–कस्तुरी देवरुखकर
पावसाळा म्हणजे भटकंतीसाठी सांगावाच. या दिवसात वर्षासहलीच्या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात यथेच्छ भ्रमंती होते. ओसंडून वाहणारे शुभ्र धबधबे पाहिले की वाटते, मेघराजाच्या आगमनाचा उत्सव चहूदिशांना सुरू आहे. अशा धुंद वातावरणात कवी मनाने उचल न घ्यावी तर नवलच..! काव्य निर्मितीला पोषक असणारा हा वर्षा ऋतू. चाकरमान्यांसाठी काहीसा गैरसोयीचा, परंतु शेतकर्यासाठी तर हा वरूणराजा देवदूतच.
या अमृतधारात भिजून चिंब होणारे महिनेसुद्धा तितकेच आनंददायी आहेत. त्यातीलच महत्वाचा महिना म्हणजे श्रावण.
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे
बालकवींच्या काव्यातून उमटलेल्या या श्रावणसरी आजही मनामनात रूंजी घालतात. श्रावण म्हणजे सृष्टीसौंदर्याचा आरस्पानी खजिनाच म्हणावा लागेल. या महिन्यात धरती निसर्गाच्या विविध कलाविष्कारात नटलेली असते. ऊनपावसाचा तर पाठशिवणीचा खेळ सुरू होतो या हरितधरेच्या पटांगणात. लहानपणापासूनच श्रावण महिन्याविषयी विशिष्ट प्रकारचे आकर्षण आहे. या मासात हिरवळीच्या कुशीत डोंगरमाथ्यावर कडेकपारीतून वाहणार्या झर्यांचा मधुर खळखळाट ऐकू आला की असं वाटतं हरित वधू शृंगार करून हर्षाने मनमुराद हसतेय आणि चांदण रातीत तिचा चंदेरी शालू अधिकच चमकून उठतोय.
माझ्या बालपणी श्रावण महिना आला की आमच्या निवासस्थानी विविध धार्मिक ग्रंथांचे पारायण सुरू व्हायचे. संपूर्ण श्रावण महिना हे पारायण चालायचे. मनाला एक प्रकारची प्रसन्नता अनुभवता यायची. खरं तर श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल. श्रावणी सोमवार, शनिवार, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी वगैरे नुसता जल्लोषच. या सणासुदीच्या लगबगीमुळे अनेक पंचपक्वांनाचा आस्वाद घेता येतो.
श्रावणातील खास आकर्षण म्हणजे नवविवाहितेसाठी पर्वणी असणारी मंगळागौर. हा मंगळागौर पूजनाचा कार्यक्रम व त्यायोगे माहेरी रात्र जागवून खेळले जाणारे पारंपरिक खेळ हे तर आपल्या संस्कृतीचे प्रतीकच. श्रावणसर जशी मनामनावर अधिराज्य गाजवते तशीच सृष्टीच्या पायघड्यांवर आपलं सोनेरी पाऊलही उमटवते. या उल्हासमासाच्या निमित्ताने जनमानसाचे एकत्र येणे होते. आनंदाची देवाणघेवाण होते. निसर्ग आणि मानवाची मैत्री पुन्हा एकदा वृद्धिंगत होते आणि लेखणीतून कविता उमटते..
आला आला श्रावणमास..
घेऊन ही दिव्यांची आरास..
आला आला श्रावणमास
घेऊन सणांची रास..
नेसूनी हिरवा शालू , नटली धरती..
आनंदाने येई, सागरा भरती..
गर्द निसर्गाच्या छायेत, करावे मन शांत..
न जाणवे मनाला, विषयांची भ्रांत..
भाऊ बहिणीचे अतूट नाते
येई बहरास, रक्षाबंधन दिवसास..
कोली बांधवांना जागवी, सण नारली पुनवेचा..
होरी मोतियांची, दर्याला नारल सोन्याचा..
श्रावणासमवेत आली दहीकाला..
हर्ष तुषारात रंगते संधीकाला..
मनास येत असे लहर..
श्वासात केला सप्तसुरांनी कहर..
कातरवेळी होतसे मन आतूर..
माहेरी जाण्या लागे मनी चाहूल..
पिऊन ऊन कोवळे, धरती झाली पित..
रानावनात पक्षी, गातसे श्रावणगीत..
करूनी पंचप्राण ज्योत, मनमंदिरात दीप..
परमेश्वर येतसे, भक्तांच्या समीप..
आला आला श्रावणमास..
घेऊन ही दिव्यांची आरास..
आला आला श्रावणमास
घेऊन सणांची रास..
हल्ली समाज माध्यमातून असा संदेश फिरत असतो की, हे पूजा विधी वगैरे बंद करा, परंतु नाण्याची एकच बाजू पाहून कसे चालेल! जुन्या व नव्या विचारांची सांगड घालणे गरजेचे आहे. आपण जे पूजाविधी करतो त्यासाठी लागणारे जे साहित्य विकत घेतो त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह होत असतो. मग त्या प्रथा बंद करण्यापेक्षा प्रथा साजर्या करताना त्यासोबत समाजकार्य केले तर काय हरकत आहे?
काहीजणांचे असे म्हणणे असते की, गोरगरिबांना अन्नदान करा. अगदी श्रेष्ठ विचार आहे. अन्नदान जरूर करा, परंतु त्यासाठी आपले सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करायची काय गरज आहे? लग्नात डोईवर अक्षता पडल्यावर तांदूळ वाया जातात म्हणून आकांडतांडव करणारे, त्याच लग्नात बुफेच्या नावाखाली वारेमाप अन्न वाया जाताना पाहून कसे शांत बसतात?
शहरापेक्षा गावाकडील पाऊस मला अधिक आकर्षित करत आलाय. दुपारचं ओसरत चाललेलं ऊन हलकेच सावल्यांच्या थव्यांना बिलगून जाते, अचानक ढगाळ वातावरण चहूबाजूला पसरते अन् त्या पाऊस नामक राजाची वर्दी घेऊन थंडगार वार्याचा दूत मातीच्या घराच्या कौलारू खिडकीपाशी येतो. खेड्यामधली ती कौलारू घरे, अंगणात मोठ्या शिताफीने धपाधप ओघळणार्या पागोळ्या उल्हासित करतात. डोंगर माथ्यावरून डौलात उतरणारे झरे, ऐटीत परंतु संथ गतीने वाहणारी नदी, रानावनात, शेतात हिरवळीला फुटलेले चैतन्याचे धुमारे…ह्रदयाचा कब्जाच करतात. गावकडील अर्धवट डांबरी रस्त्यावरून खड्डे चुकवत धावणारी व प्रवाशांनी खचाखच भरलेली लाल परी (एसटी) पाहताना जाणवते ती मानवाने निसर्गाच्या कुशीत घेतलेली धाव.
हाच पाऊस उतारवयात मात्र आठवणींचे संदेश घेऊन येणारा पोस्टमनच वाटतो. बालपणात, कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणी सोबत अनुभवलेले अनेक पावसाळे व त्यातल्या ओल्या सुगंधी आठवांचा दरवळ जणू भिजलेल्या मातीतून येतोय असे जाणवायला लागते. अन् मग आठवते ती आईच्या हातची गरमागरम कांदाभजी, कागदी नावांची लावलेली शर्यत, कॉलेजमध्ये असताना एका छत्रीतून फिरण्यातली गंमत, बायकोच्या हातची गरमा गरम कॉफी, मुलांसाठी आवडीने आणलेली मक्याची कणसे, अन् पावसाने रंगवलेल्या अनेक गप्पांच्या बैठका…एखाद्या ओल्या सांजवेळी हा जीवनपट डोळ्यासमोरून सरकत जातो आणि मग सुरू होते, पाऊस अन् त्या थकलेल्या परंतु चिरतरूण नयनामधील धुंवाधार सरीमध्ये जुंपलेली अनाकलनीय शर्यत..!