घरफिचर्ससारांशदुकानदारांचा महिला दिन!

दुकानदारांचा महिला दिन!

Subscribe

कुंदा, मंदा, नंदा, वृंदा अशी आउटडेटेड नावं असलेल्या मुलीमहिलांनासुध्दा मेसेज पाठवावा की नाही अशा संभ्रमात तो आधी होता. पण काव्या, दिव्या, आर्या, भार्या अशी अपडेटेड नावं असलेल्यांना तो आधीच मेसेज पाठवून मोकळा झाला होता. काव्या, दिव्या, आर्या, भार्या ही नावं ग्लोबलायझेशनला, मुक्त बाजारपेठेला साजेशी आहेत अशी त्याची नावं वाचल्या वाचल्या खात्री झाली होती आणि कुंदा, मंदा, नंदा, वृंदा ही नावं त्याला सनातन्यांच्या काळातली वाटत होती.

त्याला महिला दिनाचा मेसेज सगळ्या महिलांच्या मोबाइलवर पाठवायचा होता आणि आपल्या दुकानातल्या इमिटेशन ज्वेलरीवर महिला दिनानिमित्त पंचवीस टक्के सूट असल्याचं कळवायचं होतं.

- Advertisement -

महिला दिन त्याला त्याच्या पध्दतीने साजरा करायचा होता. इतर दुकानदार दसरा, दिवाळीला असे मेसेज पाठवतात, पण आपण खास महिला दिनाला असे मेसेज पाठवतो ह्याचं त्याला विशेष अप्रुप वाटत होतं.

कुणीतरी त्याला सांगितलं, अरे, तुझं दुकान इमिटेशन ज्वेलरीचं म्हणजे नकली दागिन्यांचं आहे, त्यात हल्ली दागिने हिसकावण्याच्या घटनांचं प्रमाण वाढल्यामुळे नकली दागिने घेण्याकडे महिलांचा जास्त कल आहे. त्यामुळे अस्सल, बावनकशी घेणार्‍यांपेक्षा तुझ्या दुकानाला जास्त मागणी आहे, अशा वेळी तुला हे असले मेसेज पाठवण्याची गरज काय?
खरंतर त्याला म्हणायचं होतं की तुला असला कोणता डे आणि त्यातही वुमन्स डेवगैरे साजरा करण्याची गरज काय?…तुझं दुकान तर सदान्कदा महिलांनी भरलेलं असतं.

- Advertisement -

पण दुकानदार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला डे साजरा करायचाच होता…म्हणजे खास महिला दिनाचा लाभार्थी तर व्हायचंच होतं. त्याने आपल्या डायरीतून दणादणा नंबर काढले आणि काव्या, दिव्या, आर्या, भार्यापासून कुंदा, मंदा, नंदा, वृंदा ह्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठवलेच, पण भागिरथी, इंदुमती, पार्वतीबाई अशा नातजावई, नातसून आलेल्यांनासुध्दा मेसेज पाठवले. म्हणजे आता कसं, नऊ वारीतल्या पार्वतीकाकू, कधी सहा वारीतल्या तर कधी पंजाबी ड्रेसातल्या कुंदाताई आणि तीन चतुर्थांश पॅन्टीतल्या काव्यामॅम, सगळ्यांशी न्याय्य वागणूक झाली असं त्याच्या मनाने घेतलं.
महिला दिनाचा मेसेज बनवताना त्याने मजकूरही तसाचा मराठी माणूस गाठून मातृमंगल बनवून घेतला. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते, पण ह्या मातेला अनंत काळ मान मिळावा अशी आमची इच्छा आहे म्हणूनच आमच्या ‘स्त्री गौरवालंकार’ ह्या दुकानात आम्ही खास तुमच्यासाठी महिला दिन साजरा करत आहोत, कृपया त्याचं औचित्य साधून तमाम महिलांच्या ह्या लाडक्या दुकानातले अनंत दागिने 20 टक्के डिस्काउंटवर घ्या.’

आजच्या कमालीच्या जागरूक सोशल मीडियाच्या काळात त्याचा हा मेसेज बघता बघता अठराव्या माळ्यावरल्या मॉड्युलर किचनपासून व्हाया वन रूम किचन चाळीतल्या ओट्यांपर्यंतच्या तमाम माताभगिनींपर्यंत पोहोचला. त्यातल्या कुणी त्याची नेमेची येतो महिला दिन ह्याप्रमाणे नोंद घेतली आणि आपल्या कमी जीबीच्या मोबाइलला भार नको म्हणून तो डिलिट करून टाकला तर कुणी तो मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवला.

एका महिलेने मात्र त्याच्या ह्या मेसेजची विशेष नोंद घेतली म्हणजे मेसेज वाचल्या वाचल्या त्याला उलटटपाली फोन केला.
‘हॅलो, स्त्री गौरवालंकार दुकानाचे मालक बोलताय का?…मी चिकित्सा तपासे बोलतेय…’
‘बोलो मॅम. मी गौरवालंकारचा मालकच बोलते.’
‘तुम्ही म्हणे महिला दिन साजरा करताय?’
‘हो…हो…मी दरवर्षी महिला दिन साजरा करते, पण तुम्ही म्हणताय तसा ‘म्हणे’ महिला दिन नाही ओ मॅम…मनापासून महिला दिन…तुमच्यासारख्या समद्या महिलांसाठी.’
‘मग हा महिला दिन, हे वीस टक्के डिस्काउंट फक्त एक दिवसच का हो?’
‘मॅम, महिला दिन वर्षातून एकदाच येते तर एकदाच साजरा होणार ना?’
‘मग बाकीचे तीनशे चौसष्ठ दिवस काय करता आम्हा महिलांसाठी तुमच्या दुकानात?’
‘पुढच्या महिला दिनाची वाट पहातो.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -