Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश भाजपची जळजळ!

भाजपची जळजळ!

नालासोपार्‍यातील एका कार्यक्रमात सीएएवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख तर केला, पण बापबिपही काढला. आपण कोणाविषयी काय बोलत आहोत, याचे काही तारतम्य शेलारांना नव्हते. यावरून मोठा राडा झाल्यानंतर माफी मागण्याचे नेहमीचे नाटक पार पडले. पण, या राज्यातील जनता सगळे बघत आहे. आधी गुलाबी असलेला भाजपचा चेहरा सत्तेविना कसा काळा पडत चालला आहे, हे दिसत आहे. राजकारणातील नीतिमत्तेचे धडे देत बाकीच्यांपेक्षा आपण वेगळे असल्याचा कायम दावा करणारी भाजप सत्ता गेल्यावर इतकी हताश व्हावी, हे त्यांच्या पूर्वलौकिकास शोभत नाही.

Related Story

- Advertisement -

नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?,
– आशिष शेलार
राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास कोणी कोणाचा विश्वासघात केला हे स्पष्ट होईल – चंद्रकांत पाटील

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतरचे भाजपचे राज्यातील हे दोन प्रमुख नेते काय बोलतात पाहा. उद्धव ठाकरे सरकारला 100 दिवस झाल्यानंतरही महाराष्ट्रात अजून आपले सरकार नाही, हे भाजपच्या नेत्यांना सहन झालेले नाही. आपल्या अस्तित्वाची चिंता करण्याऐवजी ते गेले शंभर दिवस महाविकास आघाडीचे सरकार कसे सत्ता चालवायला लायक नाही, याचे उठता बसता पाढे वाचत बसले आहेत. सर्वाधिक आमदार निवडून येऊनही आज आपण सत्तेवर नाही, हे भाजपच्या पचनी पडणे कठीण झाले आहे. 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यांनाही आपण आता सत्तेवर नाही, हे बरेच महिने सहन होत नव्हते. सलग 15 वर्षे सत्ता भोगल्यानंतर ती आता आपल्या हातात नाही, यामुळे जीव कासावीस होणे स्वाभाविक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या देहबोलीतून सत्तेविना जीव गुदमरल्याचे दिसत होते. पण, ती तडफड होती. मात्र सत्तेविना आता भाजपचे जे काही चालू आहे ती साफ जळजळ आहे. ती जशी शेलार, पाटील यांच्या वागण्या बोलण्यातून दिसते, तशीच ती फडणवीसांच्या चेहर्‍यावरून दिसून येते. आपल्याशिवाय आणखी कोणी सत्ता चालवू शकत नाही, ही जी काही घमेंड आहे ती लोकशाहीत चालत नाही. सुपातले कधी तरी जात्यात जाणार आहेत, हे मान्य केले की, पाय जमिनीवर राहतात. भाजपचे नेते हे मान्य करत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे.

- Advertisement -

नालासोपार्‍यातील एका कार्यक्रमात सीएएवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख तर केला, पण बापबिपही काढला. आपण कोणाविषयी काय बोलत आहोत, याचे काही तारतम्य शेलारांना नव्हते. यावरून मोठा राडा झाल्यानंतर माफी मागण्याचे नेहमीचे नाटक पार पडले. पण, या राज्यातील जनता सगळे बघत आहे. आधी गुलाबी असलेला भाजपचा चेहरा सत्तेविना कसा काळा पडत चालला आहे, हे दिसत आहे. राजकारणातील नीतिमत्तेचे धडे देत बाकीच्यांपेक्षा आपण वेगळे असल्याचा कायम दावा करणारी भाजप सत्ता गेल्यावर इतकी हताश व्हावी, हे त्यांच्या पूर्वलौकिकास शोभत नाही.
‘सत्ता का खेल चलेगा,
सरकारें आएंगी, जाएंगी,
पार्टीयां बनेंगी, बिगडेंगी,
मगर ये देश रहना चाहिए,
इसका लोकतंत्र अमर रहना चाहिए’
भाजपचे केंद्रातले 13 दिवसांचे सरकार पडल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत केलेल्या भाषणात मांडलेले हे विचार देशाच्या इतिहासातील अजरामर असे आहेत. एका पंतप्रधानाने खुर्ची सोडल्यानंतर देशाला उद्देशून केलेले हे मनोगत आजही आपण पाहतो तेव्हा तनमन सुन्न होऊन जाते. सत्ता गेल्याचे दुःख व्यक्त करण्याऐवजी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, असे वाजपेयी सांगतात तेव्हा ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. ते आज आपल्यात शरीराने नसतील, पण त्यांनी भारतीय राजकारणाला ज्या उंचीवर नेऊन ठेवले त्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे ठरतील. म्हणूनच वाजपेयी यांची भाजप आणि मोदींची भाजप यात मोठा फरक आहे. या भाजपला लोकशाही नको आहे. आम्ही म्हणू ती दिशा, असा सत्तेत राहून हुकूमशाही कारभार करायचा आहे आणि तो मिळत नसेल तर समोरच्यांचे बाप काढायला हे मोकळे आहेत. अरे, कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा विडा चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या साथीने उचलला होता. एकदा का विरोधी पक्षांना संपवले की, मग सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही नेस्तनाबूत करून टाकायचे, हा भाजपचा डाव होता. पण तो फसल्याने वैफल्यग्रस्त होऊन पाटील आता भरकटल्यासारखे बोलत सुटले आहेत. ‘काँग्रेस अगदी ठरवून शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेत आहे. त्यात तयार होणारी पोकळी त्यांना मनसेच्या रूपाने भरून काढायची आहे. काँग्रेसने शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेणे म्हणजे हळूहळू शर्ट आणि पॅन्ट उतरवण्यासारखे आहे’, पाटील यांचे हे उद्गगार म्हणजे चिखलातून उगवणार्‍या कमळाचा चिखल करण्यासारखे आहे. पार्टी विथ डिफरन्सच्या बाता करणार्‍यांच्या मेंदूत बिघाड होऊन सत्तेबाहेर गेल्याची जळजळ त्यांच्या तोंडून बाहेर पडत आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हे. आपण देशात इतरांपेक्षा वेगळे का आहोत, ते या संस्कृतीत आहे. आतापर्यंत भाजपचे हेच नेते बिहारच्या नावाने बोटे मोडत होते. पण नितीश कुमार यांनी बिमारू राज्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना संस्कृतीचे धडे नव्याने गिरवायचे असतील तर त्यांनी बिहारला नक्की भेट द्यावी. मुख्य म्हणजे युतीचे सरकार चालवताना आपल्या सोबतच्या मित्रपक्षाचा कसा मान राखायचा असतो, याचेसुद्धा त्यांना प्रशिक्षण मिळेल. कारण रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीत धडे गिरवणार्‍यांनी याआधी कुणाचे बाप आणि पॅन्ट काढली नव्हती.

- Advertisement -

सत्ता ही भल्याभल्यांना नादावते, झिंग आणते. त्यामुळे पाच वर्षांनी सत्ता बदलली की, बरी असते. सत्ताधार्‍यांना आपण या देशाचे मालक असल्याचे वाटत नाही.

भाकरी परतली नाही तर ती करपते, तसा हा प्रकार आहे. पंधरा वर्षे सत्ता हवी तशी ओरपून झाल्यामुळेच अजित पवारांना धरणात पाणी नाही तर मुतू का… असे बोलण्याची दुर्बुद्धी झाली होती आणि मग लोकांनी त्यांना पराभवाचे पाणी पाजून विरोधी पक्षात बसवले. सत्ताधारी असताना आणि नसताना त्यांच्या आणि आघाडी सरकारमधील नेत्यांच्या देहबोली जवळून बघायला मिळाल्या आहेत. पाच वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यावर काय अवस्था होते त्याचे चटके बसल्यावर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शहाणे झालेले दिसत आहेत. हा शहाणपणा त्यांना न बोलता शिकवला तो शरद पवार यांनी. अजित पवार आज मी काही बोलणार नाही, असे वारंवार बोलतात ते सत्तेविना आलेल्या शहाणपणातूनच आलेले आहे.

खरेतर शिवसेना असो किंवा भाजप यांना बरीच वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. एक आमदारापासून दोघांची सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षात राहूनही सर्वसामान्यांचा एक भाग कसा व्हायचा, यांचे बाळकडू त्यांना मिळालेले आहे. मुख्य म्हणजे एक ठोस भूमिका असलेले हे केडर बेस पक्ष आहेत. या घटकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा त्यांच्या विचारधारेची, कामांची मुळे खोलवर गेली आहेत. अशा पक्षांना सत्तेविना भीती बाळगायचे काहीच कारण नाही. भाजपच्या नेत्यांनी आधी ही गोष्ट आपल्या मनवर बिंबवली पाहिजे. जनाधार असणे ही काही निवडणुकांपुरती मर्यादित असलेली बाब नाही. लाखो कार्यकर्ते आपल्या निस्वार्थी कामांनी जनाधार घडवत असतात. त्यावर पक्ष उभा राहत असतो. शिवसेनेप्रमाणे भाजपही अशा भक्कम पायावर उभा आहे. मात्र भाजप नेत्यांनी कारण नसताना आपली जळजळ उघड करत आपला पाया खिळखिळा करू नये.

- Advertisement -