घरफिचर्ससारांशअंथरुण पाहून पाय पसरावे

अंथरुण पाहून पाय पसरावे

Subscribe

आपल्या महेशच्या लग्नाची तारीख ठरवायची आहे ना. मग जायला नको त्यांचे कोटेशन घ्यायला? काय बाई तरी अहो आजकाल फॅशन आहे एक दीड वर्षाच्या आधीच हॉल बुक करावा लागतो आणि या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे जाऊन छान छान आयडिया घ्याव्या लागतात. शिवाय केटरींगवाल्याचीदेखील वेळ घ्यावी लागते बरं का. मला तर ना सगळ्या प्रकारचे मेनू ठेवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक खाण्याच्या पदार्थाची चव घेऊन त्यानुसार ऑर्डर द्यायची आहे हो. मागे एकदा असंच झालं ना. ते पलीकडच्या गल्लीमध्ये सुनील भाऊजी आहेत ना, आठवतंय का काय गंमत झाली होती त्यांच्या मुलाच्या लग्नात? त्यांनी चवी बघितल्या नाहीत, मग काय धिरडं बिघडलं. अहो म्हणजे भलतीच प्लेट मेक्सिकन पदार्थ म्हणून ठेवली.

-अर्चना दीक्षित

मग काय तर अहो खरंच आहे हे. उगाच आजकालची फॅशन असं म्हणत काही करत राहणे बरोबर नाही की हो. मी नेहमीच माझ्या लेखणीतून सांगत असते तसेच. फॅशन काय कोणत्याही गोष्टीची, कुठल्याही प्रकारची, कुठल्याही विषयावर असू शकते हं.

- Advertisement -

तर आजचा विषय आहे लग्न. अहो लगेच लिस्ट कसली करताय. ऐका तर, ओह वाचा तर आधी.

लग्न म्हणजे अगदी स्पर्धेची प्रथा बनत चालली आहे. जो येतो त्याला वाटत असते लग्न म्हणजे एकदम थाटामाटात साजरे केले गेले पाहिजे.

- Advertisement -

घरातील चर्चेला उधाण येते. ‘अहो बरका, मी काय म्हणते आज संध्याकाळी फिरायला न जाता आपण ना त्या जवळपासच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे जाऊन येऊ.’ ह्यांना पडतो मोठा प्रश्न, ‘का गं आज का आणि एकदम इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे वगैरे. एव्हढे काय मोठे आयोजन करायचे आहे?’ ‘इश्श्य, अहो असं काय करताय. आपल्या महेशच्या लग्नाची तारीख ठरवायची आहे ना. मग जायला नको त्यांचे कोटेशन घ्यायला? काय बाई तरी अहो आजकाल फॅशन आहे एक दीड वर्षाच्या आधीच हॉल बुक करावा लागतो आणि या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे जाऊन छान छान आयडिया घ्याव्या लागतात.

शिवाय केटरींगवाल्याचीदेखील वेळ घ्यावी लागते बरं का. मला तर ना सगळ्या प्रकारचे मेनू ठेवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक खाण्याच्या पदार्थाची चव घेऊन त्यानुसार ऑर्डर द्यायची आहे हो. मागे एकदा असंच झालं ना. ते पलीकडच्या गल्लीमध्ये सुनील भाऊजी आहेत ना. आठवतंय का काय गंमत झाली होती त्यांच्या मुलाच्या लग्नात? त्यांनी चवी बघितल्या नाहीत, मग काय धिरडं बिघडलं. अहो म्हणजे भलतीच प्लेट मेक्सिकन पदार्थ म्हणून ठेवली. सुनीता वहिनी मूग गिळून गप्प बसून राहिल्या त्यामुळे. म्हणून आपण शहाणे होऊन आधीच योग्य पावले उचलली पाहिजेत बरं का’.

तर काही ठिकाणी चर्चा वेगळीच असते, ‘अहो ऐकताय का? येत्या एक-दोन वर्षात आपल्या मनोजचे लग्न करायचे आहे ना. आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपण बोलावू हं. तुमच्याकडचे, माझ्याकडचे आणि अलीकडच्या काळातील फॅशनप्रमाणे चांगले दहा-बारा दिवस कार्यक्रम आयोजित करूयात.’ अहोंचे तर डोळेच गरगरतात. ‘अगं बाई ही कसली फॅशन? लग्न कधी इतके दिवस चालते का? आदल्या दिवशी सिमांती पूजन आणि दुसर्‍या दिवशी सकाळी हळद मग मुहूर्तावर लग्न बास. अजून काय करायचंय. आपण आपल्या वरिष्ठांना विचारात घेऊन त्यानुसार योग्य मार्गदर्शन घेऊन प्रथेपरंपरेनुसार छान लग्न लावूयात ना आणि तसंही अजून खूप अवकाश आहे गं.’ ‘बाई बाई बाई, अहो आजकाल काय फॅशन आहे हे त्यांना नाही कळत हो. आपण करू ते काय रूढीबिढीप्रमाणे, पण जरा आजकालच्या पद्धतीनुसार’

‘अगं पण खर्चाचा विचार केला आहेस का? उगाच पैशांची उधळण आहे ही आणि चक्क मनोजला आणि माधुरीला साध्यासोप्या पद्धतीने लग्न करायचं आहे गं. उसने काढून सण कशाला साजरा करायचा? आपण आपले अंथरूण पाहून पाय पसरावे असं मला मनापासून वाटते आणि मी काय म्हणतो हेच उरलेले पैसे आपण मुलांसाठी राखून ठेवूयात ना. खरंतर आता परत जुन्या परंपरा हीच लेटेस्ट फॅशन झाली आहे.’

चक्क बायकोला पण हे नीट समजून सांगितले म्हणून व्यवस्थित पटतेदेखील आणि मग जुनं ते सोनं म्हणत घरातले सगळे एकमत होऊन फॅशन आणि परंपरेची सांगड योग्य रीतीने घालून योग्य निर्णय घेतात. त्यामुळे घरातदेखील एकोपा कायम राखला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -