घरफिचर्ससारांशपाणी वाचवाल, तर वाचाल!

पाणी वाचवाल, तर वाचाल!

Subscribe

रोटी, कपडा और मकान या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या सगळ्यांचा संबंध पाण्याशी आहे आणि भारतातील पाण्याची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत आहे. नैसर्गिक बदल म्हणत राज्यकर्त्यांनी तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले, पण अत्यंत नियोजनशून्य कारभारामुळे तो प्रश्न गुंतागुतीचा झाला आहे. जलदिन आला की पानी बचावची गाणी, घोषवाक्य ऐकवून झाले की वार्षिक कर्मकांड पूर्ण होते. उन्हाळ्याच्या पहिल्या १० दिवसांतच पाण्यासाठी रडायची वेळ येणे हे करंटेपणाचे लक्षण आहे. आजच महाराष्ट्रातील ३००० गावे दुष्काळग्रस्त ठरली आहेत. याचा अर्थ शहरी भाग अगदी सुजलाम आहेत असे मुळीच नाही. कर्नाटकातील बंगळुरू हे राजधानीचे शहर पाण्यासाठी तडफडत आहे.

-योगेश पटवर्धन

गेल्या ५० वर्षांत लहान मोठी हजारो धरणे होऊनसुद्धा पाण्याबाबत आपण सुफलाम् का नाही यावर विचार व्हावा असे कुणालाही वाटत नाही. लातूरला रेल्वेने पाण्याचे टँकर आणले याचा अभिमानाने उल्लेख होतो. याचा अर्थ त्याचे गांभीर्य आपल्याला समजले नाही इतकाच. जेव्हा उन्हाळ्यात प्यायला पाणी नसते तेव्हाही मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या फुटणे, आगी लागल्याने लाखो लिटर पाणी त्यासाठी खर्च होणे ही त्याच अनागोंदीची पुढील लक्षणे आहेत.

- Advertisement -

स्वच्छतेच्या नावाखाली मंत्र्यांनी पाण्याने रस्ते धुणे हे जबाबदारीचे लक्षण नाही. पुरेसे पाणी उपलब्ध नसताना त्याचा वापर वाढेल अशा सर्व योजना सरकार प्राधान्याने राबवते ते कसे यावर फारशी चर्चा होत नाही. ऊस, साखर याला प्रोत्साहन देणे, सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल, वाहन निर्मिती, रिफायनरी हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. मद्य निर्मिती, शीतपेये, वॉटर पार्क यालाही मुक्त परवाने आहेत.

निवडणुकीचे वारे वाहू लागले की मद्य निर्मिती उद्योग दुप्पट वेगाने कामाला लागतो. ऐन उन्हाळ्यात क्रिकेट हंगाम सुरू झाला की लाखो लिटर पाणी मैदानावर उडवणे हे श्रीमंतीचे लक्षण आहे असेही आपल्याला वाटते. होळीच्या रासक्रीडेसाठी जलधारा नृत्य करणे हा आपला आणि हजारो उडानटप्पू भक्तांचा हक्क आहे असे पूज्यपाद संतांना वाटते आणि सरकार त्याकडे डोळेझाक करते. पाण्यातील घसरगुंडीचे गेम खेळणे यात मोठे क्रीडा नैपुण्य आहे असे बालकांना आणि त्यांच्या आधुनिक पालकांनाही वाटते. केवळ नाशिक जिल्ह्यात सुमारे ६०० वाड्या वस्त्यांना २०० टँकरने पाणी पुरवले जात आहे.

- Advertisement -

ते पुरेसे असते असे नाही. किमान गरज भागवण्यासाठी ते आहे. त्या पाण्याचा दर्जा काय असतो, ते टँकर जुने, गळके आणि गंजलेले असतात. दिवाळी उलटली की छोट्या गावातील नागरिकांचे नशिबाचे फेरे आणि टँकरच्या फेर्‍या सुरू होतात. हे पाणी वाहून नेण्यासाठी हजारो लिटर इंधन लागते. ते परदेशातून आयात होते. दीड कोटी लोकसंख्या असलेल्या बंगळुरू शहरात ५० टक्के पाण्याची कमतरता आहे. सॅकमध्ये बिसलेरी पाण्याची बाटली कोंबून मिरवणार्‍या संगणकतज्ज्ञ बाबूंवर मिळेल ते बाटलीभर पाणी मिळवण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

१४० कोटी नागरिकांना किमान आवश्यक पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे हे आव्हान आहे. आपले पाणी नियोजन हे उपलब्ध पाण्यावर आहे, ते मुळात चुकीचे आहे. पाण्याची कमतरता नाही. पावसाळ्यात शहरे बुडतील एवढे पाणी प्रचंड नुकसान करून सागराला मिळते. त्यापूर्वी नदीमार्गात भूमिगत टाक्या बांधून ते साठवता येऊ शकते का, यावर संशोधन होऊ शकते. हजारो किलोमीटरचे लांब रुंद रस्ते बांधताना त्या खाली पाणी साठवणूक होऊ शकेल का यावरही विचार होऊ शकतो.

विमानांच्या रनवेच्या बाजूला असलेली सुरक्षित जागा भूमिगत जलाकुंभासाठी वापरता येईल. पावसाळ्यात रनवेवर जमा होणारे पाणी त्यात जमा होऊ शकते. ग्रामीण भागात शेततळी होऊ शकतात, तर शहरातही ते होऊ शकते. समस्या बनलेल्या टाकाऊ प्लास्टिकपासून पाच फूट उंचीचे महाकाय पाणी साठवण तलाव होऊ शकतात. शहरात मोठ्या चौकात असलेली गोलाकार वाहतूक बेटांच्या खाली असणारी सुरक्षित जागा पाणी साठवण्यासाठी उपयोगात येऊ शकते. त्याचे सुशोभीकरण करणार्‍या पुरस्कृत देणगीदार धनिकांना ती अट घालून जागा वापरासाठी देता येईल.

करण्यासारखे बरेच काही आहे. आता घरोघरी एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने आहेत. २१ कोटी छोटी चारचाकी वाहने विचारात घेतली तर त्यांच्या वार्षिक स्वच्छतेसाठी ४० कोटी लिटर पिण्याचे पाणी वापरतो. एक वस्त्र निर्माण होते, ते वापरत आले तर वर्षभरात १००० लिटर पिण्याचे पाणी ते धुण्यासाठी वापरावे लागते. पाऊण लिटर मद्य तयार करण्यासाठी आणि ते पिण्यासाठी १० लिटर पाणी लागते. कमोडवाले शौचकुप घरात असेल तर एका कुटुंबासाठी एका दिवसाला ८० ते १०० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी वापरावे लागते.

परदेशात स्थायिक असलेल्या लेक किंवा मुलाकडे चार महिने वास्तव्य करून आलेले मायबाप भारतात घरी परतले की घरातील सर्व पाणीसाठे रस्त्यावर ओतून देतात. असे जुने साठवलेले पाणी मुळीच पिऊ नका, असे त्यांना कुणीतरी किंवा मुलाने किंवा लेकीने सांगितले असल्याने हजार दोन हजार लिटर पाणी फेकून दिले की आपले आंतरराष्ट्रीय ज्ञान सफल झाले असे त्यांना वाटत असावे. तरीही आपण मुक्या जनावरांना, पशुपक्ष्यांना पाणी देण्याचा विचारही केलेला नाही. पार्ले जी बिस्किटे भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणार्‍या समाजसेवकांनी कधीतरी त्यांना बाटलीभर चांगले पाणी पाजावे असा विचार स्वप्नातही केलेला नाही. आपल्या घरासमोरील रस्ते झाडणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांना पाणी हवे का असे आपण विचारत नाहीत.

कुण्या उद्योगपतीने लेकाच्या लग्नात देशभरातील पाच-पंचवीस हजार अतिश्रीमंतांना ढाळ लागावी इतके खाऊ घातले. स्थानिक गावकर्‍यांच्या जेवणावळी उठवल्या याचे कौतुक मला नाही. त्याच खर्चात एखाद्या गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवता आला असता. भारतात सगळ्यात मोठी समस्या आहे ती प्राधान्य कशाला द्यायचे हे न समजण्याची. बुलेट ट्रेन, चांद्रयान, पाण्याखालून रस्ते, लोहमार्ग, चारधाम यात्रा संपन्न होण्यासाठी रस्ते इत्यादी होऊ नयेत असे मुळीच नाही, मात्र त्याआधी पिण्याचे शुद्ध, मुबलक पाणी बाराही महिने मिळायला हवे ही किमान अपेक्षा अवाजवी नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -