Homeफिचर्ससारांशSane Guruji : जगाला प्रेम अर्पावे

Sane Guruji : जगाला प्रेम अर्पावे

Subscribe

अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतरभारती चळवळीचे प्रवर्तक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांची 125 वी जयंती नुकतीच झाली. त्यांच्या जीवनकार्याचे केलेले स्मरण. साने गुरुजी हे दोन शब्द जवळ जवळ आले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या शाळेतल्या प्रार्थनेचे स्वर घुमू लागतात, ‘खरा तो एकची धर्म’सारखी प्रार्थना, ‘आता उठवू सारे रान’, ‘बलसागर भारत होवो’सारखी स्फूर्तिगीते चालीसकट मनामध्ये रुंजी घालणार नाहीत असा मराठी माणूस विरळाच म्हणावा लागेल.

-नारायण गिरप

खरा तो एकचि धर्म।
जगाला प्रेम अर्पावे॥
जगी जे हीन अतिपतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे।
जगाला प्रेम अर्पावे॥

साने गुरुजी एक उत्तम दर्जाचे कवी आणि लेखक होते. त्याहून अधिक चांगले ते शिक्षक होते. मुलांचे साने गुरुजी असलेल्या या गुरुजींचे इतर पैलू आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. साने गुरुजी हे लढवय्ये होते. क्रांती सेनानी होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचे योगदान अमूल्य होतेच मात्र त्यापलीकडे गुरुजींनी शेतकर्‍यांसाठी, कामगारांसाठी नि दलितांसाठी दिलेले लढे जास्त निर्णायक ठरले होते. त्यातलाच एक लढा ‘पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा!’

विठोबा हा कष्टकर्‍यांचा देव, राबणार्‍यांचा पाठीराखा मात्र त्याकाळी मंदिरात अस्पृश्य मानल्या जाणार्‍यांना प्रवेश नव्हता. कित्येक शतके हे असे सुरू होते. जसजसे स्वातंत्र्य जवळ येऊ लागले तसतसे या मंदिर प्रवेशाविषयीची चर्चा वाढू लागली. पंढरपूरच्या मंदिरातील बडव्यांनी अस्पृश्यांच्या या प्रवेशाला अर्थातच जोरदार विरोध केला. त्यांच्या साथीला अर्थातच तत्कालीन सनातन मंडळी उभी होती. अशा वेळी स्वत: ब्राह्मण जातीतून आलेला एक ‘पांडुरंग’ गांधीवादी मार्गाने अस्पृश्यांच्या मानवी हक्कासाठी म्हणून सनातनी व्यवस्थेच्या विरोधात उभा ठाकलेला पाहायला मिळाला.

साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांनाही प्रवेश मिळावा म्हणून मोठे आंदोलन उभे केले. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच जानेवारी 1947 ते मे 1947 मध्ये हे आंदोलन करण्यात आले होते. 1 मे 1947 ला गुरुजींनी एकादशीच्या मुहूर्तावर चंद्रभागेच्या तीरी प्रयोपवेषणास सुरुवात केली. याला अपार विरोध झाला. स्वातंत्र्य तोंडावर असताना गुरुजी हा कसला अपशकुन करीत आहेत, समाजवादी लोकांना कशाला हवा मंदिर प्रवेश?

‘जावो साने भीमापार, नहीं खुलेगा विठ्ठलद्वार’ अशा घोषणांनी काळे झेंडे दाखवले गेले, पण सगळे जग तुमच्याविरुद्ध झाले तरी आपण अचल राहिले पाहिजे, या गांधीजींच्या शिकवणीची आठवण त्यांनी करून दिली. दादासाहेब मावळणकर व इतर नेत्यांनी बडव्यांची समज घालून मंदिर प्रवेशास ते तयार आहेत, असे प्रतिज्ञापत्र मिळविले. 10 मे 1947 ला गुरुजींनी रात्री साडेआठ वाजता उपोषण सोडले. या सत्याग्रहादरम्यान अजून 200 मंदिरे लोकांनी दलितांना खुली केली.

अनेक विहिरी त्यांच्यासाठी उघडल्या गेल्या. असे हे करूणहृदयी अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतरभारती चळवळीचे प्रवर्तक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी! त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 पालगड (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगड तर माध्यमिक शिक्षण दापोली येथे झाले. औध, पुणे येथे बीएची पदवी आणि मुंबई विद्यापीठाची एमएची पदवी त्यांनी संपादन केली. अमळनेर (जि. जळगाव) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलोशिप) घेऊन पुढे

तिथल्याच प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून ते कार्यरत राहिले. त्यांनी 1930-32 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नाशिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे ब्रिटिश सरकारविरुद्ध परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली.

दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालवणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमवणे, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य करणे इत्यादी कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे निर्मूलन झाले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. तिरुचिरापल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतरभारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला.

1948 साली पुण्यात त्यांनी ‘साधना’ हे साप्ताहिक सुरू केले. समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीस लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी हा त्यामागील हेतू होता. ‘विद्यार्थी’ मासिक, ‘काँग्रेस’ साप्ताहिक, ‘कर्तव्य’ सायंदैनिक अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

पुणे येथे 1947 साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इत्यादी साहित्य प्रकारात विपुल लेखन केले. त्यांची 80 च्या वर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके, चरित्रात्मक लेख आदींची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी बालकांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते.

‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे’

ही त्यांची लेखनामागील भूमिका होती. त्याचप्रमाणे मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने ‘श्यामची आई’ (1935) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय! ‘श्यामची आई’चे अर्धेअधिक यश प्रांजळ, सरळ आणि निश्चल आत्मनिवेदनात आहे.

मराठी कादंबरीवर झालेला गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतीचित्रे यांच्या मिलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती ‘श्यामची आई’ हीच सर्वार्थाने गांधीवादी व अजरामर ठरलेली कृती होय. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार 1954 साली मिळाला.

साने गुरुजींचे सारे जीवन माणसाने करुणाशील आणि संवेदनशील व्हावे यासाठीच होते. दगडात देव पाहता तसाच माणसातसुद्धा पाहा हीच त्यांची शिकवण होती. कायद्यापेक्षा हृद्य परिवर्तन होऊन सामाजिक प्रश्न सुटावेत हीच गुरुजींची अपेक्षा होती. साने गुरुजींच्या तरल पण क्रांतिकारक विचारांचे पु. ल. देशपांडे यांनी अत्यंत चपखल वर्णन केले आहे.

या जगात असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यात साने गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे, अजोड आहे. ‘ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा! तेचि पतित की,जे आखंडती प्रदेश साकल्याचा!’ केशवसुतांचा ‘नवा शिपाई’ मला साने गुरुजींमध्ये दिसला.

साने गुरुजी हे दोन शब्द जवळ जवळ आले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या शाळेतल्या प्रार्थनेचे स्वर घुमू लागतात. ‘खरा तो एकची धर्म’सारखी प्रार्थना, ‘आता उठवू सारे रान’, ‘बलसागर भारत होवो’सारखी स्फूर्तिगीते चालीसकट मनामध्ये रुंजी घालणार नाहीत असा मराठी माणूस विरळाच म्हणावा लागेल.

सभोवतालची सामाजिक-राजकीय परिस्थिती पाहून अत्यंत निराश मनःस्थितीत 11 जून 1950 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी मुंबई येथे त्यांनी जगाचा निरोप घेतला. आंतरभारती, साने गुरुजी कथामाला, राष्ट्र सेवादल, साने गुरुजी सेवापथक अशा अनेक संस्था त्यांच्या जीवनापासून व कार्यापासून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी चालत आहेत.

-(लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत.)