– आशिष निनगुरकर
दिग्दर्शक सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सवच म्हणावा लागेल. खाडिलकरांच्या ११४ वर्षे जुन्या अभिजात नाटकावरून प्रेरित ‘संगीत मानापमान’ हा सिनेमा ‘कट्यार काळजात घुसली’ तसेच ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांचा समृद्ध वारसा पुढे नेत आहे.
नयनरम्य दृश्य, अस्सल संगीतमय कथाकथन आणि एकापेक्षा एक कलाकार आश्वासन देतात की हा सिनेमा नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव देणारा आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ चित्रपटात सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांच्यासह सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
‘कट्यार काळजात घुसली’नंतर आता अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा सर्वांना परिचित असून कृष्णाजी खाडिलकर आणि गोविंदराव टेंबे यांची अजरामर नाट्यकृती ‘संगीत मानापमान’ रंगभूमीवर गाजले असून बालगंधर्व यांनीदेखील या कलाकृतीत काम केले होते. अशी गाजलेली कलाकृती चित्रपटाच्या रूपाने समोर येत असताना लोकांची मोठी अपेक्षा या चित्रपटाकडून होती. सिनेमा बघताना हा सिनेमा नितळ आनंदासोबत खूप काही देऊन जातो. त्यामुळे एक वेगळीच अनुभूती या सिनेमाच्या निमित्ताने मिळणार आहे.
संग्रामपूर राज्यातील ज्येष्ठ सेनापती (शैलेश दातार) हे त्यांच्या जागी उपासेनापती चंद्रविलासची (सुमीत राघवन) सेनापती पदावर निवड करण्याचे जाहीर करतात. सेनापतींची मुलगी भामिनी (वैदेही परशुरामी) आणि चंद्रविलास हे दोघे लहानपणापासूनचे मैत्र. महत्त्वाकांक्षी अन् काहीसा स्वार्थी असलेला चंद्रविलास सेनापतीपद मिळवून भामिनीशी लग्न करण्याची स्वप्न रंगवतो, तर दुसरीकडे संग्रामपूरमधील एक सामान्य धैर्यधर (सुबोध भावे) पुढे त्याचं धाडस सिद्ध करून संग्रामपूरच्या सैन्यात भरती होतो.
ज्येष्ठ सेनापती धैर्यधराच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतात. भामिनीच्या वाढदिवशी ते धैर्यधराच्या आईसमोर भामिनी आणि धैर्यधराच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतात, पण या प्रस्तावाला भामिनी धुडकावून लावत धैर्यधराच्या कुटुंबाचा अपमान करते, तर सूडाच्या भावनेने चंद्रविलास भामिनीच्या मनात धैर्यधराबद्दल विष कालवतो. यानंतरचे मानापमान म्हणजे ‘संगीत मानापमान.’
या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, संगीत, पटकथा, कॅमेरा वर्क ही जमेची बाजू असून सुरुवातीला पात्रांची ओळख करून देण्यासाठी वापरलेली गाणी ही फारच जमून आली आहेत. राजवाड्याचा भव्यदिव्य सेट, बाजारपेठ अशा बाबींवरही बारकाईने काम केलंय. या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी अनेक उणिवादेखील या सिनेमात आहेत. यातील सर्वात मोठी निराशा करणारी बाब म्हणजे जुन्या गाण्यांची बदललेली चाल. यासोबतच पटकथेत असलेल्या काही उणिवांमुळे अनेक सीन्स नाटकासारखे प्रभावशाली होत नाहीत तसेच क्लायमॅक्सदेखील विनाकारण ताणल्यासारखाच वाटतो. हा सिनेमा एक वेगळा अनुभव देतो.
दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी चित्रपटासाठी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी जसे शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे यांनी आपला आवाज दिला आहे.
अभिमानाची गोष्ट म्हणजे यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. अपेक्षा होती त्याप्रमाणे सुबोध भावेने घडवलेला हा चित्रपट उत्तम लेखन, दिग्दर्शन, संगीत, गायन, अभिनय, उत्तम तांत्रिक बाजू यांनी सजलेला आहेच, पण त्याहूनही मला जाणवलेली आनंदाची बाब ही आहे की मराठी चित्रपटसृष्टीला आधुनिक काळातला एक खराखुरा ‘म्युझिकल’ चित्रपट मिळाला आहे. शंकर-एहसान-लॉय यांनी वैभवशाली भारतीय संगीत, नाट्यसंगीत आणि आधुनिक जागतिक संगीत यांचा अप्रतिम मेळ साधलाय. यासंदर्भात मित्र आदित्य ओकने अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे.
उत्तम संवाद असलेले प्रसंग आणि उत्तम जागी येणारी सुंदर गाणी आहेतच, पण संवाद आणि गाणी यांच्या मधला प्रकार असलेली ‘संवादगीतं’सुद्धा आहेत. हा प्रकार करणं सोपं नसतं. या चित्रपटात हा प्रकार अगदी अस्खलितपणे मध्ये अनुभवायला मिळाला. त्यामुळे गाणी आणि संवाद बेमालूमपणे एकजीव झाले आहेत. गीतकार समीर सामंतने वैविध्यपूर्ण गीतलेखनातून जीव ओतला आहे. चित्रपट अनुभवाला जास्तीत जास्त जिवंत करणारी ध्वनिलेखनाची बाजू मंदार कमलापूरकरने अफ़लातूनपणे सांभाळली आहे.
कथाविस्तार आणि लेखनात सांभाळलेली आणखी एक सुंदर बाजू अशी आहे की मानापमान ही जशी भामिनी-धैर्यधर-चंद्रविलास यांची प्रेमकथा आहे तशीच ती एक आई आणि मुलगा, वडील आणि मुलगी यांच्यातल्या प्रेमाची हृद्य कथा होऊनसुद्धा पुढे आली आहे.
सुबोधच्या अभिनयाने रंगलेली आणखी एक उत्तम व्यक्तिरेखा पाहायला मिळाली. वैदेही परशुरामीने साकारलेला भामिनी ते वनमाला हा प्रवास अगदी खराखुरा वाटणारा आहे. अष्टपैलू अभिनेता मित्र सुमीत राघवनचा अभिनय पाहून स्तिमित व्हायला झालं. साराभाई, हॅम्लेट आणि आता चंद्रविलास! काय रेंज आहे. नीना कुलकर्णी यांनी साकारलेल्या अतिशय गोड अणि समर्थ व्यक्तिरेखेवर केवळ प्रेमच करता येऊ शकतं.
अभिनेता शैलेश दातार यांच्या अभिनयातून उमटलेलं सेनापती आणि पिता यांचं मिश्रण लाजवाब आहे. त्याच्या नजरेतून ते सतत दिसत राहतं. अनेक उत्तम गायकांप्रमाणेच मानापमानसाठी काम केलेल्या कलाकारांची यादी मोठी आहे. दक्षिणेतल्या बाहुबलीने जसं जगभर राज्य केलं, तसं या चित्रपटानेसुद्धा केलं तर आश्चर्य वाटायला नको. त्याची सुरुवात रसिक म्हणून आपणच करायला हवी. चित्रपटगृहात जाऊन ‘संगीत मानापमान’ चित्रपट नक्कीच आणि आवर्जून पाहा, उत्तम अनुभूती मिळेल.
-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)