विठ्ठल मंदिर प्रवेश लढ्याची पंच्याहत्तरी !

भारताला स्वातंत्र्य मिळत असतानादेखील दलितांना हक्क नाकारले जात होते. त्यावेळी सानेगुरूजींच्या उपोषणालादेखील विरोधही झाला होता. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर प्रवेशाला विरोध करणार्‍यांनी ‘साने जावो सीमापार, नही खुलेगा मंदिरद्वार’, अशा घोषणा देत विरोध केला जात होता. मात्र मंदिर खुले होणार नसेल तर मी मृत्यूला कवटाळणे पसंत करेन असा त्यांचा जणू निर्धार होता. तो लढा स्वातंत्र्यासोबत जी काही आव्हाने पुढे येणार होती, त्याचे दर्शन घडवत होती. आज त्या आंदोलनाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या आंदोलनाने जातीअंताची लढाई लढून हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मानवी हक्कांची ती लढाई होती.

भारताच्या स्वातंत्र्याची लढाई थांबली होती. प्रत्यक्ष स्वातंत्र्य लवकरच मिळणार होते. मात्र तरीसुध्दा त्या राजकीय स्वातंत्र्याला खरच अर्थ होता का? याचा विचार समाजातील अनेक समाजधुरीण करत होतेच. खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य हे दीनदलितांसह सर्वांना मिळायला हवे होते. राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक, सांस्कृतिक स्वातंत्र्याची भूक सर्वांनाच होती. सामाजिक स्वातंत्र्य आणि परिवर्तनासाठी महाराष्ट्रात महत्वाची चळवळ उभी राहत होती. पंढरपूर येथील बहुजनांचे आराध्य दैवत असलेल्या लोकदेवता विठ्ठलाचे मंदिर दलितांसाठी खुले करण्याची मागणी पुढे आली होती. मंदिर दलितांसाठी खुले होणे हेच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य होते. मंदिर प्रवेश हा केवळ प्रवेश नाही तर सामाजिक परिवर्तनाचा आरंभ होता. साने गुरूजींनी त्यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. स्वातंत्र्य मिळत असतानादेखील एकप्रकारे दलितांना हक्क नाकारले जात होते.

त्यावेळी सानेगुरूजींच्या उपोषणालादेखील विरोधही झाला होता. पंढरपूरमध्ये मंदिर प्रवेशाला विरोध करणार्‍यांनी ‘साने जावो सीमापार नही खुलेगा मंदिरद्वार’, अशा घोषणा देत विरोध केला जात होता. मात्र मंदिर खुले होणार नसेल तर मी मृत्यूला कवटाळणे पसंत करेन असा त्यांचा जणू निर्धार होता. तो लढा स्वातंत्र्यासोबत जी काही आव्हाने पुढे येणार होती, त्याचे दर्शन घडवत होती. आज त्या आंदोलनाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या आंदोलनाने जातीअंताची लढाई लढून हक्क देण्याचा प्रयत्न केला होता. मानवी हक्कांची ती लढाई होती. त्यातून मंदिरे, पाणवठे खुले झाली, पण त्या आंदोलनाच्या पंच्याहत्तरीत जातीधर्माच्या संघर्षाच्या भोंग्यांच्या आवाजात हा समतेच्या भोंग्याचा आवाज काही दुमदुमताना दिसत नाही.

भारतीय स्वातंत्र्याचा विचार सुरू असताना सामाजिक परिवर्तनाचा विचार महत्वाचा होता. स्वातंत्र्याच्या काळात या देशात जाती अंताच्या लढाईसाठी प्रयत्न झाले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून १९२१ ला कायदेशीर लढाई सुरू केली होती.१९२९ ला एस.एम.जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि सहकार्‍यांनी मंदिर प्रवेशासाठीचा प्रयत्न केला होता, तेव्हा पेशवे समर्थक ब्राम्हण मंडळीना मारहाण करत विरोध केला होता. नाशिकमध्ये १९३० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा सुरू झाला होता. या लढ्यांना त्यावेळी तात्काळ फार मोठे यश मिळाले असे नसले तरी त्यानिमित्ताने जाणिवासमोर आल्या होत्या.

मानवी हक्काच्या जाणीव पेरणीत यश मिळत होते. अस्पृश्यतेचा प्रश्न गंभीर होताच. या देशाला अस्पृशता कलंक होता. हे सारे लढे समतेचे होते. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. धर्माच्या आणि जातीच्या आधारावर माणसामाणसात भेद करणे हे या लढाईतील अनेकांना मान्य नव्हते. स्वातंत्र्याच्या लढाईत अनेकजण सहभागी झाले होते, मात्र त्या सर्वांनाच हे हवे होते असे मात्र नाही. अनेकांनी आज ना उद्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायदा होऊन दलितांना मंदिर खुले होईल असे वाटत होते. साने गुरूजींचे आंदोलन हे दोन समाजात भेदाभेद करून संघर्ष निर्माण करणारे आहे असे साने विरोधकांनी गांधीजींना पटवून देण्यात यश मिळविले होते. त्यामुळे गांधींनी गुरूजींना उपोषण मागे घेण्याच्या निरोपाची तार धाडली होती. जाती अंताच्या लढाईला अप्रत्यक्ष काहींचा विरोध होता.

मात्र मातृहदयी आणि अत्यंत संवदेनशील असलेल्या साने गुरूजींनी जीवनभर ज्या गांधींवर निस्सिम प्रेम केले, त्यांचे विचार मस्तकी घेऊन पाऊलवाट चालणे पसंत केले त्या गांधींना त्यांनी अत्यंत विवेकशीलतेने, प्रखरतेने व विनम्रतेने पत्र लिहून नकार कळविला होता. त्यांचे हे पत्र म्हणजे साने गुरूजींनी सुरू केलेल्या लढाईतील त्यांच्या या विचारावर किती प्रेम होते याचे दर्शन घडविते. साने गुरूजी हे जितके आध्यात्मिक वृत्तीचे होते तितकेच सामाजिक सुधारणाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांना मंदिराचा दरवाजा खुले करणे म्हणजे माणसांच्या मनांची, हदयांचे दरवाजे खुले करणे आहे. मनाचे दरवाजे खुले झाले म्हणजे राजकीय व सामाजिक दरवाजे आपोआप खुले होतील, अशी गुरूजींची धारणा होती. ती खरीदेखील होती. शेवटी मनातील जातीयता संपेल तरच समाजातील जातीचा अंत होणार होता. त्यामुळे देशातील जातीअंताच्या लढाईतील ही एक महत्वाची लढाई होती. कायद्याने काही संपविण्याचा प्रयत्न झाला तर ते वरवर संपेल. बाह्यांगे जात संपेल. मात्र मनातून ती जाईलच असे नाही. त्यामुळे ही लढाई भारताच्या जातीभेदाच्या अंतासाठी महत्वाची ठरणार होती.

सामाजिक बदलासाठी साने गुरुजींनी हा लढा सुरू केला होता. महाराष्ट्रातील दीनदलितांसाठी पंढरपूरचे प्राचीन मंदिर खुले व्हावे यासाठी त्यांनी प्रबोधन करत अनेक सभा घेतल्या होत्या. मात्र त्यातून मानसिक प्रबोधनाची प्रक्रिया घडत होती. बहुसंख्य लोकांचा पाठिंबाही मिळत होता. मात्र तरीसुध्दा मंदिर खुले होत नव्हते.अखेर १ मे १९४७ रोजी साने गुरुजी यांनी उपोषणाचा निर्णय जाहीर केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. राज्यातील अनेक स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, विचारवंत यांचा उपोषणाला पाठिंबा मिळू लागला होता. मात्र पंढरपुरात उपोषणाला जागाच मिळू नये अशी तजवीज विरोधकांनी केली होती. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र पंढरपुरात गाडगेबांबाच्या विचाराची दिशा घेऊन काम करणारे कुशाबा महाराज तनपुरे यांनी आपल्या मठात उपोषणाला जागा उपलब्ध करू दिली. समतेचा जयघोष करणार्‍या संत विचाराचे आद्यपीठ असलेल्या पंढरीत उपोषणाला जागा देण्यात अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. हा लढा वर्तमानात जितका सोपा वाटतो तितका तो सोपा नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. जात आणि त्या जातीच्या माणसाच्या सावल्यादेखील नको असे मानण्याच्या काळात जागा उपलब्ध करून देण्याचे धाडस होते.

उपोषण सुरू झाले होते. मंदिर खुले झाल्याशिवाय उपोषण मागे घ्यायचे नाही हा निर्धार पक्का होता, मात्र तरीसुध्दा साने गुरूजींचे उपोषण दहा दिवस चालले होते. या काळात त्यांच्या प्रकृतीची चिंता सर्वांना लागून राहिलेली होती. अनेकांनी उपोषण लवकर सुटावे म्हणून प्रयत्न सुरू केले होते. लढाईने आर नाही तर पार असे स्वरूप धारण केले होते, हे लक्षात आल्यावर विरोधकांनाही धक्का बसत होता. समाज मनातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत होता. विरोधकांच्या वृत्तीबद्दल संतापही व्यक्त होत होता. गांधीजींचे गैरसमज दूर करत मन वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यांच्यापर्यंत आंदोलनाचे वास्तव पोहचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले होते. त्यात काही प्रमाणात यशही मिळत होते. त्याचवेळी लोकसभेचे पहिले सभापती राहिलेले दादासाहेब मावळणकर पंढरपूरला दर्शनासाठी आले होते. त्यांना येथील परिस्थितीचा अंदाज आला होता. त्यांनीदेखील सांगितले की, दलितांना जेथून दर्शन मिळते तेथूनच मी दर्शन घेईल.

त्यांनी उपोषण सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गांधीजींच्या वतीने मावळणकरांच्या मार्गदर्शनाखाली काम करा, असा संदेश पाठविण्यात आला आला होता. अखेर मोठ्या प्रमाणावर विविध मार्गाने प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन पंच कमिटी सदस्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन दलितांना प्रवेश देण्याचा विचार पुढे आणला. त्या संदर्भात जिल्हा न्यायालयाला कळविण्यात आले. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्ततादेखील करण्यात आली. १० मेला हा ठराव झाला आणि त्याच दिवशी दलितांना मंदिर प्रवेशासाठी खुले झाले. सांयकाळी गुरूजींनी उपोषण सोडले. खरेतर एका मातृहदयी, संवेदनशील असलेल्या गुरूजींनी सामाजिक क्रांतीची ही लढाई सत्याग्रहाच्या मार्गाने आणि कोणत्याही हिंसक संघर्षाशिवाय यश मिळविले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जातीअंताच्या लढाईला चांगले यश मिळाले होते. त्या प्रवेशानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मंदिर खुले झाली होती. अनेक ठिकाणी पाणवठेदेखील खुले झाले होते. सामाजिक क्रांतीचा ही मशाल पेटविली गेली होती.

साने गुरूजींच्या या उपोषणाला आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहे. या आंदोलनाने जातीभेदाच्या विरोधात पाया घातल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर या राज्यात मानसिक परिवर्तनाची पाऊलवाट निर्माण करण्यात यश मिळत गेले. त्यामुळे आतापर्यंत आपण बरेच काही कमवले असले तरी, साने गुरूजींचा विचार रूजविण्यात आपल्याला पुरेसे यश मिळू शकलेले नाही. साने गुरूजी यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा प्रार्थनेतून मांडलेला विचार वर्तमानात रूजण्याची निंतात गरज आहे. आपली एक लढाई संपली असली तर त्या लढाईच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने शेवट करण्यासाठी लढे उभे करावे लागतील. आज ७५ वर्षे झाली तर त्या लढ्याचे स्मरण करण्याचा ना प्रयत्न झाला, ना त्या आंदोलनाच्या स्मृती जोपासल्या गेल्या. आज मंदिर सर्वांसाठी खुले असले तरी ते इतक्या सहजतेने खुले झालेले नाही हेही लक्षात घ्यायला हवे.