घरफिचर्ससारांशबयाबाईचा मंतरलेला अंगारा...

बयाबाईचा मंतरलेला अंगारा…

Subscribe

‘देवी आली, देवी आली,’ असा गलका वाड्यावर झाला. सर्व बायाबापड्या, पोरंसोरं आणि काही मेंढपाळ बयाबाईच्या भोवती जमा झाले. त्यालाच तात्पुरता चौथरा किंवा दरबार संबोधतात. सूर्य डोंगरावरून खाली झुकला होता. डोंगर उतारावरून शेळ्या-मेंढरांचे कळप बिर्‍हाडे असलेल्या माळरानावर, वस्तीच्या अतिशय जवळ आली होती. पण तेवढ्यात मेंढरांच्या कळपामागे डोंगरापासून दबा धरून, लपतछपत चालत आलेले दोन लांडगे मेंढरांच्या कळपावर तुटून पडले. कारण जवळपास सर्वच मेंढपाळ मंडळी बयाबाईच्या उघड्यावर भरलेल्या दरबाराच्या आसपास पोहचली होती.

एका थोरल्या डोंगराच्या पायथ्याशी मेंढपाळांची चार सहा बिर्‍हाडं कळपासह मुक्कामाला होती. सूर्यास्त व्हायला अजून थोडा वेळ बाकी होता. अंधाराचे साम्राज्य पसरण्यापूर्वीच मेंढ्यांच्या कळपासोबत असलेले इतर पाळीव प्राणी जसे कोंबड्या, लहान लहान कोकरं, बकरं, कुत्रे, घोडे जिथल्या तिथे बांधून आणि कोंडून ठेवण्याची लगबग बिर्‍हाडांवरील सर्व स्री, पुरुष करीत होते. एका बिर्‍हाड मालकाचा घोडा त्या दिवशी दुपारपासून हरवला होता. संध्याकाळ होत आली तरी तो सापडत नव्हता. त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अंधार झाल्यानंतर घोडा शोधणं आणखीच अवघड होणार होतं. आज जर घोडा सापडलं नाही तर, उद्या दुसरीकडे बिर्‍हाड न्यायचं कसं? घोड्याच्या मालकासमोर ही मोठी समस्या निर्माण झाली होती. पण त्याचे उत्तर कळपासोबत दुसरे बिर्‍हाड असलेली बयाबाई भगतीन नक्की देते, हे सर्वांना ठाऊक होते. तसा सर्वांचा विश्वास होता. तिच्या अंगात पाहिजे तेव्हा देवीचा संचार होतो. देवी अंगात आली की, बयाबाई जोरजोरात घुमू लागते आणि कोणत्याही समस्येचे खात्रीने उत्तर देते, निदान समस्या सोडविण्यासाठी दैवी उपाय तरी सांगते. मग तो समस्याग्रस्त व्यक्तीने अवलंबवयाचा असतो,असा वाड्यावरील लोकांचा रिवाजच होता.

हरवलेल्या घोड्याचा मालक बयाबाईकडे गेला. दुपारपासून घोडा हरवला आहे. खूप शोधला पण अजून तो सापडला नाही. तो कुठे आहे? तो जिवंत आहे की नाही? कधी सापडेल? असे प्रश्न त्याने बयाबाईला विचारले. लोकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बयाबाईच्या अंगात येणारी देवी देते, असे बयाबाई सांगते आणि लोक मानतात. आताही घोडा हरवलेल्या माणसाच्या प्रश्नांची उत्तरं देवी देणार होती. त्यासाठी देवीचा संचार बयाबाईच्या अंगात होणे गरजेचं होतं आणि म्हणून बयाबाईने घोंगडीची चौकोनी घडी केली. त्यावर डालकीतील म्हणजे बांबूची छोटी टोपली, त्यामधील देव घोंगडीवर मांडले. तेथे जवळपास असलेल्या वनस्पतींची पानं, फुलं आणायला सांगितली आणि ती देवांच्या समोर ठेवली. जवळच्या तीन दगडांच्या चुलीतील मूठभर राख, अंगारा म्हणून देवांच्या समोर घोंगडीवर ठेवली. त्या समोर ती बसली. दोन्ही हात जोडून बयाबाईने डोळे मिटले. हळूहळू तिचे शरीर थरथरू लागले. ती अंगाला आळोखेपिळोखे देऊ लागली. तोंडातून विशिष्ट आवाज काढून घुमू लागली. हळुहळू घुमण्याचा आवाज आणि आळोखेपिळोखे देण्याचा वेग वाढला.

- Advertisement -

‘देवी आली, देवी आली,’ असा गलका वाड्यावर झाला. सर्व बायाबापड्या, पोरंसोरं आणि काही मेंढपाळ बयाबाईच्या भोवती जमा झाले. त्यालाच तात्पुरता चौथरा किंवा दरबार संबोधतात. सूर्य डोंगरावरून खाली झुकला होता. डोंगर उतारावरून शेळ्या-मेंढरांचे कळप बिर्‍हाडे असलेल्या माळरानावर, वस्तीच्या अतिशय जवळ आली होती. पण तेवढ्यात मेंढरांच्या कळपामागे डोंगरापासून दबा धरून, लपतछपत चालत आलेले दोन लांडगे मेंढरांच्या कळपावर तुटून पडले. कारण जवळपास सर्वच मेंढपाळ मंडळी बयाबाईच्या उघड्यावर भरलेल्या दरबाराच्या आसपास पोहचली होती. लांडग्यांनी ही संधी बरोबर हेरली होती. लांडगे जेव्हा कळपाचा पाठलाग करू लागले तेव्हा घाबरून शेळ्या-मेंढरे माणसांकडे, बिर्‍हाडांकडे पळत सुटले. गर्द अंधार पडला नसतानाही लांडग्यांनी, जवळपास कोणी नाही असा अंदाज घेऊन, जनावरांचा पाठलाग सुरू केला होता. कळपातील एक शेळी तिच्या लहान बकराला दूध पाजताना, कळपापासून मागे राहिली आणि नेमकी लांडग्याच्या तावडीत सापडली. शेळी जीवाच्या आकांताने कळपाकडे पळाली म्हणून वाचली. मात्र तिच्या लहान गुबगुबीत बकराची मान एका लांडग्याने पकडली आणि त्याला घेऊन लांडगा डोंगराकडे पळाला. दुसरा लांडगा मात्र काहीच पकडू शकला नाही. कारण मेंढपाळांनी आरडाओरडा केला होता. वाड्यासोबतच्या कुत्र्यांनीही लांडग्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत लांडग्यांनी धूम ठोकली होती. लांडगे निम्मा डोंगर चढून जाण्यात यशस्वी झाले होते.

इकडे बयाबाईच्या अंगात देवीचा जोरदार संचार झाला होता. बयाबाई जोरजोरात घुमत होती. बायाबापड्यांची दर्शनासाठी लगबग सुरू होती. देवीला भंडारा, कुंकू लावले. घोडा हरवलेल्या व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी बयाबाईच्या तोंडून देवी बोलू लागली. ‘घोडा उद्या दुपारपर्यंत सापडेल. काळजी करू नको. सकाळी लवकर उठून, देवीची वटी (ओटी) भरायला मात्र विसरू नको,’ असं बयाबाईच्या अंगात आलेले देवी सांगू लागली. घोड्याच्या मालकाला समस्या सुटल्याचा आनंद झाला. त्याने बयाबाईच्या पायावर डोके ठेवले. देवापुढील अंगारा कपाळाला लावला आणि तो उभा राहिला. आता अनायसे देवी आलीच आहे तर, इतर बायाबापड्यांनीही आपापल्या समस्या बयाबाईच्या अंगात संचारलेल्या देवीला विचारायला सुरूवात केली. हे सवालजबाब चालू होते. तेवढ्यात हरवलेला घोडा लांबून, इतर घोड्यांच्या कळपाकडे येताना वाड्यावरील काही पोरांना दिसला.’ हरवलेला घोडा आला, हरवलेला घोडा आला,’ असा पोरांनी मोठ्याने गलका केला. मात्र बयाबाईच्या अंगात देवीचा संचार झाला होता आणि तिच्याशी इतर बायाबापड्यांचे सवालजबाब चालू होते. ‘हरवलेला घोडा परत आला,’ पोरांच्या ह्या ओरडण्याकडे बयाबाईने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे, तेथे जमलेल्या अनेकांच्या मात्र लक्षात आले होते.

- Advertisement -

लांडग्याने शेळीचे बकरू पळवून नेले आणि इकडे बयाबाईच्या अंगात देवीचा संचार झाला, अशा दोन्ही घटना जवळ जवळ एकाच वेळी घडल्या होत्या. हरवलेला घोडा कसा व कधी सापडणार, हे बयाबाईकडून घोड्याच्या मालकाला सांगून झाले होते. आता बायाबापड्यांचे प्रश्न सोडवण्यात देवी गुंतली होती. तेवढ्यात लांडग्याचा पाठलाग करून परतलेली मंडळी पुन्हा बयाबाईच्या दरबाराजवळ हजर झाली. लांडग्याने कोणाच्या शेळीचे बकरू पकडून नेले, अशी विचारणा इतर सगळ्यांनी त्यांना केली. तेव्हा लांडग्याचा पाठलाग करणारे म्हणाले की, ज्या शेळीचे बकरू लांडगा घेऊन गेला ती शेळी, बयाबाईच्या मालकीची आहे. हे मात्र बयाबाईला व्यवस्थित ऐकू आले. आणि लगेच बयाबाईच्या अंगात संचारलेली देवी तात्काळ अंतर्धान पावली. बयाबाईने त्या मेंढपाळांना तेथेच फैलावर घेतले. त्यांना शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. ‘माझ्या अंगात देवी आली होती. मी समस्या सोडवित होते. माझ्या शेळीवर तुम्ही का लक्ष ठेवलं नाही ? माझ्याच शेळीचं बकरू कसं काय लांडगा घेऊन गेला? तुम्ही ते सोडवून का नाही आणलं ? तुम्ही माझं हटकून नुकसान केलं आहे. आता मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्या देवीला तुमच्याकडे बघायला सांगते. अशा प्रकारची तिची धमकीवजा भाषा सुरू होती. बयाबाईच्या अंगात देवीचा संचार होतो, ह्या दबदब्यामुळे आणि भीतीपोटी मेंढपाळांना बयाबाईची ती धमकी ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

इकडे हरवलेला घोडा वाड्यावर सुखरूप परत येताना पाहून, घोडा मालक खूश झाला होता. त्याचा चेहरा उजळला होता. त्याच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. त्याने बयाबाईकडे पाहिले. तिला सांगितलं की, ‘देवी, माझा घोडा सापडला.’ बयाबाईने परत येत असलेल्या त्या घोड्याकडे नजर भरून पाहिले. घोंगडी वर ठेवलेला अंगारा स्वतःच्या उजव्या मुठीत घेतला. घोडा असलेल्या दिशेकडे तोंड करून, मूठ स्वतःच्या तोंडाजवळ नेली आणि मंत्र पुटपुटल्यासारखे केले. उजव्या हाताच्या मुठीतील थोडासा अंगारा डाव्या तळहातावर ठेवून, तो घोडा असलेल्या दिशेकडे बयाबाईने फुंकला. उरलेला अंगारा घोडा मालकाला देऊन सांगितले की, ज्या ठिकाणी तू घोडा बांधणार आहेस, त्याठिकाणी घोड्याच्या बाजूने गोल रिंगण करून, त्यावर हा अंगारा टाक. घोडा मालक खूश झाला होता. खिशात हात घालून, त्याने काही पैसे घोंगडीवर मांडलेल्या देवांसमोर ठेवले. आणि लगेच आपल्या लाडक्या जनावराला कुरवाळायला धावत निघाला.

बयाबाई थोडा वेळ शांत राहिली. इतर बायाबापड्यांनाही पुढील कामासाठी बिर्‍हाडांकडे निघायचचं होतं. एवढा वेळ शांत बसलेली बयाबाई अचानक हळूहळू हुंदके देऊन रडायला लागली. कशामुळे बरं बयाबाई हुंदके देत असावी? तिच्या लाडक्या शेळीचं बकरू लांडग्याने ओढून नेलं होतं. त्याचं दुःख तिच्या मनात एवढा वेळ तिनं साठवून ठेवलं होतं. त्याला मोकळी वाट करून द्यावी म्हणून तर बयाबाई रडत नसावी? की हरवलेला घोडा उद्या दुपारी सापडणार आहे, असं तिनं घोडा मालकाला ढोंगीपणा करून, अंगात आणून खोटं खोटं सांगितले म्हणून, पश्चात्ताप झाल्याने ती रडत होती, हे एकट्या बयाबाईलाच ठाऊक !!

मात्र ती रडू लागली आणि बिर्‍हाडावरील महिला तिचे सांत्वन करण्यासाठी पुन्हा गर्दी करू लागल्या. अंधाराचे साम्राज्य आता दाट पसरायला सुरुवात झाली होती. थोड्याच वेळात मेंढपाळांच्या संपूर्ण छावणीला अंधाराने त्याच्या विक्राळ पोटात ओढून घेतले. बिर्‍हाडा-बिर्‍हाडावर रात्रीच्या जेवणासाठी एका तीन दगडांच्या चुलीवर तवा ठेवला गेला. भाकरी थापण्याचा आवाज येऊ लागला. कालवण व इतर अन्न पदार्थ शिजविण्यासाठी दुसरी चूल पेटवलेली होती. बायाबापड्या चुलीचा जाळ पुढे मागे करीत होत्या.

तिकडे मेंढपाळांनी ही शेकोटी पेटवली होती. सर्वजण त्या शेकोटीच्या उजेडात एकमेकांच्या तोंडावर पडलेल्या प्रकाशात, नुकत्याच घडून गेलेल्या दोन्ही प्रसंगाचे भाव आणि बयाबाईच्या धमकीचे पडसाद टिपत होते. हळूहळू चर्चा पुढे पुढे सरकू लागली. बयाबाईच्या अंगात संचार झालेल्या देवीने सांगितले होते की, हरवलेला घोडा उद्या दुपारी सापडणार आणि तो तर सर्वांच्या डोळ्यासमोर आताच कसा काय वाड्याला परत आला ? नेमक्या तिन्हीसांजेला देवी वाड्याला आली असतानाच लांडग्यानी कळपावर हल्ला कसा काय केला ? बयाबाईच्या मालकीच्या शेळीचंच कोवळं लुसलुशीत बकरू लांडगा कसा काय घेऊन गेला ? यामागे काही तरी वेगळीच कारणं असली पाहिजेत, अशी शंका काहींनी व्यक्त केली. कोणती कारणं असावीत बरं यामागं? एका ज्येष्ठ मेंढपाळानं असा प्रश्न सर्वांना विचारला.

कोणी म्हणाले, तिन्हीसांजांची वेळ अशुभ असते. घोडा मालकाने ती वेळ निवडायलाच नको होती. कुणी म्हणाले, देवीची ओटी भरायला आपण विसरलो. काहींनी शंका उपस्थित केली की, देवी अंगात आली तेव्हा तेथे जमलेल्या अनेक बायांमध्ये एखादी दुसरी बाई ‘बाहेर’ तर बसलेली नसेल ना? त्यामुळेच देवीला विटाळ झाला असावा, म्हणून देवी कोपली असावी का?. वगैरे.

शेवटी उद्यापासून लांडग्याचा बंदोबस्त केला पाहिजे, सावध राहिले पाहिजे, शेळ्या मेंढ्या नीट सांभाळल्या पाहिजेत. यावर सगळ्यांचे एकमत झाले आणि रात्रीच्या जेवणासाठी सर्वजण आपापल्या बिर्‍हाडांकडे निघून गेले. काळाच्या ओघात बयाबाईचे निधन झाले. मात्र अंगारा, देव्हारा आणि भगतगिरी तिच्या जन्माअगोदरही चालूच होती. ती असतानाही भगतगिरी चालूच होती. आणि आज, बयाबाईच्या निधनानंतरही ती वाडी-वस्ती, मंदिर, दर्गा, पीर, मशीद, चर्च, विहार अशा अनेक ठिकाणी वेगवेगळी ढोंगं पांघरुण, अनेक प्रकारे प्रचंड तेजीत चालू आहे. दैनंदिन जीवनातील जवळपास सर्वच बाबतीत अस्थिरता असल्याने अनेक समस्यांची संख्या वाढली. त्यातील अनेक समस्यांची झटपट उत्तरं सर्वांनाच झटपट हवी असतात. अवैज्ञानिक पद्धतीने आणि दैववादी तोडगे करून ती मिळतात, असा रूढी प्रथा, परंपरांनी लहान वयापासूनच कुटुंबात केलेला, होत आलेला संस्कार आणि समज एवढा घट्ट झालेला असतो की व्यक्तीच्या मोठेपणी आपोआप समाजमन भोंदूगिरीकडे वळते. जिथे दिसेल तिथे अशा भोंदूगिरीला धाडसाने उघडे पाडणे आणि सातत्याने समाजाशी सुसंवाद ठेवून, समाजाला दैवी उपाय आणि दैववादी कर्मकांडांपासून दूर ठेवण्यासाठी सातत्याने प्रबोधित करीत राहणे, हेच सध्या तरी आपण करू शकतो. प्रत्येक सूज्ञ माणसाला असे करायला काय हरकत आहे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -