– रवी शास्त्री
विज्ञान ही एक पद्धतशीर व कठोर शिस्त असलेली ज्ञानशाखा आहे. विज्ञानात चाचणी करण्यायोग्य गृहितके तपासून ती स्वीकारण्यायोग्य वाटल्यास या गृहितकाच्या आधारावर वास्तवात आणखी काय आढळू शकते याचे भाकीत करून जगाबाबतचे ज्ञान विकसित केले जाते. आधुनिक विज्ञान सामान्यत: तीन प्रमुख शाखांमध्ये विभागले गेले आहे.
नैसर्गिक विज्ञान (उदा. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र), ज्यात भौतिक जगाचा अभ्यास करतात; सामाजिक विज्ञान (उदा. अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र) ज्यात व्यक्ती आणि समाज यांचा अभ्यास करतात; आणि औपचारिक विज्ञान (उदा. तर्कशास्त्र, गणित आणि सैद्धांतिक संगणक विज्ञान) ज्यात स्वयंसिद्ध प्रमेये आणि नियम यांच्या आधारावर औपचारिक प्रणालींचा अभ्यास केला जातो. असं म्हणतात की पंढरीची वारी केली की आपल्याला पुण्य मिळते. बरोबरच आहे. त्या विठोबाकडे निष्ठेने पाहिल्यास आणि त्याचे नाव घेतल्यास खरोखरच आपल्या शारीरिक, मानसिक स्थितीत बदल होत असतो.
अक्षर विज्ञानामध्ये अ ते ज्ञपर्यंत जे उच्चार आहेत हे उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्यास आपल्या शरीरामध्ये खरोखर बदल होतो. यातीलच ठ हा उच्चार आपल्याला निश्चितच माहीत आहे. अक्षर विज्ञान हेदेखील एक क्षेत्र विकसित होऊ लागले आहे. अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्यास विठ्ठल विठ्ठल असे म्हटल्याने आपल्याला आराम मिळतो हे मी अनुभवले आहे. पण हे मला एका वारकर्याने सांगितले आणि मी त्याचा प्रत्यक्ष प्रयोग करून बघितला.
म्हणजेच पर्यटनामधूनच आपल्याला संशोधनाकडे वळता येते. मग विज्ञानवारी का करू नये, असा विचार मनात आला आणि वेगवेगळ्या विज्ञान केंद्राकडे माझी पावले वळू लागली. वेगवेगळ्या विज्ञान केंद्रांमधून अनेक प्रकारचे प्रयोग करताना त्यातून समाजोपयोगी संशोधन उभे राहते, यावर विश्वास बसला. म्हणजेच काय, ‘केल्याने देशाटन आणि पंडित मैत्री’ या उक्तीप्रमाणे समाजातील अनेक लहान मोठ्या व्यक्ती विज्ञान पर्यटनाकडे वळल्या तर आपला देश अनेक विषयात समाजोपयोगी संशोधन नक्की करू शकतो आणि समृद्ध बनू शकतो.
फार पूर्वी एक संकल्पना माझ्या वाचनात आली होती की, एका पिता-पुत्रांना एका राजाने डोंगरावर असलेल्या जेलमध्ये कैद करून ठेवले होते. यातून आपली सुटका कशी करून घ्यायची यावर त्या दोघांची चर्चा व्हायची. एक दिवस वडिलांनी आपल्या मुलाला सुटकेसंबंधी एक उपाय सांगितला. त्या डोंगरावर जवळच असलेल्या समुद्रातून समुद्र पक्षी यायचे. त्यांची गळलेली पिसे यांनी जमा करून ठेवली. तुरुंगात असलेले मेण या दोघांनी साठवून ठेवले आणि एके दिवशी त्या मेणाने हात आणि पायाला ती पिसे चिकटवून त्यांनी उडण्याचा प्रयत्न केला.
तो यशस्वी झाला, परंतु वडिलांनी मुलाला असे सांगितले की जास्त उंच जाऊ नकोस समुद्रात पडशील, परंतु मुलाने न ऐकता उंचावर गेला आणि सूर्याच्या उष्णतेमुळे मेण वितळले आणि पिसे वेगळी होऊन मुलगा समुद्रात पडला. अर्थात ही कथा आहे. परंतु या कथेतूनच विमान या संकल्पनेची सुरुवात झाली. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान या सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा अनेक गोष्टींमधून आतापर्यंत समाजोपयोगी संशोधन उभे राहिले आहे.
आपल्या सर्वांना जेम्स वॅट याने लावलेल्या वाफेच्या इंजिनाच्या शोधाचे रहस्य माहीत असेलच. कारण चहाच्या किटलीचे झाकण उडाल्यामुळे वाफेमध्ये शक्ती आहे हे विज्ञान निरीक्षणशक्तीतून आले. म्हणून आधी म्हटल्याप्रमाणे विज्ञानाशी गट्टी करायची असल्यास उत्तम वाचन, वेगवेगळ्या विज्ञान केंद्रांची भेट, आपल्या आजूबाजूला असलेले किल्ले, सदाहरित वने यांच्या साहाय्याने आपल्या निरीक्षणातून, प्रयोगातून अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण शास्त्रज्ञ होऊ शकतो.
हे मनात ठसायला हवे. तसेच येता-जाता उठता बसता आपल्या सभोवताली लक्ष ठेवल्यास अनेक विज्ञानावर आधारित गोष्टी बघायला मिळतात. उदाहरण द्यायचे झाल्यास बटाटे चिरल्यानंतर आपण पाण्यात टाकत नाही, मात्र वांगी चिरून पाण्यात टाकत असतो. जर वांगी पाण्यात टाकली नाहीत तर ती काळी पडतात. याचे नेमके कारण काय? तर वांग्यांमध्ये लोह असते आणि आपल्याला माहीत आहे की जर लोखंड हवेच्या संपर्कात आले की गंजते! म्हणजेच काय ऑक्सिडेशन ही प्रक्रिया घडते.
तसेच एखादा कुत्रा पाणी पीत असेल तर भांड्यातले पाणी भांड्याच्या बाहेर पडते. मात्र मांजर दूध प्यायल्यानंतर त्यातील एकही थेंब भांड्याच्या बाहेर पडत नाही. यात काय विज्ञान आहे? कुत्र्याच्या जिभेची रचना आणि मांजरीच्या जिभेची रचना ही वेगळी आहे. तर हे सरफेस टेन्शन (अर्थात पृष्ठभागावरील दाब) याचे उत्तम उदाहरण आहे. विज्ञानातील अशा चमत्कारिक गोष्टी बघण्यासाठी काय हवे?
उत्तम निरीक्षणशक्ती, विज्ञानाविषयी आपल्याला असणारे कुतूहल, प्रत्येक वेळी प्रयोग करून बघण्याची उत्कट इच्छा आणि त्याबरोबरच एखादा प्रयोग करून बघत असताना संयम आणि चिकाटी हे गुण अंगी लागतातच. आतापर्यंत भारतातील आणि अन्य देशातील शास्त्रज्ञ याच गुणांमुळे सर्वश्रुत झाले आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. आपले हळदीचे पेटंट घेताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, परंतु संयम आणि सातत्य यामुळे भारताला हळदीचे पेटंट मिळण्यात यश मिळाले.
अजूनही अशी काही उदाहरणे आहेत की, भाताची लागवड करताना महिलेला सापाचा दंश झाला. उपचारानंतर तिला असे जाणवले की असे यंत्र तयार करावे की सापदेखील चावणार नाही आणि रोपदेखील लागले पाहिजे. या एका अशिक्षित महिलेच्या नावे आज पेटंट आणि कृषी पुरस्कार आहे. विज्ञान आणि विज्ञानाचा समाजातील उपयोगी वस्तू बनवण्यामध्ये योग्य तो वापर, असे या प्रयोगातून सिद्ध होते.
एका विद्यार्थिनीने आपल्या छोट्या रिमोट कारचे रूपांतर घरातील फरशी पुसण्याच्या यंत्रात केले. आज ती विद्यार्थिनी महिन्याचे सातशे रुपये वाचवते आहे. हा विज्ञानाचा फायदा नव्हे का? अशी एक ना अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. आपणदेखील या विज्ञानवारीत सहभागी होऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने संशोधक बनू शकतो. मग यासाठी वेळ द्यावा लागेल का? मी फक्त प्रोजेक्ट करत बसायचे का? अभ्यास कधी करायचा? आईवडील परवानगी देतील का? यासारखे अनेक प्रश्न मनात येतील.
तर तसे मुळीच नाही. आपल्या आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या घटनांमधून आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधले आणि आपल्याला आवडेल, जमेल असा उपाय करून समाजासमोर आणण्यास काहीच हरकत नाही. त्यासाठी उत्तम प्रकारचे वृत्तपत्र वाचन, त्यातील विज्ञानविषयक लेख, प्रयोगशील वर्तन, उत्तम निरीक्षणशक्ती, संयम व चिकाटी ठेवल्यास आपणदेखील सहजतेने शास्त्रज्ञ होऊ शकतो. यापुढील लेखांच्या भागांमध्ये आपण विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग पाहणार आहोत.
-(लेखक विज्ञान अभ्यासक आहेत)