-नारायण गिरप
सिद्धबेटामध्ये राहत असताना श्री विठ्ठलपंतांना त्र्यंबकेश्वर येथे जाऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याची इच्छा झाली नि ते सर्वांना घेऊन त्र्यंबकेश्वरी आले. त्या ठिकाणी घनदाट अरण्यातून मार्गक्रमण करीत असता व्याघ्राच्या डरकाळीने सर्वांची पळापळ झाली आणि त्यात निवृत्तीनाथ यांचा रस्ता चुकला. पुढे रस्ता शोधत, वाट काढत असताना त्यांना एक गुंफा लागली नि ते त्या गुंफेत शिरले. तिथे ध्यानस्थ असलेल्या गहिनीनाथांची त्यांची भेट झाली.
निवृत्तीनाथांना गुंफेत गुरू भेटले. गहिनीनाथांच्या सान्निध्यात राहून निवृत्तीनाथांनी साधना केली. गुरुकडे राहून ज्ञानग्रहण केले. आणि ते परत आळंदीला आले. तो गुरुप्रसाद त्यांनी बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला.यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा, समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमधील गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी प्राकृतामध्ये ‘ज्ञानेश्वरी’ (भावार्थदीपिका) लिहिली.
संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव समाधीस्थ झाल्यावर संत मुक्ताबाई ‘अन्नपाणी सकळ त्यागुनि’ परलोकवासी झाली. त्यानंतर संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सान्निध्यात त्र्यंबकेश्वरी इ.स.१२९७ ला (ज्येष्ठ वद्य११ शके१२१९)
षटतिला एकादशी दिवशी संजीवन समाधी घेतली. निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाचि होय। गयिनीनाथे सोय दाखविली॥ असे संत निवृत्तीनाथांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे. निवृत्तीनाथांना श्री गुरू गहिनीनाथांकडून महान अशा नाथपरंपरेचा वारसा लाभला होता. नाथपरंपरेचे निवृत्तीनाथ शिष्य होते. सुमारे ३००-४०० अभंग आणि हरिपाठ एवढी रचना संत निवृत्तीनाथांची आहे. योगपर, अद्वैतपर नि कृष्ण भक्तीपर असे हे अभंग आहेत.
संत निवृत्तीनाथांबद्दल असलेला आदर संत ज्ञानेश्वरांनी अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आढळतो. निवृत्तीनाथांनी आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले, असेही म्हटले जाते. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार, उत्तर गीताटीका असे तीन ग्रंथ निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. पण ते उपलब्ध असल्याचे दिसत नाहीत. धुळे येथील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधी बोध’ अशी हस्तलिखिते आहेत, ती निवृत्तीनाथांची असल्याचे सांगितले जाते.
संत निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक आहेत, म्हणून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. निवृत्तीनाथ समजून घ्यायचे तर अनेक संतांच्या हृदयस्थ भावनांना मन:स्पर्श करायचा तो भक्तीच्या ओथंबलेपणातून. सूर्य म्हणजे प्रकाशाची सहस्त्रावधी किरणे तसेच संत निवृत्तीनाथांचे ज्ञानस्वरूप, विश्व-आत्म-स्वरूप म्हणजे निवृत्तीनाथांचे व्यक्तिमत्त्वदर्शन! निवृत्ती हे तत्त्व आहे. गुरू तत्त्व स्वरूप असतात. संतांची भाव-एकवाक्यता अनुभूतीपूर्ण आहे. निवृत्तीनाथांनी व्यक्त केलेले भाव नामदेवांनी शब्दबद्ध करून ठेवले आहेत. या भावंडांविषयी संत नामदेव म्हणतात,
शिव तो निवृत्ति सोपान ब्रह्मास्थिती।
ज्ञानदेव मूर्ति विष्णूची हो॥ब्रह्मणी हे कळा माय मुक्ताबाई। विचारूनि पाही स्वयं मुक्ता॥
संत सेना महाराजांनीही निवृत्तीनाथांचे वर्णन केले आहे,
निवृत्ति निवृत्ति।म्हणता पाप नुरेची॥
जप करिता त्रिअक्षरी।मुक्ती लोळे चरणावरी॥
संत चोखोबा यांच्या अभंग गाथेतील संतांची आरती या प्रकरणात निवृत्तीनाथांचा उल्लेख निरंतर ब्रह्म आणि आनंदाचा पूर असा केलेला आढळतो.सर्व संतांनी निवृत्तीनाथांचे गुणगान केलेले आहे.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही वारकरी संप्रदायाची आद्यप्रवर्तन भूमी असून संत ज्ञानेश्वर, गुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांच्या उत्सव-यात्रेनिमित्त निघणार्या पालखी सोहळ्याचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वागत करण्यात येते. मंदिरात आलेल्या दिंड्यांद्वारे भजन, कीर्तन केले जाते. आलेले भाविक कुशावर्त गोदावरी स्नान करून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेतात.टाळ-मृदुंगांच्या गजरात अवघं नाशिक दुमदुमून निघतं.
त्र्यंबकेश्वरी नगरीत संत निवृत्तीनाथांच्या संजीवन-समाधी सोहळ्यानिमित्त संस्थान कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, जागर, संगीत, भजन तसेच आठ दिवस अगोदर ग्रंथ पारायणे मोठ्या प्रमाणात होत असतात. संजीवन समाधी मंदिरात पुढे संत निवृत्तीनाथांची समाधी आणि मागे विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आहे. निवृत्तीनाथांचे हे समाधी-मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे.
धन्य धन्य निवृत्ति देवा।
काय महिमा वर्णावा॥१॥
शिवे अवतार धरून।
केले त्रैलोक्य पावन॥२॥
समाधी त्र्यंबकशिखरी।
मागे शोभे ब्रह्मगिरी॥३॥ निवृत्तिनाथांचे चरणी।
शरण एका जनार्दनी॥४॥
असे संत एकनाथांच्या अभंगातून गुणगान गात राज्यांसह परप्रांतातून आलेले लाखो भाविक संत निवृत्तीनाथांच्या चरणी लीन होतात. महिनाभरापासून घर सोडून दूर शेकडो मैल टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘विठू माऊली’चा, संतांच्या नामाचा जयजयकार करीत पालखी घेऊन चालत आलेला वारकरी कुशावर्तात गोदामाईच्या स्पर्शाने आणि नाथांच्या संजीवन समाधी दर्शनाने कृतार्थ होतो. समस्यांनी त्रासलेला असतानाही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या दर्शनाची ओढ त्यास दूर ठेवू शकली नाही, याची प्रचिती भक्तांची ही मांदियाळी पाहून येते.