Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश लाईक्स आणि शेअर्सच्या पलीकडे जाऊनही बघा...

लाईक्स आणि शेअर्सच्या पलीकडे जाऊनही बघा…

Related Story

- Advertisement -

उदाहरण क्रमांक 1
एखाद्या सेलिब्रिटीने तिच्या किंवा त्याच्या सोशल मीडिया हँडलवर अत्यंत उथळ वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच त्याला लाखो लाईक्स आणि हजारो शेअर्स मिळतात.

उदाहरण क्रमांक 2
गेल्या काही वर्षात नव्याने उदयाला आलेल्या ‘कंटेट क्रिएटर्स’ नावाच्या जमातीने फारसा विचार न करता सहज म्हणून तयार केलेल्या आशयाला शेकडो शेअर्स आणि हजारो लाईक्स मिळतात.

- Advertisement -

उदाहरण क्रमांक 3
एखाद्या अर्थतज्ज्ञाने देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल केलेल्या सखोल विश्लेषणाला सोशल मीडियावर काहीच प्रतिसाद मिळत नाही. मोजके 30-40 लाईक्स आणि 1-2 शेअर असतात.

वरवर पाहता ही उदाहरणे अगदी स्वाभाविक वाटतात. आपण सगळ्यांनीच ती अनुभवली आहेत. पण खोलात जाऊन बघायचे म्हटले तर त्यामध्ये आपण कुठल्या दिशेने जातो आहोत, याचे प्रतिबिंबच उमटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड खूप वेगाने वाढतो आहे. आशयाचा दर्जा, तो लिहिणार्‍याचा अनुभव यापेक्षा सोशल मीडियामध्ये त्याची व्हायरल होण्याची शक्यता कितपत आहे, त्यातून आपल्याला कसा आणि किती फायदा होणार, हे बघूनच आशयाची निर्मिती केली जाऊ लागली आणि तीच काहीशी चिंतेची बाब ठरली.

- Advertisement -

प्रत्येक माध्यमाचे काही गुण-दोष असतात. ते माध्यम हे गुण-दोष घेऊनच वाटचाल करीत असते. पण माध्यमांचे सोशल मीडियावरील अवलंबित्व जसजसे वाढू लागले तसतसे या नवमाध्यमातील दोषांकडे जणू दुर्लक्षच केल्यासारखी स्थिती निर्माण झाली. आज कोणत्याही माध्यम संस्थेमध्ये किंवा न्यूज वेबसाईटमध्ये एखाद्या बातमीने किंवा लेखाने ‘नंबर्स’ किती मिळवले किंवा आपल्या वेबसाईटवर ‘ट्रॅफिक’ किती आणले, याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. डिजिटल माध्यमात संपादकीय विभागात काम करणारा एखादा सहकारी चांगले ‘ट्रॅफिक’ आणू शकत असेल, तर त्याला तिथे सर्वाधिक किंमत असते. त्याच्या लिखाणामध्ये किती नेमकेपणा आहे, संदर्भांचा कसा वापर केला गेला आहे, भाषा साधी पण समजणारी आहे का, याचा फारसा विचार केला जात नाही. तो किंवा ती वाचकांना आकर्षित करू शकेल, अशी शीर्षकं देत आहेत ना आणि त्यामुळे आपल्या वेबसाईटवर ट्रॅफिक येते आहे ना, याचाच आधी विचार केला जातो. त्यातूनच मग क्लिकबेट शीर्षकांचे प्रमाण वाढू लागते. उदाहरणार्थ ‘… म्हणून हा अभिनेता दाढी करीत नाही’, ‘रोज रात्री झोपण्यापूर्वी करायच्या पाच गोष्टी’ वगैरे.

सोशल मीडियातील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्ससाठी आशयाची निर्मिती करणारे ‘कंटेट क्रिएटर्स’सुद्धा मला काय करायला आवडते, यापेक्षा बाजाराची मागणी काय आहे, हे समजून घेऊन त्याप्रमाणे आशय निर्माण करण्याचे काम करतात. त्यांचे गणित सरळ असते, जर आपला कंटेट व्हायरल झाला तर आणि तरच त्यातून आपल्याला प्रसिद्धी मिळणार आणि त्यातूनच मग अर्थार्जनाचे साधनही उपलब्ध होणार आहे. यामुळे तेसुद्धा केवळ नंबर्स आणि शेअर्सच्या मागे धावतात. यातील अनेक कंटेट क्रिएटर्स तरूण वयाचे असतात. त्यांना आपण नक्की काय पेरतो आहोत, याची जाणीवही नसते. आभासी जगाशिवाय राहूच शकत नाही, अशीच त्यांची अवस्था असते. मग यातूनच काहीबाही तयार केले जाते. हजारोजण ते काहीबाही इतरांना पाठविण्यासाठी हातभार लावू लागतात. पण इथेही मूळ आशयाचा दर्जा काय, याचे निष्पक्षपातीपणे विश्लेषण कोणीच करीत नाही. राजकारणी जसे म्हणतात की, आम्ही निवडून येऊ शकतो त्यामुळे आम्हाला काहीही करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला जमणार आहे का निवडून यायला… तसाच हा प्रकार आहे. आमचा कंटेट व्हायरल होतो म्हणजे आम्ही बरोबरच आहोत. तुम्ही उगाच किस पाडत बसू नका, असे सांगायलाही कोणी कमी करत नाही.

हे सगळं घडत असताना वर दिलेल्या चौकटीत न बसणारा पण खरंच दर्जेदार आशय खूप मागे राहतो. खरंतर जे लोकांनी वाचायला हवं, वाचून विचार करायला हवा आणि विचार करून कृती करायला हवी तो आशय त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. कारण परत सोशल मीडिया. सोशल मीडियाचा एक सर्वसाधारण नियम आहे जे व्हायरल होते, त्याचेच वितरण वाढवले जाते. एखादी पोस्ट सोशल मीडियात पडल्यानंतर पहिल्या दोन तासांतच त्याचे भवितव्य ठरते. बरं या सगळ्याचा वेध घेण्यारे ट्रॅक टूल्स या लोकांच्या हातात असतात. म्हणजे मग दुसर्‍या एका वेबसाईटची अमूक एक बातमी व्हायरल होण्याच्या दिशेने जाऊ लागली हे दिसताच बाकीच्या न्यूज वेबसाईट त्यावर तुटून पडतात. त्यांची बातमी व्हायरल होते आहे, आपल्याकडेही ती असलीच पाहिजे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तिच बातमी पुन्हा लोकांसमोर नेली जाते. विषय चार आण्याचा आणि शीर्षक 12 आण्याचे या पद्धतीने कारभार करून वाचकांना निव्वळ मूर्खात काढण्याचा प्रकार अनेकवेळा केला जातो. अशा कंटेटचा भला मोठा डोंगरच गेल्या काही वर्षात तयार झाला आहे.

त्याने केले म्हणून मी केले, त्याचे चालले म्हणून मी केले, सध्या हेच चालते, असे नाही केले तर स्पर्धेत टिकूच शकणार नाही, तुम्हाला काय जातंय काठावर बसून बोलायला, हे नाही केले तर पैसे येणारच नाहीत, आमच्यावर टार्गेटचे खूप प्रेशर आहे… अशा टाईपची स्पष्टीकरणे आता अगदी सहजपणे न्यूज वेबसाईटच्या संपादकीय विभागातून दिली जातात. मुळात वाचकांपुढे काय गेले पाहिजे आणि काय नाही गेले पाहिजे, हे ठरविण्याचे अर्थातच गेट किपिंगचे काम उपसंपादक करत होते. काळाच्या ओघात ते काम नाहीसे होत गेले आणि पुढ्यात जे येतंय ते देऊन टाका. वाचायचे की नाही, बघायचे की नाही, हे ग्राहकांनाच ठरवू द्या, असाच ट्रेंड रुजला आणि स्थिरावला.

तूर्त तरी हे सगळं एकदम 180 कोनात बदलता येणार नाही आणि ते शक्यही नाही. अजून काही वर्षे तरी हाच ट्रेंड राहील, असे दिसते. सांगायचे इतकेच आहे की खूप शेअर्स आहेत किंवा खूप लाईक्स आहेत म्हणजे तो कंटेट किंवा आशय एकदम चांगला आहे, असे समजू नका. तुम्ही वाचा, बघा, विचार करा मगच आपले मत तयार करा. कधी कधी कमी लाईक्स मिळालेला किंवा फारसा शेअर न झालेला आशयही तुम्हाला नवा दृष्टिकोन देणारा, समृद्ध करणारा असू शकतो.

- Advertisement -