– आशिष निनगुरकर
‘श्यामची आई’ चित्रपटाची निर्मिती जेव्हा आचार्य अत्रेंनी केली तेव्हा थेट सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं.आचार्य अत्रे यांनी १९५३ साली ‘श्यामची आई’ चित्रपट केला होता. आता साने गुरुजी यांच्या १९३३ साली आलेल्या त्याच साहित्यकृतीवर बेतलेला नवा ‘श्यामची आई’ हा सिनेमा सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केला आहे. याची पटकथा सुनील सुकथनकर यांनी लिहिली आहे. त्यामुळे ‘श्यामची आई’ सिनेमा २०२३ मध्ये कोणत्या नव्या रूपात पाहायला मिळेल याची उत्कंठा शिगेला होती. मुळात ‘श्यामची आई’ हे पुस्तक आजही तितकंच आवडीने वाचलं जातं. पुस्तकातली प्रकरणं एकदा वाचली की विसरणं अशक्य.
साने गुरुजी जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देत असतात. तिथेच तुरुंगात त्यांची भेट विनोबा भावेंशी होते. दोघेही समविचारी व्यक्ती एकत्र येतात. पुढे साने गुरुजींची नाशिकच्या कोठडीत रवानगी केली जाते आणि तिथे जन्माला येतं श्यामची आई. सिनेमाची सुरुवात प्रेक्षकांना बांधून ठेवते, परंतु हळूहळू सिनेमा खूप संथ होतो. ‘श्यामची आई’ हा सिनेमा पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण त्यामुळे सिनेमाचा परिणाम आणि गांभीर्य टिकून राहतं, परंतु सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट आजच्या काळाशी सुसंगत नाही. अनेक प्रसंग एडिट करता आले असते. उदा. सावकार घरी येतो तो प्रसंग, श्यामचे लहानपणीचे काही प्रसंग. असे अनेक सीन्स थोडे कमी ठेवता आले असते तर सिनेमा आटोपशीर झाला असता. याशिवाय साने गुरुजींचं पुढचं आयुष्य कसं होतं याचं चित्रण बघायला मिळालं असतं तर रंगत अजून वाढली असती. सुजय डहाकेंचं दिग्दर्शन कमाल आहे, पण सिनेमा आणखीन बांधून ठेवणारा हवा होता असं वाटतं.
‘श्यामची आई’ शेवटपर्यंत आपण पाहतो त्याचं एक मुख्य कारण म्हणजे कलाकारांचा अभिनय. गौरी देशपांडेने आईच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय केलाय. गौरीचा हा पहिला मराठी सिनेमा आहे. पहिल्याच सिनेमात गौरीने सुंदर काम केलंय. आईचा धाक, लेकरांसाठीची धडपड, कुटुंबासाठी तळमळ, हलाखीत जगूनही जपलेला स्वाभिमान अशा अनेक भावना गौरीने प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत. छोटा श्याम झालेला बालकलाकार शर्व गाडगीळने गोड अभिनय केलाय.
निम्म्याहून जास्त सिनेमात शर्व दिसतो. शर्वचा अभिनय पाहून आपल्या चेहर्यावर आनंद झळकतो, याशिवाय डोळ्यांत पाणीही येतं. मुळशी पॅटर्नमध्ये राहुल्याच्या भूमिकेत पाहिलेला ओम भुतकरने शांत, मितभाषी साने गुरुजी संयतपणे साकारले आहेत. ओमने साने गुरुजींच्या भाषेचा पकडलेला लहेजा, डोळ्यांत असलेली आईची आठवण प्रेक्षक म्हणून आपल्यालाही व्याकूळ करते. ओमच्या वाट्याला आणखी प्रसंग जर असते तर गंमत आणखी वाढली असती असं वाटत राहतं. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. एकूणच पुस्तकात वाचलेली ‘श्यामची आई’ सिनेमा माध्यमात आपल्या मनावर अनेक सुखाचे क्षण देऊ पाहतेय.
अत्रे यांच्या चित्रपटाशी याची तुलना होणं क्रमप्राप्त आहे, परंतु सुजय आणि सुनील यांचा हा चित्रपट केवळ पुस्तकाचं चित्ररूप पडद्यावर मांडत नाही तर साने गुरुजी होण्यापर्यंतचं श्यामचं भावविश्व मांडण्याचा प्रयत्न करतो. आईचे संस्कार आणि वडिलांच्या देशभक्तीचा प्रभाव श्यामवर कसा, कधी आणि का होत गेला याचं चित्र तो उभं करतो. आईचा आणि तिच्या संस्कारांचा महिमा हे या कथानकाचं मध्यवर्ती सूत्र असलं तरी वडिलांची शिकवण, त्यांचा त्यागही सिनेमात तितक्याच ठळकपणे समोर येतो.
गौरी देशपांडे हिने ‘श्यामच्या आई’ची प्रतिमा नव्यानं उजळून टाकली आहे. अत्रे यांच्या चित्रपटात अभिनेत्री वनमाला यांनी साकारलेल्या आईपेक्षा वेगळ्या पद्धतीने गौरीनं ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तिला नवे आयाम देण्याचा प्रयत्न गौरीनं केला आहे. लहानग्या श्यामच्या भूमिकेत शर्व गाडगीळ या बालकलाकारानं पडदा व्यापून टाकला आहे. सर्वाधिक ‘स्क्रीन टाईम’ त्याच्या वाट्याला आलेला असतानाही तो कुठे कमी पडलेला नाही. त्याची समज आणि भूमिकेत शिरण्याचं कौशल्य कौतुकास्पद आहे. या दोन्ही भूमिकांबरोबरच लक्षवेधी ठरतो तो वडिलांच्या भूमिकेतील संदीप पाठक.
एका प्रसंगात हताश झालेले वडील श्यामला म्हणतात की, मला आत्महत्या करावीशी वाटतेय! या प्रसंगात संदीपची देहबोली आणि मुद्राभिनय हृदय पिळवटून टाकणारा आहे. अभिनेता ओम भुतकर हा साने गुरुजी यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होऊन प्रेक्षकांना आपलंस करून घेतो. त्याच्या तोंडी असलेले ‘नो रूरल कॅन हँडल नॉन व्हायलन्स’ हे शब्द अचूक प्रभाव टाकतात. विनोबा भावे यांची कारावासात भेट, गीता प्रवचनांचं लिखाण, जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकाचं मराठी भाषांतर… हा प्रवास ‘श्यामची आई’च्या लिखाणापर्यंत येऊन पोहचतो.
संस्कारासोबतच हा चित्रपट काही कौटुंबिक शोकांतिकादेखील दाखवतो. संकलक बी. महंतेश्वर याने उत्कृष्ट काम केलं आहे. सिनेमॅट्रोग्राफर विजय मिश्रा याने रेखीवपणे सिनेमातील प्रत्येक फ्रेम चितारली आहे. सिनेमाच्या सुरुवातीला डोळ्यांना थोडा त्रास होतो. कारण भूतकाळातील प्रसंग अधिक गडद आणि कमी प्रकाशातील आहेत. सिनेमा जसजसा पुढे सरकतो तसा आपल्या डोळ्यांना कृष्णधवल पाहण्याची सवय होऊन जाते आणि अनेक गोष्टी नजरेस पडतात. सिनेमाचं प्रोडक्शन डिझाईन, नेपथ्य या बाबींवर बारकाईनं काम करण्यात आलं आहे.
जुना वाडा, कौलारू घर, तुळशी वृंदावन, घरातील मातीची, नारळाच्या करवंटीची भांडी आपलं लक्ष वेधून घेतात. मूळ कथानकाला कुठेही धक्का न लावता पुण्यातील ‘प्लेग’ची दाहकता, स्वातंत्र्य चळवळ आदी बाबी सिनेमात दिसतात. सारंग साठये, तरुण वयातील श्याम-मयूर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर, उर्मिला जगताप, दिशा केतकर यांनी त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे उभ्या केल्या आहेत. साकेत कानेटकर याने केलेला बॅकग्राऊंड स्क्रोअर प्रसंगांना जिवंत करतो, तर अशोक पत्की आणि महेश काळे यांचं पार्श्वसंगीत सिनेमा सुरमयी बनवतो. ‘श्यामची आई’ सिनेमाने आपण अंतर्मुख, भावविकल होऊन स्वतःमध्ये डोकावू लागतो, म्हणूनच हा चित्रपट एकदा तरी नक्की बघावा असा आहे.
-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)