घरफिचर्ससारांश...तो स्वर, ते दिवस!

…तो स्वर, ते दिवस!

Subscribe

लता मंगेशकर हे नाव इतकं जुनं झालं तरी ते कालबाह्य कसं ठरणार!...ते जुनं झालं, जुनंजाणतं झालं हे वास्तव असलं तरी नव्यांनाही सळसळतेपण देणारं, कालपरवा जन्माला आलेल्यांनाही त्यांच्यातल्या गाण्याचा कस दाखवण्यासाठी त्यांच्या झगमगत्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये उपयोगी ठरणारं. ते कालबाह्य ठरवायला काळही जिथे विचार करील तिथे बापड्या माणसाचं काय! लता मंगेशकरांचं वय वाढण्यातला सगळ्यात मोठा तोटा कोणता असेल तर तो आहे त्यांच्या लाइव्ह कार्यक्रमात त्यांना गात असल्याचं पहाताना गमावणं, त्यांचं गाणं ऐकत असतानाच त्या कशा गातात ते पहाण्याची संधी न मिळणं.

लता मंगेशकरांनी नव्वदी पार केली. नव्वदी हा आकडा म्हणजे कुणाच्या तरी वयोमानाचा एक हिशोब. प्रत्येकाच्या वयाचा हा हिशोब तसा वर्षांतून एकदा एका विशिष्ट तारखेला होत असतो. लता मंगेशकरांच्या वयालाही त्या दिवशी हे तसंच एक गणिती मोजमाप लावलं गेलं. नव्वदीचं.

एखाद्याच्या वयाचा नव्वद हा आकडा माणसाच्या जुनेपणाचा निदर्शक, अशा वेळप्रसंगी काही तसेच प्रॅक्टिकल लोक जुनेपणाला साफ जुनाटपणा ठरवून मोकळे पण होतात. हे जुनाट म्हणजे काय तर एखाद्याला सपशेल कालबाह्य करून टाकणं किंवा आजच्या कंटेम्पररी भाषेत सांगायचं तर आउटडेटेड करून टाकणं.

- Advertisement -

…पण लता मंगेशकर हे नाव इतकं जुनं झालं तरी ते कालबाह्य कसं ठरणार!…ते जुनं झालं, जुनंजाणतं झालं हे वास्तव असलं तरी नव्यांनाही सळसळतेपण देणारं, कालपरवा जन्माला आलेल्यांनाही त्यांच्यातल्या गाण्याचा कस दाखवण्यासाठी त्यांच्या झगमगत्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये उपयोगी ठरणारं. ते कालबाह्य ठरवायला काळही जिथे विचार करील तिथे बापड्या माणसाचं काय!

लता मंगेशकरांचं वय वाढण्यातला सगळ्यात मोठा तोटा कोणता असेल तर तो आहे त्यांच्या लाइव्ह कार्यक्रमात त्यांना गात असल्याचं पहाताना गमावणं, त्यांचं गाणं ऐकत असतानाच त्या कशा गातात ते पहाण्याची संधी न मिळणं.

- Advertisement -

लता मंगेशकरांना ह्याची देही, ह्याची डोळा गाताना पहाणं हा त्यांच्या मधुरमुलायम गाण्याइतकाच मंजुळ आविष्कार असायचा. त्या आपलं गाणं सादर करायला येण्याआधी अमीन सयानी, हरीश भिमाणी किंवा तत्सम सूत्रसंचालक त्यांच्या गाण्याचा, त्यांच्या आवाजाचा गौरवपर परिचय करून द्यायचे, क्वचितप्रसंगी दिलीपकुमारसारखा जाणता अभिनेता त्यांच्या आवाजाला ‘लता की आवाज कुदरत का एक करिश्मा हैं’, असं सुरेल तालात बोलून जायचे. लता म्हणजे भगवंताची बासरी, देवदेवेंद्राच्या देवालयाच्या गाभार्‍यातला पवित्रपावन, धीरगंभीर स्वर अशा नानाविध शब्दयोजनांमधूनही लता मंगेशकरांच्या गळ्यातल्या गाण्याचं व्यक्तिमत्व रेखाटलं जायचं.

…पण लता मंगेशकरांच्या गाण्याचं वर्णन हे अशा कितीही शब्दयोजना केल्या तरी अपुरं वाटायचं, आधंआधुरं वाटायचं. सूत्रसंचालकांकडून ही सगळी काव्यमय वर्णनं, सगळ्या अलंकारीक प्रस्तावना झाल्या की उजव्या विंगेतून लतादिदी स्टेजच्या मध्यभागी यायच्या. रसिक-प्रेक्षकांना अदबीने झुकून-वाकून नमस्कार करत माइकपर्यंत पोहोचायच्या. माइकपर्यंत येऊन स्थिरावल्या तरी पुन्हा वाकून नमस्कार करणं चालूच असायचं. गाणं सुरू करण्याच्या आधीच रसिक प्रेक्षकांचा केलेला तो आदर असायचा, ती मायबाप प्रेक्षकांची केलेली कदर असायची. हे सगळं करताना साडीचा रंग कधीच बदललेला नसायचा. तो तसाच असायचा. अगदी शुभ्रधवल. पदर दोन्ही खांद्यांवर. माइक स्टॅन्डवर अगदी नीटनेटका लावलेला. लतादिदींच्या ह्या थेट गाण्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ठ्य म्हणजे आजच्या लोकांसारखं माइक एका हातात घेऊन गाणं हे शोबाज चित्र त्यांच्या बाबतीत आढळून यायचं नाही. बरं, गातानाही चेहर्‍यावर एखाद्या नवशिक्या गायिकेसारखे लाजरेबुजरे भाव. आजच्या गायकगायिकांसारखा, ज्याला चॅनेलीय परफॉर्मन्स म्हणतात असा गात गात अर्ध स्टेज हुंडगून यायचा नाटकीपणा नाही. आपलं गाणं आपल्या जागी. जागच्या जागी. जागेवरून तसूभरही इकडेतिकडे हलणं नाही. अवघड तान घेतानाही उगाचच चित्रविचित्र हातवारे नाहीत, एखादा सूर उंचावताना चेहर्‍यावर कसला कडवट तणाव नाही. सगळं कसं सहजसोपं. लाजर्‍याबुजर्‍यासारखं गाऊनही गाणं पक्कं खणखणीत. त्यात कसली उणीव नाही, चूक नाही, त्रुटी नाही, अभाव नाही. सूर, ताल, लय, नाद, लहर, वेग, आवेग सगळं सगळ्या बाजुंनी चोख.

एकदा असंच आठवतंय, ‘गाईड’मधल्या ‘काटों से खिंच के आँचल’ ह्या गाण्याची सूत्रसंचालकाने अनाउन्समेंट केली. लतादिदी गाणं गायल्या सज्ज झाल्या. वन…टू…वन…टू…थ्री…फोर. ऑर्केस्ट्रा कंडक्ट करणार्‍या अनिल मोहिलेंनी आकडे मोजून संपवले…आणि लतादिदींनी ‘काटों से खिंच के आँचल’ सुरू करण्याच्या आधीची ती सुप्रसिध्द तान घेतली. नंतर गाण्याचे शब्द उच्चारले – ‘काटों से खिंच के आँचल’…बस् हे शब्द उच्चारण्याचा अवकाश…प्रेक्षकांकडून सरसरून टाळी आली. काही लोक मानवंदना देण्यासाठी अक्षरश: खुर्चीतून उठून उभे राहिले. लतादिदींनीही त्या कौतुकाची दखल घेतली. ती ओळ गाता गाताच त्यांनी त्या कौतुकाला अदबीने झुकून-वाकून मनापासून दाद दिली. त्या खास गाण्याला असं नेमकं काय घडलं होतं!…‘काटों से खिंच के आँचल’मधली ती तनमनाला स्पर्श करणारी साद लतादिदींचं गाणं ऐकता ऐकता साक्षात डोळ्यांनी पाहिलीही जात होती आणि म्हणूनच ते जितंजागतं गाणं प्रत्येकाचा रोम रोम उभा करून गेलं होतं. रोमरोमांत भिनून गेलं होतं.

आज लतादिदींच्या गाण्याचा तो लाइव्ह अनुभव मिळणार नाही. त्यांचं वय, त्यांचं आजारपण ह्यामुळे आता लता मंगेशकर नावाचा दैवी चमत्कार आता तसा लाइव्ह अनुभवता येणार नाही ही खंत कुणालाही वाटणारच. ते गुगल, युट्युब वगैरे सगळं ठीक आहे. तिथे सर्च केल्यावर आम्हाला एका क्लिकच्या अंतरावर लता मंगेशकर नावाचं गोडमधाळ गाणं हवं तेव्हा हवं तितकं ऐकता येईल, पण समोरासमोर, आमनेसामने लतादिदी ऐकण्याची जादू घडून यावी हे आता घडेल का? खंत ही आहे, दु:ख हे आहे. तो जादुई आवाज ह्या सर्वांगाने ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते खरंच भाग्यवंत, असं आज म्हणूनच म्हणावं लागेल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -