शो मस्ट गो ऑन

तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेले थिएटर पुन्हा सुरू झालेत, या दीड वर्षात थिएटरचे प्रेक्षक ओटीटीकडे वळल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यातच कोरोनाची भीती 50 टक्के आसन क्षमतेची अट आणि इतर अनेक निर्बंध यामुळे सूर्यवंशी सिनेमाला मिळणारा प्रतिसाद सर्वांसाठीच फार महत्वाचा राहील. पण हे सगळं बाजूला ठेवलं तर दिवाळीला रिलीज होणार्‍या हिंदी सिनेमांचा आणि त्याला मिळणार्‍या प्रतिसादाचा इतिहास पाहिला तर, तो निर्मात्यांसाठी नक्कीच सुखावणारा आहे.

वर्षाचे 365 दिवस सेलिब्रेशनच्या मुडमध्ये असलेल्या भारतीयांना केवळ सेलिब्रेट करण्यासाठी एक कारण हवं असतं आणि ते कारण जर दसरा दिवाळी सारखं असेल, तर मग बातच काही और… दिवाळी म्हटलं की आपल्याकडे एक वेगळीच मजा असते. फराळ, दिवे, खरेदी ह्या गोष्टी तर आहेच.. पण उत्सव साजरा करताना काही नवीन परंपरा देखील आपण पाळायला सुरुवात केलीय. अशीच एक परंपरा आपल्याकडे काही वर्षांपासून सुरू आहे. ती म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर बिग बजेट सिनेमे प्रदर्शित करण्याची आणि सहकुटुंब ते सिनेमे बघायला जाण्याची. कोरोनामुळे कधी नव्हे ते या परंपरेला मागच्या वर्षी खंड पडला होता, पण या वर्षी पुन्हा एकदा नव्या जोमाने ही परंपरा ब्रेकनंतर सुरू होत आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित होऊ घातलेला बहुचर्चित सूर्यवंशी सिनेमा या दिवाळीला प्रदर्शित होतो आहे.

बॉलिवूडला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या महाराष्ट्रात सिनेमागृहे सुरू झाल्यानंतर रिलीज होणारा हा पहिलाच मोठा सिनेमा असल्याने, या सिनेमाच्या यशावर आणि सिनेमाला मिळणार्‍या प्रतिसादावर येणार्‍या काळात प्रदर्शित होणार्‍या सिनेमांचं भवितव्य अवलंबून आहे. तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेले थिएटर पुन्हा सुरू झालेत, या दीड वर्षात थिएटरचे प्रेक्षक ओटीटीकडे वळल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यातच कोरोनाची भीती 50 टक्के आसन क्षमतेची अट आणि इतर अनेक निर्बंध यामुळे सूर्यवंशी सिनेमाला मिळणारा प्रतिसाद सर्वांसाठीच फार महत्वाचा राहील. पण हे सगळं बाजूला ठेवलं तर दिवाळीला रिलीज होणार्‍या हिंदी सिनेमांचा आणि त्याला मिळणार्‍या प्रतिसादाचा इतिहास पाहिला तर, तो निर्मात्यांसाठी नक्कीच सुखावणारा आहे.

दिवाळीला सिनेमा प्रदर्शित करून नफा मिळविण्याची परंपरा आपल्याकडे मोठी आहे. आजपासून 29 वर्षांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमे रिलीज करण्याची ही परंपरा सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. त्या आधीही काही सिनेमे दिवाळीला प्रदर्शित व्हायचे. पण स्पेशली दिवाळीची वाट पाहून बिगबजेट सिनेमे रिलीज करण्याचा हा ट्रेंड सुरू झाला तो 1993 सालापासून आणि तो सिनेमा होता बाजीगर. शाहरुख खानचा हा सिनेमा प्रचंड गाजला. त्याच्या पुढच्यावर्षी म्हणजेच 1994 साली अमीर आणि सलमान खानचा अंदाज अपना अपना दिवाळीला प्रदर्शित झाला खरा, पण दिवाळी संपायच्या आत थिएटरवरून निघून गेला. या उलट त्याच दिवशी रिलीज झालेला अक्षय कुमार आणि अजय देवगणचा सुहाग मात्र सुपरहिट ठरला. दि

वाळीच्या मुहूर्तावर मोठ्या अभिनेत्यांच्या सिनेमांचा क्लॅश सुरू झाला हा तेव्हापासून, पुढे 1995 साली शाहरुख आणि काजोलचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे दिवाळीला रिलीज झाला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद आपल्या सर्वाना माहिती आहे. दिवाळीला सुपरहिट सिनेमे देण्याची ही परंपरा पुढे 1996 साली राजा हिंदुस्तानी, 1997 ला दिल तो पागल है, 1998 साली कुछ कुछ होता है, 1999 साली हम साथ साथ है आणि 2000 साली मोहबत्ते या सिनेमांनी कायम ठेवली. पण 2001 ते 2003 पर्यंत सलग 3 वर्षे दिवाळीला रिलीज होणारा एकही सिनेमा थिएटरवर चालला नाही. या तीन वर्षात अजय देवगण, गोविंदा, संजय दत्त, सुनील शेट्टी यांचे सिनेमे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले होते. सिनेमे चांगले नसतील तर दिवाळीचा मुहूर्तदेखील तुम्हाला वाचवू शकत नाही, हे 3 या तीन वर्षात दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या प्रतिसादाने दाखवून दिले होते.

शाहरुख खान हा दिवाळीमध्ये गाजणारा सर्वात यशस्वी अभिनेता आहे असं म्हणायला हरकत नाही, दिवाळी रिलीजची सुरुवात याच अभिनेत्याच्या सिनेमाने झाली होती. 1993 साली आलेल्या बाजीगर नंतर 2000 सालापर्यंत दिवाळीला रिलीज होणारे सर्व सिनेमे हिट ठरत होते. दरम्यानच्या काळात 3 वर्षे सिनेमे फ्लॉप ठरत होते,तेव्हा पुन्हा शाहरुख खान इंडस्ट्रीसाठी शुभ ठरला आणि 2004 सालच्या दिवाळीला शाहरुखचा वीर झरा रिलीज झाला. नेहमीप्रमाणे शाहरुखच्या सिनेमाला लोकांनी गर्दी केली आणि सिनेमा सुपरहिट ठरला. पुढच्या वर्षी दिवाळीला म्हणजे 2005 साली गरम मसाला, 2006 साली शाहरुख खानचा डॉन, 2007 ओम शांती ओम. 2008 गोलमाल रिटर्न्स, 2009 ऑल द बेस्ट, 2010 गोलमाल 3 आणि 2011 साली रावन प्रदर्शित झाला. 2012 सालची दिवाळी हिंदी सिनेमा इंडस्ट्रीसाठी थोडी विशेष आहे, याला कारण देखील तसंच आहे. 2012 साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारे दोन्ही सिनेमे हिट ठरले, अजय देवगनचा सन ऑफ सरदार आणि शाहरुख खानचा जब तक है जान असे दोन्ही सिनेमे 2012 साली दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाले आणि दोन्ही सिनेमे प्रेक्षकांना आवडले, एकाच दिवशी रिलीज होणारे दोन्ही सिनेमे हिट होण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार होता.

दिवाळी आणि हिट सिनेमांचे हे समीकरण पुढेही कायम राहिले, 2013 साली क्रिश 3, 2014 हॅप्पी न्यू इयर, 2015 साली प्रेम रतन धन पायो, 2016 ए दिल है मुश्किल, 2017 साली सिक्रेट सुपरस्टार आणि गोलमाल अगेन, 2018 साली ठग्स ऑफ हिंदुस्थान आणि 2019 साली हाऊसफुल 4 हे सिनेमे प्रदर्शित झाले आणि त्यांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 2012 सालप्रमाणे 2017 मध्येही सिक्रेट सुपरस्टार आणि गोलमाल अगेन हे दोन्ही सिनेमे हिट ठरले होते. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सूर्यवंशी आणि मार्व्हलचा इटर्नल रिलीज होतो आहे. त्यातील सूर्यवंशी सिनेमा तर दीड वर्षांपासून प्रदर्शनाची वाट पाहत होता, अक्षय कुमार, रणवीर सिंह, अजय देवगण यांसारखी मोठी स्टारकास्ट असलेल्या रोहित शेट्टीच्या सिनेमाकडून बर्‍याच अपेक्षा आहेत. रोहित शेट्टी आणि दिवाळी हे देखील यशस्वी समीकरण आहे, त्याचेही चार सिनेमे यापूर्वी दिवाळीला रिलीज झाले आणि हिट ठरले. आता हा त्याचा पाचवा सिनेमा आहे जो दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. त्याला कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.