घरफिचर्ससारांशश्रावण शुक्रवार आणि संपत शनिवार....

श्रावण शुक्रवार आणि संपत शनिवार….

Subscribe

पूर्वी कनिष्ठा गौर बसवणार्‍यांच्या घरी शुक्रवारी आणि शनिवारी पंचक्रोशीतील सर्वांनाच जेवण्याचे आमंत्रण देत असत. शुक्रवारी रात्री देवीसमोर बसून घरातले आणि सगळे निमंत्रितही ‘गायन वादन’ असे कार्यक्रम करत. दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री..कथा कथन तर कधी कीर्तन करत. पूर्वीच्या लोकांना पावसाळ्यात बाहेरची कामे करता येत नसत... अशा प्रकारचे श्रावणातले उत्सव, व्रतवैकल्ये आणि त्यांचे भले मोठे नैवेद्य करायला भरपूर वेळ मिळत असे. एकत्र कुटुंबात एवढा स्वैपाक करणारी आणि खाणारीही माणसे असायची. त्यावेळी हा नैवेद्याचा स्वैपाक करण्याची जबाबदारी अर्थातच घरातल्या बायकांचीच असायची. आता मात्र घरातले पुरूष स्वयंस्फूर्तीने आणि हौसेनेही स्वैपाकातला भार उचलतात.

उत्तर कर्नाटकातल्या काही शेतकरी कुटुंबांमध्ये श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी ‘कनिष्ठा’ नावाची गौर बसवतात. तिला सिध्दगौर असेही म्हणतात. ही गौर म्हणजे तांब्यावरचा रंगवलेला देवीचा मुखवटा असतो. तिची थोरली बहीण ‘ज्येष्ठा गौर’ भाद्रपदात येते. हा उत्सव श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी साजरा करतात.

ही कनिष्ठा गौर म्हणजे खरे तर धाकट्या बहिणीचे रूप आहे. सासर घरी एकट्या पडलेल्या सासुरवाशिणीला मनातले हितगुज करायला आणि प्रसंगी हक्काची मदत करायला तिची धाकटी बहीण उभी असते. हा सण, प्रामुख्याने या धाकट्या बहिणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. त्यामुळे या सणांमध्ये धाकट्या बहिणीला फार महत्व आहे. एकापेक्षा जास्त धाकट्या बहिणी असल्या तर यासाठी, सर्वांनाच निमंत्रण जाते. यावेळी भाऊही आपल्या धाकट्या बहिणीला घरी बोलावतात. श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी बहिणीला घरी बोलवून तिला तेल लावून न्हायला घालतात. तिला द्यायच्या वाणात फुलांचा गजरा, खण, साडी, बांगड्या, हळद कुंकू, पाच ताजी फळे, पाच सुकी फळे, भिजवलेले हरभरे आणि गूळ असावा लागतो.

- Advertisement -

प्रत्येक शुक्रवारी, कनिष्ठा गौरीची पूजा जाई, गुलाब, सोनचाफा, निशिगंध आणि गलाटा …अशा वेगवेगळ्या फुलांनी आणि पाचवा शुक्रवार आलाच तर त्या दिवशी मात्र विड्याची आणि केळीची पाने…यांनी बांधली जाते. या गौरीला चवदार खाणे फार आवडते त्यामुळे तिला फक्त पुरणपोळी आणि शेवयांची खीर एवढाच नैवेद्य म्हणे पुरेसा नसतो. ही गौर म्हणजे महालक्ष्मीचे अन्नपूर्णा रूप आहे असेही मानतात. त्यामुळे तिच्या नैवेद्यासाठी पंचपक्वान्ने केली जातात. त्यासाठी घरातल्या बायका अगोदरच चकल्या, कडबोळी, करंज्या आणि राळ्याचे, मुगाचे, डाळ्यांचे तंबिट लाडू आणि रव्याचे पीठीसाखरेचे लाडू…म्हणजे रवा आणि खोबरे तुपात खमंग भाजायचे आणि त्यात पीठीसाखर मिसळून चांगले मळून घ्यायचे आणि मग लाडू बांधायचे. (हे लाडू अतिशय छान लागतात, पण फार टिकत मात्र नाहीत.) असा सगळा फराळ तयारच करून ठेवतात. तंबिट म्हणजे गूळाच्या गरम पाकात….तूप घालून त्यात सुक्या खोबर्‍याचा किस, तीळ, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ आणि वेलदोड्याची पूड घालतात. मग त्या पाकात भाजलेल्या राळ्याचे/ मूगडाळीचे किंवा डाळ्यांचे पीठ घालून कालवतात. पीठ थोडे घट्टसर वाटायला लागले की लाडू वळतात. हे लाडू गोल होत नाहीत, किंचित चपटे असतात.

पुजेच्या दिवशी लाडू, करंज्या, पुरणपोळी आणि खिरीबरोबर दुसर्‍या शुक्रवारी अप्पाल किंवा तळलेले मोदक करतात. अप्पाल हा पदार्थ म्हणजे कणकेमध्ये भरपूर तेल/ तूप घालून फेसतात, त्या कणकेला गुळाच्या किंवा साखरेच्या पाण्यात भिजवतात. छोट्या पुर्‍यांना जरा भोके पाडून त्या तळतात. गरम असताना त्यावर पीठी साखर पखरतात. गोड आणि खुसखुशीत अप्पाल, लहान मुलांना तर खूप आवडतात.

- Advertisement -

इतर शुक्रवारी कधी तुपातला थुलथुलीत शिरा, कधी पाकातले चिरोटे, कधी मांडे तर कधी सज्जिग्गे अप्पा करतात. सज्जिगे अप्पा म्हणजे, रव्याचे सारण भरलेल्या पुर्‍या. त्यासाठी प्रथम मैद्यात मोहन आणि दूध घालून भिजवतात. सारणासाठी, रवा आणि खवा खमंग भाजून त्या पीठीसाखर आणि भरडलेला सुका मेवा मिसळून त्याच्या पेढ्यासारख्या पण लाडूच्या आकाराच्या चपट्या गोळ्या करून ठेवतात. साधारण त्यापेक्षा लहान आकाराची, मैद्याची पुरी लाटून त्यात त्या सारणाच्या, चांगल्या घट्ट भरतात आणि मग परत थोडे लाटतात. काही लोक दोन पुर्‍यांमध्ये सारणाचा गोळा ठेवतात आणि बाजू कातून टाकतात किंवा काही सुगरण बायका सर्व बाजूंना गोलाकार मुरड घालतात. मग त्या भरलेल्या पुर्‍या तळतात. हा पदार्थही गरम आणि गार कसाही छान लागतो.

पंचपक्वान्नांबरोबर नैवेद्यासाठी घोसावळी/ बटाटे/ ओव्याची पाने/ केन्या/ मायाळू यापैकी कोणत्याही प्रकारची भजीही करायची पद्धत आहे. त्याचबरोबर ताटाच्या डाव्या बाजूला, हरबर्‍याच्या डाळीचा चटका, कारल्याचे पंचामृत, शेंगदाणे/ सुके खोबरे/ कारळे चटणी, तंबळी, (पातळ चटणी), काकडीचे मोहरीत फेसलेले/ नवलकोलाचे ताजे लोणचे, आंब्याचे लोणचे, मोकळी डाळ आणि भोपळा किंवा घोसावळ्याचे भरीत असतेच. उजव्या बाजूसाठी बटाट्याची / भरडा घातलेली काकडीची भाजी आणि मूग किंवा मटकीची उसळ करतात. त्याबरोबर अळूची डाळभाजीही करतातच. ताटात तळलेल्या पापड आणि कुरड्याही असतात. कटाची आमटीही असते. पहिला वरणभात, मग खारा भात म्हणजे बहुतेक भिसी बेळ्ळे (भात), खास नैवेद्याचे चित्रान्न (लिंबू भात)… शेवटी मात्र दही भाताने सांगता होते. जेवल्यानंतर पाच पानांचा खोबरे, आणि गुलकंद घातलेला गोविंदविडा देतात. एवढे नैवेद्याचे पदार्थ खाऊनही संध्याकाळी भूक लागणारे महाभाग असतातच. त्यांच्यासाठी, ‘लावलेल्या पोह्यात’ भरपूर ओले खोबरे घालून त्यावर ताजे दही आणि बरोबर तंबिट लाडू देतात. ‘लावलेले पोहे’ म्हणजे पोहे कुरकुरीत भाजून, थंड झाल्यावर त्या पोह्यांना तेलात कालवलेले किंचित तिखट मेतकूट लावतात. त्यात भाजलेले शेंगदाणेही घालतात.

या गौरीच्या नैवेद्याची खरी मजा, दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी असते. त्या दिवशी पातळ भाकरी, डाळ घातलेली पालेभाजी, मुळा/ कोबी खोबरे आणि भिजवलेली मूगडाळ आणि ओले खोबरे घातलेली उकडलेल्या श्रावण घेवड्याची/ घोसावळ्याची/ दोडक्याची कोशिंबीर, वडा, सांबार किंवा चिंचेच्या सारातल्या पाटवड्या किंवा गोळ्याची आमटी किंवा कढी गोळे किंवा अळूवड्या करतात. मुख्य पदार्थ म्हणून मूगाच्या डाळीची खिचडी/ खारा पोंगल किंवा कटंबळी म्हणजे कढी भात करतात… हा नैवेद्य पोटाला आणि मनाला शांतवणारा वाटतो.

पूर्वी ही गौर बसवणार्‍यांच्या घरी शुक्रवारी आणि शनिवारी, पंचक्रोशीतील सर्वांनाच जेवण्याचे आमंत्रण देत असत. शुक्रवारी रात्री देवीसमोर बसून घरातले आणि सगळे निमंत्रितही ‘गायन वादन’ असे कार्यक्रम करत. दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री..कथा कथन तर कधी कीर्तन करत. पूर्वीच्या लोकांना पावसाळ्यात बाहेरची कामे करता येत नसत… अशा प्रकारचे श्रावणातले उत्सव, व्रतवैकल्ये आणि त्यांचे भले मोठे नैवेद्य करायला भरपूर वेळ मिळत असे. एकत्र कुटुंबात एवढा स्वैपाक करणारी आणि खाणारीही माणसे असायची. त्यावेळी हा नैवेद्याचा स्वैपाक करण्याची जबाबदारी अर्थातच घरातल्या बायकांचीच असायची. आता मात्र घरातले पुरूष स्वयंस्फूर्तीने आणि हौसेनेही स्वैपाकातला भार उचलतात.

आता खरे तर कालमानाप्रमाणे सर्वच सण साजरे करण्याच्या पध्दतीत भरपूर बदल झालेले आहेत. तरीही काही लोक अजूनही श्रध्देने सर्व प्रथा पाळतात. घरात अगदी दोनच माणसे असली तरीही, मोजक्या प्रमाणात का असेना पण नैवेद्यासाठी म्हणून ठरलेले सर्व पदार्थ करतातच. काही कुटुंबांमध्ये त्यांच्यातील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पांगलेली माणसे, श्रावणातल्या किमान एखाद्या तरी शुक्रवारी एकत्र जमायचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील लहान मुलांना कितीतरी पदार्थ नवीनच असतात. पण त्या सुगंधित फुलांनी सजलेली गौर, मंद तेवणारे लामणदिवे आणि एकत्रित श्रीसुक्त पठण…अगदी नास्तिकालाही आस्तिक बनवतात आणि.. .तो विविधरंगी, विविधढंगी नैवेद्य तर उदरभरण म्हणून कसेतरी अन्न पोटात ढकलणार्‍यालाही खवैय्या बनवतो.

पूर्वी मला अशा प्रकारे…इतके प्रकार बनवून नैवेद्य करणार्‍यांचा आणि खाणार्‍यांचाही राग येई, पण जसजसे कळायला लागले तसतसा या प्रथांचा अभिमान वाटायला लागला. या प्रथा, खरे तर माणसांना एकत्र आणणार्‍या, त्यांच्यातील कलागुणांना वाव देणार्‍या आणि जवळच्या नात्यांमध्येही कृतज्ञता व्यक्त केल्यास, नाती अधिक दृढ होतात, असा संदेश देणार्‍याही आहेत. पण अनेकदा या अशा प्रथांमधला आनंदाचा आणि उत्साहाचा भाग गायब होतो आणि भीती पोटी केलेली जबरदस्ती आणि कट्टरपणा उरतो. मग ते सगळे सण… नकोसे आणि अंधश्रध्दा वाटायला लागतात… मग त्या प्रथा मागे पडतात…त्यावेळी केले जाणारे खाद्यपदार्थ विसरले जातात…खरे तर आहारशास्त्राच्या दृष्टीनेही या पदार्थांचे महत्व खूप आहे. आताची पिढी शहाणी आहे. अशा प्रथांमधला कोणता भाग उचलायचा आणि पुढे जायचे हे त्यांना नेमके माहिती आहे. त्यामुळेच अमेरिकेतल्या नामवंत विद्यापीठात प्राध्यापक असणारी, माझ्या एका ज्येष्ठ मैत्रिणीची नातसून.. नवर्‍याच्या मदतीने, आवर्जून एखाद्या शुक्रवारी आणि शनिवारी या कनिष्ठा गौराईची फुलांची पूजा आणि जमेल तसा नैवेद्य करून, धाकट्या बहिणीला भले मोठ्ठे वाण पाठवून.. घरादाराचे कौतुक मिळवते.

आपल्या देशातली ही विसरत चाललेली कृतज्ञता व्यक्त करणारी परंपरा… विशेषतः त्यातली खाद्यपरंपरा, तिच्यासारख्या मुलींमुळेच अजूनही नुसती टिकलेलीच नाही तर सातासमुद्रापार पोचलेली आहे.

–मंजुषा देशपांडे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -