घरफिचर्ससारांशरॅम्बो, तुला पुन्हा कविता लिहावी लागेल !

रॅम्बो, तुला पुन्हा कविता लिहावी लागेल !

Subscribe

रॅम्बोनं कविता करणं सोडून देणं आणि जग अणुबॉम्बच्या स्वागतास सज्ज होणं याचा सहसंबंध आहे. रॅम्बोनं कवितेला असं वार्‍यावर सोडणं ही बाब मिलरच्या लेखनाचा प्रेरणास्त्रोत आहे. तो म्हणतो, हे जग बदलण्याची ताकद असलेला रॅम्बो कविता लिहिणं थांबवतो आणि जणू हिंसेला मुभा देतो. दिल्लीतल्या खुल्या मैदानात पिस्तूल घेऊन उभा असलेल्या पोराकडं पाहून वाटलं याच्या वाटेवर कुठेच कविता नसेल याला भेटली ?

रात्री उशिरा घरी पोहोचलो आणि स्वाभाविकपणे हात मोबाइलकडे वळला. फेसबुक ओपन केलं तर एकच फोटो व्हायरल झालेला दिसत होता. एक तरुण हातामध्ये पिस्तूल घेऊन उभा. त्याच्यासमोर एक तरुण निधड्या छातीनिशी समोर येतो आहे. पिस्तूल हाती घेतलेल्या तरुणाच्या मागे काही अंतरावर पोलीस उभे. त्यातला एक पोलीस हाताची घडी घालून शांत निर्विकार उभा. माध्यमांचा कुणी प्रतिनिधी कॅमेरा घेऊन सारं चित्रित करतो आहे. एखाद्या नाटकातला प्रसंग वाटावा, असा हा फोटो. अनेकांच्या पोस्टमधून हा फोटो माझ्यापर्यंत येऊन पोहोचला असला तरीही माझा काही विश्वास बसेना. गोदी मीडियाच्या काळात फेक न्यूजचा प्रस्फोट त्यामुळे मी ‘रिव्हर्स इमेज सर्च’ अ‍ॅप्लिकेशनवर फोटो पोस्ट करुन चेक केलं. -Alt news वर जाऊन हा फोटो खरा की खोटा, ही पडताळणी केली आणि खात्री झाली तेव्हा मला धक्काच बसला.

30 जानेवारी 2020 हा तो दिवस. गांधीजींचा स्मृतिदिन. ऐन सकाळी शेकडो लोकांसमोर बरोब्बर 72 वर्षांपूर्वी नथुराम गोडसेने असंच पिस्तूल गांधींवर चालवलं. गांधी मुळात निर्भय माणूस. या आधीही अशा हल्ल्यांना सामोरे गेले होते. ते धारातीर्थी पडले अन्यथा त्यांनी नथुरामचंही ‘हृदय परिवर्तन’ म्हणून प्रयत्न केले असते. नथुराम कसा योग्य आहे, हे जाहीररित्या म्हणणारे तेव्हा फार कुणी लोक नव्हते. त्याला अधिमान्यता मिळणं तर दूरची गोष्ट. पण या तरुणाने हातात पिस्तूल घेऊन हल्ला करणं याची मला काळजी वाटली आणि त्याला सामोरं जाणार्‍या तरुणाविषयी नितांत अभिमानही. याविषयी मेनस्ट्रीम मीडिया फारसा बोलत नाही, याची त्याहून अधिक काळजी वाटली आणि पोलीस अशा प्रसंगी मौनव्रत धारण करत आध्यात्मिक शांततेची साधना करत आहेत, हे पाहून त्यांच्या सहकार्यानेच हा पोरगा भर रस्त्यात उभा राहून पिस्तूल उगारतो आहे, याची खात्री पटली.

- Advertisement -

वयाची अठरा वर्षेही ज्यानं अजून पूर्ण केली नाहीत तो पोरगा ‘ ये लो आजादी’ म्हणत गोळ्या झाडण्याची सांगतो प्रत्यक्षातली कथा तर गांधी-बुद्धाची परंपरा सांगणारी माझ्या देशाची अहिंसेची गाथा !

काळ या क्षणी गोठला आहे आणि या काळाचं सारांश रुपाने चित्रच माझ्या डोळ्यासमोर उभं आहे असं मला वाटलं. अगदी का कोण जाणे, अपघातानं त्याच वेळी ‘The Time of the Assassins’ या हेनरी मिलरच्या पुस्तकाचा महेश एलकुंचवारांनी केलेला अनुवाद हाती पडला. फ्रेंच कवी रॅम्बो याचा काव्यात्म वेध घेणारं हे पुस्तक त्यावेळी हातात येणं हा विलक्षण योगायोगच खरा. एलकुंचवारांनी त्याला शीर्षक दिलं आहे- ‘विनाशवेळा’ !

- Advertisement -

स्वतः एलकुंचवारांनीच असं लिहिलंय की 1977 साली हे पुस्तक हाती आलं आणि आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. किती गंमत आहे- रॅम्बो हा कोण कुठला फ्रेंच कवी (1854-1891), त्याच्या निधनानंतर जन्माला आलेला अमेरिकन लेखक हेनरी मिलर आणि हे सारं काव्यात्म निवेदन आपल्यापर्यंत पोहोचवावं, असं वाटणारे मराठी नाटककार एलकुंचवार. आत्म्याचे बंध भाषेचे बांध जुमानत नाहीत, हेच खरं. तर या रॅम्बोचं आयुष्यच मुळी 37 वर्षांचं आणि त्यात त्यानं वयाच्या 19 व्या वर्षीच कविता करणं सोडून दिलं. हा तपशील समजताच मी थक्क झालो. मिलर म्हणतो, रॅम्बोनं कविता करणं सोडून देणं आणि जग अणुबॉम्बच्या स्वागतास सज्ज होणं याचा सहसंबंध आहे. रॅम्बोनं कवितेला असं वार्‍यावर सोडणं ही बाब मिलरच्या लेखनाचा प्रेरणास्त्रोत आहे. तो म्हणतो, हे जग बदलण्याची ताकद असलेला रॅम्बो कविता लिहिणं थांबवतो आणि जणू हिंसेला मुभा देतो. दिल्लीतल्या खुल्या मैदानात पिस्तूल घेऊन उभा असलेल्या पोराकडं पाहून वाटलं याच्या वाटेवर कुठेच कविता नसेल याला भेटली ? केजरीवाल प्रचारादरम्यान म्हणाले, आम्ही मुलांच्या हाती लेखणी दिली, त्यांनी बंदूक दिली. बंदूक की लेखणी, याचा निर्णय आता तुम्ही करायचा आहे. दिल्लीचा निकाल काय लागायचा तो लागेल; पण या भर रस्त्यात पिस्तूल उगारणार्‍या या पोराचं काय करायचं, हा मोठा सवाल आहे. या काळातली कविता मरत चालल्याने इतकी भयानक क्रूरता निर्माण होत असावी काय ? आजच्या रॅम्बोने कविता लिहिणं सोडून दिलं आहे की रॅम्बो जन्मालाच येऊ नये इतकी निष्ठूर व्यवस्था बनली आहे ? असे अनेक प्रश्न मनात येऊन गेले.

मिलरच्या या पुस्तकातला परिच्छेद वाचून अंगावर काटा आलाः
विज्ञान व शास्त्रज्ञ कितीही नाकबूल करु देत; पण आपल्या हातातली सत्ता किरणोत्सर्गी आहे व सर्वकाळासाठी सर्वविनाशी आहे. काही भलं व्हावं अशा संदर्भात आपण कधी सत्ता पाहिलीच नाही. तिला कायम विनाशासाठी वापरलं आपण. अणुमध्ये रहस्य असं काहीच नाहीए; रहस्य आहे ते माणसाच्या मनात. अणुऊर्जेच्या शोधामुळे एक होणार आहे मात्र. आता आपण कधीही एकमेकांवर विश्वास ठेवू शकणार नाही. हाच मोठा घात आहे. आपल्या बांधवांचा ज्यानं विश्वास गमावलाय, तोच खरा द्रोही. श्रद्धेचा लोप आता सार्वत्रिक आहे. प्रत्यक्ष परमेश्वरही इथं हतबल आहे. आपण आपली श्रद्धा अणुबॉम्बला वाहिली आहे, आपल्या प्रार्थनांना आता अणुबॉम्बच उत्तर देईल.

किरणोत्सर्गी असणारी ही सत्ता कशी हाताळायची हा मोठा यक्षप्रश्न आहे. आपल्या प्रार्थनांना अणुबॉम्बनेही उत्तर मिळू नये नि या पोराच्या पिस्तुलाचंही उत्तर मिळू नये. यासाठी मुळापासून विचार बदलावा लागेल. नथुरामाला शिव्या घालून हे होणार नाही. नथुरामाची महानता सांगणारी एक अधिमान्यताप्राप्त व्यवस्था निर्माण होईस्तो आपण गप्प राहिलोत, हा मोठा अपराध आहेच खरा; पण रॅम्बोने कविताही सोडली हा त्याहून मोठा गुन्हा आहे. लौकिकाला न भिडता असे पळून जाता येणार नाही. आपल्या प्रार्थना अधिक फलदायी ठरण्यासाठी या बंदुकीच्या जागी लेखणी कशी येईल, कुंचला कसा येईल, हाच विचार करावा लागेल. तो बदल शक्य आहे. अन्यथा क्रोनॉलॉजी समजून घेण्यात वेळ जाईल; क्रोनॉलॉजी बदलावीही लागेल. अर्थात रॅम्बोला पुन्हा कवितेच्या गावी यावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -