Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai

वजीर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील आणि देशातील मराठी माणसांच्या आणि भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी स्थापन झालेल्या जहाल आणि आक्रमक संघटनेत मनगटशाहीवर नव्हे तर केवळ आणि केवळ लेखणीच्या बळावर उभे राहिलेले नेतृत्व म्हणून शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची खास शैलीतील ठाकरी भाषा आत्मसात केलेला पत्रकार महाराष्ट्रात आणि देशात कोणता राजकीय चमत्कार घडू शकतो याकडे बघायचे असेल तर गेल्याच वर्षी महाराष्ट्रात झालेल्या नोव्हेंबर महिन्यातील सत्तांतराकडे बघावे लागेल. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीनही परस्परविरोधी राजकीय विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांची मोट बांधून महाआघाडी विकास सरकार स्थापन करण्याचे श्रेय राज्यात तिघांनाच जाते एक शरद पवार दोन उद्धव ठाकरे आणि त्यातील तिसरा महत्त्वाचा दुवा म्हणजे खासदार संजय राऊत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्य मध्ये खासदार संजय राऊत यांनी जी अत्यंत मोलाची आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी भूमिका पार पडली याबाबत राजकीय वर्तुळात विशेषत: भाजप आणि परिवारात तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या वर्गामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. यामध्ये साहजिकच भाजपने राऊत यांना या सत्तांतर नाट्यातील खलनायक ठरवून टाकले तर शिवसेना राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेस या तीन पक्षातल्या नेत्यांनी मात्र महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाआघाडी विकास सरकार स्थापन करण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावणार्‍या संजय राऊत यांना नायक पद बहाल केले. वास्तविक महाराष्ट्रात 2014 पूर्वी आणि 2014 नंतरही भाजप-शिवसेना युतीची सत्ता असताना आणि त्यापूर्वी सत्ता नसताना देखील सामनातून संजय राऊत यांनी संपादक म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नेतृत्वावर अत्यंत कडवट आणि जहरी टीका वारंवार केली होती.

- Advertisement -

मात्र, राऊत यांच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेचा राजकीय विचार ते सामना’च्या माध्यमातून मांडत असले तरीही त्यांचे शिवसेनेच्या राजकीय विरोधकांशी नेहमीच वैयक्तिक स्तरावर मैत्रीपूर्ण संबंध राहिले. जो शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात वागला त्याला संजय राऊत यांनी ‘सामना’तून पूर्णपणे तोडीस तोड उत्तर देत आडवे केले. मात्र त्याच वेळी व्यक्तिगत मैत्रीही त्यांनी जोपासली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख,सुशीलकुमार शिंदे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुब्रमण्यम स्वामी, माजी अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज हे अगदी भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी असा सर्व पक्षांमध्ये त्यांचा व्यापक मित्र परिवार होता आणि आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी संजय राऊत यांची असलेली जवळीक हा नेहमीच राष्ट्रवादी आणि त्याहीपेक्षा शिवसेनेत कुतूहलाचा विषय असतो. मात्र, याबाबत संजय राऊत यांची भूमिका परखड आणि स्पष्ट आहे. शिवसेनेचे खासदार म्हणून त्यांनी मांडलेली भूमिका, ‘सामना’च्या मुखपत्रातून मांडलेली शिवसेनेची भूमिका आणि व्यक्तिगत संजय राऊत म्हणून एखाद्या राजकीय विरोधकांची असलेली मैत्री या तीनही भिन्न गोष्टी आहेत. जो शिवसेनेच्या विरोधात उभा ठाकला मग तो शत्रू असो की मित्र त्यावेळी संजय राऊत त्यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत संबंध यांचा विचार न करता त्यांच्यावर तुटून पडतात. सामना, ठाकरे कुटुंब आणि शिवसेना या तीन गोष्टींना संजय राऊत यांच्या राजकीय आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संजय राऊत यांचे नेतृत्व हे सामनातून उभे राहिले आणि विकसित झाले. संजय राऊत यांचे सामनावर विलक्षण प्रेम आहे. गेल्या वेळी महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्याच्या वेळी जेव्हा संजय राऊत यांना अति ताण आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यावेळीही रुग्णालयात रुग्णशय्येवर बसून सामनासाठी लेखन करीत असल्याचे त्यांचे छायाचित्र सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. सामनाशी संजय राऊत यांची बांधिलकी किती कडवट आणि निष्ठावंत आहे याचे हे छायाचित्र उत्तम प्रतीक होते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे संजय राऊत यांचे दैवत. आपल्या या दैवताशी त्यांनी आपली बांधिलकी आणि निष्ठा कायमस्वरूपी प्राणपणाने जपली. आणि विशेष म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख व सध्याच्या महाआघाडी विकास सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही ते कमालीचे प्रामाणिक आणि निष्ठावंत राहिले. साधारणपणे राजकारणामध्ये जर पित्याशी उत्तम संबंध असतील त्याच्या पुढच्या पिढीशी म्हणजेच मुलांशी नातवंडांशी त्याच तोडीचे उत्तम संबंध राहतील की नाही याची कोणतीही शाश्वती नसते. मात्र, संजय राऊत हे या नियमाला आणि निकषाला ही अपवाद ठरले. स्वर्गीय बाळासाहेब, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यानंतर आता युवासेना प्रमुख महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अशा ठाकरे घराण्यातील तीनही पिढींशी उत्तम सुसंवाद, समन्वय आणि मुख्य म्हणजे या तिन्ही पिढ्यांचा विश्वास संपादन करण्यामध्ये संजय राऊत यशस्वी ठरले.

- Advertisement -

संजय राऊत यांना शिवसेनेत जे अत्यंत मानाचे स्थान मिळाले त्याकडे महाराष्ट्रातील दिल्लीतील अनेक ज्येष्ठ पत्रकार संपादक हे हेवा वाटावा अशा दृष्टीने पाहत असतात. परंतु संजय राऊत यांनी हे स्थान अहोरात्र कष्ट उपसत, तीन दशकाहून अधिक काळ तपश्चर्या करत महत्प्रयासाने प्राप्त केले आहे. शिवसेनेत ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख होणे शक्य नाही त्याचप्रमाणे धारधार लेखणी च्या बळावर शिवसेनेची डरकाळी महाराष्ट्रासह दिल्लीच्या तख्ताला भिडणारे दुसरे संजय राऊत ही होणे शक्य नाही.

- Advertisement -