Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशShort Story : सुहास

Short Story : सुहास

Subscribe

अरे यार गजा...तू भी क्या...सारखं पैसा पैसा करत असतोस. आता संध्याकाळी तुला पन्नास हजार देऊन टाकतो. नेहमीच तू असं काही काही सांगतोस आणि गेला की तिकडेच जातो. हो... ना करता करता गजानं पैसे दिले. थँक्यू थँक्यू करत सुहास बाहेर पडला. दुसरी रिक्षा केली आणि एका बकाल वस्तीच्या कोपर्‍यावर सोडून दिली. तेथे त्याचा मित्र शाम्या त्याची वाटच पाहत होता. सुहास आज पहिल्यांदाच मटक्याच्या अड्ड्यावर जाणार होता. नेहमी तो लॉटरी खेळायचा. अलीकडे ऑनलाईन गेम्समध्ये पण पैसे घालवायचा.

-सुनील शिरवाडकर

अगं माझा गॉगल सापडत नाहीये.. बघितला का कुठे? सुहासची नेहमीची चिडचिड चालू झाली. त्याला सगळ्या गोष्टी जागच्या जागी हव्या असायच्या.. कपडे, शूज, गॉगल.. आणि ते तसं असायचंही..पण मग एखादे वेळी त्याच्याच हातून कुठे काही ठेवलं जायचं..मग ते सापडायचं नाही.. आणि मग ही चिडचिड.
दीपानं टीव्हीवर ठेवलेला ब्राऊन कलरचा बॉक्स त्याच्या हातात ठेवला..सुहासनं तो उघडला.. आतून हिरव्यागार काचेचा रे बॉनचा गॉगल डोळ्यांवर ठेवला.. आरशासमोर उभा राहिला.
मस्तच.. स्वत:वरच तो खूश झाला.. बाकी काही असो..त्यांची पर्सनॅलिटी.. टापटीपपण मात्र वाखाणण्याजोगा होता..लिवाईस जीन्स..पीटर इंग्लंडचा शर्ट..ब्रॅण्डेड शूज.. डोळ्यांवर रे बॉनचा गॉगल.. कपाटातून त्याने पार्क अ‍ॅव्हेन्यूचा परफ्यूम काढला..हात वर करुन.. इकडे तिकडे फुसफुस केला.. आणि बाहेर पडला.. अशा थाटात की, जणू काही ऑफिसलाच निघाला..
सुहास नेहमीच रिक्षाने फिरायचा.. आजही तो रोडवर आला.. रिक्षा दिसतीये का ते पहात होता.. एकमेव रिक्षा स्टँडवर उभी होती..सुहासला रिक्षाच्या, ट्रकच्या मागे लिहिलेली वाक्ये वाचण्याचा छंद होता..आज त्याने जी रिक्षा केली..त्या रिक्षाच्या मागे एक वाक्य लिहिलं होतं..
समय से पहेले भाग्य से अधिक
किसीको कुछ मिलता नहीं
क्या बात है.. सुहास मनही मन खूश झाला.. खरंच..आज अपना समय आनेवाला है..आज आपलं भाग्य उजळणार आहे हे नक्की..तो थेट रिक्षात जाऊन बसला.. किती पैसे घेणार वगैरे काही विचारलं नाही..
पुढच्या चौकात रिक्षा एका मेडिकल स्टोअरसमोर त्यानं सोडून दिली.. हे त्याच्या मित्राचं दुकान होतं.. काऊंटरवरची फळी उचलून तो आत गेला..
गजा..फोनपे आहे ना तुझ्याकडे? लग्गेच पंचवीस हजार ट्रान्स्फर कर बरं.
गजाला हे सवयीचं झालं होतं.. प्रत्येक वेळी सुहास येणार.. काही पैसे मागणार..तो थोडे आढेवेढे घेणार.. हजार मागितले की पाचशे देणार..पण आज एकदम पंचवीस हजार?
अरे यार..मागचे किती बाकी आहे माहितीय का?
अरे यार गजा..तू भी क्या.. सारखं पैसा पैसा करत असतोस.. आता संध्याकाळी तुला पन्नास हजार देऊन टाकतो..
नेहमीच तू असं काही काही सांगतोस.. आणि गेला की तिकडेच जातो.
हो.. ना करता करता गजानं पैसे दिले..थँक्यू थँक्यू करत सुहास बाहेर पडला..दुसरी रिक्षा केली.. आणि एका बकाल वस्तीच्या कोपर्‍यावर सोडून दिली.. तेथे त्याचा मित्र शाम्या त्याची वाटच पहात होता.
सुहास आज पहिल्यांदाच मटक्याच्या अड्ड्यावर जाणार होता.. नेहमी तो लॉटरी खेळायचा.. अलीकडे ऑनलाईन गेम्समध्ये पण पैसे घालवायचा..
हो..त्याला कधी जिंकणं माहीत नव्हतंच..चार वेळा पैसे घालवायचा.. आणि एखादं वेळी जिंकायचा.. सुहासला दुसरा कामधंदा नव्हताच.. बायको बँकेत नोकरी करायची..घर चालवायची.. आणि हा तिच्या जीवावर लॉटरी खेळायचा..सगळे सांगून थकले..पण त्याच्यावर परिणाम ढिम्म.
गयावया करून बायकोकडून पैसे घ्यायचे.. आणि जुगारात उडवायचे हेच त्याचं आयुष्य झालं होतं.. कधीतरी मग एखादे वेळी लॉटरी लागायची..मग..पोरावर ते पैसे खर्च करायचे..त्याला भारीतले कपडे, शूज आणायचे..ते लहान मूल त्याला भुलायचं..त्यामुळे झालं होतं काय..पोराचं आणि बापाचं चांगलं पटायचं..
अशातच एकदा त्याची ओळख शाम्याशी झाली.. तोही जुगारीच..त्यानं सांगितलं..हे लॉटरी बिटरी सोड रे.. माझ्याबरोबर एकदा अड्ड्यावर चल.. कुठला अड्डा? तर मटक्याचा अड्डा. सुहास तिथं कधी गेला नव्हता..आज शाम्याबरोबर पहिल्यांदा जाणार होता.. त्याला खूप उत्सुकता होती..आजवर फक्त ऐकून होता तो मटक्याबद्दल..
कुठे जायचं आपल्याला नक्की?

ते काय.. त्या गल्लीत
अरे तिकडे तर कचरा कुंडी दिसतेय
तू चल फक्त माझ्या मागून.
नाक मुठीत धरुनच सुहास शाम्याच्या मागून निघाला.. थोड्या अंतरावर एक पडकं घर दिसलं.. दरवाजाला एक कळकटलेला पडदा लावला होता..तो बाजूला करून दोघे आत शिरले..आत गेल्यावर एक वेगळीच दुनिया त्याला तिथे दिसली..एका भिंतीवर फळा टांगला होता..त्यावर खडूने खूप आकडेमोड केली होती.. मुंबई.. कल्याण असंही काही लिहिलं होतं.. चार पाच जण उभ्या उभ्या हातात असलेल्या छोट्या बुकमध्ये काही लिहीत होते.
हे बघ..ओपनचं बुकिंग सुरू आहे.. किती लावायचे? आणि कुठली फिगर?
मला त्यातलं काही माहीत नाही.. पंचवीस हजार रुपये आहेत माझ्याकडे..कसे लावायचे.. कुठे लावायचे तूच सांग मला
मग अर्धे अर्धे असे दोन ठिकाणी लावायचे ठरवले. तो जो बुकी होता, शाम्याने त्याच्याजवळ पैसे दिले..पट्टा लाव..जोड लाव.. असं त्या बुकीला शाम्या काहीतरी सांगत होता. बसच्या तिकीटापेक्षाही लहान पातळ गुलाबी कागदावर त्या बुकीनं काहीतरी लिहीलं..दोन चिठ्ठ्या बनवल्या..त्या सुहासकडे देऊन त्यानं सांगितलं..
दुपारी चार वाजता आकडा फुटेल.. आपण येऊ त्यावेळी.. या चिठ्ठ्या मात्र जपून ठेव..माझा अंदाज आहेच आज अठ्ठा येणार आहे..वळण घ्यायला येऊ आपण चार वाजता. वळण? ते काय असतं? अरे वळण म्हणजे पेमेंट.. कुठला तरी एक आकडा नक्की लागणारच आहे.. लिहून ठेव. सुहासनं मोबाईलचं कव्हर काढलं..आत ती चिठ्ठी ठेवली.. पुन्हा कव्हर घातलं.. पडदा बाजूला करुन त्या अड्ड्यावरुन बाहेर पडला.. रिक्षा केली ती थेट घरापर्यंत..घरी येऊन जेवण करून त्याने मस्तपैकी ताणून दिली.
चार वाजता उठून.. मस्त आवरुन अड्ड्यावर हजर..आज त्याला खूप हुरहुर लागली होती..शाम्या म्हणतो तसा आकडा लागला तर लाखांमध्ये पैसे मिळणार होते.. पुन्हा एकदा नाक मुठीत धरून तो अड्ड्यावर आला..शाम्या तिथं होताच.
काय रे..काय झालं..आला का आकडा आपण लावलेला? थांब जरा वेळ.. पंधरा वीस मिनिटात येईलच. पंधरा मिनिटांनी जरा हलचल झाली..एक जण स्टुलवर चढला.. हातातल्या खडूने त्यानं टांगलेल्या फळ्यावर काही आकडे लिहिले..ते आकडे पाहून अनेक जण तिथून निराश होऊन निघून गेले..
चल रे..का? काय झालं..आपला आकडा आला?
नाही..तू इथून चल.. आपण उद्या परत येऊ.. उद्या नक्की येईल..तू पैसे घेऊन ये.
सुहासच्या लक्षात आलं..आपले पैसे गेले..खूपच नर्व्हसनेस आला त्याला..खरंतर त्याला हे असं हरण्याची सवय होतीच..पण आज कसं? मोठी रक्कम गेली होती ना त्याची!
हताश होऊन तो बाहेर रस्त्यावर आला.. रिक्षा शोधू लागला..एक रिक्षा त्याला मिळालीही..आत जाऊन तो बसला..घराचा पत्ता सांगितला..
आज मात्र त्या रिक्षाच्या मागे लिहिलेलं वाक्य वाचायचं तो विसरला होता..त्या रिक्षावर लिहिलं होतं..
समयसे पहेले भाग्य से अधिक..
मेहनत करनेसेही सबकुछ मिलता है.