Homeफिचर्ससारांशSane Guruji : खरा तो एकची धर्म...

Sane Guruji : खरा तो एकची धर्म…

Subscribe

आज हे सबंध जग शांतता, सुख, समाधान आणि आनंददायी जीवन इच्छिते. हे सर्वकाही मिळवून देण्याचे सामर्थ्य खरंतर महापुरुषांच्या सर्वकल्याणकारी अशा महान विचारांत असल्याचे अभ्यासाअंती आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ या सुप्रसिद्ध प्रार्थनेतील या ओळी जगण्याचे अनेक आयाम स्पष्ट करतात. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिरंतन मतितार्थ आणि दिव्यत्व या ओळींच्या अक्षरांत ओतप्रोत भरलेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशा महान विचारवंतांचा विचाररूपी सहवास लाभणे ही आपल्या पिढीकरिता खरोखरच भाग्यशाली बाब आहे.

-अमोल पाटील

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींनी आपल्या या दिव्य ओळीमधून जगाला महान शिकवण दिलेली आहे. सबंध जगाला जेव्हा या ओळीचा गर्भितार्थ समजेल तेव्हा जगातील बहुतांश समस्यांचे निराकरण होऊन हे जग नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. दिव्य, प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वे ही आपल्या दिव्य वाणी व लेखणीच्या माध्यमातून अखिल जगाला सर्वोदयी कल्याणाचा मार्ग दाखवित असतात.

- Advertisement -

त्यांच्या त्या कल्याणकारी मार्गाचा आवलंब करून जीवन जगल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनाचे सोने होत असते. जे पेराल ते उगवते हा निसर्गाचा प्रसिद्ध नियम आहे. जर आपण या महापुरुषांच्या विचार सहवासात रमलो तर निश्चितच त्यांच्या अमोघ विचारांची पेरणी आपल्या मनावर निरंतर होत राहून त्यातून कल्याणकारी फलनिष्पत्ती तुमच्या माझ्या हाती लागत असते.

आज हे सबंध जग शांतता, सुख, समाधान आणि आनंददायी जीवन इच्छिते. हे सर्वकाही मिळवून देण्याचे सामर्थ्य खरे तर महापुरुषांच्या सर्वकल्याणकारी अशा महान विचारांत असल्याचे अभ्यासाअंती आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या सुप्रसिद्ध प्रार्थनेतील या ओळी जगण्याचे अनेक आयाम स्पष्ट करतात. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिरंतन मतितार्थ आणि दिव्यत्व या ओळींच्या अक्षरांत ओतप्रोत भरलेले असल्याचे आपल्याला पहायला मिळते.

- Advertisement -

अशा महान विचारवंतांचा विचाररूपी सहवास लाभणे हे आपल्या सर्व पिढीकरिता खरोखर भाग्यशाली बाब आहे. संपूर्ण जगात आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे कौतुक होण्याचे व त्याबद्दल आदर व्यक्त होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील प्रबळ कारण जर कोणते असेल तर ते हेच असावे की, या भारतभूमीत अनेक महान विचारवंत व तत्त्वज्ञानी, थोर महापुरूष जन्माला आले. त्यांनी आपल्या सखोल चिंतनातून समाजाला समृद्ध वैचारिक अधिष्ठान मिळवून दिल्यामुळे येथील समाज हा सृजनशील व आनंददायी जीवन जगू शकला व ही प्रक्रिया आजही निरंतर सुरूच आहे.

असे आपल्या वाचनात व ऐकण्यात नेहमी येते की ‘जो समाज आपला इतिहास विसरून जातो, तो कधीही आपले भविष्य निर्माण करू शकत नाही’, हे खरे आहे. इतिहास आपल्याला सर्वांगाने शहाणं करण्यात मोलाचे योगदान देत असतो. अंगी शहाणपण नसेल तर वर्तमानातही आपला टिकाव लागणे मुश्कील होऊन जाते, तिथं भविष्य निर्माण करण्याचा प्रश्न तर दूर-दूरपर्यंत उद्भवण्याची शक्यताही वर्तवणे कठीणच म्हणावे लागेल. इतिहासाचे स्मरण तेवत ठेऊन त्यांच्या तेजोमय प्रकाश किरणांच्या सानिध्यात सक्षम होऊन भविष्याकडे झेप घेणे हे कधीही हितावह असते. अशी झेप मनाला आनंद मिळवून देणारी ठरते.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज अशा थोर संतांच्या दिव्य अभंगवाणीतून जगण्याचे चिरंतन मर्म सापडते. संत महात्मा बसवेश्वरांची थोर वचने आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतात. या संत वाङ्मयाच्या अभ्यासाने आपला दृष्टिकोन बदलून तो विशाल मानवतावादी दृष्टिकोन होतो.

हेच या महान संतांचे व त्यांच्या दिव्य विचारांचे यश आहे. थोर तत्वज्ञ व विचारवंत सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या जीवनविद्येच्या माध्यमातून अखिल विश्वाचं भलं चिंतण्यासाठी सांगितलेली विश्वप्रार्थना असेल किंवा त्यांचे अनेकानेक विचाररूपी अमृत तुषार असतील हे सर्व माणसाला माणूस म्हणून समृद्ध करणारे आयाम आहेत, विशाल मानवतावादी दृष्टिकोन निर्मितीचे ते निर्मळ झरे आहेत.

लक्षात असू द्या की, जेव्हा आपण दिव्यत्वाच्या सहवासात असतो तेव्हा निश्चितच आपण अधिक विशाल अंगाने विचारप्रवण होतो. भेदाभेदाचे सर्व मानवनिर्मित नियम तिथं नकळत गळून पडतात. अखिल मानव समूहाच्या उन्नतीचे मार्ग स्फुरू लागतात आणि ते कृतीत आणण्यासाठी मनाची धडपड सुरू होते.

आजच्या समकालीन परिस्थितीत अशा थोर विचारांची फार गरज आहे हे खरे. आज अशा थोर विचारांच्या सानिध्यात रमणारी माणसं ही तुलनेने कमी पहायला मिळतात व क्षणिक मनोरंजनाच्या साधनांकडे आकर्षित होत असलेली तरुण पिढी तुलनेने अधिक पहायला मिळते. आजची ही तरुण पिढी बहुतांशपणे अधिक हिंसक व संवेदनाहिन आहे की काय, असा प्रश्न पडावा अशा अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडतात. हे सारे विचार प्रदूषणाचेच द्योतक म्हणावे लागेल.

हा तरुणांचा, युवांचा सामर्थ्यवंत महासागर जर सुविचारांच्या सानिध्यात येऊ लागला, बहरू लागला तर सबंध जगाचं कोटकल्याण होईल. जगाच्या पाठीवर विचार करून जीवन जगणारा माणूस वैचारिक म्हणूनच नावारूपाला येतो तर विचारशून्य जीवन जगणारी माणसं अविचारी म्हणून ओळखली जातात. अशा अविचारी माणसांपासूनच या जगाला आणि जगातील सर्वोदयी मानव समूहाला धोका अधिक असल्याचे कुठलाही सुज्ञ माणूस मान्य करेल.

अविचारी माणूस आपल्या ठिकाणी असलेल्या चांगल्या विचारांच्या वैचारिक बैठकीअभावी जगातील कुविचारांना बळी पडण्याचा संभव अधिक असतो. अंतिमत: अशी मंडळी समाजातील संधीसाधू व धूर्तजनांच्या अमानवी चक्रात ओढली जातात आणि स्वत:सह कुटुंबाचे व समाजाचे नुकसान करून घेतात. यांच्या अज्ञानाचा फायदा घेण्यासाठी पावलोपावली अमानवी शक्ती सावजाची वाट पाहत बसलेले असतातच. ते यांची अलगद शिकार करतात.

नेमकी हीच बाब हेरून प्रतिभावंतांनी सामान्यांना जागं करण्याचे काम केलं. समकालीन साधनांचा वापर करत आपल्या अमोघ वाणी व लेखणीद्वारे ते सामान्य लोकांना शहाणं करत लोकशिक्षक झाले. अशा प्रतिभावंतांच्या चिरंतन विचारांस अमरत्व असते. त्यांचे विचार काळाच्या प्रत्येक कसोटीवर खरे ठरत माणसाला गुंतागुंतीच्या परिस्थितीतून बाहेर येण्यास सहाय्यभूत ठरतात.

आज जग भौतिक अंगाने समृद्ध झाले, पण हेच भौतिक अंगाने समृद्ध झालेले जग मानसिक, भावनिक अंगाने मात्र स्वत:स तुलनेने तितके समृद्ध करू शकले नाही. तसे होण्यास अनेक कारणे असली तरी त्यातील प्रबळ कारण व्यक्ती जीवनात आलेले व व्यापलेले यांत्रिकीकरण हे निश्चितच आहे. स्वावलंबी होण्यापेक्षा परावलंबनाकडे अधिक नेणारे यांत्रिकीकरण हे खरे तर धोकादायकच.

ज्या गोष्टी जगण्यासाठीची मदत म्हणून पुढे आल्या किंवा शोधल्या गेल्या त्याच गोष्टी आज नकळतपणे मूळ जगण्याचा आनंद गिळंकृत करू पाहत आहेत. एकमेकांचा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मदत म्हणून मानव जीवनात आलेले मोबाईल हे साधन आज अनेकांचं जगणं होऊन बसलेलं आहे. नव्हे तर कित्येकाचं जगणंच आणि त्यातील आनंद हे त्याने गिळंकृत केलेलं आहे, असे म्हटल्यास वावगं ठरू नये.

या साधनांची मर्यादा ओळखण्याची व मूळ जीवनाकडे आपल्याच स्वदृष्टीने परत न्याहाळण्याची ही वेळ आहे. त्यासाठी आपण अधिकाधिक वैचारिक असणे अपरिहार्य. वैचारिक होण्यासाठी मनातील अविचारपणा त्यागून शांत, निवांत व एकांत समयी थोरांचे विचार स्मरण्याची आवश्यकता आहे. त्यातून अनेक जगण्याचे मर्म उलगडत जाऊन क्षणिक साधनांची मर्यादा लक्षात येत जाते. विचारांच्या श्रीमंतीचे दर्शन घडते.

सबंध जग हे आपल्याला ज्ञान, आनंद आणि सामर्थ्याने भरलेले प्रेमरूपी भांडार असल्याची भावना निर्माण होऊन प्रेमभाव, बंधूभाव उदयाला येतो. वाणी व व्यवहारातून प्रेमाचे आदानप्रदान होते. जे पेराल ते उगवेल या निसर्ग नियमाप्रमाणे सबंध जगाकडून प्रेमाची परतफेड प्रेमानेच होऊन जगणं आनंददायी होतं. तेव्हा साने गुरुजींच्या गीताच्या ओळी मनात चिरंतन घर करून राहतात व गुरुजींनी केलेल्या खर्‍या धर्माची व्याख्या समजते. ज्याची आज सबंध जगाला अत्यंत गरज आहे.

आनंददायी प्रेमाची उधळण
ही खर्‍या धर्माची शिकवण
आनंददायी जगणं होईल
साधता आनंदाचं रूजवण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -