-रवी शास्त्री
मागील लेखात आपण मूलभूत विज्ञानातील काही उदाहरणे बघितली. विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांपैकी काही शाखा मधली माहिती आपण आज बघणार आहोत. विज्ञान हा शब्द ऐकल्यावर एक जाड पाठ्यपुस्तक, पांढरे प्रयोगशाळेचे कोट आणि सूक्ष्मदर्शक, दुर्बिणीतून पाहणारा एक खगोलशास्त्रज्ञ, वर्षावनातील एक निसर्गशास्त्रज्ञ, फलकावर लिहिलेले आइन्स्टाईनचे समीकरण, अंतराळ यानाचे प्रक्षेपण, बुडबुडे उडणारे बीकर… या सर्व प्रतिमा विज्ञानाच्या काही पैलूंना प्रतिबिंबित करतात.
विज्ञान हे ज्ञानाचा एक समूह आणि एक प्रक्रिया दोन्ही आहे. शाळेत, विज्ञान कधीकधी पाठ्यपुस्तकात सूचीबद्ध केलेल्या वेगळ्या आणि स्थिर तथ्यांचा संग्रह वाटू शकते, परंतु ते कथेचा फक्त एक छोटासा भाग आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे, विज्ञान ही शोधाची एक प्रक्रियादेखील आहे जी आपल्याला वेगळ्या तथ्यांना नैसर्गिक जगाच्या सुसंगत आणि व्यापक समजुतींमध्ये जोडण्याची सुंदर कला आहे ती आत्मसात करणे गरजेचे आहे.
प्रत्येकाने विज्ञानातील वेगवेगळ्या प्रयोगाचा रोमांचकारी अनुभव घेणे अत्यंत गरजेचे आहे. मग तो विद्यार्थी असो किंवा पालक असो. एक सुंदर अनुभव इथे नमूद करावासा वाटतो. एका विद्यार्थिनीला भूमितीमधील त्रिकोणमितीमधील काही संकल्पना समजत नव्हत्या. तिच्या वडिलांनी काही दिवस रजा घेऊन स्वत: त्या पुस्तकातील सर्व प्रमेय व सिद्धता स्वत: अभ्यासून आपल्या मुलीला शिकवल्या. त्यामुळे वडिलांकडून काही संकल्पना तिला अत्यंत आनंदाने शिकायला मिळाल्या.
यामुळे मुलगी आणि वडील यांच्यातील नातं घट्ट झालं. तिला असं वाटत होतं की आपले वडील आपल्याकडे लक्ष देत नाहीत, पण या एका अनुभवातून त्या दोघांमध्ये नात्यातली ओढ निर्माण झाली. हा विज्ञानातील रोमांचकारी अनुभव नव्हे काय? आपण नेहमी बघतो लहान मुले आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात. मागे एका विद्यार्थ्याने मला फुलांना रंग कसे येतात हा प्रश्न विचारला. मग मी त्याला एका ग्लासामध्ये रंगीत पाणी घेऊन त्यामध्ये एक पांढरे फुल ठेवायला लावले.
संध्याकाळपर्यंत त्या फुलाने पाण्यातील जो रंग होता तो शोषून घेतला आणि त्या रंगाचे फुल दिसू लागले. स्वत: प्रयोग केल्यामुळे मुलाला खूप आनंद झाला आणि तो अशा प्रकारे विज्ञानाची ओढ लागून नंतर विज्ञान शाखेचा पदवीधर झाला. विज्ञानाने निर्माण केलेले ज्ञान शक्तिशाली आणि विश्वासार्ह आहे. ते नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, रोगांवर उपचार करण्यासाठी आणि इतर अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी वापरले जाऊ शकते.
विज्ञान सतत चालू आहे. मनातील निर्माण होणार्या अनेक प्रश्नांना विज्ञानाद्वारे उत्तर मिळवण्याचा सुंदर प्रयत्न आपण करू शकतो. विज्ञान हे एक त्यासाठी असलेले साधन आहे. संशोधनासाठी असलेल्या पूर्णपणे वेगवेगळ्या शाखांमधून रोजच सतत विचार करणे, निरीक्षण करणे त्यातूनच प्रयोग करणे व त्याचा आनंद घेणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. एका शास्त्रज्ञासाठी (आणि खरंच त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल वैज्ञानिकदृष्ठ्या विचार करणार्या प्रत्येकासाठी), प्रत्येक दिवसात शोध लागण्याची शक्यता असते – एक नवीन कल्पना घेऊन येणे किंवा असे काहीतरी निरीक्षण करणे जे कोणीही यापूर्वी कधीही पाहिले नाही.
याप्रकारे विचार करणे हाच संशोधनातील मूलभूत पाया आहे. त्यासाठी प्रश्न पडणे महत्त्वाचे असते. आपला मेंदू आठवणी कशा साठवतात? पाण्याचे रेणू एकमेकांशी कसे संवाद साधतात? असे अनेक प्रश्न असतात. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाल्यास आपण सरबत करतो त्यामध्ये पाण्यात लिंबू, साखर, मीठ यांचे मिश्रण होत असताना एका मुलाने ते बघत राहून त्यात काय फरक पडतो आणि ते पाण्यातील रेणू कसे संवाद करतात याचे निरीक्षण करत बसला आणि त्यातील केमिकल इक्वेशन शोधून काढायचा प्रयत्न केला.
त्या एका प्रयोगातून त्याला पिरीओडिक टेबल याची माहिती झाली आणि नंतर त्याने या सारणीतील अनेक संज्ञा, सूत्रे मुखोद्गत केली. मला म्हणवूनदेखील दाखवली. म्हणजेच काय एका प्रयोगातून दुसरा प्रयोग उभा राहू शकतो आणि त्याचा रोमांचकारी अनुभव आपण घेऊ शकतो. शास्त्रीयदृष्ठ्या, विज्ञानाचे मुख्य ध्येय म्हणजे त्याच्या संभाव्य अनुप्रयोगांची पर्वा न करता ज्ञान आणि समज निर्माण करणे-उदाहरणार्थ, सेंद्रिय संयुग त्याच्या संरचनेबद्दल जाणून घेण्यासाठी ज्या रासायनिक अभिक्रियांमधून जातो त्याचा तपास करणे.
तथापि, वाढत्या प्रमाणात, समस्या सोडवणे किंवा तंत्रज्ञान विकसित करणे या स्पष्ट ध्येयासह वैज्ञानिक संशोधन केले जाते. त्या ध्येयाच्या मार्गावर, नवीन ज्ञान आणि स्पष्टीकरणे तयार केली जातात. उदाहरणार्थ, एक रसायनशास्त्रज्ञ कृत्रिमरित्या मलेरियाविरोधी औषध तयार करण्याचा प्रयत्न करू शकतो. विज्ञानाने निर्माण केलेले ज्ञान नेहमीच प्रश्न विचारण्यासाठी आणि पुनरावलोकनासाठी खुले असते. कोणताही वैज्ञानिक विचार कधीही एकदाच सिद्ध होत नाही.
का नाही? बरं, विज्ञान सतत नवीन पुरावे शोधत असते, ज्यामुळे आपल्या सध्याच्या समजुतींमध्ये समस्या उद्भवू शकतात. आज आपण ज्या कल्पना पूर्णपणे स्वीकारतो त्या उद्या सापडलेल्या नवीन पुराव्यांच्या प्रकाशात नाकारल्या जाऊ शकतात किंवा सुधारल्या जाऊ शकतात. सर्वांसाठी विज्ञान या अंतर्गत किती प्रश्न आहेत हे आपण पुढील लेखात पाहूया.