घरफिचर्ससारांशजातीय शस्त्राने प्रेमाचा गर्भपात!

जातीय शस्त्राने प्रेमाचा गर्भपात!

Subscribe

लेखक भटू जगदेव यांची ‘गाठोडे’ ही कादंबरी म्हणजे आतापर्यंत जगलेल्या वास्तव जीवनातील कथन. ही कादंबरी म्हणजे जातीय भेदाच्या शृंखलेत अडकलेल्या युगुलांची दीर्घ प्रेमकथा आहे, असं म्हणावं लागेल. वास्तविक पाहता हिला कादंबरी म्हणावे तर काही प्रश्न निर्माण होतात. नायक आणि नायिका दोघेही जिवंत असून लेखकाने भोगलेल्या स्वानुभवातून निर्माण झालेली ही साहित्यकृती आहे. आपण सुधारणावादावर कितीही चर्चासत्रे घेतली आणि अनेकांनी जाहीर व्यासपीठांवर जातीयतेचा निषेध केला तरी वास्तविकता वेगळी असते. कडवट जातीय अहंकारामुळे केवळ गर्भवतीचाच नव्हे, तर दोन जीवलगांच्या प्रेमाचाही गर्भपात केला जातो.

भारतीय संविधानाने सर्वांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार बहाल केला आहे. त्यामुळे सर्व भारतीय शिकू लागले, लिहू लागले, वाचू लागले. संविधानापूर्वी शिक्षणाचा अधिकार एका विशिष्ट वर्गाकडे होता. त्यामुळे शिक्षण आणि साहित्य याची मक्तेदारी एकाच समूहाकडे केंद्रित होती. आता ती मक्तेदारी मोडून सगळे साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले, लिहू लागले, मुकेही बोलू लागले. हा लोंढा आता शहरापासून खेड्यापर्यंत, गल्लीबोलापासून वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. साहित्याचा केंद्रबिंदू आता शहराकडून खेड्याकडे सरकत आहे. गाव खेड्यातील अनेक तरुण-तरुणी वेगवेगळ्या अनुभवातून साहित्यातून व्यक्त होत असून आपलं लिखाण सर्वांपर्यंत पोहचवत आहेत. कथा, कविता, नाटक, कादंबरीच्या रूपाने सकस आणि नवनिर्माण साहित्याची निर्मिती होत आहे ही बाब अभिमानाची आहे.

समाजाला साहित्यातून अपेक्षित असलेला उद्देश साध्य होताना दिसत आहे. साहित्याने माणसाच्या विचारसरणीमध्ये गुणात्मक बदल व्हावा ही अपेक्षाही रास्तच आहे. समाज बदलत असताना समाजामध्ये घडणार्‍या वाईट घटनांची पुनरावृत्ती होऊ नये हे साहित्यातून जगासमोर आल्यानंतरही समाजामध्ये तशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा घडतात हे निषेधार्ह आहेच. भटू हरचंद जगदेव हा गेली काही वर्षे कथा, कवितेच्या माध्यमातून साहित्य आपल्यासमोर आणत आहे. धुळे जिल्ह्यातील जापी गावातील हा तरुण काम करून शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईकडे आला आणि साहित्य निर्मितीकडे वळला. आता तो ‘गाठोडे’ या कादंबरीच्या रूपाने वाचकांकडे आला आहे.

- Advertisement -

भटू जगदेव यांच्या गाठोडे या साहित्यकृतीला कादंबरी म्हणावं का, हा खरा प्रश्नच आहे. गाठोडे म्हणजे आतापर्यंत जगलेल्या वास्तव जीवनातील कथन. एका अर्थाने हे स्वकथन आहे. ही कादंबरी म्हणजे जातीय भेदाच्या शृंखलेत अडकलेल्या युगुलांची दीर्घ प्रेमकथा आहे, असं म्हणावं लागेल. वास्तविक पाहता हिला कादंबरी म्हणावे तर काही प्रश्न निर्माण होतात. नायक आणि नायिका दोघेही जिवंत असून लेखकाने भोगलेल्या स्वानुभवातून निर्माण झालेली ही साहित्यकृती आहे. ‘गाठोडे’ कादंबरी म्हणजे भटू जगदेव यांच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेलं वास्तव आहे.

जातीभेदाच्या शृंखला तोडल्या पाहिजेत यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करतो. जातीभेद निर्मूलनाचा कार्यक्रम करतो. जातीअंताच्या चळवळीची निर्मिती करून जातीयता नष्ट व्हावी म्हणून अनेक सामाजिक संघटना कार्यरत आहेत, परंतु तरीही जातीयता संपली आहे, असं म्हणता येणार नाही. जी कधीच जात नाही तिला जात म्हणतात. त्याचं हे उदाहरण आहे असं मानावं लागेल. गाठोडे या कादंबरीत भटू जगदेव जे जगला तेच त्याने तसच्या तसं नावंही न बदलता मूळ नावानेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे एक विदारक सत्य कादंबरीतून स्पष्ट होत आहे. नायक भटू जगदेव आणि नायिका मनू नाडकर्णी ही नावं जशीच्या तशी लिहून सत्य सांगितले आहे. त्याच्या धैर्याला दाद द्यावी लागेल. कारण जातीयतेने पोखरलेल्या, होरपळलेल्या लोकांना आपले जीवन उलगडताना त्यांच्या जीवाचा अंत झालेला आपण पाहिलं आहे.

- Advertisement -

जगदेव हे आडनाव असलेल्या परंतु वर्णव्यवथेने निर्माण केलेल्या एका मागास समाजातील तरुण मनू नाडकर्णी या उच्चवर्णीय ब्राह्मण मुलीवर प्रेम करतो. कालांतराने ठाण्यातील विवाह मंडळात नोंदनी पद्धतीने लग्नही करतो आणि इथे खर्‍या अर्थाने या प्रेम प्रकरणाला सुरुवात होते. त्याची रंजक कथा या कादंबरीत आहे. भटू आणि मनू लग्न करून कल्याण शहराच्या आसपास दोघं संसार थाटतात. तोपर्यंत भटू आणि मनूच्याही घरी माहिती नाही. ६ महिने गेल्यानंतर मनूच्या आईवडिलांना हे मनूच्या मैत्रिणीकडून कळतं तेव्हा ते त्यांच्याकडे येतात. त्यावेळी मनू नाडकर्णी नावाची तरुणी भटूची पत्नी ६ महिन्यांची गरोदर आहे. भटू जगदेव हे नाव भुरळ पाडणारं आहे. जगदेव हे ब्राम्हण असावेत असा नाडकर्णी आईवडिलांचा समज होता, पण प्रत्यक्षात घरी गेल्यावर भटू हा ब्राम्हण नसून बौद्ध आहे हे पाहून वडिलांचा पारा चढतो.

आईला पुसटशी कल्पना असल्याने आई समजूतदारपणा दाखवते, पण वडिलांची जातीय प्रतिष्ठा आडवी येते. गोड बोलून आम्ही सगळे मागचे वैर विसरलो, असं सांगून मुंबईला त्यांच्या घरी मनूला नेतात. तिला काही शपथा घालतात, दम देतात. तू पुन्हा त्याच्याकडे गेल्यास माझं मेलेलं तोंड पाहशील, अशी धमकी वडील देतात आणि मनूचा गर्भपात करतात. त्याही अवस्थेत भटू जगदेव मनूला जेव्हा संपर्क साधायचा प्रयत्न करतो तेव्हा मनू त्याला समजावून सांगते. माझे वडील जिवंत असेपर्यंत आपल्याला एकत्र राहता येणार नाही. तिथे दोघांचा विरह सुरू होतो. अधूनमधून दोघे भेटत राहतात, परंतु प्रेमाची जी आस आहे ती दोघांकडून पूर्ण होत नाही. दोघांचा विरह वाढत जातो. दोघांचा संपर्क जरी असला तरी मनूचे एकच वाक्य माझे वडील जिवंत असेपर्यंत मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही, जरी आपलं लग्न झालं असलं तरी.

मध्यंतरीच्या काळात तिचे आईवडील, भाऊ-वहिनी मनूचे लग्न दुसरीकडे करण्याचा प्रयत्नही करतात, परंतु मनू इतकी प्रामाणिक आहे की ती भटूशिवाय कुणालाही मान्य करीत नाही. ती सगळ्या प्रलोभनाला नकार देऊन गरिबी जरी असली तरी भटूबरोबरच राहण्याचा निर्णय घेते आणि भटूबरोबरच आयुष्यभर काढीन, असं समजावून सांगते. या तिच्या प्रामाणिकपणाला मानलं पाहिजे. नंतर जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा त्यांचा संवाद होतो, तेव्हा मनू त्याला हेच सांगते की तू दुसरं लग्न कर. माझ्या वडिलांचा मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही. पर्यायाने भटू लग्न करतो. योगायोग असा की मनूच्या वडिलांचंही निधन याच चार दिवसांत होतं, परंतु आईवडिलांच्या आज्ञेत असणार्‍या मनूला जम्मूला तिच्या भावाकडे पाठवतात.

जम्मू हे अतिशय संवेदनशील शहर असल्याने वहिनीबरोबर बाजारात असताना छोटासा स्फोट होतो. त्या स्फोटने मनूच्या चेहर्‍यावर काही डाग पडल्याने तिचा चेहरा विद्रुप होतो. इकडे भटू आपलं घर बदलून दुसरीकडे राहायला जातो. वडिलांचं निधन झाल्याने मनू भटूसोबत राहण्यासाठी जुन्या रूमवर येते. भटू दुसर्‍या गावात राहायला जातो. भटूला शोधण्यासाठी मनू व्याकुळ होते, पण भेट होत नाही. एके दिवशी अचानक एसटी स्टँडवर दोघांची भेट होते. भटू मात्र मनूला तिच्या विद्रुप चेहर्‍यामुळे ओळखू शकत नाही. मनू सर्व जीवनपट भटूसमोर उभा करते, रडू लागते. दोघेही भान विसरून सगळ्या जगासमोर एकमेकांना मिठीत घेऊन पुन्हा प्रेम व्यक्त करतात, परंतु तो तिला घरी नेत नाही.

भटू आता वैवाहिक जीवनात रममाण झाला आहे. इथे खरा प्रश्न निर्माण होतो. मनूने आयुष्य कसं जगायचं? मनूवर भटूचं प्रेम एकमेकांवर इतकं जीवापाड आहे की मनूचे वडील वारले आहेत, परंतु एकत्र राहू शकत नाहीत हा सगळा प्रसंग पाहिल्यानंतर अशा प्रकारची कथा कादंबरी यापूर्वीही आली आहे. एखाद्या चित्रपटातही पाहिलं असेल, परंतु हे वेगळं रसायन आहे. कारण मनू या सगळ्या जखमा उराशी बाळगून जीवन कंठीत आहे. ती मात्र भटू हाच माझा नवरा या आनंदात आहे. मनूचा हा त्याग भटूला सतावत आहे. यात दोष कुणाचा?

जातीयता इतकी भयानक पसरलेली आहे, त्यापलीकडे आपण विचार करणार आहोत की नाही, या प्रश्नांची किती वर्षे आपण फक्त चर्चाच करणार आहोत. काही वर्षांपूर्वी ‘सैराट’ चित्रपटातून अशाच प्रकारची कथा समोर आली. त्यावर खूपच विचारमंथन झाले. चर्चा, विचार कृतीत उतरत नाहीत, तोपर्यंत ते केवळ मनोरंजन उरतं. भटू पत्नी, मुलासोबत राहत असताना मनू त्यांच्यासोबत राहू शकत नाही. कारण सामाजिक बंधन तोडून एकाच ठिकाणी दोन पत्नी एक पती असं राहता येत नाही. अशीच समाजाची रचना असल्याने भटू आपल्या पत्नी-मुलांसोबत सुखाने जगत आहे. मनू मात्र आपल्या वेदनांचे ‘गाठोडे’ घेऊन दिवसरात्र प्रवास करीत आहे. माणुसकीपेक्षा, प्रेमापेक्षा जातीयतेची बंधनं किती चिवट असतात, त्याच्यात किती गुरफटून जायचं आणि आपला जीवन प्रवास करताना थांबवायचा की या जातीयतेच्या शृंखला तोडून पुढे सुरू ठेवायचा हा निर्णय अनुत्तरित राहतो.

एकूण १६ प्रकरणांमध्ये असलेली कादंबरी अतिशय गुंतागुंतीची वाक्य, संवाद, काही ठिकाणी आपली बोलीभाषा त्यामुळे आकलन व्हायला कठीण जात असलं तरी कोणतीही भीडभाड न ठेवता खरेपणा मांडताना खरेपणाला इजा पोहचणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. यापुढे लिहिताना साहित्याची स्वरूप व्याप्ती अभ्यासावी, अधिक वाचावं. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लिहू नये याचं भानही भटू जगदेव या लेखकाने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. साहित्य निर्मिती करताना काही शब्दांचे भांडार आणि थोडी प्रतिभा वापरली तर त्या साहित्याला दर्जा प्राप्त होऊ शकतो.

— प्रदीप जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -