घरफिचर्ससारांशराजधानीतील शिवसेनेचा शिलेदार

राजधानीतील शिवसेनेचा शिलेदार

Subscribe

आजवर देशभरातील अनेक पत्रकारांना संसदेत विविध राजकीय पक्षांनी संधी दिली. खुद्द शिवसेनेनेच राज्यसभेवर विद्याधर गोखले, प्रितीश नंदी, संजय निरुपम, भारतकुमार राऊत या पत्रकारांची वर्णी लावली. भाजपनेही चंदन मित्रा, स्वपन दासगुप्ता, बलबीर पूंज, नरेंद्र मोहन गुप्ता यासारख्या पत्रकारांना राज्यसभेवर संधी दिली. काँग्रेसनेही कुमार केतकर यांना राज्यसभेवर आणले. राज्यसभेचे विद्यमान उपसभापती हरिवंश पत्रकार आहेत; पण आपल्या त्यापैकी बहुतांश पत्रकार संसदेतही पत्रकारच राहिले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे संपादक म्हणून संजय राऊत यांची दिल्लीतील कारकीर्द ठळकपणे उठून दिसणारी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती त्यांनी पत्रकार आणि कट्टर राजकारणी म्हणून यशस्वीपणे बजावलेल्या दुहेरी भूमिकांमुळे.

एकीकडे आपल्या तिखट आणि धारदार अग्रलेखांची प्रसिद्धी माध्यमांना दखल घेण्यास भाग पाडणारे संजय राऊत संसदेत आणि संसदेबाहेरच्या दिल्लीच्या राजकारणात तेवढ्याच प्रखरतेने तळपले. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चात ‘सामना’ची आक्रमकता तसूभरही कमी होऊ न देता संजय राऊत यांनी माध्यमांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायमच ठेवले नाही तर त्याला नवी उंची गाठून दिली. दिल्लीतील आपल्या निवासस्थानी मराठी भाषेत विरोधकांना झोंबणारे अग्रलेख लिहिणारे संजय राऊत संसदेच्या परिसरात दाखल होताच त्यांच्यातला मुरब्बी राजकारणी आणि कडवा शिवसैनिक जागा होतो. एक साधा पत्रकार ते देशातील बड्यातल्या बड्या राजकीय नेत्याशी सहजतेने संवाद साधू शकणारा कसलेला राजकारणी हे अचंबित करणारे परिवर्तन संजय राऊत यांच्यामध्ये बघायला मिळते. तेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. दिल्लीत त्यांच्यातील पत्रकार हा त्यांच्या बंगल्याच्या भिंतीपुरता मर्यादित असतो.

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार म्हणून संजय राऊत यांची राज्यसभेतील कारकीर्द सोळा वर्षांपूर्वी सुरु झाली तेव्हा लोकसभेची निवडणूक सुरु होती आणि निकाल लागायचे होते. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत रालोआचे सरकार होते. राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचे नेते म्हणून त्यावेळी भाजपचे प्रतिभावान नेते प्रमोद महाजन आणि लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचा दबदबा होता. महिन्याभरानंतर भाजप-रालोआला अनपेक्षित पराभवाचा धक्का लागून वाजपेयींचे सरकार पडले. महाराष्ट्रात विरोधात असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सहा महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेना-भाजप युतीवर प्रमोद महाजन यांचा प्रभाव होता. राऊत यांच्यापेक्षा जास्त राजकीय अनुभव असलेले अनंत गीते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे ही मंडळी लोकसभेत होती, राज्यसभेत दुसरी टर्म मिळालेले पत्रकार संजय निरुपम होते. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मनोहर जोशी यांनाही शिवसेनेने राज्यसभेवर पाठवले होते. दिल्लीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या या सहकार्‍यांसोबत वावरताना शिवसेनाप्रमुखांचे थेट डोळे आणि कान बनून आलेले संजय राऊत यांच्यासाठी दिल्लीच्या राजकारणात स्थिरस्थावर होण्याचा तो काळ होता. सुरुवातीची दोन वर्षे दिल्ली शांतपणे समजून घेतल्यानंतर संजय राऊत यांच्यासाठी पुढचा मार्ग आपोआपच प्रशस्त होत गेला. प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनामुळे देशाच्या राजकारणातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज शांत झाला होता. संजय निरुपम यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. राज्यसभेवर परतलेले मनोहर जोशी निष्प्रभ झाले होते. गीते-अडसूळ-खैरे ही लोकसभेतील शिवसेनेची त्रिमूर्तीही एका मर्यादेपलिकडे प्रभावी नव्हती.

या बदललेल्या परिस्थितीत जळजळीत आणि आक्रमक राजकीय अग्रलेखांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सामना’चे संपादक आणि शिवसेनेचे राजकीय नेते म्हणून संजय राऊत यांचा हळूहळू दबदबा वाढला. संजय राऊत हे केवळ संपादकच नाही तर राज्यसभेतील नेते आणि ठाकरे कुटुंबाचे विश्वासू आहेत याची एव्हाना कल्पना दिल्लीच्या राजकीय वर्तुळाला होती. ‘सामना’चे संपादक म्हणून शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा समन्वय आता दिल्लीच्या राजकारणातही ठळकपणे दिसू लागला होता. दिल्लीच्या राजकारणात मनोहर जोशी यांची जागा संजय राऊत यांनी कधी घेतली ते कळलेही नाही.

- Advertisement -

पत्रकार किंवा शिवसेनेचा नेता म्हणून कुठलाही अभिनिवेश न बाळगणारे संजय राऊत यांचे राष्ट्रीय राजकारणातील सर्वच बड्या नेत्यांशी तसेच राष्ट्रीय माध्यमांतील सर्वच उच्चपदस्थांशी वैयक्तिक सौहार्दाचे संबंध आहेत. त्यांनी देशातील सर्व प्रादेशिक पक्षांचे प्रमुख आणि लोकसभा-राज्यसभेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांशी अतिशय उत्तम राजकीय संबंध जोपासले आहेत. संजय राऊत यांच्या राजकीय वाटचालीत बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकेच महत्त्वाचे स्थान शरद पवार यांचे आहे. मुंबईत ‘सामना’चे संपादक म्हणून संजय राऊत यांना घडविण्यात शिवसेनाप्रमुखांचा जेवढा मोलाचा वाटा आहे, तेवढेच दिल्लीतील मुरब्बी राजकारणी म्हणून संजय राऊत यांच्या जडणघडणीत शरद पवार यांचे सान्निध्य महत्त्वाचे ठरले आहे.

संजय राऊत यांनी राष्ट्रीय राजकारणात मंत्रीपदाची लालसा किंवा कोणतीही वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवली नाही. ठाकरे कुटुंबियांचा विश्वासू म्हणून अतिशय निष्ठेने संसदेत, दिल्लीच्या माध्यमांमध्ये आणि देशाच्या पातळीवर शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यावर त्यांनी भर दिला. शिवसेनेचे राजकारण देशाच्या पातळीवर सतत चर्चेत ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलला. देशाच्या राजकारणावर ठसा उमटविण्याची आजवर कुणा पत्रकाराला न जमलेली किमया तर त्यांनी करुन दाखवलीच, शिवाय शरद पवार, प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्या बरोबरीने त्यांनी राजकारणी म्हणून त्यांनी राष्ट्रीय राजकारणावर छाप पाडली. शिवसेनेची भूमिका आणि ठाकरे कुटुंबाच्या हिताशी यत्किंचितही तडजोड न करता त्यांनी दिल्लीच्या राजकारणात राजकीय वाटाघाटी यशस्वी करीत उद्धव ठाकरे यांचे संकटमोचक म्हणून लौकिक कमावला. काँग्रेसचे अहमद पटेल, गुलामनबी आझाद किंवा भाजपचे अमित शहा यांच्यासारख्या वाटाघाटीत तरबेज नेत्यांच्या पंक्तीत बसताना त्यांनी शिवसेनेची ताकद वाढवली. दिल्लीतील राजकारणात अभावानेच आढळणार्‍या स्पष्टवक्तेपणामुळे ते राजकीय वर्तुळात लोकप्रिय झाले.

गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन शिवसेनेचा भाजपशी संबंध विच्छेद होत असताना संजय राऊत यांनी देशाच्या राजकारणात अजेय ठरलेल्या मोदी- शहांच्या वर्चस्वाला हिसका देण्यात निर्णायक भूमिका बजावली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचेच हा ध्यास घेऊन त्यांनी अडतीस दिवस अविरत मोहीम राबवली. मुंबईतील दैनंदिन आक्रमक पत्रकार परिषदा घेत भाजपला सतत बॅकफूट ठेवताना त्यांनी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी पडद्याआडच्या वाटाघाटीही तेवढ्याच यशस्वीपणे पार पाडल्या. भाजप दिल्या शब्दाला जागत नाही, ही भावना सर्व प्रादेशिक पक्षांच्या मनात निर्माण केली. महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचा पक्ष आणि युतीत बहुमताची सत्ता आली असतानाही त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या आक्रमक अभिनिवेशाने निष्प्रभ करीत वैचारिकदृष्ट्या परस्परभिन्न अशा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची अशक्यप्राय वाटणारी आघाडी प्रत्यक्षात साकारुन उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करुन दाखवले. भाजपच्या हातून सत्तेची सूत्रे खेचून घेण्याच्या संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी अतिशय आक्रमक, बेडर आणि धाडसाने हल्ले चढविले. त्यांच्या या कामगिरीने विरोधी पक्षच नव्हे तर सर्वशक्तीमान भाजपही थक्क आणि आश्चर्यचकित झाला. कोणतीही वैयक्तिक महत्वाकांक्षा किंवा हितसंबंध जोपायची नसल्याने काहीही गमवायचे नसलेल्या संजय राऊत यांच्यापुढे निष्ठूर राजकारण करणारे मोदी आणि शहाही निष्प्रभ ठरले.

एकीकडे सत्तासंघर्षात भाजपशी परतीचा दोर कापत असताना काँग्रेसच्या नेत्यांनी कालापव्यय करण्याचे आणि नको तितक्या अटी लादून सरकार स्थापनेला विलंब लावण्याचा प्रयत्न चालविला असताना संजय राऊत यांनी पडद्यामागे काँग्रेसच्या नेत्यांनाही खडे बोल सुनावून वठणीवर आणले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वारंवार विधाने केल्यामुळे महाविकास आघाडीत सुरुवातीलाच बिघाडीची स्थिती निर्माण झाली होती. पण सावरकरांच्या मुद्यावरुन शिवसेना अजिबात तडजोड करणार नाही, याची संजय राऊत यांनी काँग्रेस श्रेष्ठींना जाणीव करुन दिली. त्यानंतर राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल पुन्हा अनुदार उद्गार काढले नाहीत.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात अजिबात विस्तव जात नव्हता. परस्परांवर विश्वास न ठेवणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी एकत्र येण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. पण संजय राऊत यांच्या मुत्सद्देगिरीने हे सर्व अडथळे लिलया संपुष्टात आले. शिवसेना-भाजप युतीच्या काळात वाजपेयी-अडवाणी यांच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जसे प्रमोद महाजन संकटमोचकाची भूमिका पार पाडायचे, तशीच भूमिका आज संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बजावत आहेत. पत्रकाराच्या मानसिकतेतून बाहेर पडून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात शंभर टक्केे कसलेल्या राजकीय नेत्यासारखी वावरण्याचे कसब, शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रती अढळ भावनिक निष्ठा, प्रतिस्पर्ध्याला जिव्हारी लागेल असे नेमके बोलण्याची समयसूचकता, राजकारणाच्या सर्वोच्च पातळीवर शिवसेनेची भूमिका निर्भीडपणे मांडण्याची हातोटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैयक्तिक विश्वासार्हता या वैशिष्ट्यांमुळे संजय राऊत हे दिल्लीच्या राजकारणात शिवसेनेचे प्रमुख शिलेदार बनले आहेत.

(लेखक जेष्ठ पत्रकार आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -