घरफिचर्ससारांशबिजांकुरण करणारे चमत्कारिक ‘सीड बॉल्स’

बिजांकुरण करणारे चमत्कारिक ‘सीड बॉल्स’

Subscribe

बाळाच्या पोषणासाठी गर्भपिशवी असते, अंड्यातल्या पिलासाठी प्रोटिनचं बाह्यआवरण असतं, तसंच वनस्पतींच्याही बाबतीत काहीशी तशीच रचना निसर्गाने केलेली दिसते. आंब्याच्या कोयीमध्ये रोपाला अंकुरण्यासाठी तशीच काहीशी रचना केलेली असते. तर, अनेक बियांना केवळ मातीची ऊब पुरेशी असते. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे ही मातीही त्यांच्या नशिबी येत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत या बियांना ’सीड बॉल्स’च्या रुपाने आपण कृत्रिम पोषण आवरणाचा आधार देऊन वनीकरणाची चळवळ प्रभावीपणे राबवू शकतो. पावसाळा अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला असल्यानं हे ’सीड बॉल्स’ तयार करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे.

वनसंपदा संपवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत, तशाच वनसंपदा जगवण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी तितक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक हात कार्यरत आहेत. मात्र, ज्या ठिकाणी रोपं लावायची किंवा बीजारोपण करायचं ती ठिकाणं रहिवाशी क्षेत्रापासून लांब असतात. करिअर, नोकरी, कुटुंब सोडून नियमित त्या ठिकाणी जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश वृक्षारोपणाच्या चळवळी या नागरी वसाहतींच्या चौफेर मर्यादित राहिलेल्या दिसतात. समजा कुणी दूर अंतरावर जाऊन एखाद्या माळरानावर किंवा डोंगरावर बीजारोपण केलं किंवा रोपटी लावली तरीही त्यातल्या बहुतांश रोपांच्या नशिबी पुढचा पावसाळा नसतो. उन्हाळ्यात स्थानिकांना पिण्यासाठीही पाणी राहत नाही, अशा वातावरणात रोपांच्या वाट्याला घोटभर पाणी यावं, अशी अपेक्षा मृगजळासारखी ठरावी.

अशा प्रतिकूल परिस्थितीत वनीकरणाचा विचार रुजवायचा असेल तर त्यासाठीची पद्धतीही बदलावी लागणार आहे. त्याच अनुषंगाने गेल्या पाच वर्षांत बियांची रुजूवात करण्यासाठी ’सीड बॉल्स’ ही अत्यंत सोपी, स्वस्त आणि उपयुक्त संकल्पना वापरली जाते आहे. यात माती, शेणखताचा वापर करत गोळे बनवले जातात. त्यात जांभूळ, बोर, शिवण, आवळा, बकूळ, पांगारा, अमलताश, विलायती चिंच, फणस, आंबा अशा विविध झाडांच्या बिया खोवल्या जातात. हे सीड बॉल्स पावसाळ्यात त्यातल्या बिया आणि पर्यावरणासाठी अत्यंत पोषक ठरतात. बाहेर कडाक्याचं ऊन आणि तोंडावर आलेला पावसाळा असा हा काळ सीडबॉल्स बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे. एकदा पावसाळा सुरू झाला की, तयार केलेले सीडबॉल्स घेऊन मोहीमेवर निघता येतं. हे गोळे निश्चित केलेल्या ठिकाणी दूरवरुन फेकून दिले तरीही चालतात. शेणमातीच्या मिश्रणामुळे ते फुटत नाहीत.

- Advertisement -

दोन-चार सलग झालेल्या पावसामुळे मातीत ओल असल्याने हे सीडबॉल्स मातीतली ओल ओढून घेत मातीशी एकजीव होतात. शेणखताचे पोषण, मातीचा ओलावा यामुळे ’सीड बॉल’मधील बिया चटकन रुजतात. हवेतील आर्द्रता, मातीची ओल आणि अधून-मधून पावसाचा शिडकावा हे सारं अनुकूल असलं तर फेकलेल्या ’सीड बॉल्स’मधील किमान 60 टक्के रोपं तीन-चार महिन्यांत चांगली टवटवीत होऊन वाढायला लागतात. शेणा-मातीचं आवरण या बियांना ऊब आणि ओलावा असं पोषक वातावरण मिळवून देत असतं. रुजताना फार कष्ट लागत नसल्याने, आलेली रोपं अधिक चांगली आणि वेगाने मोठी होतात.

’सीड बॉल्स’च्या माध्यमातून वृक्षारोपणाच्या मोहीमांना आता अधिक महत्त्व प्राप्त झालंय. त्यातही वर्षभरापासून अवघ्या मानवजातीला बेजार करुन सोडलेल्या कोरोना विषाणूने ऑक्सिजनचं महत्त्व चांगलंच पटवून दिलंय. प्रत्येक श्वास किती महत्त्वाचा आणि आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो, हेही अनेकांनी पाहिलंय. त्यामुळे ऑक्सिजन देणार्‍या झाडांसह अन्य झाडांच्या लागवडीसाठी पुढे येणार्‍या हातांची संख्या प्रचंड वाढेल. वृक्षारोपणाच्या मोहीमांनाही बहर येईल. मात्र, हे उपक्रम केवळ आरंभशूर नकोत. त्यात सातत्य राहिले तरच वनसंपदा वाढून पर्यावरणाचा समतोल कायम राहण्यास मदत होईल.

- Advertisement -

ऑक्सिजन नाही म्हणून सरकारला, यंत्रणांच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड लावलं तरीही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण शक्य होईल. अनेकांना कुटुंब, नोकरी, करिअर, शिक्षण अशा व्यापामुळे निसर्गासाठी वेळ देता येत नाही. अशावेळी समविचारी व्यक्तींनी लहान-लहान गट तयार करत कामांची विभागणी केल्यास ते अत्यंत उपयुक्त ठरेल. ज्यांना अत्यल्प वेळ आहे त्यांनी बियांचं संकलन, सीड बॉल्सची निर्मिती करावी, ज्यांना थोडा अधिक वेळ आहे त्यांनी प्रत्यक्ष रोपणासाठी जावं आणि ज्यांना आठवड्यातून किमान एक दिवस पूर्णवेळ मिळतो त्यांनी रोपांची निगा राखणं, कुंपण करणं, पाणी देणं, आळं करणं अशी काम करावीत. ही समूह शक्ती पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल!

’असे तयार करा सीड बॉल्स’
संकलित केलेल्या बिया स्वच्छ धुवून घ्याव्यात. आपल्या परिसरातील पिशवी भरून माती आणावी. लहान-मोठे खडे बाजूला काढत ही माती दोनवेळा चाळून घ्यावी. जेवढी माती घेतली असेल साधारण तितकेच शेणखत किंवा गांडूळ खत घ्यावे. थोडं पाणी घालून हे खत ओलं करावं. काही वेळाने नरम झालेले हे खत चाळलेल्या मातीत एकत्रित करावं. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करावं. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे करुन बेसनाचे लाडू जेवढे असतात, त्या आकारात वळून घ्यावेत. या ओल्या गोळ्यांमध्ये झाडाची एकेक बी खोचावी. बियांच्या आकारानुसार त्यांची संख्या ठरवावी. जांभूळ वा फणस असल्यास पाच-सात बिया त्यात खोवता येतात. आंब्याची कोय असेल तर गोळ्याचा आकार थोडा मोठा करावा. आता हे तयार झालेले गोळे कोरड्या जागी कागदावर ठराविक अंतराने ठेवून एक-दोन रात्री सुकवावेत. एकदा ते घट्ट झाले की पावसाळ्यापर्यंत कापडी पिशवीत भरून ठेवावेत.

बिजारोपणाची नैसर्गिक पद्धत
’सीड बॉल्स’ची पद्धतीसाठी मानवी हस्तक्षेप गरजेचा असतो. मात्र, निसर्ग जेव्हा स्वतःच स्वतःच्या परिक्षेत्रातील बियांचं पोषण करत त्यांना रुजवतो, ती पद्धतही प्रभावी ठरते. विशेषतः काटेरी झुडूपांच्या बुंध्याशी जी माती असते त्यात अधिक आर्द्रता असते. त्यामुळेच झुडूपाच्या बाजूची माती कितीही रखरखीत असली तरीही बुडालगतची माती काहीशी ओलसर असते. अशा ठिकाणी एखादी सीड बॉल किंवा एखादी बी हाताने मातीत टोचून दिली तर त्यातून येणारं रोप अगदी सहज जगतं. या रोपाला उगतानाच काटेरी संरक्षण लाभतं. त्यामुळे बकरी किंवा अन्य प्राण्यांपासनं त्याचं संरक्षण होतं. हे रोपटं मोठं झालं तर काटेरी झुडूपाचाही ऊन्हापासून बचाव होतो. अर्थात निसर्गाच्या दुनियेत ’एकमेकां सहाय्य करू’, संकल्पना दिसते. त्यामुळेच निसर्गाची ही पद्धत प्रभावी ठरते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -