घरफिचर्ससारांशझोपड्या वाढताना, फेरीवाले माजताना शिवसेनेने डोळ्यावर पट्टी बांधलीय...!

झोपड्या वाढताना, फेरीवाले माजताना शिवसेनेने डोळ्यावर पट्टी बांधलीय…!

Subscribe

आज मराठी माणसांबद्दल शिवसेनेला थोडीतरी आपुलकी असती तर परवडणारी घरे उभारली असती. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी ते करून दाखवले आहे. गोरेगावला नागरी निवारात गरीब माणसांना परवडेल असे मोठे गृहसंकुल उभारल्याने आज अनेक मराठी माणसे स्थिरावली. असे शिवसेनेला कधी का वाटले नाही. मराठी माणसांसाठी परवडणारी घरे बांधली असती तर आज गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी ‘उद्धव ठाकरे आपडो’ असे कार्यक्रम घ्यावे लागले नसते. अनेक सरकारी आणि महापालिकेचे मोकळे भूखंड, कांदळवने, खाड्या झोपड्या गिळंकृत होत असताना शिवसेनेने डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि आताही बांधली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी याच महिन्यात असतील. देशातील सर्वात श्रीमंत अशा सुमारे 40 हजार कोटींचे बजेट असलेली ही महापालिका आपल्या हाती असावी यासाठी शिवसेना आणि भाजप हे आतापासून एकमेकांच्या समोर उभे असून आरोप-प्रत्यारोपांचे खेळ सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेवर बोचरी टीका करण्यात मनसेसुद्धा मागे नाही. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर राज्य करणार्‍या शिवसेनेची खरी ताकद याच सत्तेत आहे. मुंबई महापालिकेची सत्ता म्हणजे शिवसेनेचा प्राण आहे आणि हे त्यांच्या विरोधकांनाही पुरते माहीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात अनेक वर्षे सत्ताकारण करत असूनही मुंबईवरील शिवसेनेच्या वर्चस्वाला त्यांना कधी हात लावता आला नाही. हे ठरवून होते का, असा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा शंका घ्यायला अनेक कारणे सापडतात. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची थोडीफार धडपड जाणवते तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने तर आपला पायाच मुंबईत उभा केला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील मैत्रीमुळे राज्य आम्ही सांभाळतो, मुंबई महापालिका तुम्ही बघा… असा अलिखित करार असावा कदाचित. राजकारणात पडद्याच्या मागे अनेक गोष्टी घडत असतात.

एका छोट्या राज्याचे बजेट असलेली मुंबई महापालिका ताब्यात असूनही पुरेशा नागरी सुविधा तुम्ही या शहराला देऊ शकत नाही. या शहराच्या नियोजनाचा आराखडा तुमच्याकडे नाही, मग करांच्या रूपात कोट्यवधींचा निधी जमतो तो जातो कुठे? अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भरवशावर मुंबईला सोडून शिवसेना फक्त मराठी माणसांच्या नावाने गळे काढणार असेल तर आता हा भुलभुलैय्या फार काळ चालणार नाही. कारण आता तुमचा एकेकाळचा मित्रपक्ष भाजप मोठ्या ताकदीने उभा राहिलाय. मागच्या वेळी दोन चार नगरसेवकांच्या फरकाने शिवसेनेला सत्ता मिळाली असली तरी ती एक तडजोड होती. राज्यातील युतीचे सरकार नीट चालावे म्हणून फडणवीस यांना एक पाऊल मागे घेण्याचा मोदी-शहा यांच्याकडून मिळालेला आदेश होता.

- Advertisement -

अन्यथा चार पाच नगरसेवक फोडून भाजपने कधीच सत्ता मिळवली असती. लोकांचा कौल विरोधात जाऊनही आमदार फोडून देशभरात राज्ये मिळवणार्‍या भाजपचा मुंबईची सत्ता हा डाव्या हाताचा खेळ ठरला असता. 2017 साली ते मुद्दामहून करण्यात आले. 2022 साली मात्र तसे नसेल. शिवसेनेकडून सत्ता काबीज करण्यासाठी भाजप जीवाचे रान करणार हे ठरलेले आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपची फौज मुंबईत उतरेल. खरेतर भाजपची पुढच्या वर्षीच्या निवडणुकीची तयारी कधीच सुरू झाली आहे. विरोधकांनी त्यांच्या नावाने कितीही खडे फोडले तरी निवडणुका जिंकण्याचे तंत्र-मंत्र आता त्यांना इतरांपेक्षा अधिक चांगला कळाला आहे. निवडणुका फक्त पैशाच्या जीवावर आणि ईव्हीएमच्या जीवावर जिंकता येत नाहीत. अजूनही पैसे न घेता मतदान करणारे खूप लोक या देशात शिल्लक आहेत.

शिवसेनेसमोर फक्त भाजप नाही तर मनसेचेही आव्हान असणार आहे. भाजपसोबत मनसेने युती केली तर हिंदुत्व आणि मराठी असे दोन विषय एकत्र तर येतील, शिवाय नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा हे दोन्ही पक्ष ऐरणीवर आणतील. मराठी माणसांच्या अस्मितेला फुंकर घालून मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न शिवसेना बघत असेल तर ते स्वप्नांच्या दुनियेत जगत आहेत, असेच म्हणावे लागेल. आज मुंबईत मराठी टक्का तीसच्या आसपास उरला आहे. 1982 च्या गिरणी कामगार संपानंतर मराठी माणूस हळूहळू मुंबईतून परागंदा होत गेला. आधी तो कोकण आणि घाटावर निघून गेला आणि गेल्या दोन दशकात विरार, पालघर, बदलापूर, अंबरनाथ, पनवेलला जीव जगवण्यासाठी निघून गेला. मग आता मुंबईत गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, बिहारी, अल्पसंख्याक मोठ्या संख्येने तळ ठोकून आहेत. गुजराती, मारवाडी यांच्याकडे पैसा असून गिरगाव, लालबाग, परळ, शिवडी, वरळी, प्रभादेवी या एकेकाळच्या मराठीबहुल भागात आता ते मोठ्या संख्येने स्थिरावले आहेत. तर उत्तर भारतीय, बिहारी आणि अल्पसंख्याक यांची कुठेही आणि कशीही राहण्याची तयारी असल्याने ते बिनधास्त आहेत. एका झोपडीवर आणखी चार झोपड्या चढवून ते मजेत जगत आहेत. उलट आणखी कांदळवने तोडून, खाड्या बुजवून, मैदाने गिळंकृत करून झोपड्या बांधल्या जात आहेत का, याची ते वाट पाहत आहेत.

- Advertisement -

त्यांना उत्तर प्रदेश, बिहार आणि भारताच्या कानाकोपर्‍यातून आपली माणसे बोलवायची आहेत. बरोबर बांगलादेशीसुद्धा आणायचे आहेत. कारण शिवसेनेने डोळ्यावर पट्टी बांधलीय. ते सत्तेत मश्गुल आहेत. मराठी माणूस जगला काय, मेला काय काहीच सोयरसुतक नाही. फक्त निवडणुका आल्या की आवाज कोणाचा… मराठी माणसांचा… असे बेंबीच्या देठापासून ओरडायला हे तयार. आज मराठी माणसांबद्दल शिवसेनेला थोडीतरी आपुलकी असती तर परवडणारी घरे उभारली असती. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी ते करून दाखवले आहे. गोरेगावला नागरी निवारात गरीब माणसांना परवडेल असे मोठे गृहसंकुल उभारल्याने आज अनेक मराठी माणसे स्थिरावली. असे शिवसेनेला कधी का वाटले नाही. मराठी माणसांसाठी परवडणारी घरे बांधली असती तर आज गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी ‘उद्धव ठाकरे आपडो’ असे कार्यक्रम घ्यावे लागले नसते. अनेक सरकारी आणि महापालिकेचे मोकळे भूखंड, कांदळवने, खाड्या झोपड्या गिळंकृत होत असताना शिवसेनेने डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि आताही बांधली आहे.

विक्रोळी कन्नमवार नगर, मानखुर्द, वांद्रे, जोगेवरी, दहिसर येथे आजही कांदळवने तोडून, खाड्या बुजवून, मोकळी मैदाने बळकावून, झोपड्यांवर झोपड्या चढवून, सरकारी भूखंड ढापून एका रात्रीत झोपड्या उभ्या राहत असतील तर त्या भागातील नगरसेवक, आमदार आणि महापालिका अधिकारी झोपून बसलेले असतात का? ही सगळी मिलीभगत असते. महापालिका, पोलीस आणि लोकप्रतिनिधी मिळून या झोपड्या उभ्या करण्याला मदत करतात. या सगळ्यांना पैसा हवा असतो. मुंबई मरतानाचे त्यांना काही सोयरसुतक नसते. त्यांच्या सात पिढ्या सुखाने जगल्या पाहिजेत, एवढेच त्यांचे जीवनाचे उद्दिष्ट असते. दहिसरचे गणपत पाटील नगर धारावीला मागे टाकून आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी होत असताना, विक्रोळीच्या कन्नमवार नगरचे कांदळवन तोडून तेथे झोपड्या उभ्या राहत असताना त्या परिसराचे आमदार, नगरसेवक शिवसेनेचे असताना त्यांना या गोष्टी माहीत नाहीत का? आणि ते जर कानावर हात ठेवत असतील तर त्यांचा या सार्‍या प्रकाराला आशीर्वाद आहे, असेच दिसते. बोरिवलीच्या नॅशनल पार्क शेजारचा कुलुपवाडी रोड हा शांत चित्त रस्ता होता. अनेक वर्षांपासून या ठिकाणी चार एक फेरीवाले होते.

त्याचे आता चोवीस झालेत. सगळे बाहेरून आलेले. या ठिकाणी हातपाय पसरायला मिळते म्हटल्यावर उत्तर भारतीय, बिहारी त्यांच्या लोकांना गावाहून रस्त्यावर टोपली घेऊन बसायला बोलावणार. एक टोपलीच्या वर्षात चार टोपल्या होणार, नंतर बाकडे, छप्पर येणार आणि हा अनधिकृत बाजार महापालिकेला आणि नगरसेवकांना दिसणार नाही. हा सारा पैशांचा खेळ आहे. कारण महापालिकेची तोंड दाखवायला गाडी कधी येणार हे त्यांना माहीत असते. मुख्य म्हणजे महापालिकेचाच एक माणूस या सर्व फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करून आपल्या अधिकार्‍यांना देणार. सगळी मिलीभगत. लोकांना चालायला रस्ते नाहीत. मात्र, फेरीवाले आपल्या मालकीची जागा असल्याचा रुबाब दाखवणार. हे सारे कोणाच्या जीवावर? कारण सत्ताधारी शिवसेनेने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यांना हे काहीच दिसत नाही.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते विक्रोळीत फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल करत त्यांना पावत्या देतात, असा आरोप पुराव्यानिशी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो पावतीवर छापून फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल केली जात असल्याचे दाखवून दिले. गंमत म्हणजे सार्वजनिक पथ आणि पद वापर करणार्‍या फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणारा आकार, असे या पावतीवर लिहिण्यात आले आहे. आता हे काम जर शिवसेना करणार असेल तर महापालिकेतील कर्मचारी काय फुकट पगार घ्यायला ठेवले आहेत का? आम्हाला पैसे द्या. पालिकेचे कर्मचारी तुमच्या स्टॉलला हात लावणार नाहीत. पोलिसांना आम्ही मॅनेज करू, असे शिवसेना फेरीवाल्यांना सांगतेय, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला आहे.

एकूणच मुंबई बकाल होत चालली आहे. या शहराला कोणी वाली उरलेला नाही. या शहराचे लचके तोडून पोट भरणारी माणसे तिच्या आजूबाजूला उभी आहेत. दुसर्‍या बाजूला आता मुंबईत पसरायला जागा नसल्याने आता आडवी मुंबई उभी होत आहे. उत्तुंग इमारती आकाशाला गवसणी घालत असताना मूळ मुंबईकर मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जात आहे. कामगारांची, कष्टकर्‍यांची मुंबई आता राहिलेली नाही. प्रामाणिक आणि सहिष्णू असा मराठी माणूस आज आपल्याच भूमीत परका होऊन भरल्या डोळ्यांनी बाहेर फेकला गेलाय.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -