घरफिचर्ससारांशप्रेमाची परिभाषा सांगणारा ‘सरी’

प्रेमाची परिभाषा सांगणारा ‘सरी’

Subscribe

‘सरी’ चित्रपटातून प्रेमाचा अनोखा त्रिकोण पडद्यावर अनोखं नाट्य किंबहुना ‘मेलोड्रामा’ मांडणारा असला तरी तो बघण्याजोगा नक्कीच आहे. ‘आयुष्यात कधीही काहीही घडू शकतं’ याची प्रचिती हा सिनेमा पाहून नक्कीच येते. त्यामुळे ‘सरी’ एकदा बघायला हरकत नाही. प्रेमाची परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे.

– आशिष निनगुरकर

आयुष्य कधीतरी एका अशा वळणावर येते, जिथे पुढे काय होणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच म्हणतात की, ‘लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स’. याच आशयाचा ‘सरी’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत.

- Advertisement -

कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले असून ‘सरी’ चित्रपटाच्या निमित्ताने ते प्रथमच मराठीत पदार्पण करीत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी दिले आहे. पडद्यावर पोरकट शोकांतिका पाहून स्वतःच्या मनाचं सांत्वन करीत आपण प्रेक्षागृहाच्या अंधारातून बाहेर पडतो.

एखाद्याच्या-एखादीच्या आयुष्यात इतकं दुःख कसं काय असू शकतं? लेखकानं सर्व शोकांतिका त्याच्या-तिच्या माथ्यावरच का मारली? ट्रॅजिडी झाली खरी, पण नेमकं लेखक काय सांगू, दाखवू पाहतोय? असे काही प्रश्न ‘सरी’ पाहून पडतात. सिनेमाचं कथाबीज उत्कंठावर्धक, रंजक आहे, पण या कथेवर पटकथा आणि सिनेमाचा डोलारा उभा करताना लेखक-दिग्दर्शकानं अपरिपक्व पट मांडला आहे. सिनेमाची पटकथा विशिष्ट टप्प्यानंतर ‘प्रेडिक्टेबल’ होऊन जाते. परिणामी ती रटाळ आणि मुद्दाम ताणलेली भासते. पटकथेत धक्कातंत्रांचा वापर करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याच्या प्रयत्नात ‘सरी’ हा सिनेमा अपेक्षाभंग करतो.

- Advertisement -

सिनेमाच्या पहिल्या प्रसंगात दिया (रितिका श्रोत्री) रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी उभी आहे. कट-टू तिचं कॉलेजमधील आयुष्य… दिया रोहित (अजिंक्य राऊत) नामक मुलाच्या प्रेमात पडते. रोज कॉलेजमध्ये येता-जाता ती त्याच्याकडे पाहत असते, पण हिंमत करून त्याच्याशी थेट बोलायला जात नाही किंवा आपल्या प्रेमाची कबुलीदेखील देत नाही. तसं करण्याचा ती प्रयत्न करते, पण तोवर रोहित कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून परदेशी निघून जातो. कथानक काही वर्षे पुढे जातं. अचानक दियाला ती राहत असलेल्या इमारतीच्या लिफ्टमध्ये रोहित दिसतो. कॉलेजमधील जुनं प्रेम तिला आठवतं. आता ती त्याच्याशी बोलायला जाणार इतक्यात रोहित स्वतःहून तिच्याशी बोलायला पुढे येतो. रोहित दियाच्या समोरच्या घरात राहायला आलेला असतो. बोलणं होतं, ओळख वाढते, मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं.

दोघं एकमेकांवर प्रेम करीत असतात. अचानक एके दिवशी त्यांचा अपघात होतो. दियाला गंभीर दुखापत होते आणि रोहित या अपघातात दगावतो, असं दियाच्या घरचे तिला सांगतात. दियावर दुःखाचा डोंगर कोसळतो. ती अस्वस्थ होते. ती सावरावी म्हणून घरचे तिला पुण्याला नातेवाईकांकडे पाठवतात. पुण्यात असताना ती एकदा आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर जाते. तिथे आदी (पृथ्वी अंबर) तिच्या आयुष्यात येतो. त्यांच्यात मैत्री होते. दरम्यान, पटकथेत अनेक घटना घडतात. दिया सर्व भूतकाळ विसरते. ते दोघं एकमेकांच्या प्रेमातही पडतात. कथानकाच्या या वळणावर रोहित पुन्हा एकदा दियाच्या आयुष्यात परत येतो. तो कसा? का? रोहित आणि दियामधील प्रेमाचं काय? दिया आणि आदी यांच्यातील नव्या प्रेमाचं काय होतं? या सगळ्यांची उत्तरं ‘सरी’ सिनेमात आहेत.

कन्नड, तुल्लू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवल्यानंतर पृथ्वी अंबर आता मराठी चित्रपटातून काम करीत आहे. अशोका के. एस. यांच्या ‘सरी’ या चित्रपटातून पृथ्वीने मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला आहे. प्रेमाचा त्रिकोण असणार्‍या या चित्रपटात पृथ्वी मुख्य भूमिकेत आहे. पहिल्या भेटीत जाणवणारं प्रेम, वाटणारं आकर्षण, असणारी ओढ हे सगळं शेवटपर्यंत कायम टिकतं का? पहिली भेट आणि प्रेमाचा शेवटचा क्षण या दोन बिंदूंमध्ये घडलेली गोष्ट के. एस. अशोक लिखित-दिग्दर्शित ‘सरी’ सिनेमातून आपल्याला पडद्यावर दिसते. लेखक-दिग्दर्शक के. एस. अशोकनं २०२० मध्ये कन्नडमध्ये ‘दिया’ हा सिनेमा बनवला. त्यानंतर २०२२ मध्ये ‘डिअर दिया’ म्हणून त्याचा हिंदी रिमेकही बनवला. आता दिग्दर्शकानं तेच कथानक गिरवत मराठीत त्याच सिनेमाची ‘कॉपी-पेस्ट’ आवृत्ती ‘सरी’च्या माध्यमातून आणली आहे.

रोहित, दिया, आदी आणि आदीची आई (मृणाल कुलकर्णी) यांच्याभोवती सिनेमाची मूळ पटकथा फिरते. बाकी काही कलाकार लेखक-दिग्दर्शकानं नावापुरते पटकथेत आणले आहेत. प्रेमाचा अनोखा पट मांडताना पटकथेत वातावरणनिर्मिती करण्यात लेखक-दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. प्रेक्षकांना गृहित धरून कथानकात ‘ट्रॅजिडी’ आणण्यासाठी लिहिलेली दृश्यं बाळबोध वाटतात. नायक-नायिकेच्या आयुष्यात शोकांतिका मुद्दाम घडवली जातेय हे जाणवत राहतं. सिनेमाला एक वास्तविक टच देण्यात दिग्दर्शक कमी पडतो. वळणा वळणावर नाट्य घडत असल्यानं सिनेमा हास्यापद बनून जातो. त्यात सिनेमातील तांत्रिक घटकदेखील अवास्तविक दिसतात. सिनेमातील व्हिएफएक्स सुमार आहेत.

त्यातल्या त्यात काही अंशी सिनेमाचे संवाद आणि पार्श्वसंगीत, गाणी या गोष्टी जमून आल्या आहेत. अजिंक्य राऊतनं यापूर्वी काही मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे. ‘सरी’मधून त्यानं पदार्पण केलं आहे, पण तो मालिकांप्रमाणे चित्रपटात त्याच्या अभिनयाची चमक दाखवू शकला नाही. दुसरीकडे अभिनेता पृथ्वी अंबर मात्र स्वतःची दखल घ्यायला भाग पडतो. त्याच्या विनोदबुद्धी आणि देहबोलीमुळे त्याची व्यक्तिरेखा उठून दिसते. त्यानं आदी ही व्यक्तिरेखा यापूर्वीच्या ‘दिया’ (कन्नड), ‘डिअर दिया’ (हिंदी) सिनेमांमध्येही साकारली आहे. त्यामुळे कदाचित या भूमिकेचा त्याचा चांगला सराव झालेला असावा. ‘सरी’मधील त्याच्या व्यक्तिरेखेला निशांत वैद्यनं उत्तम आवाज दिला आहे. रितिका श्रोत्रीनं सहजसुंदर काम करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: भावनिक प्रसंगांमध्ये ती अधिक खुलून आली आहे.

त्याच्या, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची एक अकल्पित गोष्ट ‘सरी’ चित्रपटात मांडण्यात आली असून या चित्रपटात प्रेमाचे त्रिकुट दिसत आहे. दियाच्या (रितिका श्रोत्री) आयुष्यात आलेल्या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते, ती दोघांच्याही प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखावून घेते? तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात? त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार हे प्रेक्षकांना सिनेमा पाहूनच कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -