घरफिचर्ससारांशबदलतं सोशल जग

बदलतं सोशल जग

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून जग खूपच बदललं. खासकरून सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे गोष्टी आल्यापासून तर जरा जास्तच! या बदलत्या युगात अनेक गोष्टी सहजसोप्या झाल्या, तर खूप गोष्टी क्लिष्ट...

परवा नेटफ्लिक्सवर ‘शेरलॉक’ ही वेबसीरिज बघत होतो. सर आर्थर कॉनन डायल यांच्या डोक्यातून कागदावर उतरलेला शेरलॉक होम्स आणि त्याचा सहकारी डॉ. वॉटसन ही जोडगोळी जगप्रसिद्ध आहे. 20 व्या शतकात कधीतरी सर आर्थर कॉनन डायल यांनी चितारलेला हा शेरलॉक आहे, मात्र महायुद्धांपूर्वीच्या इंग्लंडमधला. पण ही सीरिज बघताना सीरिजकर्त्यांनी मालिकेला आताचा म्हणजे 21 व्या शतकाचा संदर्भ दिला आहे. ज्यांनी ही सीरिज बघितली असेल, त्यांना तर हे माहीत असेलच. पण ज्यांनी बघितली नाही, त्यांच्यासाठी काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे. सर आर्थर कॉनन डायल यांनी लिहिलेल्या कथांचा गाभा तसाच ठेवून शेरलॉक जर 21 व्या शतकात असता, तर त्याने या सगळ्या केसेस आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कशा सोडवल्या असत्या, हे खूप छान पद्धतीने गुंफलंय.

या सीरिजमध्ये शेरलॉकचं सोशल मीडिया, अद्ययावत मोबाईल फोनमधले अद्यायवत मॅप्स वापरणं, माहितीसाठी गुगल करणं या गोष्टी अगदी सहज दाखवल्या आहेत. त्या बघता बघता मनात सहज विचार तरळून गेला की, ‘या सोशल मीडियाने आणि तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यात किती गोची करून ठेवली आहे’! पटलं नाही ना? पण घाबरू नका, लेखाच्या शेवटापर्यंत कदाचित तुम्हीही माझ्याशी सहमत व्हाल. सोशल मीडिया याआधी असता, तंत्रज्ञानातील हे बदल याआधी असते, तर आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुतांश चित्रपट बनलेच नसते. कसं, ते सांगतो.

- Advertisement -

वानगीदाखल आपण धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, ओमप्रकाश यांचा नितांतसुंदर ‘चुपके चुपके’ हा चित्रपट घेऊ या. या चित्रपटात धर्मेंद्र शर्मिला टागोरच्या ‘पूज्य जिजाजीं’ना त्याच्या लहानपणीचा फोटो पाठवतो आणि मग त्यांच्याच घरी एक ड्रायव्हर, अर्थात वाहनचालक, म्हणून कामाला जातो. संपूर्ण चित्रपट धर्मेंद्रच्या या ड्रायव्हर बनून केलेल्या गमतींवर बेतला आहे. आता विचार करा, त्या काळात सोशल मीडिया असता, तर बॉटनी या विषयातील प्रख्यात डॉ. परिमल त्रिपाठी यांचा फेसबुक प्रोफाईल नक्की असता. त्यावर त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारनाम्यांचे फोटो असते. गेला बाजार एखाद्या तरी वेबसाईटवर किंवा अगदी विकीपिडीयावर त्यांचा फोटो कुठे ना कुठेतरी उपलब्ध झालाच असता. त्यामुळे पूज्य जिजाजी, अर्थात, ओमप्रकाश यांच्यासमोर धर्मेंद्रला वाहनचालक म्हणून वावरता आलंच नसतं.

तसाच आणखी एक सहज आठवणारा पिक्चर म्हणजे 1990 मधला ‘जो जिता वही सिकंदर’. यातही आमीर खान पूजा बेदीला तो ‘राजपूत कॉलेज’चा असल्याचं सांगतो. आता मला सांगा, फेसबुक असतं, तर आमीरच्या प्रोफाईलवर ‘Studying at Model College’ असं ठळक दिसलंच असतं की! म्हणजे झाला पोपट? ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्येही राज-सिमरनने युरोप ट्रीपमध्ये काढलेले फोटो इन्स्टावर बाबुजींनी बघितले नसते का? मग राज पंजाबात येऊन बाबुजींच्या बाजूला उभं राहून कबुतरं उडवू शकला असता का?

- Advertisement -

अमोल पालेकर यांचा गोलमाल तर कवडीमोल झाला असता. कारण उत्पल दत्त यांना LinkedIn वर अमोल पालेकरांच्या प्रोफाईलची माहिती सहज मिळाली असती. फेसबुकवरून त्यांना कोणीही जुळा भाऊ नाही आणि आईदेखील नाही, हेसुद्धा कळलं असतं. मग गोलमाल चित्रपटात उरलं काय? अशा किती चित्रपटांची मोजदाद करायची?

चित्रपटांचं एक जाऊ द्या! बोलून चालून कल्पनेतलं जग ते. खर्‍या आयुष्यात सोशल मीडिया आल्याने लोकांचं आयुष्य सोपं झालंय असं म्हणतात. एका अर्थी खूप बरोबर आहे ते. म्हणजे बघा ना, एके काळी शाळेत आवडणार्‍या एखाद्या मुलीचं किंवा नव्याने कॉलेजमध्ये भेटलेल्या एखाद्या अनोळखी मुलीचं नाव शोधणंही कठीण असायचं दोघांमधला एखादा समान दुवा शोधावा लागायचा. त्याला आपला मित्र किंवा मैत्रीण बनवावं लागायचं. मग नाव, गाव, फळ, फुल ही सगळी माहिती मिळायची. आता आवडणार्‍या मुलाचं किंवा मुलीचं नाव कळायचीही गरज नाही. त्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या एखाद्याचं नाव माहीत असलं, तरी खूप झालं. लगेच फेसबुक, इन्स्टाच्या फ्रेंडलिस्टमध्ये जाऊन प्रोफाईल फोटो तपासून आपल्या आवडत्या व्यक्तीची कुंडली समोर येते.

नव्वदीच्या दशकात शाळेत असाल, तर आठवा जरा! ‘ए, माझ्याशी मैत्री करतेस का?’ हे विचारण्याचा असा आभासी अप्रोच नव्हताच. जे काही आहे, ते थेट समोरासमोर. फार तर एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला मध्ये घालून. पण ते असं विचारताना मनात होणारी धाकधुक, समोर बावरलेली ती, होकार असेल तर तिचा सलज्ज चेहरा, नकार असेल तर डोळ्यात फुललेले अंगार.. हे सगळं इन्स्टंट समजायचं. होकार असलाच, तर मग एखाद्या अनोळखी एरियातला PCO बुथ पकडून एक एक कॉईन त्या फोनच्या डब्यात टाकत चाललेल्या गुजगोष्टी! नकार असेल, तर अल्ताफ राजाच्या ‘तुम तो ठेहेरे परदेसी’ची केलेली आवर्तनं… नकोच ना त्या आठवणी?

बरं हे झालं प्रेमाचं वगैरे. पण या सोशल मीडिया, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, CCTV कॅमेरे यांमुळे सर्वात जास्त वांदे झाले असतील, तर गुप्तचर विभागातल्या हेरांचे. Intelligence क्षेत्रात माहिती गोळा करण्याची दोन माध्यमं असतात. TechInt आणि HumEnt. म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने गोळा केलेली गुप्त माहिती आणि हेरांच्या मदतीने गोळा केलेली माहिती. पूर्वी या टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्सचा पगडा खूप कमी होता. माणसांनी गोळा केलेल्या माहितीवर मोसादसारख्या गुप्तचर संघटना उभ्या राहिल्या. पुढेपुढे तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि या गुप्तचर यंत्रणांच्या हेरांचं जिणं मुश्कील झालं. जिथे-तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आले, पासपोर्ट स्कॅनिंग सुरू झालं, त्यातही रेटिना स्कॅनिंग वगैरे प्रकार बळावले आणि हेरांचा मुक्त वावर कमीच झाला. अनेक गुप्तचर संघटनांच्या मते तंत्रज्ञान कितीही विकसित झालं, तरी हेरांमार्फत मिळणारी माहिती अनमोल असते.

पण या सोशल मीडियाचा सर्वात जास्त फटका बसलाय तो आपल्या व्यक्त होण्याला. अगदी अलीकडची गोष्ट. माझ्या 10 वर्षांच्या पुतण्यासह दोन दिवस पिकनिकला गेलो होतो. त्या दोन दिवसांमध्ये माझ्या पुतण्याने जेवढ्या प्रतिक्रिया दिल्या, त्या सगळ्या कोणत्या ना कोणत्या तरी मीम्सरूपात प्रसिद्ध आहेत. काहीतरी भन्नाट जोक झाला, तर ‘अद्भूत… अद्भूत’ असं ओरडणं. एखादं काम सांगितल्यावर करायचं नसेल, तर मुन्नाभाई MBBS मधल्या संजय दत्तसारखं ‘नहीं’ असं म्हणणं, अशा कितीतरी प्रतिक्रिया दोन दिवस सतत ऐकायला आणि पाहायलाही मिळाल्या. फक्त माझा पुतण्याच नाही, तर त्याच्या वयाच्या शहरात राहणार्‍या जवळपास सगळ्याच लहान मुलांची व्यक्त होण्याची भाषा बदलत चालली आहे. त्यांचं व्यक्त होणं हे मिम्स आणि स्मायली या चौकटीत अडकत चाललं आहे. चांगलं की वाईट, हा प्रश्नच नाही. पण पूर्वी जरा काही झालं की कविता प्रसवणारे आणि आपल्या भावनांना शब्दबंबाळ करून मांडणारे तरुण तरुणी बरे की, दोन शब्दांमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त करून पुढे कामाला लागणारे हे बरे, हे ठरवणं माझ्या तरी आवाक्याबाहेरचं आहे. सोशल मीडियाने आपलं सोशल विश्व गिळंकृत केलंय, हे खरं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -