घरफिचर्ससारांशएकतर्फी बोला, सक्सेसफूल व्हा

एकतर्फी बोला, सक्सेसफूल व्हा

Subscribe

सोशल मीडिया एकटा आलेला नाही. तो सोबत काही गुण-दोषही घेऊन आला आहे. या मीडियामुळे जसे फायदे झाले आहेत तसे तोटेही झालेत. फरक इतकाच की आपण फायदा बघत आलो तोट्याकडे फारसे लक्ष दिले नाही. सोशल मीडियामुळे सर्वात मोठा तोटा कोणता झाला, असा प्रश्न जर कोणी मला विचारला तर समाजातील वाढलेला एकांगीपणा किंवा एकतर्फीपणे वागणे असे उत्तर मी देईन. समतोल या शब्दाचं आणि सोशल मीडियाचं जणू वाकडच आहे. समतोल विचार मांडणार्‍यांना, समतोल लिखाण करणार्‍यांना, समतोलपणे बोलणार्‍यांना सोशल मीडियात कवडीची किंमत नसते. इथे एकतर तुम्ही भक्त असावे लागता किंवा अभक्त. इथे तुम्ही पाठीराखे असावे लागता किंवा विरोधक. इथे तुम्ही डावे असावे लागता किंवा उजवे.

2011 मध्ये वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण देशभरात गाजले. अनेक लोक उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले होते. याच आंदोलनावेळी दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री आणि या आंदोलनातील एक महत्वाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आवाहन केले होते. एकतर तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहात किंवा तुम्ही देशातील भ्रष्टाचाराच्या बाजूने आहात. म्हणजे जे कोणी या आंदोलनात सहभागी नाही, तो किंवा ती भ्रष्टाचाराच्या बाजूने आहे. देशातील भ्रष्टाचाराला त्याचा किंवा तिचा पाठिंबाच आहे, अशी मांडणी त्यावेळी करण्यात आली होती. या मांडणीतून सामान्य नागरिकांपुढे आंदोलनाला पाठिंबा देण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. पुढे या आंदोलनातून काय घडले आणि अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल कसे वेगळे झाले, याची पुन्हा उजळणी करण्याचे कारण नाही. सोशल मीडियाच्या काळात अशा पद्धतीने एकतर्फीपणाचा वापर करून आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत, पण अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाला पाठिंबा नाही, असे म्हणणार्‍यांना त्यावेळी काही जागाच उरली नव्हती. यानंतर एकीकडे सोशल मीडिया भारतात वाढत गेला आणि दुसरीकडे एकांगीपणा आणि एकतर्फीपणे वागणेही.

- Advertisement -

सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्यामध्ये व्हायरल होणार्‍या आशयाला सर्वाधिक महत्व आहे. आशयाची गुणवत्ता किती यापेक्षा त्यामध्ये व्हायरल होण्याची क्षमता किती हे जास्त बघितले जाते. आता व्हायरल होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी त्या आशयाबद्दल बोलले पाहिजे, त्याला शेअर केले पाहिजे आणि लाईक वगैरे केले पाहिजे. जर लिखाण एकांगी किंवा एकतर्फी असेल तर ते व्हायरल होण्याची शक्यता बळावते. मग सोशल मीडियामध्ये सक्सेसफूल होण्यासाठी किंवा मिळालेला सक्सेस अबाधित ठेवण्यासाठी काही जणांकडून एकांगीपणेच मांडणी केली जाते. एकांगीच बोलले जाते.

एकतर्फी लिखाण करण्याचा दुसरा फायदा असा होतो की त्याविरोधात बोलणार्‍यांनाही धार येते. मुळातील लिखाण एकांगी असल्यामुळे मग त्याविरोधात मांडणी करणे तुलनेत सहज शक्य होते. मूळ लिखाणातील त्रुटी शोधल्या जातात आणि सोशल मीडियाच्या भाषेत ज्याला ट्रोलिंग म्हटले जाते ते सुरू होते. याच ट्रोलिंगचा दुहेरी फायदा एकांगी मांडणी करणार्‍याला होतोच की. एकतर विरोधात बोलणार्‍यांच्या विरुद्ध लढण्यासाठी पाठीराखे पुढे येतात आणि दुसरे म्हणजे यामुळे त्या पोस्टची एंगेजमेंट वाढल्याने त्याचे वितरणही वाढते. म्हणजे तीच पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेली जाते. चक्रवाढ व्याज पद्धतीनेच मूळ लेखकाला याचा फायदा होतो. मग काय एका मागून एक विषय तयार केले जातात आणि स्वतःला सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणवून घेणारे, ब्लॉगर म्हणवून घेणारे आपल्या हँडलवर ते पोस्ट करायला लागतात. पुढे या पोस्टवर कमेंट्सच्या थ्रेड तयार होतात, पण समतोल मांडणी करण्याची थ्रेड धुसर होत जाते. ती कायमचीच.

- Advertisement -

एकांगी मांडणी करणारे कायम अवतीभोवती घडणार्‍या प्रत्येक घटनेला एकाच चष्म्यातून पाहतात. कधी तो चष्मा जातीचा असतो तर कधी धर्माचा, कधी आर्थिक स्तराचा असतो तर कधी विचारांचा. कधी भाषेचा असतो तर कधी प्रांताचा. आपल्या चष्म्यातून जे काही दिसते ते इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी माध्यम म्हणून सोशल मीडियाचा वापर केला जातो. सोशल मीडिया नव्हता त्यावेळी या पद्धतीची मांडणी हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत लोकांपर्यंत पोहोचत होती. पण सोशल मीडियामुळे ही मांडणी अगदी काही मिनिटांमध्ये लाखो लोकांपर्यंत नेली जाते. ज्याला हे सगळे मिळते त्याने यासाठी काही पैसे वगैरे मोजलेले नसतात. त्यामुळे तोही मिळालेला मजकूर पुढे पाठवून जणू काही पूण्यकर्मच केल्यासारखे मानत असतो.

साधारण तीन पद्धतीचा आशय सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊ शकतो. एकतर ज्यांच्यामध्ये उपजत काही कला आहे किंवा शिकून त्यांनी कला आत्मसात केली आहे त्यांच्या पोस्ट. दुसरे म्हणजे ज्या आशयात स्मितहास्य करायला लावण्यापासून ते पोट धरून हसायला लावण्यापर्यंतचा विनोद आहे अशा पोस्ट आणि तिसरे म्हणजे एकांगी किंवा एकतर्फीपणे केलेली मांडणी असलेल्या पोस्ट. या पलीकडे जर एखादा आशय तुमच्यापर्यंत व्हायरल म्हणून येत असेल तर तो ‘स्पॉन्सर्ड’ आहे असे समजून जायचे. कोणीतरी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तो आशय तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.

सोशल मीडियाने संपूर्ण समाजाला आपल्या कवेत घेतल्यापासून घटना-घडामोडींचे विश्लेषण करणार्‍या पत्रकारांची मोठी अडचण झाली आहे. ती कशी हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. वृत्तपत्रांमध्ये विश्लेषण करताना एकदम एकांगी किंवा एकतर्फीपणे मांडणी करून शक्यतो चालत नाही. अर्थात याला काही पत्रकार अपवादही आहेत. वृत्तपत्रात समतोलपणे लिखाण करावे लागते. पण हेच पत्रकार सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर येऊन जेव्हा बोलू लागतात तेव्हा त्यांना फारशी एंगेजमेंट मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेले दोन निर्णय खूप चांगले आहेत, पण अन्य दोन निर्णयांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे म्हणून सोशल मीडियांमध्ये चालत नाही. कारण तिथे मोदींचे भक्त आहेत आणि विरोधक.

मोदी भक्तांना असे वाटते की पंतप्रधानांचा निर्णय कधीच चुकू शकणार नाही आणि विरोधकांना असे वाटते की पंतप्रधानांचा कोणताही निर्णय योग्य असूच शकत नाही. त्यामुळे प्रत्येक निर्णयाला विरोध केलाच पाहिजे. यातूनच मग काही वेळा डावे उजव्यांना आता कुठे लपून बसलात विचारतात आणि काही वेळा उजवे डाव्यांना आता का तुमची दातखिळ बसली, असे विचारतात. या सगळ्यामध्ये वर उल्लेख केलेल्या पत्रकारांना फारसा भाव नसतो. हळूहळू तुमच्या विश्लेषणाला फारसे कोणी बघत नाही म्हणत त्यांना व्यवस्थेतून बाजूला केले जाते.

भोवतीच्या व्हर्च्युअल जगात असे सगळे सुरू आहे. तुम्हाला हे जमणार आहे का, जमले तरी पुढे मानवणार आहे का, याचा विचार करा आणि मगच सोशल मीडियात सक्सेसफूल होण्यासाठी प्रयत्न करायचे की नाही हे ठरवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -