभावी नेता, तत्त्वचिंतक अन्य कुणी नाही. शिक्षण, अर्थार्जन, आत्मसन्मान आणि व्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले कार्य भारतीय नव्हे, तर जगाच्या इतिहासात अद्भुत म्हणावे इतके थोर आहे.

समग्र भारतीय इतिहासाची पुनर्मांडणी करून त्यांनी जातीअंताची लढाई लढली. अशी क्रांती अपवादानेच अन्यत्र दिसते. जाती निर्मूलनाच्या संदर्भात त्यांनी म्हटले आहे, जातीभेद हा निसर्गजन्य भेद नव्हे, हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. अमक्या एका जातीतले सगळेच लोक बुद्धिमान, तेजस्वी, सदाचरणी असे निपजतात आणि दुसर्‍या एका जातीतले सगळेच लोक निर्बुद्ध अजागळ व दुराचरणी निपजतात असे जोपर्यंत दाखवून देता येत नाही तोपर्यंत जातिभेद हा नैसर्गिक भेद आहे असे म्हणता यावयाचे नाही. मनुष्यभेद नाहीसे करणे मनुष्याला शक्य नाही व सध्याची सामाजिक विषमता मनुष्यकृत असल्यामुळे ते काढून टाकणे अगदी शक्य आहे. जाती निर्मूलनाच्या संदर्भातली त्यांची ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. समताधिष्ठित समाजरचना हे ध्येय बाळगून कृतिशीलपणे त्यांनी जाती प्रश्नांची चिकित्सा केली. एवढेच नव्हे तर स्त्रियांच्या हितासाठी, हक्कासाठी त्यांनी कायद्याने अनेक गोष्टी केल्या. त्यामुळेच ज्या ज्या वेळी स्त्री स्वातंत्र्याच्या इतिहासाची चर्चा केली जाईल त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाईल. कारण परंपरागत रुढी-परंपरेत अडकलेल्या स्त्रीला मुक्त करून शिक्षण आणि अर्थार्जनाच्या नव्या अवकाशात आणण्याचे काम त्यांनी अव्याहतपणे केले आहे. एवढेच नव्हे तर मानवतेचा उद्गार असणारे आजचे भारतीय दलित साहित्यसुद्धा डॉ. आंबेडकरांचाच वैचारिक आविष्कार आहे. आंबेडकरी प्रेरणेच्या या साहित्याला म्हणूनच जगभरात मान्यता मिळाली.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण वर्तमान पार्श्वभूमीवर करण्याचे औचित्य काय, असा प्रश्न कदाचित आपल्याला पडला असेल. तर त्याचे उत्तर हे आहे की, मागच्या आठवड्यात म्हणजे 26 नोव्हेंबरला आपण ‘संविधान दिवस’ साजरा केला. तर पुढच्या काही दिवसांमध्ये सहा डिसेंबर रोजी त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ.आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना हा एक स्वतंत्र दिवस म्हणून लोक स्मरणात ठेवतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना मनोभावे अभिवादन करतात. त्यांच्या जयंतीचा उत्साह जसा देशभरात संचारतो. तसेच महापरिनिर्वाणदिनी एक कमालीची खिन्नता, व्याकुळता घेऊन प्रचंड मोठा जनसागर त्यांना आदरांजली अर्पण करतो. कारण आंबेडकर ही केवळ एक व्यक्ती नाही तर नव्या स्वातंत्र्याचा एक सर्वोच्च उद्गार आहे. असा उद्गार ज्याने इथल्या दलित पददलितांना, वंचितांना, स्त्रियांना, कष्टकर्‍यांना आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची, अस्मितेची जाणीव करून दिली. त्यांच्या मनात सत्वाची पेरणी केली. आणि म्हणूनच कधीकाळी स्वतःची ओळख विसरलेली माणसे आज स्वाभिमानाने जगत आहेत.

अत्यंत निष्कलंक आणि आपल्या समग्र राजकीय कारकिर्दीत कमालीची नैतिकता जपणारे ते एकमेवाद्वितीय नेते होते. स्वतःच्या कर्तृत्त्वाने, बुद्धिमत्तेने त्यांनी स्वतःला सिद्ध केले. शिवाय पराकोटीचा सामाजिक विरोध असूनही त्यांनी भारतीय राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे ज्या काळात म. गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे मोठे नेते काँग्रेसचे आणि देशाचे नेतृत्व करत होते, त्याकाळात डॉ.आंबेडकर हे समांतरपणे या सर्वांशी वैचारिक संघर्ष करत व दलितांचे नेते म्हणून प्रस्थापित होत होते. आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे दलित आणि अन्य समूहाविषयी त्यांच्या मनात असलेली पराकोटीची आस्था. त्यांच्याविषयीची परिवर्तनाची आस. सामाजिक आणि राजकीय जीवनात मोठे ताणतणाव आणि अस्थैर्य असूनही जातिव्यवस्थेच्या संदर्भात, हिंदू धर्म आणि वर्णव्यवस्थेच्या संदर्भात ते सतत बोलत राहिले. जन्माधारित वर्णव्यवस्थेवर त्यांनी टीका केली. जातीवर आधारित व्यवसायाला त्यांनी मूठमाती दिली. भेदभावाच्या सामाजिक उतरंडी नष्ट करून राजकीय हक्कासाठी ते लढले. अशावेळी त्यांच्या विद्वत्तेला दुर्लक्षून चालणार नव्हते. म्हणूनच स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना कायदामंत्री करण्यात आले. काही तात्विक मतभेद झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला.

- Advertisement -

भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेत त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे. संसदीय शासन प्रणालीचा त्यांनी केलेला स्वीकार ही घटनाही अधिक मोलाची आहे. सामाजिक जीवनातला विरोधाभास, विषमता दूर व्हावी म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वाचा त्यांनी आग्रह धरला. सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाहीला फार अर्थ उरत नाही याची जाणीव त्यांना होती. डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणाचे स्वरूप बदलले. हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हा जातीव्यवस्थेच्या विरोधातला एक महत्वाचा पर्याय होता. त्यांनी केलेले धर्मांतर ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत अभूतपूर्व घटना होती.

हे धर्मांतर केवळ एक धर्म सोडून दुसर्‍या धर्माची दीक्षा घेणे इतक्या मर्यादित स्वरूपाचे नव्हते. तर ते एका अर्थाने प्रचंड मोठे मानसिक परिवर्तनदेखील होते. मनुस्मृती आणि पारंपरिक धर्मसंकल्पना नाकारून त्यांनी ‘धम्म’ ही संकल्पना मांडली. सामाजिक नीतिविषयक प्रश्नांचा सखोल अभ्यास केला. आणि मानवी प्रतिष्ठेची, लोकशाही मूल्यांची रुजवणूक केली. परंपरेच्या शृंखला तोडून नवी समाजरचना निर्माण करणे हे काम सोपे नव्हते. पण ते डॉ. आंबेडकर यांनी केले. ‘मूकनायक’ किंवा ‘बहिष्कृत भारत’ च्या माध्यमातून त्यांनी केलेली विधायक पत्रकारिता हीसुद्धा एक अत्यंत विलक्षण गोष्ट म्हणावी लागेल. विविध सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य परिवर्तनाची नवी दिशा देणारे ठरले. समानता प्रस्थापित करणे हे त्यांच्या राजकारणाचे मुख्य ध्येय होते.

समकालीन भारतीय राजकारणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची पुनर्तपासणी केली तर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे सुमारे साडेसहा दशकानंतरही त्यांच्या योग्यतेचा तर सोडाच पण त्यांच्या जवळपासही जाऊ शकणारा नेता निर्माण होऊ शकला नाही. यातच त्यांचे थोरपण सामावले आहे. निस्वार्थी प्रज्ञावंत ही त्यांची खरी ओळख. म्हणूनच पुन्हा पुन्हा त्यांचे स्मरण करण्याची गरज आहे. कारण आंबेडकर हा शब्द आशावादाची पेरणी करणारा उर्जास्त्रोत आहे. मूल्यात्मक राजकारणाचा आणि नैतिकतेचा अभाव असलेल्या काळात आंबेडकरांचे विचार समजून घेणे ही आपली गरज आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर लाखो लोकांचा समुदाय अभिवादनासाठी एकत्र येतो. यावर्षी तसे घडण्याची शक्यता नाही. पण तरीही जगभरातून या दिवशी ऑनलाइन अभिवादन केले जाईल.

आज आपण काळाच्या एका वेगळ्या वळणावर उभे आहोत. आपल्या सर्वांचेच सामाजिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य या काळाने हिरावून घेतले आहे. अशा एका संभ्रमित काळातसुद्धा काही युगपुरुष समाजाला दिशादर्शन करतात. प्रेरणा देतात. डॉ. आंबेडकर हे त्या अर्थानेही एक मोठे प्रेरणास्थान आहेत. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा विचार देऊन सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य बहाल करणार्‍या आणि माणूस म्हणून त्यांना मान्यता देणार्‍या डॉ.आंबेडकरांनी उपेक्षित समूहाला मुख्य प्रवाहात आणले. हे त्यांचे अलौकिक कार्य जगाच्या इतिहासात थोर म्हणायला हवे. म्हणूनच या महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -