घरफिचर्ससारांशती ‘एकल’ आहे म्हणोनी...

ती ‘एकल’ आहे म्हणोनी…

Subscribe

सर्वसामान्य स्त्री-पुरुषांची एकल स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता एकवेळ बाजूला ठेवू, पण न्यायदान करणार्‍या न्यायधीशांचा, नोबेल प्रोफेशन समजल्या जाणार्‍या डॉक्टरांचाही दृष्टिकोन किती बुरसटलेला, सनातनी आणि रोगट आहे हे वाचून प्रचंड धक्का बसतो. उत्कृष्ट अंगणवाडी सेविकेचा पुरस्कार मिळालेल्या एका उंच, दणकट शरीरयष्टीच्या स्त्रीला पोलिसाने तू बाई आहेस की हिजडा म्हणून दिलेला त्रास वर्दीच्या अरेरावीचा कहरच आहे.

–प्रवीण घोडेस्वार

महिलांच्या समस्यांवर सजगपणे काम करणार्‍या अभ्यासक आणि कार्यकर्त्या रेणुका कड यांचं ‘एकल महिलांचे चर्चाविश्व’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालंय. औरंगाबादच्या सौरव प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार दीप्ती राऊत यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. आपल्या समाजात स्त्रियांचे म्हणून अनेक प्रश्न, समस्या अस्तित्वात आहेत. पराकोटीची विषमता आणि विविधता आढळून येणार्‍या भारतीय समाजात स्त्री प्रश्न हा एकजिनसी नाही. इथं बालिकांचे प्रश्न आहेत, तरुणींचे प्रश्न आहेत, मध्यमवयीन बायकांचे प्रश्न आहेत. ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलांचे प्रश्न आहेत. ग्रामीण-शहरी-निमशहरी-महानगरीय अशी भौगोलिक वर्गवारीही आहेच. शिवाय जात-धर्म-आर्थिक स्थितीशी निगडित स्त्रियांचे प्रश्न आहेत. विधवा, परितक्त्या महिलांचे प्रश्न आहेत.

- Advertisement -

अलीकडच्या काळात प्रकर्षाने पुढे आलेला अजून एक प्रश्न म्हणजे एकट्या राहणार्‍या अर्थात एकल महिलांचा प्रश्न. एकल स्त्रियांना समाजात वावरत असताना भेडसावणार्‍या समस्या-अडचणी-प्रश्नांचा वेध या पुस्तकातून घेतला आहे. यातल्या सार्‍या घटना, हकिकती, प्रसंग, अनुभव, माणसं म्हणजे जळजळीत वास्तव होय. फक्त संबंधित बायकांची ओळख जाहीर होऊ नये म्हणून त्यांची नावं बदलली आहेत. ह्या एकल स्त्रिया म्हणजे परंपरागत पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या बळी आहेत. ही (अ)व्यवस्था इतकी सर्वव्यापी आहे की ती अशिक्षित-शिक्षित-अल्पशिक्षित-उच्चशिक्षित, गावं-शहरं-महानगरं, उच्चवर्ग-मध्यमवर्ग-कनिष्ठवर्ग, हिंदू-मुस्लीम असा कोणताही भेद मानत नाही. इथं आपण सारे भारतीय एक आहेत याचा प्रत्यय येतो.

पुस्तकातल्या बहुतांश कहाण्या मराठवाडा परिसरातल्या असल्या तरी इतर भागातही थोड्याफार फरकाने परिस्थिती अशीच आहे, असं म्हणता येतं. दीप्ती राऊत यांनी ‘वृंदावनाची वेदना’ या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ‘हा प्रश्न परितक्त्या, विधवा एकल स्त्रियांचा नसून प्रौढ कुमारिका, कुमारी माता, घटस्फोटीता, देशभरातल्या वॉर विडोज, काश्मिरातल्या हाफ विडोज, फार्म विडोज, कोविड विडोज अशा अनंत छटा घेऊन आज आपल्या समाजापुढे उभा ठाकला आहे. या सर्व एकल महिला समूहास आणि आवाजास ताकद देण्याच्या या प्रक्रियेत रेणुका कड यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.’ एकल स्त्रियांच्या प्रश्नावर केवळ लेखन करून न थांबता रेणुका कड या महिलांच्या अधिकार-हक्कांसाठी, त्यांच्या शोषणाविरोधात उपाययोजनेसाठी लढत असतात.

- Advertisement -

राज्यातल्या विविध स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या सहयोगाने एकल स्त्रियांसाठी स्वतंत्र धोरणाचा मसुदा तयार करण्यात कड यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शिवाय त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीतदेखील या प्रश्नाची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. आशा केंद्र, आशा एकल महिला व बाल मंच या संस्थांच्या माध्यमातून त्यांचं कार्य सुरू आहे. या महिलांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचं आर्थिक सबलीकरण करणे यासाठी लेखिका निरंतर काम करताहेत. शासनाच्या आकडेवारीनुसार देशात एकल स्त्रियांची संख्या सुमारे सात कोटी आहे. महाराष्ट्र यामध्ये दुसर्‍या स्थानावर आहे. एवढ्या मोठ्या समूहाच्या प्रश्नाकडे राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर दुर्लक्ष करून चालणारे नाही. त्यांच्यासाठी देशपातळीवरसुद्धा स्वतंत्र धोरण आखण्याची तातडीची गरज आहे. महाराष्ट्रात याविषयी काम सुरू झालंय याचं समाधान वाटतं.

पुस्तकातून भेटणार्‍या अहिल्या, संगीता, अरुणा, बबिता, विजया, चैताली, नीता, रहेना, सामिया तुमच्या-आमच्या आजूबाजूलाच आहेत. आपल्या घरात, कुटुंबात, शेजारी, वसाहतीत, कामाच्या ठिकाणी त्या दिसतात, पण ज्या अपमान, अवहेलना, शोषण, उपेक्षा, अगतिकता, सामाजिक दुरावा यांना त्या सामोरे जातात त्याकडे आपण डोळेझाक करतो याचं वाईट वाटतं. एखादी स्त्री विधवा झाली म्हणजे ती अपशकुनी, एखाद्या स्त्रीने घटस्फोट घेतला म्हणजे ती वाईट चालीची, एखादी स्त्री लग्न न करण्याचा निर्णय घेते म्हणजे तिचा लग्नसंस्थेवर विश्वास नाही, लग्नाशिवाय स्त्रीच्या आयुष्याला पूर्णत्व नाही, स्त्री विधवा-घटस्फोटीता-परितक्त्या आहे म्हणजे लैंगिक संबंधांसाठी पुरुषांना उपलब्ध आहे, आपल्या कार्यालयीन पुरुष सहकार्‍यांशी हसत-खेळत वर्तन करते, तिला मित्र आहेत म्हणजे ती चारित्र्यहीन आहे, लग्न झालं म्हणजे तिचा नि माहेरचा संबंध संपला, लग्नानंतर तिने आईवडिलांच्या संपत्तीवर हक्क दाखवू नये, ह्या धारणा आजही बदललेल्या नाहीत.

हेच यातल्या कहाण्यांमधून दिसून येतं. ही आपल्या समाजाची दारूण शोकांतिका आहे. थोडक्यात काय तर स्त्रीच्या आयुष्यात नवरा म्हणून पुरुष असणं अनिवार्यच! स्त्री एकटी जगू शकत नाही. राहू शकत नाही. किंबहुना तिने एकटे राहायला नको. एकटे जगायला नको. हे म्हणजे सरळ सरळ जीवन जगण्याच्या तिच्या मूलभूत हक्कावरच गदा आणणारे आहे. एकटी /एकल स्त्री म्हणून तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, तिला येणारे अनुभव, तिची होणारी निर्भत्सना म्हणजे तिच्या मानवी हक्कांचे उल्लंघनच आहे.

सर्वसामान्य स्त्री-पुरुषांची एकल स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता एकवेळ बाजूला ठेवू, पण न्यायदान करणार्‍या न्यायधीशांचा, नोबेल प्रोफेशन समजल्या जाणार्‍या डॉक्टरांचाही दृष्टिकोन किती बुरसटलेला, सनातनी आणि रोगट आहे हे वाचून प्रचंड धक्का बसतो. उत्कृष्ट अंगणवाडी सेविकेचा पुरस्कार मिळालेल्या एका उंच, दणकट शरीरयष्टीच्या स्त्रीला पोलिसाने तू बाई आहेस की हिजडा म्हणून दिलेला त्रास वर्दीच्या अरेरावीचा कहरच आहे. त्या स्त्रीने वरिष्ठांकडे तक्रार करून माफी मागायला लावली, पण यात तिला झालेला मनस्ताप, खर्ची पडलेला वेळ याचं काय?

पाणी, शेती आणि एकल महिला, एकल महिला आणि संपत्तीचा हक्क, एकल महिला आणि मानसिक आरोग्य, सिंगल मदर्स, प्रश्न कोविड विधवांचे या लेखांमधले वास्तव सुन्न करणारे आहे. एकल महिलांच्या बाबतीत समाज किती असंवेदनशील, क्रूर, दुष्ट आहे ही वस्तुस्थिती अस्वस्थ करणारी आहे. ‘महिलांचे जिणे उद्ध्वस्त करणारा निर्णय-नोटबंदी’ या लेखातलं गरीब-श्रमजीवी-कष्टकरी-मजूर स्त्रियांच्या वाटेला आलेल्या यातना, हाल-अपेष्टांचं वर्णन मन हेलावणारे आहे. ‘एकल महिलांचे लैंगिक अधिकार’ या लेखातून एका मूलभूत प्रश्नाला हात घातल्याबद्दल लेखिकेचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. आपल्याकडे लैंगिकतेवर बोलणंही पाप, गलिच्छ, घाणेरडे, अनैतिक समजलं जातं. त्यामुळे हक्क, अधिकार वगैरे तर खूप दूरच्या गोष्टी.

या प्रश्नावर दिल्लीतली ‘हय्या’ नावाची संस्था काम करते. संस्थेने ‘अविवाहित स्त्रियांच्या लैंगिक आरोग्य अधिकारांचे रक्षण’ करण्यासाठी डॉक्टरांसाठी निर्देश तयार केले जावेत, अशी मागणी केली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. तहान-भूक-विश्रांतीइतकीच लैंगिक सुख हीदेखील मानवाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे एकल स्त्रियांनाही हे सुख उपभोगण्याचा हक्क आहे हे मान्य करायला हवं. एकल स्त्रिया स्वकर्तृत्वावर यशस्वी होत असतील तर ते स्वीकारणे समाजाला फार जड जातं. स्त्रियांची मेहनत, हुशारी पुरुषसत्तेला सोयीनुसारच आवश्यक असते हे यातून स्पष्ट होतं. एकल स्त्रियांच्या प्रश्नांचं सम्यक आकलन होण्यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -