बुडता हे जन पाहवे न डोळा

सतत जातीयता, समाजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करून वातावरण सतत अस्थिर कसे राहील इकडे आमचा ओढा का वाढला आहे?. प्रत्येक पिढीचे त्यांचे त्यांचे वेगळे प्रश्न आहेत. कुठला देव कुठे जन्मला किंवा कुठल्या देवाचे इथे मंदिर होते, याने आज काय फरक पडतो?. आम्ही कोणाला तरी आपला नेता मानून त्याच्यामागे, त्याच्या धारधार बोलण्याला बळी पडून जगत असतो. आजच्या जगण्याचे संदर्भ मेट्रो आल्यावर सुटणार नाहीत तर मेट्रोमुळे कितीजण बेघर झाले यावर आधारलेले आहेत. हा दिखावा मला कधीकधी अस्वस्थ करतो. त्यातूनच मग आपोआप बुडता हे जन पाहवे न डोळा, या तुकोबांच्या उक्ती आपोआप मुखातून येतात.

आमच्या सोसायटीच्या समोरच एक मोठा हॉल आहे. तिकडे अनेक लग्नसमारंभ होतातच, कोणाची एकसष्टी चालू असते, कुठूनतरी कोणाची पंच्याहत्तरी चालू असल्याच्या घोषणा चालू असतात. बारसे आणि वाढदिवसाचे कार्यक्रम नेहमीचेच, पण श्रावणात मात्र इथे धार्मिकतेचा उत येतो. पुराणिक पुरणाच्या पोथ्या घेऊन आणि कीर्तनकार इठ्ठल इठ्ठाल करत वातावरण दुमदुमवून टाकतात. दोन चार वर्षापूर्वी कोणा कीर्तनकाराने कीर्तनात जो दाखला दिला तो मनावर इतका फिट्ट बसला की आजच्या घडीला पुसायचा म्हटलं तरी पुसत नाही. असा काय दाखला होता. कीर्तनकारांनी जन्मांधांची कथा सांगितली.

एका खेड्यात एक शेतकरी होता. त्याच्याकडे एक दुभती गाय होती, तिला हल्लीच वासरू झालं होतं. अर्थात ही गोष्ट निदान पंधरा वीस वर्षापूर्वीची असावी. ही गोष्ट हल्लीच्या काळातली नसावी कारण हल्ली कोणाच्या गोठ्यात दुभती गाय दुरास्पद झाली आहे. पाटल्यादारच्या गायरीत आता दुधाच्या पिशव्यांचा थर जमा झालेला दिसतो. एकदिवस रात्री वासराच्या गळ्यातील दावणी सुटली आणि वासरू थेट गायीला लुचलं, आज दुसरं कोणी अडवणारे नसल्याने वासराने पी पी दूध प्यायले. नुकतेच पंधरा दिवसापूर्वी जन्मलेले हे वासरू गायीचे भरपूर दूध प्याले. सकाळी वासराचे पोट फुगले. सकाळी नेहमीप्रमाणे शेतकरी उठला बघतो तर वासरू जागेवर नाही. आजूबाजूला बघितलं. शेवटी गोठ्याजवळ आला तर गायीच्या बाजूला वासरू मलूल होऊन पडलेलं. गावातल्या वैद्याला बोलवलं. वैद्याने अचूक निदान केलं की वासराने गायीचे भरपूर दूध प्यायले आहे. आता वासराचे पोट फुगले आहे. आता वैद्य औषधोपचार करण्यासाठी कुठला पाला रानातून आणणार, तेवढ्यात इकडे वासराने मान टाकली आणि वासरू मेलं.

वासरू मेलं ही गोष्ट गावात कळली. लोकांच्या कानाला बातमी लागली. लोक एकमेकाला सांगू लागले. अमक्या अमक्याच्या गायीचे वासरू भरपूर दूध प्यायले आणि पोट फुगून मेले. वार्ता एकाकडून दुसर्‍याकडे अशी कळत कळत अनेकांना कळली, फक्त शेवटी शेवटी बातमी सांगणार्‍याने अमक्या अमक्या माणसाच्या गायीचे वासरू दूध पिऊन मेलं एवढ्या थोडक्यात बातमी संपवली. पुढे जो कोण भेटेल त्याला अरे बाबा! अमक्याच्या गायीचे वासरू दूध पिऊन मेले एवढीच बातमी गावात फिरू लागली. लोक पारावर बसून ही बातमी चघळत बसले असताना पाराच्या मागे एक जन्मांध बसला होता त्याने ही बातमी ऐकली. त्याला प्रश्न पडला, अरे दूध ही वस्तू आहे तरी नेमकी कशी जी प्यायल्याने वासरू मेलं?. बिच्चारा तो बसल्या जागेवरून लोकांना म्हणाला बाबानो, मी जन्मापासून आंधळा माणूस. मी दूध काय कधी बघितलं नाही, हे दूध कसं असतं नेमकं? त्यावर तिथे बसल्यापैकी एकजण म्हणाला दूध होय!, काय लगा दूध म्हायत नाय तुला. दूध पांढरशुभ्र असतं. बिचारा हा जन्मापासून आंधळा असणारा माणूस त्याला पांढराशुभ्र रंग कसा कळणार. त्याने आपली ही अडचण लोकांना सांगितली.

लोक तर त्याहून पुढचे. समोर वहीचा कागद पडला होता, तो त्याच्यासमोर नाचवत पांढराशुभ्र म्हणजे असा रंग. बोला आता!. तरी बरं त्यातल्या त्यात एक शहाणा होता, त्याने लोकांना म्हटलं काय भले लोक तुम्ही. तो म्हणतोय तो जन्मापासून आंधळा आहे आणि तुम्ही पांढर्‍या रंगासाठी त्याच्यापुढे कागद धरता आहात, काय तुम्ही खुळे की शहाणे?. आता ह्या माणसाला पांढरा रंग कसा समजून द्यावा? सगळ्यांना हाच प्रश्न पडला. तेवढ्यात आकाशातून बगळा उडत होता. त्याला बघितल्यावर अगदी उत्फूर्त होऊन त्याने पांढरा रंग ह्या बगळ्यासारखा असतो. तिकडे जमलेले जे अतिशहाणे होते त्यातलाच हा देखील एक. तो आंधळा माणूस मात्र लोकांची त्याला समजवण्याच्या कामी येत असलेली असमर्थता अनुभवत होता. पांढरा रंग माहीत नाही, दूध माहीत नाही, तर बगळा तरी कसा माहीत असेल?. शेवटी बगळा कसा असतो हा प्रश्न त्याने विचारल्यावरुन त्यातला एकजण उठला आणि आपला हात कोपरात दुमडून हाताचा पंजा थोडा वाकवून बगळ्याच्या मानेसारखी हाताची रचना करून बगळा असा असतो असं म्हणत त्याने त्या जन्मांधाचा हात घेऊन त्या बगळ्यासारखी रचना केली होती त्यावर फिरवला.

जन्मांधाने विचार करून आपलं गृहीत तयार केलं. दूध पांढर्‍या रंगाचे. आणि पांढरा रंग बगळ्यासारखा. बगळा हा असा काहीतरी विचित्र असतो, म्हणजे दूधदेखील असेच काहीतरी विचित्र असणार. असले विचित्र काहीतरी पिऊन नुकतेच जन्मलेले वासरू मरणार नाहीतर काय जगणार?. ह्या गोष्टीतला वास्तववाद किंवा त्यातील आकलन ह्या गोष्टी थोडावेळ बाजूला ठेऊ, पण ह्या गोष्टीतला आंधळा आणि त्याला एखाद्या कल्पनेतील वास्तवता दाखवण्यास असमर्थ असलेले लोक मला आजच्या काळाची प्रतीके वाटतात. आपल्यातील काहीजण अशा गोष्टी नेहमीच पहात असतो. अनेक गोष्टी आपल्या समोर घडत असतात, पण अनेक वेळा त्यातील दिखाऊपणा आपल्याला भिडतो. फेसबुक किंवा इतर सामाजमाध्यामावर आपल्या विचारांचा पगडा टाकणारी माणसे जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो तेव्हा त्यांचे पाय मातीचेच आहेत याची जाणीव आपल्याला होते. अगदी तुकोबांच्या शब्दात सांगायचे तर बुडताहे जन न पाहवे डोळा म्हणून कळवळा येई तसे असेच म्हणावे लागेल.

कॉलेजमध्ये असताना एका मोठ्या लेखकाची कादंबरी मनाला खूप भिडली. तेव्हा ही माणसे सहज उपलब्ध होतं होती. ह्या मोठ्या लेखकाने विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याचा एवढा मोठा पट त्या कादंबरीत मांडला होता की आपल्या वैयक्तिक जीवनात हा लेखक-कवी असणारा शिक्षक असाच असेल. आपण एक विद्यार्थी असलेला वाचक त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना आनंद होईल पण कसले काय!. मी त्यांच्या दारावरची बेल वाजवली. कोणी वयस्क स्त्रीने दरवाजा उघडला. मी नेहमीप्रमाणे सर आहेत का?. मी त्यांची अमुकअमुक कादंबरी वाचून त्यांना भेटायला आलो, तेवढ्यात हे लेखक महाशय बाहेर हॉलमध्ये आले आणि कोण हाय अशा मंजुळ स्वरात सुरुवात करून कळत नाही का मला भेटायला येताना वेळ घेऊन यायची ते. मला अवघडल्यासारखे झाले, मी आल्या पावली परतलो. बहुतेक त्या महान लेखकाची ती प्रतिभासाधनेची वेळ होती. लेखनातला लेखक आणि वास्तविक जीवनातला माणूस हा वेगळा कसा असू शकतो?. खरंच आपण ह्या गोष्टीतल्या माणसांसारखे जगत असतो का?. आम्ही तंतोतंत माहिती लोकांना देतच नसतो. सतत संभ्रमित वातावरण आजूबाजूला तयार करत असतो. यातूनच आम्ही समाजात दुही माजवत असतो.

सतत जातीयता, समाजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करून वातावरण सतत अस्थिर कसे राहील इकडे आमचा ओढा का वाढला आहे?. प्रत्येक पिढीचे त्यांचे त्यांचे वेगळे प्रश्न आहेत. कुठला देव कुठे जन्मला किंवा कुठल्या देवाचे इथे मंदिर होते, याने आज काय फरक पडतो?. आम्हीदेखील त्या आंधळ्याप्रमाणे कोणाला तरी आपला नेता मानून त्याच्यामागे, त्याच्या धारधार बोलण्याला बळी पडून जगत असतो. आजच्या जगण्याचे संदर्भ मेट्रो आल्यावर सुटणार नाहीत तर मेट्रोमुळे कितीजण बेघर झाले यावर आधारलेले आहेत. हा दिखावा मला कधीकधी अस्वस्थ करतो. त्या माणसाने जसा बगळा कसा असतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसे ह्या समाजात अनेक तर्‍हेचे भास निर्माण करणारे आणि आपल्याला वस्तुस्थितीची जाणीव न करू देता भ्रमात टाकणारे भेटतील.

हल्लीच माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला प्रसंग. त्याला त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही एका माणसाला जामीन म्हणून राहिला आहात. त्या माणसाने कर्जाचे हफ्ते भरले नाहीत, आता माझी कंपनी तुमच्यावर आणि कर्ज घेतलेल्या माणसावर पोलिसात गुन्हा दाखल करणार अशा स्वरूपाचा मेसेज आला. ह्या मित्राची धावपळ सुरू झाली, त्याला कळेना ज्या माणसाचे कर्जदार म्हणून नाव आहे. त्याला आपण जामीन राहण्यासाठी कुठलीच कागदपत्रे दिली नाहीत, मग ही भानगड काय?. कोणाची तरी अशी फसवणूक करणार्‍यांची ही हिंमत किती बघा?. कोणावर विश्वास ठेवावा बरं?. नुकतेच ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन झाले. अर्थात बातमी खरी होती. गेल्यावर्षी कोणीतरी अशीच बातमी समाजमाध्यमावर टाकली होती, तेव्हा ती खोटी होती. त्यामुळे भिडे यांच्या नातेवाईकांनी त्या पोस्टला उत्तर दिले होते. काल सगळ्या वृत्त वाहिन्यांनी ही बातमी खरी असल्याची खातरजमा करून भिडे गेल्याची बातमी दिली, पण काही आंधळ्यांनी गेल्यावर्षीची त्यांच्या नातेवाईकांनी समाजमाध्यमावर टाकलेली पोस्ट फिरवायला सुरुवात केली. लोक खरच असंवेदनशील झालेत का?, ह्या धावपळीच्या काळात आम्ही त्या आंधळ्यासारखे चुकीच्या माणसांना कवटाळून बसलो नाहीत ना?, याची खातरजमा करण्याची आता वेळ आली आहे. आजचा काळ सहाशे वर्षापूर्वी तुकोबांना कळला होता म्हणून ते म्हणाले होते, बुडता हे जन पहावे न डोळा, म्हणोनी कळवळा येई तसे.