घरफिचर्ससारांशआर्जव विनंती पत्रं छत्रपतींच्या थेट तेराव्या गादीस

आर्जव विनंती पत्रं छत्रपतींच्या थेट तेराव्या गादीस

Subscribe

आदरणीय
श्रीमंत छत्रपती श्री संभाजीराजे
अध्यक्ष,
‘रायगड विकास प्राधिकरण’
सस्नेहपूर्वक दंडवत!
विषय : रायगड विकास प्राधिकरण, निर्मिती हेतूचा अपेक्षाभंग होऊ नये !

आदरणीय छत्रपतीराजे,

- Advertisement -

वरील विषयाअनुषंगाने, एक इतिहास अभ्यासक शिवभक्त म्हणून महाराष्ट्रातील लाखो इतिहास-शिवप्रेमींच्या वतीने शिवतीर्थ किल्ले रायगडावर सध्या सुरू असलेल्या निकृष्ट कामांसंदर्भात तीव्र भावना आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितोय, त्यावर तात्काळ उपाययोजना व्हावी ही विनंती.

वास्तविक सर्व किल्ल्यांत किल्ले रायगड हे महाराष्ट्राचे ‘शिवतीर्थ’ होय. सर्व इतिहास शिवप्रेमींचे श्रध्दा स्थान. त्यामुळे किल्ले रायगडाच्या बाबतीत होणार्‍या सुधारणा आदी कामांत जर लापरवाही होऊन निकृष्ट काम झाल्यास महाराष्ट्रातील शिवप्रेमी अजिबात तडजोड करणार नाहीत, ही तीव्र भावना आपण लक्षात घ्यावी. आपण स्वतः आणि सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले दोन्ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे थेट तेरावे वंशज असल्याने प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात आपल्याविषयी श्रध्दापूर्वक आदरभाव आहे. मात्र, दोन्ही छत्रपतींकडून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी अत्यावश्यक पुढाकार किंवा प्रयत्न दिसत नसल्याने शिवप्रेमीमध्ये नाराजीही तेवढीच आहे. आपण उभयता जाणीवपूर्वक थोडा जरी सायास केला असता, तर आपल्या हाकेच्या अंतरावरील छत्रपती शिवरायांच्या लाडक्या पन्हाळगडाचे आज हनिमून हिलस्टेशन झाले नसते.

- Advertisement -

बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावन-समाधी असलेल्या विशाळगडावर बेसुमार अतिक्रमण वाढले नसते. प्रतापगडाचेही गडावरच दुकाने-बाजार मांडून पुरते ऐतिहासिक मूल्य लयास गेले नसते. विजयदुर्ग किल्ल्यावरील तटबंदी पडून वर्ष लोटले. आत्ता त्यावरील बुरुजही आधार तटबंदी नसल्याने केव्हाही कोसळेल,अशी अवस्था आपणास ठाऊक असूनही आपल्याकडून कोणतेही शर्थीचे प्रयत्न झाले नाहीत. मनात आणले असते, तर आपण स्वतः ती तटबंदी बांधण्याचा खर्च पेलू शकला असता. किंवा रायगड विकास प्राधिकरणाकडे रायगडाच्या विकासासाठी दिलेला निधी आपण जर महाड पूरग्रस्त पुनर्वसनासाठी वापरण्याचे अधिकार बजावत असाल तर, विजयदुर्गाच्या तटबंदीचा मामुली खर्चही सहजपणे करता येऊ शकला असता. महाराष्ट्रातील किल्ल्यांची दुरवस्था लक्षात घेऊन आपण राज्यातील संस्था, संघटनांना बळ पुरवून त्यांच्या माध्यमातून किल्ले जतन संवर्धनाचे काम करू शकला असता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीच्या प्रत्येक शब्दाला मान आहे. आपण हिरीरीने पुढाकार घेऊन त्या त्या किल्ल्यांच्या परिसरातील मंत्री, खासदार-आमदार, संस्था-संघटना, उद्योगपती यांना आवाहन करता तर आजमितीस अनेक किल्ले वाचवता आले असते आणि यापुढेही हे किल्ले वाचवू शकतो. मात्र,असे प्रयत्न आपल्या द्वयीकडून होऊ नये, याचा खेद इतिहासप्रेमी- शिवभक्तांना निश्चितच होतोय. त्यात, ‘रायगड विकास प्राधिकरण’ समितीची स्थापना होऊन आपल्याकडे त्याचे सर्वाधिकार असूनही जर खुद्द शिवतीर्थ रायगडाच्या कामातच हेळसांड होत असेल, तर महाराष्ट्रातील शिवभक्तांचा रोष अनावर होईल. गेल्या वर्षभरात रायगडावर जाऊन आलेल्या शिवप्रेमींच्या मनातील नाराजी आता उघड उघड व्यक्त होऊ लागलीय. जोवर हा असंतोष धुमसतोय तोवरच तात्काळ योग्य कारवाई आपल्याकडून होईल, ही अपेक्षा आहे. अन्यथा आज ना उद्या हा असंतोष उग्र स्वरूप धारण करील, यात कोणतीही शंका कुणास वाटू नये. कारण, महाराष्ट्राचा बाप महाराष्ट्राचे दैवत राजा शिवछत्रपती यांचा राज्याभिषेक झालेल्या आणि समाधी असलेल्या पवित्र वास्तुशी कुणीही कधीही तडजोड करणार नाही. सबब,पुढील मुद्यांवर त्वरित कारवाई व्हावी, ही अपेक्षा.

1)महाराजांच्या सिंहासनापाशी आणि समाधीस्थळा पाशीच पुरातत्व विभागाची चौकी कशाकरिता ?
तिथे त्यांचे कर्मचारी जरूर असुद्यात, पण त्या पवित्र निवांत वातावरणाचा भंग करणारी रटाळ विद्रुप चौकी कशासाठी ?
या पवित्र स्थळी इतिहास शिवप्रेमी शिवचरणी समाधीस्थ होतो. तिथे या कर्मचार्‍यांचा मोठमोठ्या आवाजात वायरलेस वॉकीटॉकी संवाद कशासाठी ?

2)हजारो मैलावरून येणार्‍या शिवभक्तांच्या जिल्हा परिषदेच्या निवासाची व्यवस्था कोणत्या कारणास्तव उद्ध्वस्त केली गेली?

3) जिथे रायगड किल्ला पूर्ण अभ्यासावयास किमान 3 दिवस पुरायचे नाहीत तिथे सकाळी 11 ते 5 या वेळेत राजधानी रायगड पाहून अभ्यासून होईल का ?

4)जर रायगडावर शिव-इतिहास प्रेमींकरिता निवास व्यवस्था ठेवायचीच नाही, तर एमटीडीसीचे नव्याने सुखसोयींनी युक्त बांधकाम कुणासाठी कोणत्या अधिकार्‍यांसाठी ?

5)जर सर्वसामान्य शिवभक्तांची जिल्हा परिषदेची निवासी सोय, एमटीडीसी निवासी सोय बंद केलीत तर किल्ल्यावरील जोग यांच्या रोप वे कडीलच खासगी निवासाची महागडी व्यवस्था शिवप्रेमींच्या कपाळी का मारली जातेय ?

6)चितदरवाजापासून गडाच्या माथ्यापर्यंतचा चढ चढून दमून भागून येणार्‍या लहानसहान, वयस्कर वृद्ध लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय जिल्हा परिषदेच्या शेडपाशी होती. ती पूर्वीची सोय कोणताही पर्याय न देता बंद का केलीय?
म्हणजे, त्यांनी 30 रुपयांची पाण्याची बॉटलच विकत घ्यावी, हा अट्टाहास का ?

7)गंगा सागर तलावातील पाण्याच्या बॉटल्स, कचरा काढायचे काम प्राधिकरणात बसत नाहीय का ?

8)संपूर्ण पायर्‍यांचे काम अतिशय बेसुमार निकृष्ट दर्जाचेच होतेय.
पायर्‍यांची कमी रुंदी आणि त्यांना ठेवलेला विनाकारण उतार असा की पर्यटक,वडीलधारी व्यक्ती पडावयासच हव्यात.

9)गड उतरताना प्रत्येक वळणावर पायर्‍यांची डावीकडे कमी केलेली रुंदी हा कोणता वास्तू स्थापत्याचा प्रकार ?
वळणावरील प्रत्येक पायरीची कट केलेली रुंदी बघून आश्चर्य वाटतेय. आपले पाऊलही मावणार नाही अशा रुंदीत त्या पायर्‍यांचे दगड कट करून बसवलेयत. म्हणजे, उतरताना पर्यटक पडायलाच हवा. रायगडाच्या पायर्‍या म्हणजे बागबगीच्या गार्डनच्या पायर्‍या तर नव्हे.

10)महादरवाजावरील भागात/कुशावर्त तलावापासून वाघ दरवाजापर्यंत/हत्ती तलाव-टकमक मार्गे कोळीम्ब तलावापर्यंत/ राणीवसाच्या मागे हिरकणी बुरुजापर्यंत बेसुमार वाढलेले जंगल-रान हेसुध्दा रायगड विकास प्राधिकरण यांच्या अखत्यारीत येत नाहीय का ?
एकदा जाहीर तर करा, कोणत्या गोष्टी आपल्या कक्षेत आहेत वा नाहीत?
म्हणजे इतर कामे किमान शिवप्रेमी अंगमेहनतीने तरी करतील.पण रायगडाची आबाळ होऊ देणार नाहीत.

11)रायगडाच्या दरबारातील नगारखान्याच्या बाजूने इमारतीचा आग्नेय दिशेकडील कोपरा भिंतीवरील वाढलेल्या झाडांमुळेच ढासळलाय.
हीच गत राणीवसाच्या मागील पश्चिम दिशेच्या भिंतीवर आजही मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडी दिसतेय. ज्यामुळे बालेकिल्ल्याच्या या बाजूने तटभिंतीस धोका पोहोचलाय. जवळच एमटीडीसीच्या आधुनिक सोयीसुविधा युक्त इमारतींचे काम जोरात सुरू असताना या ऐतिहासिक वास्तुकडे मात्र, कुणाचेच गांभीर्याने लक्ष नसल्याचे ठळकपणे जाणवतेय. हे खेदाने नमूद करावेसे वाटतेय.

12)कुशावर्त -कोळीम्ब तलावा निकटच्या जुन्या वाड्यांचे केले गेलेले उत्खनन. या वाड्यांच्या विटांमधील आत्ता भरलेल्या चुना मिश्रण युक्त कामांत ठेकेदाराने स्पष्टपणे बेबनाव केल्याचे दिसून येतेय. हे मिश्रण येत्या 2-4 वर्षांत ऊन-वारा-वादळ-पावसाच्या तडाख्यात उखडले जाईल. हे इतिहास वास्तू अभ्यासकांचे आणि तिथल्या बहुतांश प्रत्यक्षदर्शी स्थानिक लोकांचे ठाम मत आहे.

13)आपण मागील वर्षी उल्लेख केलेल्या हत्ती तलावाची गळती अखेर झालीच. एप्रिल-मे मध्ये किती पाणी शिल्लक होते?

14) मी,स्वतः प्रत्यक्षदर्शी आहे. कुशावर्त तलावाच्या वरील बाजूच्या वाड्याच्या आवारात काही 7-8 व्यक्ती साफसफाई करण्याच्या निमित्ताने संशयास्पदरित्या वावरत असल्याचे पाहिले. जर काम बंद असेल, तर या व्यक्ती कोण? तिथे पुरातत्व खात्याचा किंवा प्राधिकरणाचा एकही अधिकृत व्यक्ती उपस्थित असू नये? त्यांच्यात आपापसात काही साटेलोटे आहे का, अशी शंका बळावते.

15)विनंती मागणी- किल्ल्यांप्रमाणेच ‘कोल्हापूर ते सातारा’ जिल्ह्या दरम्यानच समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले 11 मारुती आणि समर्थांच्या 8 रामघळी आहेत. आदिलशाही बहमनी जुलमी राजवटीत शक्तीची उपासना होऊन समाजाचे शौर्य तेज उजळावे, शत्रूस प्रतिकार व्हावा या उद्देशाने स्थापन झालेल्या या स्थळांचीसुद्धा रायगड विकास प्राधिकरणाकडून दखल घेतली जावी.

आदरणीय श्रीमंत छत्रपती राजे,
आपणांस या निवेदनाद्वारे कळकळीची विनंती करीत आहोत. रायगडावर सुरू असलेल्या कामावर या ऐतिहासिक वास्तूशिल्प बांधकामाचा अनुभव असलेले किमान 2 इंजिनिअर्स सदैव तैनात ठेवावेत.

युगपुरुष छत्रपती शिवराय आणि शिवतीर्थ किल्ले रायगड ही महाराष्ट्राचीच नव्हे तर अखंड भारतवर्षाची अस्मिता-मानबिंदू होय. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी रायगड, महाराजांचे सिंहासन, महाराजांची समाधी या पवित्र प्रेरणादायी वास्तू प्रत्येक शिवप्रेमीच्या मनाहृदयात पूज्यनीय होत.

निश्चयाचा महामेरू, बहुतजनांशी आधारू !
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी !

जगाच्या इतिहासात श्रीमंत अनेक झालेत, पण त्यात योगी कुणीही नव्हते. शिवछत्रपतींचे आगळेपण हे, की ते श्रीमंत तर होतेच; पण योगीही होते. महाराज परमनिग्रही होते. चालढकल आणि चंगळ हे शब्द त्यांच्या कोषात नव्हते. दक्षता, तत्परता, सावधानता हेच त्यांचे स्थायीभाव होते. महाराज धर्माचे प्रणेते आणि प्रजेचे पालनकर्ते होते. त्यांनी गरिबांच्या विझलेल्या चुली पुन्हा प्रज्वलित केल्या. समाजाला प्रयत्नपूर्वक व पराक्रमपूर्वक प्रपंचप्रवण केले. त्यासाठीच ‘राज्यसिंहासन व न्यायालय’ निर्मिले. महाराष्ट्राला-भारताला या ‘राज्य योगसाधनेची’ आजही गरज आहे अन उद्याही असेल. प्लेटो या ग्रीक तत्वज्ञाने राजकीय आदर्श रेखाटताना ‘फिलॉसॉफर किंग’ ही संकल्पना सादर केली होती. विरक्त, विवेकी, कार्यक्षम, समाज हितदक्ष राज्यकर्ता ही लोकसमुदयाची सदैव गरज असेल. छत्रपती शिवरायांचे चरित्र आणि शिवरायांचे किल्ले दुर्ग गडकोट हे त्यासाठी दीपस्तंभ होत.

छत्रपती परत भूतलावर येणार नाहीत. त्यांचे मूळ राज्यही अस्तित्वात येणार नाही. पण लोकराज्यात हे योगसाधन व्यक्ती, समाज व राष्ट्र यांना संजिवक ठरेल. आपल्या वाट्याला आलेल्या संदर्भात आपली भूमिका पार पाडताना आपणही अंशतः ‘श्रीमंत योगी’ होण्याचा प्रयत्न का न करावा ?

आपण स्वतः शिवरायांच्या पवित्र गादीचे थेट वंशज आहात. शिवराज्याभिषेक सोहळ्यात अखंड महाराष्ट्रातून आलेला लाखोंच्या संख्येतील प्रत्येक शिवप्रेमी ऐन पावसात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा क्षण जगत असतो. आपला प्रत्येक शब्द प्रमाण मानून कर्तव्यबुद्धीने सहकार्य करावयास तत्पर असतो. तोच शिवभक्त छत्रपती शिवरायांच्या राजधानी रायगडावरील सध्याच्या कामाविषयी प्रचंड नाराजी व्यक्त करतोय. याची गांभीर्याने आपणास दखल घ्यावीच लागेल.

शिवभक्तांच्या मनातील खदखदणारी असंतोषाची भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायच्या अगोदरच आपण जातीने लक्ष घालून सुधारणा करावी, हे अपेक्षित आहे.

विनंती !
शिवभक्त,
रामेश्वर सावंत (सिंधुदुर्ग)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -