घरफिचर्ससारांशश्यामची आई कालची आणि आजची

श्यामची आई कालची आणि आजची

Subscribe

श्यामची आई ही काळाच्या ओघात विसरली जाऊ शकत नाही तर ती काळाच्या बरोबर जाते. आजच्या काळाला श्यामची आई पूरक आहे. आजच्या काळात जिथे शब्दाला फार शिरकाव करायला मिळत नाही, ईमोजीच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या काळात शब्द किती महत्वाचे आहेत हे श्यामची आईच्या माध्यमातून कळण्यासारखे आहे. श्यामची आई श्यामशी सतत बोलत होती. ती त्याचाशी नेहमी संवाद साधत होती. आजच्या काळात मला वाटतं मुलांशी संवाद साधने गरजेचे आहे. मुलांना जो शाब्दिक स्पर्श हवा आहे तो श्यामच्या आईने आपल्या मुलाला दिला आहे. त्यातून श्याम घडला.

1933 साली नाशिकच्या तुरुंगात स्वातंत्र्य चळवळीतील सहभागावरून शिक्षा भोगत असताना साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ ह्या पुस्तकाची निर्मिती केली. जीवनातल्या अनेक घटना, प्रसंग, त्यातून मिळणारी शिकवण आणि त्यातून आजच्या पिढीला मातृहृदयाने जे सांगायचे आहे, त्याची सांगड घालून साने गुरुजींनी हे पुस्तक लिहिले. सश्रद्ध आणि बाळबोध कुटुंबात हयात गेलेल्यांना श्यामच्या आईची शिकवण आजच्या काळात कशी लागू पडेल किंवा त्यातील अतीभावनापूर्ण प्रसंगातून मिळणारे बोध आजच्या काळात लागू पडतील का?, मुळात मूल्यशिक्षणावर बेतलेले हे पुस्तक गुरुजींनी अतिशय संवेदनशीलतेने लिहिले आहे. त्या संस्काराची शिदोरी गुरुजींना आणि त्यानंतरच्या अनेक पिढ्यांना कशी पुरून उरली आणि आजच्या एकविसाव्या शतकाच्या दुसर्‍या दशकातदेखील ही आई कशी टिकून आहे किंवा काळाच्या ओघात ती संकल्पना पुसली गेली का, हे अनेक प्रश्न उभे रहातात.

‘श्यामची आई’ पुस्तकातील अनेक प्रसंग जेव्हा वाचतो तेव्हा त्या प्रसंगांचा आजच्या आधुनिक काळाशी कसा संदर्भ लागू शकतो याचा विचार करताना अनेक प्रसंग वानगीदाखल घेता येतील. आजच्या काळात शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा किंवा नोकरीच्या निमित्ताने अनेक मुले बाहेरगावी, परमुलुखात किंवा परदेशात आहेत, त्यावेळी ह्या संस्काराचे बीज कसे उपयोगी पडते किंवा ही शिदोरी किती उपयोगी असेल याचे उदाहरण म्हणजे श्यामने घरी आलेल्या पाहुण्याच्या खिशातील आणा चोरला तेव्हा आईने सुनावलेले बोल. नंतरच्या काळात गुरुजी शिक्षणासाठी पुण्याला असताना अनेक कठीण प्रसंगातून गेले. प्रसंगी उपाशी रहाण्याचे प्रसंग आले, पण आईने दिलेली चोरी न करण्याची शिकवण ही कायम मनावर राहिली किंवा दापोलीच्या शाळेत शिकत असताना केस वाढवून घरी आलेल्या श्यामला केस वाढवणे म्हणजे मोह नव्हे का, हा साधा प्रश्न विचारून त्याची उकल करताना ह्या मोहाला बळी न पडता आयुष्यात कोणते ध्येय गाठता येऊ शकते याची शिकवण ह्या प्रसंगातून मिळते. आज मोह पडेल इतकी कितीतरी ठिकाणे बाहेर उपलब्ध आहेत. त्यापासून लांब रहाणे मुलांना कसे जमेल, त्यात पिअर प्रेशरसारखा घटक सगळ्यांच्या मानगुटीवर बसलेला असेल तेव्हा हा मोह आईच्या शिकवणुकीने टाळता कसा येऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आजच्या घडीला आहे.

- Advertisement -

गुरुजी हे प्रचंड संवेदनशील व कमालीचे भावूक होते. त्यातील अजून एक प्रसंग आजच्या काळात कसा लागू पडू शकतो यासाठी एका प्रसंगाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. दापोलीच्या शाळेत असताना सुट्टीच्या दिवशी श्याम घरी आला तर यशोदाबाई त्याला आपल्या घराच्या कामात मदत करायला सांगायच्या तेव्हा एखाद्यावेळी श्यामने काम करण्यास किंवा कामात मदत करण्यास नापसंती दाखवली तेव्हा त्याबद्दल श्यामला आईने विचारले असता मी घरकाम करतो म्हणून माझे मित्र मला हसतात. यावर आईने दिलेले उत्तर आजच्या किंवा यानंतरच्या काळातल्या अनेक जोडप्यांना लागू पडेल. आजच्या आधुनिक काळात ज्यावेळी नवरा आणि बायको दोघेही नोकरीनिम्मित बारा-चौदा तास बाहेर असतात. दोघेही एका ठराविक मुदतीच्या कामासाठी जुंपून घेतात तेव्हा घरातील कामे कोणी करायची याबाबत जेव्हा विचार केला जातो, तेव्हा बारा-चौदा तास काम करून येणारी स्त्री, आजच्या काळात पुरुषाने तिला कामात मदत करावी ही अपेक्षा करणे मुळीच चुकीचे होणार नाही. मला वाटते हा यशोदाबाईचा विचार आजच्या काळात किती चपखल बसतो. यात दूरदृष्टीपणा म्हणता येणार नाही, पण अर्धनारी नटेश्वराचे प्रतिक घेऊन स्त्री पुरुष समानता हा मुद्दा शंभर वर्षापूर्वी यशोदाबाईंनी श्यामच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला.

बंधुप्रेमाची शिकवण देताना आजच्या काळात कितीतरी उदाहरणे देता येतील, ज्यामुळे शुल्लक व्यवहारामुळे भावाभावात वितुष्ट आलेले आढळेल. काळाच्या पुढे हा विचार मांडताना ही केवळ बंधुप्रेमाची शिकवण नव्हती तर ती विश्वबंधुत्वाची शिकवण होती असे म्हणावे लागेल. अर्थात या सगळ्या संस्कारामुळे गुरुजींचे मन खूपच संवेदनशील झाले, त्यामुळे जगाकडे बघण्याचा गुरुजींचा दृष्टीकोन हा अधिक मानवतावादी होत गेला असावा. त्यामुळे आपले अपत्य असे असावे हे आजच्या काळातल्या आईला वाटत असेल तर श्यामची आई हे आजच्या स्त्रीला विद्यापीठ वाटावे.

- Advertisement -

आजच्या काळात जेव्हा मुलांना काही खरचटले तरी त्याचा बाऊ करताना किंवा शिक्षकांनी मुलाला ओरडले तर शाळेत येऊन त्या शिक्षकाची तक्रार करताना कुठल्या आईला बघितले की, मला श्यामच्या आईची भूमिका फार महत्वाची वाटते. आजच्या काळात मुलांना थोडे खंबीर बनवायचे असेल, आजच्या परिस्थितीत झगडायला शिकवायचे असेल तर आईला थोडे कणखर व्हावे लागतेच, त्यामुळे आपल्या मुलाला पोहायला येत नाही किंवा विहिरीत पोहायला जायला आपला मुलगा घाबरतो ते जेव्हा यशोदाबाईंच्या लक्षात येते तेव्हा काठीने मारत मारत श्यामला आई विहिरीपर्यंत घेऊन जाते. त्याला कोणी भित्रा म्हणू नये किंवा भीतीची छाया मनावर राहू नये म्हणून श्यामची आई किती प्रयत्नशील होती. एकदा भीतीची छाया नष्ट झाली की, माणूस कोणत्याही प्रसंगी खंबीर राहू शकतो. कोणत्याही कठीण प्रसंगी तो भांबावून जात नाही. आजच्या काळात एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर मुलं लगेच डिप्रेशनमध्ये जातात. याचे कारण असे की, मुलांना गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत नव्हे तर त्या पालकांकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. इथे श्यामची आई खूप वरचढ ठरते. मुलाला ह्या भीतीचा वारा लागू नये म्हणून तिचे ते वागणे किती बरोबर होते किंवा आहे हे आजच्या काळात लक्षात येण्यासारखे आहे.

एक वृद्ध स्त्री लाकडाची मोळी घेऊन विकायला चालली होती त्यावेळी गुरुजींच्या मनावर विश्वबंधुत्वाची समज देणारी आई कालबाह्य कशी होऊ शकेल. आजच्या काळातही दलित बांधवावर होणारे अन्याय बघून सत्तर वर्षापूर्वी पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मोकळे व्हावे यासाठी झटणार्‍या साने गुरुजींना ही प्रेरणा कुठून मिळाली असेल तर याठिकाणी लहानपणी केलेले आईचे संस्कार पुन्हा पुन्हा डोकं वर काढताना दिसतात. स्वतःचा स्वाभिमान कसा जपावा याचे उदाहरण द्यायचे झाले तर पुन्हा श्यामच्या आईकडे लक्ष वेधले जाते. पैसे वसुली करण्यासाठी सावकार घरात आला तेव्हा वाटेल ते बोलून तो सगळ्यांना दुखवू लागला. सोशिकपणा हा स्थायीभाव असणार्‍या यशोदाबाई याप्रसंगी मात्र पेटून उठतात. सत्तेच्यापुढे किंवा सत्ताधीशाच्या पुढे शरण न जाता त्याला ठणकावून सांगणारी आई आजच्या काळात किती महत्वाची ठरते. आपल्या स्त्रीत्वाचा अपमान होतोय असे जेव्हा लक्षात येते तेव्हा स्त्री म्हणून यशोदाबाईंनी घेतलेली भूमिका ही स्त्री म्हणून किती महत्वाची ठरते, हे लक्षात घ्यावे लागते. आज कामाच्या ठिकाणी स्त्री शोषण होते हे आपण पाहतो, ऐकतो पण त्याच्या विरुद्ध आपण कसे उभे राहतो हे आज महत्वाचे ठरते.

श्यामची आई ही काळाच्या ओघात विसरली जाऊ शकत नाही तर ती काळाच्या बरोबर जाते. आजच्या काळाला श्यामची आई पूरक आहे. आजच्या काळात जिथे शब्दाला फार शिरकाव करायला मिळत नाही, ईमोजीच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या काळात शब्द किती महत्वाचे आहेत हे श्यामची आईच्या माध्यमातून कळण्यासारखे आहे. श्यामची आई श्यामशी सतत बोलत होती. ती त्याचाशी नेहमी संवाद साधत होती. आजच्या काळात मला वाटतं मुलांशी संवाद साधने गरजेचे आहे. मुलं बोलती झाली पाहिजेत. त्यांना आपला विचार मांडता आला पाहिजे. मुलांना जो शाब्दिक स्पर्श हवा आहे तो श्यामच्या आईने आपल्या मुलाला दिला आहे. त्यातून श्याम घडला.

आजच्या काळात श्यामची आई कशी उपयोगी पडेल तर तिच्याकडे असणारी सोशिकता पण स्वाभिमान, मुलाच्या संस्काराबद्दल असणारी कणव, त्याला आपले ध्येय काय आहे त्यासाठी त्याच्या मनाची तयारी करून घेणे हेच गुण लक्षणीय ठरतात. आजच्या करीअरच्या प्रश्नाला ध्येय ठेवले तर ते हस्तगत करायला आजच्या काळातल्या आईला असेच उभे राहावे लागेल. त्याचबरोबर त्याच्यामागे संस्काराची जोड कायम तशीच द्यावी लागेल. काळाबरोबर साधने बदलतील, पण साध्य मात्र तेचं राहिलं हे सांगताना श्यामची आई अजूनही त्या बदलत्या काळातल्या आईंचा पाया आहे हे मात्र खरे !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -